रविवार, १ जानेवारी, २०२३

नूतनवर्षस्य प्रथम दिवसे...



हे नवे वर्ष उत्तम जाणार आहे, याची खात्री पहिल्याच दिवशी वाटते आहे कारण लहानपणी ज्यांनी शाळेत आमच्यावर सुसंस्कार करण्यासाठी अतिशय खस्ता खाल्ल्या आणि आजही एखादे पुस्तक, कविता वाचताना ज्यांची हटकून आठवण येते, अशा शिक्षकांचा आशीर्वाद आज पुन्हा लाभला.

कागलचे यशवंतराव घाटगे हायस्कूल ही माझी शाळा. आई त्याच शाळेत शिक्षिका. तिच्या माझ्यावरील शिक्षक म्हणून झालेल्या संस्कारांबद्दल तर मी येथे स्वतंत्रपणाने लिहीले आहेच. पण, त्याही पलिकडे या शाळेत असे अनेक दिग्गज शिक्षक, शिक्षिका मला लाभल्या ज्यांचा माझ्या जडणघडणीत खूप महत्त्वाचा वाटा आहे. आज कुरणे बाईंच्या सागरच्या विवाहाच्या निमित्तानं तांदुळवाडीला गेलो. खरं तर आई प्रकृतीमुळं घराबाहेर पडू शकत नसल्यानं तिचं प्रतिनिधित्व करणं अगत्याचं होतंच, पण त्यातही शाळेतले आपले काही जुने शिक्षक नक्कीच भेटतील, ही आसही होती. आणि घडलंही तसंच. कुरणे बाईंची तर भेट झालीच. पण, विज्ञानाचे एस.डी. पाटील सर, मराठीच्या उपाध्ये बाई यांच्यासह नाटोलीकर बाई, सुतार बाई आणि नव्यानं रुजू झालेल्या काही शिक्षिकाही भेटल्या. इतकं छान वाटलं म्हणून सांगू. एसडी सर तर पूर्णवेळ सोबत होतेच. पण, उपाध्ये बाईंमुळं मराठीतली अनेकविध पुस्तक वाचण्याची प्रेरणा मनी जागली होती, त्याची आठवण झाली.

आज शाळेतल्या अनेक शिक्षकांच्या आठवणी मनी जागल्या. प्रवासभर लेकीला शाळेच्या आठवणी सांगत राहिलो. तिला सांगत होतो की, माझा मीच त्या आठवणींची उजळणी करीत होतो, कुणास ठाऊक? पण, या आठवणींच्या लाटा मनभर उचंबळत राहिल्या. पुन्हा शाळेत जाऊन त्यांच्या पुढ्यात बसावं आणि शिकवा म्हणावं, असं काहीसं वाटत राहिलं. कारण, ते त्या दर्जाचे शिक्षक होते, ज्यांनी आमच्या शाळेला तिचा लौकिक मिळवून दिला आणि विद्यार्थ्यांना त्यांची ओळख. आणि आमच्या ओळखीमध्ये त्यांना स्वतःचं समाधान गवसतं. तो अभिमान त्यांच्या डोळ्यांमध्ये चमकताना दिसतो आणि तो कायम राहावा, यासाठी प्रेरणाही देत राहतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा