ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांना इंडियन सोसायटी फॉर प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स
(आयएसपीएस) या संख्याशास्त्रातील राष्ट्रीय आघाडीच्या संस्थेकडून ‘फेलो ऑफ दि सोसायटी’ हा सन्मानाचा पुरस्कार प्रदान
करून गौरविण्यात आलं. या निमित्तानं प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते
पुष्पगुच्छ देऊन कुलगुरू महोदयांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी विद्यापीठाचे
अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास
शिंदे आणि अस्मादिक उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के सरांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘संख्याशास्त्र आणि वारंवारिता क्षेत्राच्या प्रगती
आणि विकासात दिलेल्या लक्षणीय योगदाना’बद्दल
हा पुरस्कार बहाल करण्यात आलाय. यावेळी त्यांनी काही आठवणी सांगितल्या. आंध्र
प्रदेशातील तिरुपती मुख्यालय असणाऱ्या इंडियन सोसायटी फॉर प्रॉबॅबिलिटी अँड
स्टॅटिस्टिक्स (आयएसपीएस) आणि कोचीन येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड
टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानं कोचीन इथं ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत
संस्थेची ४२ वी वार्षिक परिषद पार पडली. या परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार
देण्यात आला. या संस्थेच्या सुरवातीच्या कालखंडातली आठवी परिषद (साधारण ३४-३५
वर्षांपूर्वी) ही शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. तेव्हा शिर्के सर
संख्याशास्त्राचे विद्यार्थी होते. त्यावेळी आलेल्या संख्याशास्त्रज्ञांचे स्वागत
करणे, त्यांना आवश्यक ती मदत करणे आणि परिषद व्यवस्थित पार पाडण्यासाठी विभाग
देईल, ती जबाबदारी पार पाडणे अशा हरकाम्या विद्यार्थ्याच्या भूमिकेमध्ये ते होते.
तिथंपासून ते परिषदेकडून सर्वोच्च फेलोशीप प्राप्त होण्यापर्यंतचा प्रवास खरोखरीच
त्यांच्या संख्याशास्त्र विषयाप्रती आस्था व योगदानाची साक्ष देणारा आहे. याच
आठव्या परिषदेवेळी त्यांची भारताचे महान संख्याशास्त्रज्ञ डॉ. पी.व्ही. सुखात्मे
यांची भेट झालेली होती आणि त्या काळात सुखात्मे सरांनी ‘आयएसपीएस’ला
सुमारे एक लाख रुपयांची देणगी दिलेली होती. मोठी माणसं स्वतः मोठी होत असताना
संस्थात्मक कार्यालाही कसं पाठबळ देतात, याचंच हे उदाहरण.
कुलगुरू डॉ. शिर्के सरांना वारंवारिता व संख्याशास्त्रातल्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा