बुधवार, ८ जुलै, २०२०

एक ‘राजगृह’ माझंही असावं...


 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ५० हजार ग्रंथसंपदेसाठी बांधलेल्या 'राजगृह' या ऐतिहासिक वास्तूवर काही कंटकांनी दि. ७ जुलै २०२० रोजी दगड भिरकावून तेथे नासधूस केली. या घटनेचा निषेध करीत असताना मनात उमटलेली प्रतिक्रिया...)

आश्चर्य अजिबातच वाटलं नाही मला...

ना खंत वाटली... ना खेद दाटला...

राग येऊन दातओठ खावेसेही नाही वाटले...

कारण...

त्या दगड भिरकावणाऱ्या हातांनी,

अनपेक्षित असे काहीच केले नव्हते...

हां... केले असेल ते इतकेच...

की प्रत्यक्ष कृती केली!

अप्रत्यक्षपणे रोज कणाकणाने,

तीळातीळाने, कुणाच्याही नकळत...

माझ्या बाबाला बदनाम करण्याचे काम

सुरूच तर आहे गेली कित्येक वर्षे...

त्याच्या हयातीतही ते करीतच होते...

त्यांच्या माघारी तर काय?...

रानच मोकळे सारे...

कुठे पुतळ्याला चप्पल घाल...

कधी काळे फास...

तर कधी घाव घालून मोडतोड...

कसला हा निलाजरा भ्याडपणा...!

अरे, हा बाप माझा...

उभा राहिला छाती ताणून,

ताठ मानेने, भीमगर्जना करीत...

इथल्या नीच जातीभेदाच्या विरोधात...

फक्त न् फक्त शब्दांचे अस्त्र वापरीत...

पुस्तकांची रसद उभारीत...!

दिलंय त्यानंच तुम्हाला संविधान...

त्यातल्या स्वातंत्र्याच्या मूल्यासकट...

ज्याचा उपयोग तुम्ही त्याच्यावरच

दगड भिरकावण्यासाठी करताय...

पण, लक्षात ठेवा...

तुमच्यानं ते कदापि होणार नाही...

हातात कुठलंही शस्त्र असलं तरी...

रिकाम्या डोक्यांनी कधीच कुठलं काम होत नसतं...

चांगलंही अन् वाईटही...!

आमच्या बापानं...

ज्यानं पुस्तकांसाठी घर बांधायचा संस्कार दिलाय

इथल्या मुला-मुलाला...

त्या बापाची पोरं आहोत आम्ही...

जी स्वप्नं पाहतात राजगृहाची...

एक 'राजगृह' माझंही असावं म्हणून...

ज्यात असेल जागा खास...

त्याच्या पुस्तकांसाठी...

आणि असेल त्याचं एक जग...

त्याचं अन् त्याच्या बापाचं...

जे मिळून ठरवतील भवितव्य या देशाचं...

जो घडेल तुम्ही भिरकावलेल्या दगडांतूनच...

फासलेल्या डांबरातूनच... घातलेल्या घावातूनच...

कारण...

ही प्रत्येक गोष्ट जाणीव करून देते...

आम्हाला आमच्या आस्तित्वाची...

उरलेल्या लढाईची...

समता संघर्षाची...!!!

 

-    आलोक प्रियदर्शन

 


1 टिप्पणी: