- (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांचे मैत्रबंध अगदी वेगळ्या प्रकारचे होते. त्यांच्या या मैत्रपर्वावर यंदाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्याची संधी सन्मित्र मोहसीन मुल्ला यांच्या आग्रहामुळे लाभली. हा लेख 'पुढारी ऑनलाईन'वर दि. ६ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला. 'पुढारी ऑनलाईन'च्या सौजन्याने तो माझ्या ब्लॉगवाचकांसाठी सादर करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)
आचार्य अत्रे यांच्या ‘महात्मा फुले’ चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी (दि. ४ जानेवारी १९५४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माई आंबेडकर यांच्यासमवेत (डावीकडून) अभिनेते बाबूराव पेंढारकर, सुलोचना (महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत), आचार्य अत्रे, त्यांच्या पाठीमागे शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे आदी. या चित्रपटाला शुभेच्छा देताना बाबासाहेब म्हणाले होते की, “आजकाल जो उठतो तो राजकारण किंवा चित्रपटाच्या मागे लागलेला दिसतो. परंतु, सामाजिक सेवेचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. अत्रे यांच्या या चित्रपटाने भारताचे महान समाजसुधारक महात्मा फुले यांच्या स्मृती पुन्हा नव्याने जागविल्या जातील.” तर, अत्रे म्हणाले होते की, “महात्मा फुले यांचे सच्चे वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. म्हणूनच या चित्रपटाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणे हा दुग्धशर्करा योग आहे.” या चित्रपटाला राष्ट्रपतींचे रजतपदक प्रदान करण्यात आले. बाबासाहेबांनीही हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी अत्र्यांचे अभिनंदन केले. दि. २० जानेवारी १९५५ रोजी अत्रे यांना पत्र पाठवून “विषयाची रचना आणि सादरीकरण या अंगांनी हा चित्रपट उत्कृष्ट आहे,” असे कळविले. या चित्रपटाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे याचे निवेदन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले होते. यात संत गाडगे बाबांचे कीर्तन होते आणि आचार्य अत्रेंनी स्वतः कर्मठ तेलंगशास्त्र्याची खलभूमिका साकारलेली होती. (छायाचित्र भारिप बहुजन महासंघ, खारघर यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार)
आचार्य प्र.के. अत्रे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या
बरोबरीने मला आठवण येते ती ज्येष्ठ साहित्यिक, संपादक आचार्य प्र.के. अत्रे यांची! त्याचे कारण म्हणजे या
दोघांमध्ये असणारे अतूट असे मैत्रबंध होय. खरे तर, सुरवातीच्या काळात अत्रे
बाबासाहेबांकडे काँग्रेसी चष्म्यातून पाहात असत. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांवर
पराकोटीची टीकाही केली. मात्र, बाबासाहेबांनी घटना समितीत केलेल्या जाज्ज्वल्य
भाषणामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि पुढे बाबासाहेबांशी थेट परिचय झाल्यानंतर
अत्रे त्यांच्या अखंड प्रेमात राहिले. हे प्रेम त्यांनी अखेरपर्यंत जपलेच, शिवाय,
बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जयंतीला आणि महापरिनिर्वाण दिनाला मराठा,
नवयुगमधून त्यांच्या आठवणी सातत्याने जागविल्या.
अत्रेंच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, “डॉ. आंबेडकरांचा एक वेळ मी कठोर टीकाकार होतो.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा जेव्हा सुरू होता,
त्या वेळी देशातील सर्व राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी त्या लढ्याचा पुरस्कार
करावा, असे मला वाटत होते. ह्या दृष्टीने डॉ. आंबेडकर व सावरकर यांच्या त्या
वेळच्या भूमिका मला अयोग्य वाटत होत्या. तथापि, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
दलितांच्या आणि हिंदू समाजाच्या हिताचे काँग्रेसने फार मोठे नुकसान केले, हे दिसून
आले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताच्या फाळणीला मान्यता देऊन काँग्रेसने देशाचा
जो घात केला, त्या इतिहास क्षमा करणार नाही. डॉ. आंबेडकरांनी या महान संकटाचा
इशारा पूर्वीपासून दिला होता. पुढे घटना समितीमध्ये डॉ. आंबेडकर ह्यांनी अखंड
भारताच्या पुरस्काराची जी तेजस्वी घोषणा केली, त्या वेळी त्यांच्या प्रखर
देशभक्तीचे साऱ्या देशाला दर्शन झाले, आणि तेव्हापासून त्यांच्या चरित्राबद्दल आणि
कर्तृत्वाबद्दल मला विलक्षण आदर वाटू लागला. त्यानंतर त्यांचा नि माझा परिचय झाला
आणि त्या परिचयाचे रुपांतर दृढ स्नेहात झाले. त्यांच्या सहवासात येण्याची
कित्येकदा संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे मला जे देदिप्यमान
दर्शन झाले, त्याच्या स्मरणाने अद्यापही भावना दीपून जातात. आंबेडकर ह्यांच्याएवढा
विशाल बुद्धिमत्तेचा आणि प्रचंड धैर्याचा पुरूष भारतात पुन्हा होणे नाही.
भारताच्या राजकीय, धार्मिक जीवनात क्रांती करून त्यांनी भारताच्या सामाजिक विचारात
आणि तत्त्वज्ञानात मोलाची भर घातलेली आहे. तथापि, आंबेडकरांच्या अथांग विद्वत्तेची
आणि विचारांची अद्याप भारताला पुष्कळच ओळख व्हावयाची आहे. ती ज्या दिवशी समग्रपणे
होईल, त्या दिवशी त्यांच्या कर्तृत्वाचा जनतेला साक्षात्कार होईल. भारताच्या
इतिहासातील एक युगप्रवर्तक पुरूष असाच डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करावा लागेल.”[1]
आचार्य अत्रे म्हणजे खुल्या दिलाचा माणूस. त्यांच्या व्यक्तीमत्त्वात
एक प्रकारचा सच्चेपणा आढळतो. पटलं तर प्रेम, नाहीतर वेशीवर टांगायला कमी न करणारा
हा माणूस बाबासाहेबांच्या मात्र प्रचंडच प्रेमात पडलेला होता. आणि हे त्यांचे
प्रेमही एकतर्फी नव्हते. बाबासाहेबांनीही त्यांचे हे मैत्रीबंध तितक्याच
आत्मियतेने स्वीकारले होते. एरव्ही आपला वाढदिवस साजरा करण्याच्या विरुद्ध
असणाऱ्या बाबासाहेबांनी ५५व्या वाढदिवशी अत्रेंना ‘नवयुग’चा खास अंक काढण्याची
परवानगी दिली. त्याची हकीकतही अत्रेंनी लिहून ठेवली आहे. “आम्ही
बाबासाहेबांकडे संदेश मागावयास गेलो. बाबासाहेब हसून म्हणाले, ‘महाराचा कसला वाढदिवस साजरा करताहात?’ त्यांच्या या
प्रश्नाला उत्तर देण्याचे आम्हाला काय तोंड होते? आम्ही खाली
मान घातली आणि गप्प बसलो. तेव्हा बाबा एकदम गंभीर झाले. आमची भावना त्यांना कळली.
ते म्हणाले, ‘खरं सांगू? व्यक्तीशः
माझा वाढदिवस साजरा व्हावा, हे मला मुळीच आवडत नाही. या देशात अवतारी पुरूष आणि
राजकीय पुरूष ह्या दोघांचेच जन्मदिवस पाळले जातात. फार दुःखाची गोष्ट आहे ही. मी
लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतीपूजा कशी आवडेल?
विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याच्याबद्दल प्रेम
बाळगा. आदर दाखवा. पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा कसली करता? त्यामुळे पुढाऱ्यांबरोबर भक्तांचाही अधःपात होतो.’
बाबा बोलत होते आणि आम्ही त्यांचे शब्द टिपून घेत होतो. ‘हा
झाला आमचा स्पृश्यांना संदेश.’ आम्ही म्हणालो, ‘आता अस्पृश्यांना तुमचा संदेश द्या पाहू!’ ‘अस्पृश्यांना काय देऊ संदेश?’ डोळे अर्धवट मिटून
बाबासाहेब स्वतःशीच पुटपुटले. इतक्यात त्यांना कसी तरी आठवण झाली. ते म्हणाले, ‘ग्रीक पुराणातील एक गोष्टच मी तुम्हाला सांगतो. होमरने आपल्या महाकाव्यात
सांगितली आहे. डिमेटर नावाची एक देवता मनुष्यरुप धारण करून पृथ्वीतलावर आली. एका
राणीने आपले तान्हे मूल सांभाळायला तिला राजवाड्यात नोकरीस ठेवले. त्या लहान मुलाला
देव बनवावे, अशी त्या देवतेला इच्छा आली. म्हणून ती रोज रात्री सारी मंडळी झोपली
की सारी दारे बंद करी. मुलाला पाळण्यातून काढी आणि त्याचे कपडे उतरवून त्याला
जळत्या निखाऱ्यांवर ठेवी. हळूहळू निखाऱ्यांची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या
मुलामध्ये उत्पन्न झाले. त्याचे बळ वाढू लागले. त्याच्यात अत्यंत तेजस्वी असा दैवी
अंश विकसित होऊ लागला. पण, एका रात्री त्याची आई एकाएकी त्याच्या खोलीत शिरली.
तिच्या दृष्टीस तो प्रकार पडताच ती भयंकर संतापली. तिने मूल चटकन निखाऱ्यांवरुन
उचलून घेतले आणि त्या देवतेला हाकलून दिले. अर्थात राणीला तिचे मूल मिळाले, मात्र
त्याचा ‘देव’ जो होणार होता, त्या
देवाला मात्र ती मुकली! ही गोष्ट हाच अस्पृश्यांना माझा
संदेश! तो हा की, विस्तवातून गेल्यावाचून देवपण येत नाही.
दलित माणसाला हालअपेष्टांच्या आणि त्यागाच्या आगीमधून जावयालाच पाहिजे. तरच त्याचा
उद्धार होईल... आजपर्यंत आम्ही अस्पृश्यांनी हजारो वर्षे हाल सोसले आहेत. छळ सोसला
आहे. झगडा केला आहे. पण, इतके असूनही मी पुन्हा हाच संदेश देतो की, झगडा, आणखी
झगडा. त्याग करा, आणखी त्याग करा. त्यागाची आणि हालांची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल.
प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे. आपले कार्य
पवित्र आहे, यावर त्यांचा दृढविश्वास असला पाहिजे.’ बाबासाहेबांचे
ते दिव्य शब्द आजही आमच्या कानात घुमत आहेत.”[2]
अत्रे यांच्याशी घनिष्ट संबंध असले तरी बाबासाहेबांकडे एखादा मतभेदाचा
मुद्दा उपस्थित झाला, तरी ते मित्राची बाजू उचलून न धरता, योग्य बाजूने उभे राहात.
याचा एक गंमतीदार किस्सा एस.एम. जोशी यांनी आपल्या ‘मी एस.एम.’ या आत्मचरित्रात
सांगितला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या त्या कालखंडात एस.एम. आणि अत्रे
यांच्यात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यावरुन मतभेद निर्माण झाले. कोणत्याही
परिस्थितीत सत्तेत सहभागी होऊ नये, असे एस.एम. यांचे म्हणणे होते, तर सत्तेत जाऊन
लढाई जारी राखावी, असे अत्रे यांचे! हा मुद्दा घेऊन हे दोघे
बाबासाहेबांसमोर उपस्थित झाले. बाबासाहेब आपल्या बाजूने मत देतील, याची अत्रेंना
जणू खात्रीच होती. पण, “जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि
मुंबई हवी असेल तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये,” असे बाबासाहेबांनी सांगितले. बाबासाहेबांचा हा निवाडा अत्र्यांनी लगेच
मान्य केला. या प्रसंगाबद्दल एस.एम. यांच्याशी बोलताना अत्रे म्हणाले, “बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची.”
गंमतीचा भाग सोडा, पण अत्रे यांचा स्वभाव माहिती असणाऱ्यांना लक्षात येईल की,
अत्रे आपल्या मताबद्दल किती आग्रही असत. मात्र, बाबासाहेबांच्या मुखातून आलेला
निवाडा मात्र त्यांनी अगदी मनापासून स्वीकारला. यातून त्यांचे त्यांच्यावरील
प्रेमच दिसून येते. महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाचा प्रारंभ करीत असताना
मुहूर्ताच्या पहिल्या दृश्याच्या चित्रिकरणावेळी सुद्धा त्यांनी बाबासाहेबांना
आग्रहपूर्वक बोलावले आणि बाबासाहेबही तितक्याच प्रेमाने उपस्थित राहिले.
या दोघांचे हे मैत्र अखेरपर्यंत अबाधित राहिले. आपल्या मृत्यूच्या दोन
दिवस आधी म्हणजे ४ डिसेंबर १९५६ रोजी संध्याकाळी बाबासाहेबांनी दोन पत्रे
स्वहस्ताक्षरात लिहीली. त्यापैकी एक आचार्य अत्रे यांना, तर दुसरे एस.एम. जोशी
यांना होते.[3]
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या ह्या दोघा आघाडीच्या नेत्यांनी आपण काढीत असलेल्या
रिपब्लिकन पक्षाला येऊन मिळावे, अशी विनंती त्या पत्रांत बाबासाहेबांनी केलेली
होती.[4] ५
डिसेंबरच्या रात्रीही आपले सहाय्यक नानकचंद रत्तू हे निघत असताना त्यांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकासाठी लिहीलेल्या उपोद्घात व प्रस्तावनेची टंकलिखित प्रत आणि ही
दोन पत्रे आपल्या उशाला ठेवण्यास सांगितले होते- अखेरचा हात फिरविण्यासाठी. कदाचित
त्यांनी हाताळलेली ही अखेरचीच पत्रे ठरली असावीत. कारण त्या रात्री झोपेतच त्यांचे
प्राणोत्क्रमण झाले.
दि. ७ डिसेंबर १९५६ रोजी सुमारे दहा लाखांच्या जनसागराच्या साक्षीने
बाबासाहेबांची मुंबईत राजगृहापासून दादर चौपाटीपर्यंत जी महापरिनिर्वाण यात्रा
सुरू झाली, त्या यात्रेच्या अग्रभागी आचार्य अत्रे होते. दादर येथे ही महायात्रा
पोहोचल्यानंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहाच्या साक्षीने त्या प्रचंड
जनसमुदायासमोर त्या प्रसंगी केवळ एकमेव भाषण झाले ते आचार्य अत्रे यांचे.
तत्पूर्वी, दादासाहेब गायकवाड यांनी, १६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांनी मुंबई येथे जो
धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला होता, तो विधी त्यांच्या पार्थिव देहाच्या
साक्षीने दादासाहेबांनी तेथे पार पाडला. लाखो लोकांनी त्यावेळी साश्रूपूर्ण
नयनांनी धम्मस्वीकार केला.
त्यानंतर भिक्खू आनंद कौसल्यायन यांच्या अनुमतीने आचार्य अत्रे यांनी
जे भाषण केले, त्यावेळी त्या लाखोंच्या जनसागराच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे दृश्य
दिसले. अत्रे म्हणाले, “मराठी पत्रकार व लेखक यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला
श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच
मला कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी
माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या
नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप
घातली? महापुरूषाचे जीवन पाहू नये, असे म्हणतात. पण, त्यांचे
मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य
त्यांना लाभले. भारताला महापुरूषांची वाण कधी पडली नाही. परंतु, असा युगपुरूष
शतकाशतकांत तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा
त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा
बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरूष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा
घेत आहे. त्यांचे वर्मन करण्यास शब्द नाहीत. अशी एकही गोष्ट नाही की, ज्याविरुद्ध ‘बाबां’नी बंड पुकारले नाही. अन्याय, जुलूम,
जबरदस्ती, विषमता जेथे दिसली, तेथे त्या वीराने आपली गदा उगारली. बौद्ध धर्म
स्वीकारून हिंदू धर्मावर सूड घ्यावा, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यांच्या
इच्छेप्रमाणे लोकसभेने हिंदू कोड बिल मंजूर केले असते, तर त्यांनी धर्मांतर केलेच
नसते. हिंदू धर्म सुधारण्यासाठीच त्यांनी हा क्रांतीकारक निर्णय घेतला. सूड
घेण्यासाठी नव्हे.”[5]
बाबासाहेबांच्या मृदू अंतःकरणाचे वर्णन करताना आचार्य अत्रे पुढे
म्हणाले की, “महात्मा गांधींना वाचविण्यासाठी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांचे नुकसान
करूनही त्यांनी पुणे करारावर सही केली. ते कच्च्या गुरूचे चेले नव्हते. बुद्ध,
कबीर व फुले हे त्यांचे गुरू होते. अस्पृश्यता जाळा, जातिबेद जाळा, मनुस्मृती जाळा
असे म्हणणारा हा पुरूष स्वतंत्र भारताच्या घटनेचा शिल्पकार बनला. त्यांना आम्ही
छळले- सरकारने छळले- अशा वेळी कुठे जावे त्यांनी? शेवटी
भगवान बुद्धाला ते शरण गेले व त्याने त्यांना कायमचा आश्रय दिला. (यावेळी सारा
जनसमुदाय ओक्साबोक्शी रडू लागला.) सात कोटी लोकांच्या उद्धारासाठीच त्यांनी
बुद्धाला कवटाळले.
अशा परिस्थितीत, मी हिंदू म्हणून जन्मलो, तरी हिंदू म्हणून मरणार
नाही, असे जे ते बोलले, ते काय रागावून बोलले? हिंदू धर्माचे तेच खरे उद्धारकर्ते होते, हे पुढे
कळून येईल. बाबा अत्यंत आणीबाणीच्या वेळी आम्हाला सोडून गेले. संयुक्त
महाराष्ट्राचा पाळणा त्यांनी हलविला. मुंबई परमेश्वराने महाराष्ट्राला दिली, ती
कुणाच्या बापाला महाराष्ट्रापासून हिरावून घेता येणार नाही, असे ते म्हणाले. आता
मुंबईचा लढा आम्ही कुणाच्या नेतृत्वाखाली लढवायचा? शोक करणे
त्यांना आवडणार नाही. आज त्यांचा प्राण त्यांच्या कुडीतून बाहेर पडून सात कोटी
अस्पृश्यांच्या शरीरात शिरला आहे. त्यांचे चारित्र्य, निर्भयपणा व दुसरे गुण अंगी
बाणवून आपण त्यांचे कार्य पुरे केले पाहिजे.”[6]
त्यानंतर चंदनाच्या चितेवर चढविलेल्या बाबासाहेबांच्या पार्थिवाला
यशवंतरावांच्या हस्ते संध्याकाळी सव्वासात वाजता अग्नी देण्यात आला. या
महापरिनिर्वाण यात्रेचे संपूर्ण धावते वर्णन ऑल इंडिया रेडिओवरुन ध्वनिक्षेपित
करण्यात आले आणि ती कामगिरी पु.ल. देशपांडे पार पाडीत होते.[7]
यानंतर दि. ७ डिसेंबर ते १९ डिसेंबर १९५६ या कालावधीत ‘मराठ्या’तून अत्रेंनी बाबासाहेबांच्या स्मरणार्थ तेरा अग्रलेखांची मालिका लिहीली.
हे सारे अग्रलेख बाबासाहेबांच्या तेजस्वी प्रतिमेला आणि कारकीर्दीला ‘अत्रे उवाच’ पद्धतीने उजाळा देणारे आहेत. पहिल्या
अग्रलेखातच ‘दलितांचे ‘बाबा’ गेले..’ असा टाहो फोडतात आणि तेथून ‘मानव धर्माचा प्रेषित’ होण्यापर्यंतच्या त्यांच्या
वाटचालीचे परिशीलन करतात. याच काळात ‘नवयुग’मध्येही ‘भारताचा उद्धारकर्ता महात्मा’ असा त्यांचा सार्थ गौरव करतात. सच्चे ब्रह्मर्षी, समतायोगी, नवभारताचे
निर्माते अशा विशेषणांची खैरात बाबासाहेबांवर करताना अत्रे थकत नाहीत. “आंबेडकर हे सात कोटी अस्पृश्यांचे कल्याणकर्ते नव्हते, तर पंचवीस कोटी
स्पृश्यांचे उद्धारकर्ते होते. विभूतीपूजा आणि ढोंग ह्याने साऱ्या हिंदू समाजाचा
अधःपात झालेला होती. म्हणून त्या विभूतीपूजेवर आणि ढोंगावर घमाचे घाव घालून त्या
खोट्या मूर्ती आंबेडकरांनी फोडून टाकल्या आणि ‘बुद्धीची नि
मानवतेची पूजा करा’, अशी देशाला शिकवणूक दिली... भारताच्या
धार्मिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी सारा जन्म ज्यांनी
जुलूम, असत्य आणि ढोंग ह्यांच्याशी निकराने झुंज दिली असा लोकोत्तर धैर्याचा,
वज्रकठोर छातीचा आणि कुसुमकोमल हृदयाचा महात्मा म्हणून डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
यांचे नाव भारताच्या इतिहासात चिरंतन प्रकाशत राहील!”[8] असे अत्रे म्हणतात.
या मालिकेच्या पलिकडे मराठ्यातून दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाला ते ‘मराठ्या’तून दरवर्षी बाबासाहेबांच्या आठवणी जागवत असत. मुंबईच्या महापौर पदावर
प्रथमच दलित समाजातील पी.टी. बोराळे यांची निवड झाल्याची वार्ता (१९५९) अत्रेंच्या
कानी येते, अगदी त्या क्षणी सुद्धा अत्रेंच्या मनात बाबासाहेबांचा विचार तरळतो आणि
त्यांच्या हातून अग्रलेख कागदावर उमटतो, ‘आज बाबा असते तर...’! ते लिहीतात, “या देशातील सर्वश्रेष्ठ नगरीचा सर्वश्रेष्ठ
नागरिक म्हणून एका अस्पृश्याच्या नावाने द्वाही फिरताना आणि ब्राह्मणांपासून सर्व
जातीजमातींच्या हजारो लोकांच्या मुखातून एका ‘महारा’च्या (हे बाबासाहेबांनी अत्रे यांना मुलाखत देताना स्वतःसाठी वापरलेले
संबोधन अत्रे येथे मोठ्या खुबीने वापरतात. त्याकडे जातीवाचक अर्थाने पाहून चालत
नाही.) नावाचा जयघोष होताना आम्ही या कानांनी ऐकला. जेव्हा रिपब्लिकन पक्षाचे नेते
पी.टी. बोराळे महापौर पदाच्या खुर्चीवर आरुढ होण्यासाठी चालू लागले, तेव्हा
त्यांच्या प्रत्येक पावलाखाली अस्पृश्यतेचा अन्याय तुडविला जात आहे, असे आम्हाला
वाटले. जेव्हा त्यांच्या गळ्यात पुष्पहार पडू लागले, तेव्हा त्या प्रत्येक
हारागणिक जातिभेदाच्या राक्षसाच्या गळ्याबोवती करकचून फास आवळले जात आहेत, असा
आम्हाला भास झाला. आमच्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली आणि त्याच वेळी एका
आठवणीने आमचे मन व्याकुळ होऊन आमच्या मुखातून उद्गार निघाले, ‘बाबासाहेब आंबेडकर, आज आपण इथे हवे होता’!”
धन्य ते बाबासाहेब आणि धन्य त्यांचा हा अत्रे नावाचा सखा!
(लेखक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या
विचार व कार्याचे अभ्यासक)
[1]
अत्रे, प्र.के. : दलितांचे बाबा, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई,
(आठवी आवृत्ती, २००२), प्रास्ताविकातून
[2] अत्रे: कित्ता, पृ. ४७-४८
[3]
खैरमोडे, चां.भ.: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड १२, सुगावा
प्रकाशन, पुणे (दुसरी आवृत्ती, २०००) पृ. ११०
[4]
कीर, धनंजय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
(पाचवी आवृत्ती, २०१६), पृ. ५०८
[5]
खैरमोडे: कित्ता, पृ. १३०
[6]
खैरमोडे: कित्ता, पृ. १३१
[7]
खैरमोडे: कित्ता, पृ. १३१
[8]
अत्रे: कित्ता, पृ. ७६-७७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा