गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

वस्त्यांची नावे आणि ‘गरूड’कार दादासाहेब शिर्के

'गरूड'कार दा.म. शिर्के


महाराष्ट्र शासनाने काल राज्यातील विविध (अर्थातच मागासवर्गीय) वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय घेतला. जातीऐवजी वस्त्यांना महापुरूषांची नावे देण्याचा स्वागतार्ह निर्णयही घेतला. ही बातमी काल ऐकली आणि तेव्हापासून गरूडकार दादासाहेब तथा दा. म. शिर्के यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी गरूडमधून कोल्हापूर म्युनिसिपालिटीला केलेली सूचना माझ्या मनात घोंघावू लागली. दादासाहेब शिर्के (१९०७-१९८५) हे कट्टर आंबेडकरवादी व्यक्तीमत्त्व. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन हयातभर त्यांनी परिवर्तनाच्या चळवळीला स्वतःला वाहून घेतलेले. कोल्हापुरातील दलित चळवळीतील एक महत्त्वाचं नाव. सन १९२६मध्ये त्यांनी गरूड साप्ताहिक सुरू केलं आणि दलितांच्या न्याय्य हक्कांचा उच्चार केला. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते दलितांमधील पहिले आमदार म्हणूनही निवडून आले होते.

तर, दादासाहेबांची मला आठवण होण्याचे कारण म्हणजे त्यांनी दि. २८ जून १९२८च्या गरूडच्या अंकात एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना 'कोल्हापूर म्युनिसिपालिटीस सूचना' या शीर्षकाखाली केली होती. त्यात पालिकेने ठिकठिकाणी लावलेल्या 'ढोर गल्लीकडे', 'महार वाड्याकडे' वा 'मांग वाड्याकडे' अशा जातिवाचक उल्लेख असणाऱ्या नव्याने लावलेल्या पाट्या काढून टाकण्याची सूचना दादासाहेबांनी केली होती. राजर्षी शाहू महाराजांनी बहिष्कृत शब्दालाच बहिष्कृत केले असून अस्पृश्य समाजाला आपल्या मानवी हक्कांबद्दल जाणीव झाली आहे. त्यामुळे पूर्व बहिष्कृतांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशा पाट्या लावाव्यात, असे त्यांनी त्यात सुचविले होते. आज ९२ वर्षांनंतर शासनाने राज्य स्तरावर हा कृतीशील निर्णय घेतला, त्याचे स्वागत करायलाच हवे. पण, दादासाहेब आपल्यापेक्षा ९२ वर्षे पुढे होते, हेही या ठिकाणी मान्य करायला हवे.

शासनाच्या सामाजिक समतेसाठीच्या या निर्णयामुळे मागास वस्त्यांची जातिवाचक नावे बदलतील. पण, महापुरूषांच्या जाती मात्र निघू लागतील, हेही खरे आहे. तसेही आपण आधीच अशा महापुरूषांच्या जातीजातींत वाटण्या करून रिकामे झालो सुद्धा आहोत. आता प्रत्येत जात, जमात, वस्ती आपापल्या जातीतील महापुरूष, महास्त्रिया शोधू लागतील, आणि त्यांची नावे वस्तीसाठी पुढे करतील. आजही आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर म्हटलं की तिथं महार, नवबौद्धच असणार, हे वेगळे सांगावे लागत नाही. तसेच, अण्णाभाऊ साठे नगरात मातंगांशिवाय दुसरे कोण बरे असणार? आपल्याला खरे तर हे चित्र बदलण्याची गरज आहे. का बरे, एखाद्या महारवाड्याला टिळक- सावरकरांचे नाव असू नये? का एखाद्या ब्राह्मण आळीने आंबेडकरांचे, शाहू-फुल्यांचे नाव मिरवू नये? का दलवाईंच्या नावाने एखादी बहुसंख्यकांची वस्ती असू नये? ही समरसता साधली जाणे, हे माझे स्वप्न आहे. भलेही ते आज कोणाला दिवास्वप्न वाटो, पण शासनाच्या कालच्या निर्णयामुळे अशा अनेक सकारात्मक आशा मनी जागल्या आहेत, एवढे नक्की!

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा