माझा
मोबाईल वाजतो... मी उचलतो...
पलिकडून
फोनवरील आवाज: सर, नमस्कार!
मी: नमस्कार! बोला...
प.फो.आ.: सर, मी गतिमान चॅनलमधून बोलतो
आहे. फलाणा माझं नाव...
मी: हो, बोला ना. काय काम आहे?
प.फो.आ.: सर, आपण जाणताच की, काही दिवसांतच
आपले महान नेते स्व. अमूक यांची जयंती साजरी होत आहे.
मी: हो ना.
प.फो.आ.: त्या निमित्ताने आमच्या चॅनलने
त्यांच्या विचार व कार्याचे अभ्यासक असणाऱ्या काही महत्त्वाच्या विचारवंतांच्या
मुलाखती घेण्याचे ठरविले आहे. आणि त्या दिवशी संपूर्ण दिवसभर आम्ही या मुलाखती
प्रसारित करणार आहोत.
मी: अरे व्वा! छानच आहे उपक्रम. यासाठी माझी काय मदत लागेल?
प.फो.आ.: सर, या नेत्याच्या संदर्भात आपला दांडगा
अभ्यास आहे. आपण संशोधनही केले आहे त्या संदर्भात. तर आपलीही मुलाखत या
उपक्रमांतर्गत घ्यावी, असे आम्ही ठरविले आहे. (इथे आमच्या मनाला गुदगुल्या होऊ
पाहताहेत. छातीही अभिमानाने ५६ इंचांकडे धाव घेऊ लागते, हे विनम्रपणाने नमूद करतो.)
आपल्यासारखे काही लोक आम्ही निवडले आहेत. प्रत्येकी साधारण २० ते २५ मिनिटांचा वेळ
असेल.
मी: व्वा, व्वा! ही तर खूपच चांगली गोष्ट आहे.
यामुळे दर्शकांना आपल्या नेत्याच्या वेगवेगळ्या पैलूंचा परिचय होण्यास खूपच मदत
होईल. नव्या पिढीलाही त्यांचे कार्य माहिती होईल.
प.फो.आ.: हो ना सर. म्हणूनच आम्ही अत्यंत आवर्जून
हा दिवस पूर्णपणे त्यांच्या स्मृती जागविण्यासाठीच राखून ठेवलाय.
मी: बरं. मग, माझ्यासाठी कोणता विषय
निवडलाय आपण? की मीच सुचवायचा आहे?
प.फो.आ.: तसे काही नाही सर. आपण
मुलाखतीच्या आधी दहा एक मिनिटे बोलू आणि करून टाकू या.
मी: तसे कसे? मुलाखतीचा विषय, प्रश्न ठरविल्याखेरीज पुढे कसे
जायचे? तसे नसल्यास मुलाखतीसाठी कन्टेन्टची मर्यादा पडेल ना? आधी थोडी पूर्वतयारी केली की
दर्शकांना चांगल्यात चांगली माहिती देता येईल आपल्याला.
प.फो.आ.: तसे काही ठरविलेले नाही. पण पाहता
येईल.
मी: ??? (प्रश्नचिन्हांकित मोठा पॉझ)
प.फो.आ.: सर, आणखी एक महत्त्वाचे...
मी: हो, ऐकतोय. बोला.
प.फो.आ.: सर, या मुलाखतींसाठी आम्ही साधारणतः
पाच हजार रुपये इतका दरही ठरवलाय...
मी: (थोडासा सटपटून) अरे, इतके कशाला? दोन हजारही पुरेसे
होतील...
प.फो.आ.: नाही सर. दोन हजारांत परवडत
नाही...
मी: म्हणजे..?
प.फो.आ.: म्हणजे असं की सर, आम्ही तुमची
मुलाखत घेणार, तुम्हाला आमच्या चॅनलवर दिवसभर दाखविणार. यासाठी आमचा खर्चच पाच
हजारांत जातो...
मी: म्हणजे तुम्ही माझ्याकडूनच पैसे
घेणार? मला वाटलं मानधनाबद्दल
बोलताय...
प.फो.आ.: काही तरीच काय सर? आम्ही तुमची प्रसिद्धी करणार तर
त्यासाठी काही तरी दर आकारणारच ना?
मी: अरे हो. पण, तुम्हीच मला फोन करून
विचारताहात ना? मी तुमच्या मागे लागलो
होतो का, माझी मुलाखत घ्या, प्रसिद्धी करा म्हणून?
प.फो.आ.: नाही सर. आम्हीच आपल्यासारख्या प्रसिद्धीपासून ‘वंचित’ (मघाचे
हे ‘महत्त्वाचे विचारवंत’ बरं!) लोकांची यादी करून त्यांच्या मुलाखतींचे नियोजन
केले आहे. (इथे त्याला ‘गाठून
बकरा करायचे ठरविले’,
असे अभिप्रेत असावे.)
मी: नाही बुवा... पैसे देऊन अशी
प्रसिद्धी मिळविणे काही पटत नाही... आणि मला त्याची गरजही वाटत नाही... तुम्ही एक
वेळ पाच हजारांची पुस्तकं घेऊन माझ्याकडं आला असतात, तर मी खुशीनं काढून दिले
असते... पण, हे काय भलतंच?
प.फो.आ.: मग काय करू सर? तुम्ही नाही म्हणताय?
मी: हो. हे काही माझ्या बुद्धीला पटत
नाही. मी काही पैसे देणार नाही...
प.फो.आ.: ठीकाय सर. मी आमच्या वरिष्ठांना
विचारून कळवितो...
मी: विचारा, पण कळविण्याच्या भानगडीत
पडू नका प्लीज. मला आता तुमच्या चॅनलवर फुकटातही येण्यात इंटरेस्ट नाहीय.
प.फो.आ.: ओके सर. धन्यवाद!
(इथे आमच्या ५६ इंची होऊ
घातलेल्या छातीच्या बुडबुड्याला टाचणी लागली, हेही पुनश्च वि. न. करायला हवेच!)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा