सुखाच्या लहरींना मात देण्यासाठी दुःखाची एक लाट पुरेशी ठरते. काल पुरस्काराचा आनंद सर्वांसोबत शेअर करीत असतानाच आज आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या निधनाची बातमी यावी, यापरते मोठं दुःख ते काय?
डॉ. जयसिंगराव पवार यांचं जाणं ही सामाजिक आणि इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी आहेच, पण व्यक्तिगत पातळीवर ही माझी सुद्धा खूप मोठी हानी आहे. माझ्यावर अगदी पुत्रवत प्रेम करणारा एक प्रेमळ पिता आज मी गमावला आहे, अशी माझी भावना आहे. काही व्यक्तिगत कारणानं बाहेरगावी असल्यानं या पित्याचं अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. याची खंत वाटते आहेच; पण त्याही पलीकडे त्यांच्या अनेक आठवणी या प्रसंगी मनामध्ये उचंबळून येत आहेत. अनेक आठवणी आहेत त्यांच्या. विद्यापीठात आले की प्रेमाने हातात हात घेऊन चालणारे, अगदी विश्वासाने खांद्यावरती हात टाकणारे, अत्यंत सस्मित वदनाने स्वागत करणारे, बोलणारे, आपुलकीने संशोधनाची, लेखनाची चौकशी करणारे असे पवार सर मला सतत भेटत राहिले. त्यांचा हसतमुख चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतो आहे आणि तितक्या वेळा डोळे पाण्यानं डबडबताहेत.
मी जेव्हा पीएचडी झालो, तेव्हा माझा एकमेव जाहीर सत्कार हा आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांनी आणि माझे गुरु डॉ. अशोक चौसाळकर यांनी शाहू स्मारक भवनमध्ये केला. नुसता सत्कार केला नाही तर 'शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर पत्रकारिता' या विषयावर सविस्तर व्याख्यान देण्याची संधी त्यांनी मला दिलेली होती. पवार सर स्वतः अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी माझ्या मांडणीचं कौतुक तर केलं होतंच, पण आता आपले संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी असे तरूण संशोधक पुढे येताहेत, ही समाधानाची बाब असल्याचे उद्गारही काढले होते.
गेल्या वर्षी माझ्या दोन पुस्तकांचा प्रकाशन झालं. ती पुस्तकं द्यायला मी सरांच्या घरी गेलो. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर आदरणीय माईंनी आणि सरांनी अतिशय आपलेपणानं माझं अभिनंदन तर केलंच; त्याशिवाय अगदी अनपेक्षितपणे माझा या दोघांनी सत्कारही केला. साक्षात डॉ. जयसिंगराव पवार सरांनी सत्कार करावा, यापेक्षा आयुष्यामध्ये अन्य कुठलीही गोष्ट मोठी असू शकेल, असं मला वाटत नाही. महत्त्वाचं म्हणजे सरांचं पंचखंडात्मक चरित्र लेखनाचं कार्य सुरू असतानाही त्यांनी ही दोन्ही पुस्तकं वाचली आणि मला आवर्जून फोन केला. 'ब्लॅक व्हाईट अन् ग्रे' मधल्या 'डिकास्ट व्हावं कसं?' या लेखानं ते अस्वस्थ झाले होते. त्या विषयावर आम्ही सुमारे पाऊण तास बोललो. 'माझ्या ८५ वर्षांच्या आयुष्यात तुमच्यासारखा खऱ्या अर्थानं डिकास्ट झालेला माणूस प्रथमच मला भेटला,' हे सरांचे कौतुकोद्गार आजही जसेच्या तसे कानात गुंजताहेत आणि जबाबदारीची जाणीवही करून देताहेत.
त्यानंतर माझ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकाचा मसुदा पाहून सरांनी त्यातील काही संदर्भ नवीन आहेत, असे निरीक्षण नोंदवले आणि अनेक मौलिक सूचना या संदर्भाने मला केल्या. त्या अंमलात आणायच्या की नाही, याचा निर्णय तुम्ही घ्या, असं इतक्या निर्व्याजपणाने सरांनी मला सांगितलं होतं. सरांच्या सूचनांबरहुकूम आता पुस्तकाची रचना झालेली आहे. अशा किती आठवणी सांगाव्यात सरांच्या.
या क्षणी पूर्ण ब्लँक व्हायला होतंय ते यासाठी की सरांनी शाहू महाराजांचा वारसा ज्या पद्धतीने पुनरुज्जीवित केला, शाहूंच्या बदनामीची सगळी प्रकरणं, सगळ्या गोष्टी अगदी प्रचंड अभ्यासांती पुरावे गोळा करून सरांनी शाहूंची प्रतिमा ज्या पद्धतीने उजळवली. केवळ देशातच नव्हे, राज्यातच नव्हे तर जगाच्या पातळीवर सरांनी शाहूंचं नाव पोहोचवलं. पवार सरांचं सगळ्यात मोठं काम हे शाहूंच्या संदर्भातलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं, त्याला अजिबात तोड नाही. त्यांच्यामुळे शाहू महाराजांशी आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने, आत्मीय भावाने जोडले गेलो. शाहू महाराज यांचं दैवतीकरण न करता त्यांना आत्मसात करणं ही आवश्यक बाब आहे, हे सातत्याने ते प्रत्येक तरुणाच्या मनावर बिंबवत राहिले. मला वाटतं ही गोष्ट फार फार मोलाची आणि महत्त्वाची आहे. मात्र आता होतंय असं की, ज्या कोल्हापूरमध्ये महाराजांनी काम केलं आणि जयसिंगराव पवार सरांनी महाराजांचा वारसा पुनरुज्जीवित करण्याचं आणि जिवंत ठेवण्याचं काम केलं; त्या कोल्हापूरमध्ये शाहू विचार संपवण्यासाठीची एक वेगळी चळवळ मूळ धरू पाहते आहे. तशा स्वरूपाच्या बाबी, घटना होऊ लागलेल्या आहेत. त्यांच्या पुरोगामित्वाला हरताळ फासणाऱ्या गोष्टी घडवल्या जात आहेत. 'आता कोल्हापूर पुरोगामी राहिलं नाही,' असं शाहूंच्या पुतळ्याच्या साक्षीनं अभिमानानं सांगणारे तथाकथित नेते उभे राहताहेत. त्यामुळं मला असं वाटतं की शाहूंना जपणं, शाहूंचा वारसा खऱ्या अर्थानं जपणं आणि वृद्धिंगत करणं हीच आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या जीवनकार्याला खरी आदरांजली ठरेल!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा