(मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये या वर्षी पाक्षिक ललित लेखमाला लिहीतो आहे. या मालिकेचा पहिला भाग माझ्या वाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)
एक व्यंगचित्र पाहण्यात आलं. यामध्ये एक दिग्दर्शक सांगतो आहे की, त्याचा
पुढील चित्रपट हा ब्लॅक अँड व्हाईट असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तो मूकपट असेल! संदर्भ ताजा आहे. तो विस्कटून
सांगण्याची गरज नाही, मात्र आपल्या अभिव्यक्तीने तथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याने
दिशा कोणती पकडली आहे, यावर नेमकेपणानं बोट ठेवणारं हे स्टेटमेंट!
का होतं आहे असं?
का नाकारत चाललो आहोत आपण सगळं?
अवघ्या शंभर-दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, न्या. रानडे, लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल
रामजी शिंदे आदी अनेकांनी या देशाच्या पुरोगामित्वाची जी पायाभरणी केली, तिला
मजबूत करण्याचे राहोच, पण ठिसूळ करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या ७५
वर्षांत आपण चालविले आहेत. वादावर संवादानं विजय मिळवायचा, द्वेषाला प्रेमानं
जिंकायचं, ही बुद्ध-गांधींची परंपरा या देशाला लाभलेली आहे. ती आपण विसरलो आहोत की
काय, असे वाटायला लावणारा भोवताल आपल्याच भोवती फेर धरून गरगरतो आहे आणि आपणही
त्यातच त्यात अधिकाधिक गुरफटत चाललो आहोत. चांगुलपणाचं भान सुटत चाललं आहे. एकाच
एक चष्म्यातून या भोवतालाकडे पाहण्याची सवय आपल्याला लागलेली आहे. बरं, तो चष्मासुद्धा
आपला नाहीच. इतरच कोणी तरी आपल्या डोळ्यावर तो चढविलेला आहे. आपलाच भाऊ, आपलीच
भगिनी, आपलाच शेजारी अन् आपलाच मित्र, या सर्वांकडं अविश्वासदर्शक संशयाच्या
नजरेनं आपण पाहू लागलो आहोत. या संशयानं आपलं अवघं आयुष्य व्यापत चाललं आहे. आपला सारासार
विवेक, आपली विचारक्षमता, बुद्धीप्रामाण्यवाद या बाबी जणू काही आपलं बोट सोडून
कुठं तरी अनोख्या बेटावर कायमच्या निवासाला निघून गेल्यात की काय, असं वाटण्यासारखी
ही स्थिती.
काय कारण असेल बरं?
कधी विचार केलात?
आपण स्वतः सोडून इतर प्रत्येकाचं मूल्यमापन फार कठोरपणानं करू लागलो आहोत. त्या
मूल्यमापनाचे निकषही आपले नव्हेतच. तेही दुसऱ्याच कोणी दिलेले. सप्तरंगांमध्ये
नानाविध छटा असतात. त्या छटांमधील वैविध्यतेचा आनंद घेण्याऐवजी आपण साऱ्याच गोष्टी
जणू ‘ब्लॅक’ आणि ‘व्हाईट’
या दोनच छटांमध्ये पाहू लागलो आहोत. काळोखासारखं कुळकुळीत काळं आणि नितळ हिमालयासम
शुभ्रधवल पांढरं असं काही नसतंच मुळी. काळोखालाही चंद्र-चांदण्यांची शीतल धवलता उठाव देते; तर, हिमालयाची शुभ्रता खुलते ती आकाशी निळाईच्या
पार्श्वभूमीवर!
मानवी आयुष्यालाही अशाच रंगच्छटा सौंदर्य बहाल करतात. अगदी करडेपणाच्याही अनेक
छटा आयुष्याला व्यापत असतातच की. काळ्याकडून पांढऱ्याकडचा प्रवास हाच मुळी या
करडेपणाच्या छटांमधून होत असतो. याच प्रवासाच्या टप्प्यावर काही रंग आपल्याला
भेटतात- आयुष्याला गहिरेपण, अर्थ प्रदान करणारे.
निसर्गच जर असा रंगबिरंगी... तर, त्या निसर्गाचेच घटक असणारे आपण बेरंगी का
होतो? एखाद्यावर सरसकट
काळेपणाचे, धवलपणाचे आरोपण का करीत सुटतो? निसर्गाचे समस्त रंग आपल्यातही आहेत. त्यातही इतर
प्राणीमात्रांपेक्षा एक अधिकचा रंग बाळगण्याची सक्षमता आपल्यामध्ये आहे, तो म्हणजे
मानवतेचा रंग! विविध जाती, धर्म,
प्रांत, भाषा आदी भेदांच्या भिंती आपणच बांधल्या आणि त्या भिंतींना आपणच
वेगवेगळ्या रंगांत रंगवलं. आपण आपला एक रंग ठरविलेला आहे. तो वगळता आता आपल्याला
अन्य तमाम रंगांविषयी घृणा वाटू लागली आहे. त्या घृणेमध्ये मानवता, एकता-एकात्मता,
समता, राष्ट्रभक्ती यांच्या आकर्षक नैकरंगी विविधतेवर मात्र एक प्रकारची कृष्णछाया
दाटून आलेली आहे.
ही कृष्णछाया, औदासिन्याचे मळभ, विषमता व द्वेषाची भावना दूर करण्याची
जबाबदारी कोणा दुसऱ्याची नाही. आपले घर आपणच आवरायचे अन् सावरायचे असते. हा देश
आपले घर आहे. तो जपणे आपली जबाबदारी आहे. आतला घरभेदी असो वा बाहेरचा घुसखोर, या
दोहो प्रवृत्तींना तोंड द्यावयाचे, तर आपले एकीचे बळ कायम जपण्याची नितांत
आवश्यकता आहे. त्यासाठीचे मार्गदर्शक डॉक्युमेंटही आपल्याकडे आहे- ते म्हणजे
संविधान! आज जगभरात सुरू असणारे
कलह आणि अशांती यांच्या थेट भडिमारापासून भारताचे अन् प्रत्येक भारतीयाचे संरक्षण
संविधान करते आहे. संविधान तुमच्या-माझ्या पाठी पहाडासारखे उभे आहे, म्हणून आपण
ताठ कण्याने उभे आहोत. घटनेनेच प्रदान केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण
जिथे-तिथे वापर करतो आहोत. मात्र, तो सकारात्मक आहे की या देशाच्या
स्वातंत्र्याच्या मुळावर उठणारा आहे, याचा विवेक आपण कधीही गमावता कामा नये. सृजनात्मक
अभिव्यक्तीचे निर्माते आणि वाहक असणाऱ्या साहित्य, संस्कृती, कला, नाट्य, संगीत
आदी क्षेत्रांनी तर याची जाणीव ठेवणे आवश्यकच. या विविध क्षेत्रांमध्ये
स्वातंत्र्याची नवचेतना सदोदित प्रज्वलित राखण्यासाठी अभिव्यक्तीचे विविध रंग
मुक्तपणाने उधळीत राहणे, हे जसे प्रतिभावान सर्जकाचे काम; त्याचप्रमाणे त्या अभिव्यक्तीला कणखर
प्रोत्साहनाचे पंख प्रदान करणे, ही गुणग्राहक व्यवस्थेची आणि ती व्यवस्था
राबविणाऱ्यांची जबाबदारी! या
दोन्ही गोष्टी जुळून आल्या की, देशाच्या सर्वंकष प्रगतीला इंद्रधनुषी दिशा
लाभण्याची शक्यता गडद होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा