मंगळवार, १० मार्च, २०२६

कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीतील तारकादळ विद्यापीठात अवतरते तेव्हा...

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत (डावीकडून) प्रिया सरीकर, आरजे स्नेहा, आरजे रसिका, डॉ. आलोक जत्राटकर, शुभांगी तावरे, अनुराधा सरनाईक-कदम, इंदुमती गणेश आणि श्रद्धा जोगळेकर.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाच्या मुशीतून घडलेलं कोल्हापूर. इथं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं यशाची कमान निर्माण करणाऱ्या आणि उंचावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी नाही. स्त्री-सन्मान, स्त्रियांना समतापूर्ण सौहार्द लाभावा, यासाठी अनेक कायदेकानू करून तिची प्रतिष्ठा कायम करणाऱ्या या राजर्षींच्या वारशामुळं आजही कोल्हापुरात स्त्रिया आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालताना दिसतात. कोल्हापूरची वृत्तपत्रसृष्टी सुद्धा त्याला अपवाद नाही. फिल्डवर पुरूषांच्या बरोबरीनं आत्मविश्वासानं वावरणाऱ्या, किंबहुना कित्येकदा त्यांच्याहून काकणभर सरस कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारांची इथं कमी नाही. आज फिल्डवर, डेस्कवर आणि डिजीटल अशा मिळून साधारण पन्नासेक महिला, मुली कोल्हापूर शहरात कार्य़रत असतील. यातील अनेकींची कारकीर्द २० वर्षांहून अधिक काळची सुद्धा आहे. तसे पाहता कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीत स्वयंतेजाने तळपणाऱ्या या अशा तारका आहेत ज्या आजच्या युवा वर्गासाठी सच्च्या आयडॉल ठराव्यात.
सध्या शिवाजी विद्यापीठात प्रभारी प्र-कुलगुरूपदाची धुरा ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव यांच्याकडं आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठाला महिला प्र-कुलगुरू लाभलेल्या आहेत. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं या महिला पत्रकारांना विद्यापीठात आमंत्रित करावं आणि प्र-कुलगुरू मॅडमचा त्यांच्याशी औपचारिक, अनौपचारिक संवाद घडवून आणावा, अशी एक आंतरिक इच्छा मनी होती. ती १० मार्चच्या सायंकाळी फलद्रुप झाली. पत्रकारितेमध्ये ‘ड्युटी फर्स्ट’ हाच मूलमंत्र जपावा लागत असल्यानं अनेक महिला पत्रकार त्यांच्या असाईनमेंट्स, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळं उपस्थित राहू शकल्या नाहीत. तथापि, काही जणी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिल्या. नावंच सांगायची झाल्यास, इंदुमती गणेश, अनुराधा कदम-सरनाईक, प्रिया सरीकर, शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर, आरजे रसिका आणि आरजे स्नेहा. यातल्या प्रत्येकीनं स्वतःच्या कामाचा ठसा कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. तसं पाहता, त्या या फिल्डमधल्या खऱ्या स्टार आहेत. इंदुमती गणेश या मैत्रिणीच्या धाडसी पत्रकारितेला सलाम करीत असताना मी यापूर्वी स्वतंत्र पोस्ट लिहील्याचं आपल्याला स्मरत असेलच. तिच्यासह अनु, प्रिया, शुभांगी, श्रद्धा या प्रत्येकीचा पिंड वेगळा, कामाची पद्धत वेगळी असं असलं तरी सिन्सिरिटीच्या बाबतीत त्या साऱ्या सरस आहेत, कदाचित पुरूषांपेक्षाही अधिक. त्यामुळं त्यांच्या बायलाईन बातम्या आवर्जून वाचणारे वाचक आढळतात. तीच परिस्थिती आरजे रसिका आणि स्नेहा यांची. स्थानिक एफएम वाहिनीच्या माध्यमातून या दोघींचे आवाज प्रत्येक रेडिओ श्रोत्याला अतिशय चिरपरिचित असलेले. अतिशय संयमी, अभ्यासू आणि संदर्भांनी परिपूर्ण असे अनेक कार्यक्रम त्या सादर करतात. या निमित्ताने त्याही प्रथमच विद्यापीठात आल्या. या सर्वांमध्ये आणखी एक महत्त्वाचा धागा होता, तो म्हणजे त्या सर्व जणी शिवाजी विद्यापीठाच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे या चर्चेला एक वेगळीच आपुलकीची किनार होती.
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी या संवादासाठी साधारण अर्धा तासाची वेळ दिलेली होती. पण त्यांच्यात आणि या सर्व पत्रकार मैत्रिणींमध्ये संवाद असा काही रंगला की दीड तास कधी उलटून गेला, तेही समजले नाही. गंमतीचा भाग म्हणजे या साऱ्या जणींना मॅडमच्या संशोधनाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते, तर मॅडमना पत्रकारिता करीत असताना त्यांना येणारी आव्हाने, भेडसावणाऱ्या समस्या, समाज आणि सहकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक इत्यादी गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे होते. आणि त्या पद्धतीने अत्यंत अनौपचारिकपणे हा संवाद घडत गेला, उलगडत गेला. अंती साऱ्यांच्याच चेहऱ्यावर एक उत्तम भेट झाल्याचा आनंद झळकला. आणि मला लाभले एक चांगला संवाद घडवून आणल्याचे समाधान!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा