रविवार, ८ मार्च, २०२६

बाबा भारती यांच्या स्मृतींना पुरस्कार अर्पण!




माझे अण्णा ए.दा. कांबळे (गुरूजी), भन्ते दीपंकर आणि बाबा भारती.


(पुरस्कार प्रदान समारंभाची लघुचित्रफीत)



ईश्वरपूर (इस्लामपूर) येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या मराठी साहित्य संमेलनात काल (दि. ८ मार्च) संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते माझ्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित संग्रहाला लोकनेते राजारामबापू राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार-२०२५ प्रदान करून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी उद्घाटक सु. धों. मोहिते, स्वागताध्यक्ष प्रा. शैलजा यादव-पाटील, कार्यकारिणी अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी, प्रा. सुनील पाटील, सुभाष खोत, दशरथ पाटील, धर्मवीर पाटील आदींसह ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील, एकनाथ पाटील, रमजान मुल्ला, डॉ. शामसुंदर मिरजकर, चित्रकार अन्वर हुसैन, माझे मित्र डॉ. मुजफ्फर मुल्ला, विनायक ठोंबरे आदी उपस्थित होते.
हा पुरस्कार अत्यंत विनम्रतापूर्वक स्वीकारतानाच तो मी इस्लामपूरचे बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक कालकथित जगन्नाथ विष्णू तथा बाबा भारती यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण केला. बाबा भारती हे माझ्या आण्णांचे (आजोबा) अत्यंत जवळचे मित्र होते. दोघेही ‘राष्ट्र भाषा रत्न’ होते. त्यांच्या या स्नेहामुळे माझ्यासाठी ते ‘इस्लामपूरचे भारती आजोबा’च होते. त्यांचा पाली-मराठी शब्दकोष हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आला असून पाली भाषेच्या विशेषतः बौद्ध साहित्याच्या अभ्यासकांच्या तो आवर्जून संग्रही आहे. त्याखेरीज बाबा भारती यांनी समग्र बौद्ध संस्कार विधी सर्वसामान्य लोकांना समजावेत म्हणून अत्यंत गेयतापूर्ण मराठीत सादर केले. धम्मपदाचेही त्यांनी अत्यंत रसाळ आणि ओघवत्या मराठीत पद्यानुवाद केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशक माझे आजोबा आहेत. तर, त्याचे प्रकाशन इस्लामपूरमध्येच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
पाली भाषेच्या शब्दकोषाचे काम सुरू असताना दर शनिवारी शाळा सुटली की, भारती आजोबा सांगलीत आण्णांकडे येत. तेव्हा मी सांगलीतच शिकायला होतो. आजोबा आले की, जेवून हे दोघे पुस्तकाविषयी चर्चा करायला बसत. सायंकाळपर्यंत चर्चा चाले. शनिवारी सांगलीचा आठवडी बाजार असे. दोघे आवरुन बाजारात जात. भाजीपाला खरेदी करून त्या पिशव्यांसह जो कोणता नवा चित्रपट त्यावेळी लागलेला असेल, तो चित्रपट पाहात. चित्रपट पाहून झाला की घरी येत. जेवण झाले की पुन्हा रात्री उशीरापर्यंत चर्चा करीत बसत. रविवारी आईबाबा, मावश्या, मावसभाऊ वगैरे येत असत. बहुतेकदा सामिष भोजनाचा बेत असे. बरोबर बाराच्या भोंग्याला जेवायला बसत सारे. तासाभरात जेवण झाले की हे दोघे मित्र पुन्हा पुस्तकावर सायंकाळपर्यंत पुन्हा चर्चा करीत. पाच वाजता भारती आजोबा इस्लामपूरला परत जात आणि आजोबा बाजारात. अनेकदा मी त्यांच्या या चर्चांचा साक्षीदार झालो आहे. फारसं काही समजण्याचं ते वय नव्हतं, मात्र एखाद्या विषयावर, शब्दावर हे दोघे तासंतास कसे काय बरे चर्चा करू शकतात, याचे मला कुतूहल, त्याहूनही अधिक मौज वाटे. मी आण्णांच्या नाही तर भारती आजोबांच्या मांडीवर बसूनच ऐकत असे. रात्री त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतही असे. या दोन आजोबांचा सहवास मला खूप प्रिय होता. ते माझे लाडही खूप करायचे. त्यांच्याबरोबर मी अनेक चित्रपट पाहिले होते. एकदाच फक्त एक सस्पेन्स चित्रपट पाहिला होता. (बहुधा, ‘कब? क्यूँ? और कहाँ?’ असावा.) खूप घाबरलो होतो. त्यापुढचे दोन तीन आठवडे मी काही त्यांच्याबरोबर बाजारात गेलो नव्हतो.
पुढे मी कागलला आईवडिलांकडे आलो. तथापि, भारती आजोबा तिकडेही आम्हाला भेटायला येत. सांगलीइतक्या सातत्यानं भेटी होत नसल्या तरी भारती आजोबांविषयीचं प्रेम मात्र कायम मनात आणि सोबत राहिलं. आम्ही निपाणीचं घर बांधायला काढलं तेव्हा भूमीपूजनाला ते उपस्थित होते. मात्र, बांधून पूर्ण होण्याआधीच भारती आजोबांचं निधन झालं.
त्यांच्या अनेक स्मृती मनात आहेत. आजोबांच्या जलदान विधीनंतर प्रथमच काल मी इस्लामपूरला आलो होतो. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. ‘बाबा भारती सदन’ असे नाव दिले आहे घराला. त्यांचे पुतणेच केवळ भेटले. मुले बाहेरगावी असल्याने भेट होऊ शकली नाही. कालचा दिवस आजोबांच्या स्मरणरंजनात गेला. त्यांचे साहित्य, त्यांच्या आठवणी सोबत आहेत, हेच आयुष्यातील एक महत्त्वाचे संचित आहे. म्हणूनच त्या भूमीतील पुरस्कार त्यांच्या स्मृतींना अर्पण करीत असताना मनाला अतीव समाधान वाटते आहे.
(पुरस्कार छायाचित्र सौजन्य: विनायक ठोंबरे, मोतीराम पौळ)

पुरस्कार प्रदान समारंभाचा व्हिडिओ: https://youtu.be/xpxJKKl-wvc


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा