कधी कधी लोक विचारतात की तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल
अनेकदा लिहीले, पण आईबद्दल फार काही लिहीले नाही. असे का? याचं उत्तर शोधताना
माझ्या लक्षात आलं की, माझ्या वडिलांनी अत्यंत जाणीवपूर्वक आमच्या वाढत्या वयाबरोबर
आमच्याशी मैत्रीचं नातं जोडलं. आईही कधी कठोर वागली नाही, पण तिच्याशी माझं तसं
मैत्र जुळलं नाही कारण माझी आई ही सदैव माझ्यासाठी एक आदर्श शिक्षिका, आदर्श गुरू
राहिली आहे. तिच्यातल्या आईइतकाच किंबहुना त्यापेक्षाही मला हा गुरू सदैव
मार्गदर्शक राहिला आहे. तिच्या या ‘गुरू’त्वाचा प्रभाव
माझ्यावर अधिक आहे. माझ्या जडणघडणीत तिचं हे शिक्षकत्व खूप महत्त्वाचं ठरलं आहे.
माझी आई रजनी जत्राटकर. शिक्षिका. कागलच्या
यशवंतराव घाटगे हायस्कूलमधून ती निवृत्त झाली. लग्नापूर्वी सांगलीच्या राजवाड्याच्या
कन्या शाळेत शिकविणारी आई लग्नानंतर कागल विद्यालयात रुजू झाली. इंग्रजी तिचा
विषय. नुसता विषय नाही तर एकदम हातखंडा. सांगलीच्या तुलनेत कागल खेडंच. इथली
पंचक्रोशी ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी. या कष्टकऱ्यांच्या मुलांना इंग्रजीची अफाट
भीती. ही भीती दूर करून विषयाची गोडी लावण्याचं काम आईनं हयातभर केलं. त्यामुळं ती
कितीही सिनियर झाली, तरी तिचे पाचवी-सहावीचे वर्ग काही सुटले नाहीत. कारण शाळेलाही
माहिती होतं की मुलांचा बेस पक्का करायचा झाला तर तिथं जत्राटकर बाईच पाहिजेत.
मी हिंदुराव घाटगे विद्यामंदिरातून चौथी उत्तीर्ण
झाल्यानंतर पाचवीला आईच्या हाताखाली तिच्या शाळेत दाखल झालो. शाळेत आणि
शाळेबाहेरही तिचा एक विशिष्ट दरारा होता. बाई रस्त्यानं जाताना दिसल्या की मुलं
सैरावैरा होऊन आपापल्या आयांच्या मागं दडत. इंग्रजी घोटून घेण्यात आई जबरदस्त
होती. शब्द आणि त्यांचे अर्थ ती देई. त्यातला प्रत्येक शब्द दुसऱ्या दिवशी २५ वेळा
लिहून आणण्याचा सराव ती देई. त्या दिवशी २५ वेळा ज्यांनी लिहीला नसेल, त्यांना
दुसऱ्या दिवशी ५० वेळा लिहीण्याची शिक्षा असे. त्यामुळं मुलं होमवर्क करूनच येत.
कविता चालीत म्हणवून घेण्याचा तिचा कटाक्ष असे. त्यामुळं पाचवी सहावीच्या कित्येक
कविता आजही मला तोंडपाठ आहेत.
आईच्या या शिकवण्यामुळं मला इंग्रजीचा क्लास कधी
लावावा लागला नाही. वर्गमित्रांना वाटत असे की, आई माझा घरी ज्यादा अभ्यास घेत
असेल. मात्र, ती घरी आली की घरकामाला लागे. तिचा स्वयंपाक सुरू असताना बस्तर टाकून
मला तिच्यासमोर अभ्यासाला बसवत असे. त्या पलिकडं तिनं माझा स्वतंत्र अगर विशेष असा
अभ्यास कधी घेतला नाही. मात्र, तिच्या शिकवण्यामुळं मला इंग्रजीची, विशेषतः
इंग्रजी व्याकरणाची खूप गोडी लागली. ती इतकी की मी सहावी ते आठवी या तीन
वर्षांच्या मेच्या सुटीत तर्खडकरांची तीनही पुस्तके सोडविली. त्याशिवाय आठवीत
असतानाच दहावीपर्यंतच्या इंग्रजीच्या विकास व्यवसायमाला सोडविल्या होत्या. इंग्रजी
पुस्तकं, कादंबऱ्या मिळतील तशा न घाबरता वाचू लागलो होतो. दहावीच्या आतच पेरी मेसन,
जेफ्री आर्चर वगैरेना हात घातला होता. पुढं अकरावीनंतर मॅक्झीम गॉर्की, सिडने
शेल्डन आणि अन्य इंग्रजी लेखक आपसूकच दाखल झाले आयुष्यात. पुढं जेव्हा मी
उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी बनलो, तेव्हा एका कार्यक्रमात मी
लिहीलेलं इंग्रजी भाषण ठोकून आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मला विचारलेलं, तू
कोणत्या कॉन्व्हेंटचा विद्यार्थी म्हणून. तेव्हा मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी
असल्याचं मी मोठ्या अभिमानानं सांगितलं. आणि माझं इंग्रजी करवून घेणाऱ्या होत्या
जत्राटकर बाई.
आईमुळंच माझ्या वाचन-लेखन-वक्तृत्व या गुणांचा
विकास झाला, ही गोष्ट अभिमानानं नमूद करावीशी वाटते. दुसरीपर्यंत सांगलीत शिकून
तिसरीला मी हिंदूराव घाटगे शाळेत आलो. त्यावेळी ढोले गुरूजींनी लोकमान्य टिळक
जयंतीनिमित्त वर्गातल्या सर्वच मुलांना एकच भाषण लिहून दिलं आणि पाठ करून यायला
सांगितलं. १ ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा होती. आईनं मला भाषण कसं करायचं, उच्चार कसे
करायचे, आवाजातले चढउतार अशा अनेक बाबी सांगितल्या. अगदी आपण दुसरं भाषण लिहूनही
मला दिलं. पण, गुरूजींनी हेच भाषण करून यायला सांगितलंय, यावर मी ठाम राहिलो. आईचा
नाईलाज झाला, पण तिनं ते भाषण माझ्याकडून तयार करून घेतलं. भाषण म्हणजे केवळ पाठ
करून पोपटासारखं घडाघडा बोलणं नव्हे. त्यातला शब्द न् शब्द समजून घेऊन समोरच्याला
सांगणं, पटवून देणं, हे खरं भाषण. असं तेव्हा तिनं सांगितल्याचं मी कायम लक्षात
ठेवलं. १ ऑगस्टला शाळेत गेलो. आमच्या वर्गातल्या कोगनोळीच्या पाटील (बहुधा आशिष
नाव असावं त्याचं.) म्हणून एका मित्राला त्याच्या आईनं वेगळं भाषण लिहून दिलं
होतं. त्यानं म्हटलंही उत्तम. ते ऐकून मला माझ्या आईचं भाषण डोळ्यासमोर आलं. पण,
माझ्यासह वर्गातल्या सर्व मुलांनी गुरूजींनी दिलेलं भाषणच म्हटलं. साहजिकच
पाटलांचा पहिला नंबर आला आणि दुसरा नंबर माझा. परीक्षक म्हणून ढोले गुरूजी आणि मगर
गुरूजी होते. मगर गुरूजी म्हणाले, त्यानं वेगळेपण दाखवलं म्हणून त्याचा स्वाभाविक
पहिला नंतर आला. पण, कॉमन भाषणही उत्तम पद्धतीनं तू केलंस, म्हणजे त्यांच्यात तू
पहिलाच आहेस. कॉमन गोष्ट अनकॉमन पद्धतीनं सादर करण्याचं फळ मिळतंच, हा आणखी एक धडा
तिथं मिळाला. या पहिल्या स्पर्धेनं खूप आत्मविश्वास मिळाला.
पुढं अशा वक्तृत्व स्पर्धांची माहिती मिळाली की
मी आईच्या मागं लागत असे. आईही अतिशय सोपं पण प्रभावी भाषण लिहून देत असे. कागलची
ब्राह्मण सभा ही खूपच अॅक्टीव्ह होती. त्यांच्यातर्फे
दरवर्षी वक्तृत्व सभा आयोजित केल्या जात. चौथीत मी ब्राह्मण सभेच्या स्पर्धेत
पहिल्यांदा भाषण केलं ‘चांगल्या
सवयी’ या विषयावर. या भाषणाचं खूपच कौतुक
झालं. श्रेय आईचंच. तेव्हापासून सातवीपर्यंत दर वर्षी मी ब्राह्मण सभेच्या
स्पर्धेत पहिला नंबर मिळविला. बक्षीसंही घेतली ती सूर्यकांत मांढरे, भालचंद्र
कुलकर्णी यांच्या हातून.
इथं आईच्या शिकवणीचा आणखी एक किस्सा नमूद करायलाच हवा, ज्यानं मला आयुष्यभराचा एक मोठा धडा दिला. सातवीत असताना कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघानं वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली. मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून भाषण करायचं होतं. मी हिंदीतून भाषण करायचं ठरवलं. विषय घेतला ‘जय जवान, जय किसान’. आईनं उत्तम भाषण तयार करून घेतलं माझ्याकडून. हिंदीतून म्हणायचं, तर त्यातले उच्चार, त्याची शब्दफेक कशी असायला हवी, यावर आम्ही काम केलं. नंबर आला नाही तरी चालेल पण आपलं सादरीकरण उत्तम व्हायला हवं, यासाठी आमची धडपड होती. स्पर्धेसाठी शाळेतून दोन गटांत दोघांची निवड झाली होती. मी सहावी ते आठवी गटात आणि आणखी एका नववीतील विद्यार्थ्याची आठवी ते दहावी गटात. स्पर्धा उद्यावर होती. मी वर्गात होतो. गणिताचा तास सुरू होता. इतक्यात दहावीच्या वर्गातला एक मुलगा बोलवायला आला. कमते सरांनी मला बोलावल्याचं सांगितलं. मला लक्षात येई ना, दहावीच्या वर्गात माझं काय काम? टेन्शनमध्येच मी त्या वर्गात गेलो. सारेच दादा आणि ताई माझ्याकडं पाहात होते. इतक्यात तो नववीच्या वर्गातला दादाही आला. कमते सरांनी आम्हाला उद्याच्या स्पर्धेसाठीची भाषणं सादर करायला सांगितली. मी जाम टेन्शनमध्ये आलो. घाम फुटला, काही सुचेना! पण, सरांनी सांगितलंय म्हटल्यावर बोलायला सुरवात केली. घशाला कोरड पडली, काही आठवेना. असं कधीच झालं नव्हतं मला. पण, कदाचित अचानक बोलावल्यामुळं असेल किंवा मोठ्या मुलांसमोर कधी बोललो नसल्यामुळं असेल, माझं सादरीकरण फेल गेलं. दुसऱ्या दादानं मात्र घडाघडा भाषण म्हटलं. माझ्या भाषणावर सरांनी कॉमेंट केली, ‘हे पाहा आपल्या शाळेचे प्रतिनिधी. स्पर्धा उद्या आणि यांच्या तयारीचा अजून पत्ता नाही. उद्याचा निकाल आत्ताच दिसतोय मला.’ दहावीचा तो वर्ग हसला फिदीफीदी त्यावर. सरांच्या मनात कदाचित शाळेच्या हिताखेरीज काही नसेलही. पण, मला मात्र हे वाक्य खूपच बोचलं, झोंबलं. मी खालमानेनं माझ्या वर्गात परतलो. बसलो जागेवर. पण तो अपमानास्पद प्रसंग काही मनातून जाई ना. दुपारपर्यंत अंगात जोराचा ताप भरला. मी डबाही खाल्ला नाही. दुपारच्या सुटीत घरी आलो. आजी होती घरी. तिला काही न बोलता घरात गेलो आणि अंगावर चादर ओढून झोपलो. आई संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी आली. तर मी झोपलेलो. तिनं कपाळावर हात ठेवून पाहिलं, तर तापानं फणफणलेलो. तिच्या मायाभरल्या हाताच्या स्पर्शानं मला जाग आली. जसं तिला पाहिलं, पटकन उठलो आणि तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडलो. आईला काहीच माहिती नव्हतं. तिनं मला मोकळं होऊ दिलं. रडता रडता आईला मी म्हणालो, ‘आई, मी काही उद्या स्पर्धेला जाणार नाही. मला काहीच पाठ झालेलं नाही.’ काही तरी गडबड आहे, हे तिच्या लक्षात आलं. कारण एरव्ही कुठल्याही स्पर्धेसाठी जाताना मनापासून तयार होणारा मी आता वेगळ्याच पवित्र्यात होतो. तिनं मला काय झालं म्हणून खूप खोदून खोदून विचारलं. तेव्हा कुठं मी तिला सकाळचा प्रसंग सांगितला. त्यावर आईनं मग मला एकच प्रश्न विचारला, ‘मग तू त्या सरांचं विधान स्पर्धेत भाग न घेताच खरं करून दाखवणार, की स्पर्धेत भाग घेऊन त्यांचं विधान खोटं ठरवणार?’ या वाक्यानं आजतागायत माझ्या मनात घर केलंय. त्यानंतर आयुष्यात खोट्या मित्रांपेक्षा खरे निंदकच आपल्या प्रगतीसाठी कसे आवश्यक असतात, हे तिनं मला सांगितलं. सच्चे मित्र मिळणं जितकं दुर्लभ, तितकेच खरे निंदक मिळणं हेही भाग्याचं! निंदकाचं घर शेजारी असलं की आपण ताळ्यावर राहायला मदतच होते, हे सांगितलं. अशा अनेक गोष्टी ती सांगत राहिली आणि माझ्या मनातला हरपलेला आत्मविश्वास चेतवित होती. अखेरीस उद्या स्पर्धेला जाणारच, इथपर्यंत तिनं मला पोहोचवलं. त्या रात्री आई-बाबांनी मिळून माझी प्रॅक्टीस घेतली. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये स्पर्धा होती. आईनं थेट रजा काढली आणि शाळेच्या सरांबरोबर न पाठवता ती स्वतःच मला घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी आली. मी भाषणाला उभा राहिलो. आयुष्यातली पहिलीच मोठी स्पर्धा. त्यात पहिलंच हिंदी भाषण. माझी प्रेरणा, माझी आई समोरच्या बाकावर बसली होती. मी भाषणाला सुरवात केली. मला त्या क्षणी आईखेरीज अन्य कोणीही दिसत नव्हतं. कुठंही न तटता, अडखळता भाषण झालं. दुपारी निकाल लागला. उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झालं. आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं. माझ्याही. वरच्या गटातला स्पर्धक मित्रही भेटला. त्याला कुठलंच बक्षीस मिळालं नव्हतं. एखाद्याला बक्षीस मिळालं नाही, याचा आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचा आसुरी आनंद मला वाटला कारण सरांनी त्यावेळी वर्गात त्याला शाबासकी दिली होती आणि माझी खिल्ली उडवलेली. पण, त्यात त्याचा काय दोष होता?, म्हणून मग पुढच्याच क्षणी मी त्याला दिलासा द्यायला सरसावलो, कारण तोही शेवटी माझा मित्रच होता. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या दिवशी मुख्याध्यापकांनी माईकवरुन माझ्या यशाची घोषणा केली, तेव्हा मला मुलांसमोर आणून टाळ्या वाजवणाऱ्यांत कमते सरही होते. नंतर स्टाफरुममध्ये मात्र आईनं त्यांची जोरदार शाब्दिक धुलाई केल्याची वार्ता आमच्या कानी आलीच. कमते सर पुढे मुख्याध्यापक झाले शाळेचे. आणि या शाळेत माझं एकमेव व्याख्यान ठेवणारे व सत्कार समारंभ घडवून आणणारेही तेच होते. ही बाब ही कृतज्ञतापूर्वक नोंदवायलाच हवी.
आमच्या आईचा हा थेट निर्भीड, टोकदार स्वभाव
वैशिष्ट्यपूर्णच. त्यामुळं तिच्यापुढं विद्यार्थीच काय, पण शिक्षकांसह कोणाचंही
काही चालत नसे. जशास तसे, याचं मूर्तीमंत उदाहरण. आणि तिच्यामध्ये तिच्या आईचा
म्हणी अन् वाक्प्रचारांत बोलायचा, स्वभाव ओतप्रोत उतरलेलाय. त्यामुळं समोरच्याचं
कौतुक असो की धुलाई, आई ते काम मोजक्या शब्दांत उरकायची; आजही उरकते. रिटायर
झाली असली तरी आम्ही असतोच की तिच्या टार्गेटवर. असो!
माझ्यात वाचनाची आवड निर्माण केली होती माझ्या
आजोबांनी. मात्र वाचन-लेखनाची आवड वृद्धिंगत झाली ती आईमुळेच. आईनं माझ्यासाठी
कपडे कदाचित कमी आणले असतील, मात्र कुठेही गेली तरी माझ्यासाठी एखादं तरी पुस्तक
तिनं आणलं नाही, असं कधी झालं नाही. कोल्हापूरला साहित्य संमेलन झालं, तेव्हा तर चंगळच
म्हणावी इतकी पुस्तकं आणली होती तिनं. त्याशिवाय, आमच्या शाळेत मुलांसाठी एक
लायब्ररी चालवली जायची. एका मोठ्या संदुकीत भरगच्च पुस्तकं होती. ती मुलांना दर
आठवड्याला वाचायला दिली जात. माझी आठवड्यातच दोन-तीन होत वाचून. पाचवीतच मी
त्यातली बहुतेक पुस्तकं वाचून संपवली. नंतर माझा डोळा शिक्षकांसाठीच्या लायब्ररीवर
होता. मुख्याध्यापकांच्या शेजारच्या खोलीत ती होती. जाता-येता नजरेला पडत. परीक्षेचा
कालावधी वगळता आईनं मला त्यातली अनेक पुस्तकं आणून दिली. या ओघामध्ये रामायणाचे
बरेचसे कांडही मी वाचून काढले होते. विवेकानंद वाचले ते याच काळात. आणि दलित
साहित्याशी परिचय झाला तोही याच माध्यमातून. अनेक महान व्यक्तीमत्त्वांची चरित्रेही
इथलीच वाचली. सहावीत थॉमस अल्वा एडिसनच्या चरित्रकार्यानं मी प्रचंड भारावलो होतो.
इतका की शाळेच्या भित्तीपत्रकासाठी त्याची जीवनकथाच लिहीली. माझ्या आठवणीनुसार
माझं हे पहिलं मोठं लेखन. त्यानंतर नववीत मी महात्मा फुले यांच्यावर एक प्रदीर्घ
निबंध लिहीलेला आठवतो.
वाचनानंतरचा पुढला टप्पा लेखनाचा निश्चित होता. मघाशी
सांगितल्याप्रमाणं वक्तृत्व स्पर्धांसाठी आई भाषणं तयार करून द्यायची, मी पाठांतर
करायचो आणि स्टाईलमध्ये सादर करून बक्षीस मिळवायचो. नंतर नंतर माझ्यासारखे अनेक
पोपट मला या स्पर्धांतून दिसू लागले. आणि एक दिवस या पोपटपंचीचा मला स्वतःलाच
वैताग आला. आईला म्हटलं, तू लिहून द्यायचं, मी पाठ करायचं आणि बक्षीस मारायचं,
याला काय अर्थ? मी स्वतः जेव्हा तुझ्यासारखं लिहीन आणि त्या
भाषणावर बक्षीस मिळवीन, तेव्हा खरं! या गोष्टीसाठीही
तिनं प्रोत्साहन दिलं. लेखन सुधारायचं, तर मग निबंध स्पर्धांतून भाग घ्यायला तिनं
प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी वक्तृत्वाऐवजी निबंध स्पर्धांतून लिहू लागलो.
वेगवेगळे संदर्भ गोळा करणे, विषयानुरुप त्यांची संगती लावणे या बाबतीत मात्र मला
बाबांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनीही लागतील ती पुस्तकं थेट विकतच आणून द्यायला
सुरवात केली. आमच्या देवचंदची लायब्ररीही जबरदस्त आहे. तिचाही मी खूप लाभ उठवलाय.
बारावीची प्रॅक्टीकल एक्झाम सुरू असताना लायब्ररीत थेट शेक्सपिअरला मिठी मारुन
बसलेल्या मला पाहून काय अवस्था झाली असेल बाबांची आणि त्यानंतर माझी, याचा विचारही
तुम्हाला करवणार नाही. तर असो! या निबंध लेखनातही माझी तयारी चांगली झाली.
राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत ‘भारताची अण्वस्त्र
चाचणी’ या विषयावरील निबंधाला मला पुरस्कार मिळाला आणि पुन्हा कागलमध्येच
याच विषयावरील भाषणानं माझ्या वक्तृत्वाचीही दुसरी इनिंग सुरू झाली.
आईनं शिक्षक म्हणून कागलमधल्या कित्येक पिढ्यांना
इंग्रजी विषयाचे पहिले पाठ शिकविलेच, पण तिने या नगरीला दिलेली सर्वात मोठी देणगी
कोणती असेल तर ती म्हणजे शाळेतला विविध गुणदर्शन कार्यक्रम किंवा गॅदरिंग होय. आई
सांगलीहून इथे रुजू होईपर्यंत गॅदरिंग हा प्रकार कागलला ठाऊक नव्हता. रुजू
झाल्याच्या पुढच्याच वर्षी तिनं मुख्याध्यापक डिंगणकर बाईंसमोर गॅदरिंगचा प्रस्ताव
ठेवला आणि त्यांनी ती जबाबदारी आईकडंच सोपविली. तेव्हापासून अगदी अलिकडंपर्यंत
म्हणजे साखळकर सर वगैरे ही नव्या दमाची शिक्षक मंडळी रुजू होईपर्यंत आईनं
गॅदरिंगची जबाबदारी एकहाती यशस्वीरित्या सांभाळली. गॅदरिंगच्या एक महिना आधी
आमच्या कागले वाड्यातल्या घरी मुलं शाळा सुटल्यानंतर जमायची. तीस चाळीस विविध
नृत्य-नाट्य-कला आदी प्रकार आई त्या मुलांकडून बसवून घ्यायची. अगदी नाचाच्या
स्टेपसुद्धा तीच बसवायची. आमच्या घरात आणि बाहेरही त्या काळात बसायला नव्हे,
उभारायला सुद्धा जागा मिळायची नाही. शेणानं सारवलेलं घर उकरून निघून घरभर मातीचा
धुरळा उडायचा नाचानं. पण, घरमालक कागले काकांनी कधीही एका शब्दानं त्याबद्दल
विचारलं नाही. उलट जमीन पुन्हा दुरुस्त करून द्यायला ते असायचेच. मुलांच्या
कलागुणांना वाव देण्यासाठी असे अनेक लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागीदार होते.
गॅदरिंगच्या दिवशी तर सारं कागल लोटायचं शाळेच्या मैदानावर. आईबाप आपल्या मुलांचं
सादरीकरण कौतुकानं पाहायचे. सूत्रसंचालन बहुतेक वेळा आईकडंच असायचं. तिच्या
आवाजानं पोरंच काय, दंगा करणारे आईबापही शांत बसत- एवढा दरारा होता तिच्या आवाजात.
कनवाळूपणही तितकंच होतं. एखाद्या मुलाला अगर मुलीला आईबाप शाळेला पाठवत नाहीत, असं
लक्षात आलं की आई दाखल झालीच समजायचं त्यांच्या दारात. मग आईबापाची तिच्यासमोर
चकार शब्द काढायची प्राज्ञा नसायची. मुलाला घेऊनच आई शाळेत दाखल होत असे. शाळेत
असताना आईच्या शिकवण्याचा, गृहपाठाचा जाच वाटणारी मुलं पुढं जेव्हा कधी तिला
भेटतात, तेव्हा आमच्या प्रगतीत आपला मोठा वाटा आहे, असं आवर्जून सांगतात. एका
शिक्षकाला आणखी काय हवं असतं? अशा अनेक गोष्टी तिच्या योगदानाबद्दल सांगता
येतील.
आईचं फाईटिंग स्पिरीट हे अगम्य अन् अफलातून आहे. वेगवेगळी
सात ऑपरेशन झालीयत तिची. काही वर्षांपूर्वी अर्धांगाचा झटका आला. निम्मं अंग लुळं
पडलं, वाचा गेली. ब्रेन हॅमोरेजमुळं मेंदूच्या काही भागावर परिणाम झाला. बीपी-शुगर
हे तर तिचे गेल्या चाळीसेक वर्षांपासूनचे सोबती. अशा परिस्थितीतूनही दर खेपी ती
पुनःपुन्हा उभी राहिली ती केवळ या फाईटिंग स्पिरीटच्या जोरावरच. पॅरालिसीस झाला,
तेव्हा कोल्हापुरात एडमिट केलं. तिथून माझ्या फ्लॅटवर नेलं. आयुष्य इतकं स्वावलंबी
जगलेली की कधी कोणावर कुठल्याही बाबतीत अवलंबून राहण्याचं कारण नव्हतं. मात्र इथं
दर खेपी सुनेचा आधार घ्यावा लागायचा. त्याचं शल्य तिच्या नजरेत जाणवायचं. मग, तो
त्रागा शब्दांतून नाही, तर इतर गोष्टींतून व्यक्त व्हायचा. तेव्हा तिच्या या
फाईटिंग स्पिरीटलाच मी आव्हान दिलं. ‘हे असं दुसऱ्याकडून
करून घेणं बरं वाटत नसेल, तर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि त्या पायांनी माझा
जिना उतरुन तुझ्या तुझ्या घराकडं जायचं!’ असं सुनावलं.
पुढच्या महिनाभरात आई स्वतःच्या पायांनी चालत गाडीत बसून निपाणीला परतली. या वर्षी
कोविडच्या काळातही तिची ऑक्सिजन लेव्हल ७० पेक्षाही खाली गेलेली. स्थानिक
डॉक्टरांनीच तिची आशा सोडलेली. पण, पुन्हा इथेही तिला आम्ही सांगितलं, ‘आपल्याला इतक्या
सहजी मरायचं नाहीय. इंजक्शनचा कोर्स पूर्ण होईपर्यंत उभं राहायचंय. स्वतःची कामं
स्वतः करता आली पाहिजेत.’ आणि आई पंधरा दिवसांत उभी राहिलीय. थरथरतेय,
थोडा तोल जातोय, पण काठीशिवाय चालू लागलीय.
आईचे हे सारे गुणावगुण मला माझ्या मुलीतही
दिसतात. आजचा तिचा हट्ट, दुराग्रह हे भविष्यातले निर्धार अन् निश्चय असतील, असं
वाटत राहतं आईच्या अनुभवावरुन. तिच्या रुपानं मागे आई आणि पुढेही आई, असं आयुष्य असणार
आहे माझं. आई कॉलेजमध्ये असताना भारूड वगैरे उत्तम सादर करायची. तिचं भारूड ऐकून
सांगली आकाशवाणीनं त्या काळी तिला अनाऊन्सरच्या पोस्टसाठी ऑडिशनला बोलावलेलं. पण,
आजीनं स्पष्ट नकार दिल्यानं ती जाऊ शकली नव्हती. पण, पुढच्या आयुष्यात तिच्या
अभिव्यक्तीच्या साऱ्या दिशा तिनं शोधल्या. मुलीमध्येही मला त्याच पाऊलखुणा दिसतात.
हे सारं लिहीतोय, कारण आज आईचा ६८वा वाढदिवस आहे.
कोरोनाचा काळा कालखंड ओलांडून आम्ही सारे एकत्र आहोत. ती आमच्यासमवेत आहे ती केवळ
तिच्या इच्छाशक्तीच्या बळावर! आज सकाळी डायनिंग टेबलवर तिला विचारलं, आई कितवा
गं वाढदिवस? त्यावर ती हसतमुखानं उत्तरली, ६७ पूर्ण, ६८. आणि
I owe this life to these two persons... असं म्हणून तिनं
बंधू अनुप आणि माझी पत्नी दीपालीकडं अंगुलीनिर्देश केला. आणि ते खरंही आहे.
या दोघांनी आईची इतकी सेवा केलीय की त्याबद्दलची कृतज्ञता अगर कौतुक शब्दांत मांडणंच
कठीण आहे. आणि आईची शब्दफुले झेलत ती करणं हे तर महाकठीण काम. ते या दोघांनी
आस्थेनं केलंय. म्हणून तर ती आपल्या बोनस आयुष्याचं श्रेय त्यांना देती झालीय. पण,
आई, काही जरी असलं तरी I owe my life to you! Thank you for this lovely life!!
खूपच सुंदर आणि Inspiring
उत्तर द्याहटवामातॄदेवो भव !