मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

नितळ-२: अजीर्ण: खाणं आणि जगण्याचं...

 


(मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये लिहीत असलेल्या 'नितळ' या मालिकेअंतर्गत आज दि. २४ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित झालेला दुसरा भाग माझ्या वाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


संज्ञापनशास्त्राचे निवृत्त शिक्षक प्रा. ओमप्रकाश कलमे भेटावयास आले होते. विविध विषयांवर, विशेषतः संस्कृती आणि संज्ञापन या अनुषंगाने बोलताना त्यांच्या एका विधानानं माझ्या मनाचा ठाव घेतला. ते म्हणाले, चवीसाठी खाणं आणि मनोरंजनासाठी जगणं, या दोन गोष्टी माणसानं सोडल्या, तर त्यातून उरेल ती केवळ सात्त्विकता, अन्नाचीही आणि जगण्याचीही!”

आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं, मार्गदर्शक असं हे विधान आहे. सध्याचा काळ हा आपल्या खाण्याचाही आणि जगण्याचाही अगदी अजीर्ण होण्याचा आहे. अन्नामध्ये एक मूलभूत चव असायला हवी, ही रास्त अपेक्षा आहे. मात्र, आपलं खाणं आज केवळ चवीसाठी आणि चवीसाठीच चाललेलं आहे. त्यातली सात्त्विकता कुठेतरी बॅकसीटवर बसली आहे. यंदाचं वर्ष आपण जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करीत आहोत. मुळात आपली संस्कृती ही भरडधान्याधारितच आहे. पाश्चात्य जगताच्या नादाला लागून आपण आपल्या या पोषक खाद्यसंस्कृतीकडं काणाडोळा करीत गेलो आणि आपल्या नसलेल्या खाद्यसंस्कृतीला जवळ करताना तिच्यासोबत येणारे लाइफस्टाईलची सारी आजारपणंही कवटाळून बसलो. कोविडच्या कालखंडानं थोडं या सात्विकतेकडे आपल्याला पुन्हा वळवलं, मात्र त्याच काळात वेगवेगळ्या चवींकडं आकर्षून घेणाऱ्या युट्यूब वाहिन्यांचाही सुळसुळाट झाला.

सुखासीन जीवनासाठीच सारं काही करणाऱ्या व्यक्तींचं हे चवीसाठीचं खाणं काही काळापुरतं मान्यही करता येईल. मात्र, आपण समाजाच्या निम्न अथवा मध्यमवर्गीय स्तरातले लोक अन्नाची मस्ती करून जी नासाडी करतात, त्यावरही या निमित्तानं आक्षेप घ्यायला हवेत. खरे तर, विविध समारंभांमध्ये अन्नाची अतिरिक्त नासाडी होऊ नये, लोकांनी हवे तेवढेच अन् तितकेच घ्यावे, यासाठी अस्तित्वात आली ती बुफे पद्धत. मात्र, आपण जणू काही त्यातला कोणताही पदार्थ ना कधी यापूर्वी खाल्ला आहे, ना नंतर कधी बघायला मिळणार आहे, अशा पद्धतीनं अन्नपदार्थांनी ताट ओसंडून वाहेस्तोवर भरून घेतो. मागच्यांचा विचारही करीत नाही आणि त्यातला जीभेला बरा लागेल तो पदार्थ खातो आणि उरलेलं सगळं टाकून देतो. हे बुफेचं एक उदाहरण झालं. मात्र, भारतात अशा प्रकारे जवळपास ४० टक्के अन्नाची नासाडी होते. जगभरात हेच प्रमाण १७ टक्के इतकं आहे. भारतात एकीकडं ८१ कोटी लोक एका वेळी उपाशीपोटी झोपत असताना आपल्या स्वयंपाकघरात दरवर्षी ६.८८ कोटी टन इतक्या अन्नाचा कचरा होतो. यानुसार आपल्या देशातली प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी ९४ किलो अन्न वाया घालवते. हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये दरडोई अन्नाची नासाडी ही सरासरी २८ किलो इतकी आहे.

मुळात पोट भरायला माणसाला लागतं किती अन्न? एखादी भाजीभाकरी, डाळभात आणि सॅलड. या पलिकडं जाऊन केवळ चवीसाठी खाण्याचा आणि त्याहूनही अन्न वाया घालवण्याचा सोस आपण टाळायला हवा. एखादा अन्नाचा कण टाकून देतानाही भुकेपोटी ज्याला कळवळत झोपावं लागतं, अशा व्यक्तीचा, मुलाचा चेहरा आपल्यासमोर यायला हवा. त्याच्या मुखात आपण घास घालत असू वा नसू, मात्र आपल्याकडून अन्नाचा एक कणही वाया जाणार नाही, एवढी किमान दक्षता तरी आपण निश्चितपणानं घेऊ शकतो.

जे अन्नातल्या चवीच्या बाबतीत होतं, तेच आज आपलं मनोरंजनाच्या बाबतीतही झालेलं आहे. मान्य आहे, आपल्या लाईफस्टाईलमुळे ताणतणावाचे प्रसंग वाढलेले आहेत. सर्वत्र जीवघेणी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, टिकवून ठेवायचं आहे. सारी दमछाक त्यासाठीच जणू काही सुरू आहे. त्या नादात आपण आपलं खरं जगणं विसरून गेलो आहोत. या धबडग्यातून मग थोडासा विरंगुळा म्हणून आपण मनोरंजनाचा आधार घेतो. मात्र, सध्या या मनोरंजनाचा इतका अतिरेक झाला आहे की, बोलता सोय नाही. तसे पाहता, संज्ञापनशास्त्रानुसार, माध्यमांच्या प्रमुख कार्यांमध्ये माहिती, मार्गदर्शन, प्रबोधन, मतनिर्मिती यानंतर मनोरंजनाचा क्रम लागतो. मात्र, आज बाकी सारे प्राधान्यक्रम गुंडाळले जाऊन सर्वच क्रमांवर जणू एंटरटेनमेंटनं आपलं बस्तान बसवलं आहे. अगदी सिरिअस जर्नालिझम करणाऱ्या वाहिन्या सुद्धा इन्फॉर्मेशनच्या ऐवजी स्वतःला इन्फो-टेनमेंट म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागल्या आहेत. आणि हे मनोरंजनही सर्वंकष, सकस असं नाही. तिथंही सात्त्विकतेचा अभावच अधिक दिसून येतो. एकसुरी, सपाट, कोणत्याही प्रबोधनाचा अभाव असणाऱ्या मालिका, अंगविक्षेपी विनोदांचा भडीमार असणारे कार्यक्रम आणि रिएलिटीच्या नावाखाली लोकांच्या, स्पर्धकांच्या भावनांशी खेळ मांडणारे कचकडी टॅलेंट शोज् यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. वृत्तवाहिन्यांवरील डिबेट चर्चांच्या कार्यक्रमांवर तर अगदी सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत, यातच सारे काही आले.

आता नव्या पिढीच्या हातात आलेल्या स्मार्टफोन्समुळे दिवाणखान्यातल्या दूरचित्रवाणी पाहण्याच्या परंपरेमध्ये ट्विस्ट येऊन पर्सनलाईज्ड कन्टेन्ट एक्सेस करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. या प्रेक्षकांना एन्गेज ठेवण्यासाठी ओटीटी कन्टेन्ट क्रिएटर आणि सप्लायर्स यांच्या बरोबरच विविध सोशल मीडिया कंपन्यांनीही कंबर कसली आहे. प्रत्येकाला आज त्याचा दर्शक अर्थात ग्राहक मिळवायचा आहे, तो आपल्याकडे राखायचा आहे. त्यासाठी मोठी यातायात सुरू आहे. केवळ लिपसिंक आणि चेहरादर्शी स्युडो अभिनेते, अभिनेत्रींची निर्मिती घाऊक प्रमाणात करणाऱ्या रिल्सचं आता प्रचंड पेवच फुटलं आहे. हे रिल्स निर्माण करणारे जितके आहेत, त्यापेक्षा एक्सेस करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. गंमत म्हणजे एकापाठोपाठ एक रेल्वेप्रमाणं स्क्रीनवर येतच राहणाऱ्या या रिल्समध्ये आपण आपला किती तरी प्रचंड प्रमाणात अनावश्यक वेळ घालवू लागलो आहोत, याचं भानही राहात नाही. या अनाठायी मनोरंजनाची आपल्याला खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात गरज आहे का, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वापरकर्त्यानं आपापल्या स्तरावर याचा निर्णय घ्यायचा आहे. नाही तर, खाण्याचं जसं अजीर्ण होतं, तसंच या अतिरिक्त मनोरंजनामुळं आपल्या जगण्याचंही अजीर्ण होऊन जाईल. त्या नादात आपलं सात्त्विक जगायचंही राहून जाईल, कदाचित!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा