जगातील सर्वात लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक म्हणजे शेरलॉक होम्स. जो कधी जन्मलाच नाही, पण ज्याच्या अस्तित्वाच्या स्मृती जग आज त्याच्या साहित्यिक जन्माच्या दोनेक शतकांनंतरही जपतं, साजरं करतं, असा हा वल्ली. अगदी आधुनिक काळातील तंत्रज्ञान हाताशी आल्यानंतरही त्याचा तपास कशा पद्धतीचा असू शकेल, या दिशेनेही लेखन आणि मालिकांची निर्मिती झाली. त्या दर्शकप्रियही झाल्या. तथापि, शेरलॉक होम्स या पात्राची निर्मिती करताना सर आर्थर कॉनन डॉयल यांनी त्याच्या संपूर्ण आयुष्याचे तपशीलवार चरित्र लिहिले नाही. उलट त्यांनी विविध कथांमध्ये फक्त काही सूचक उल्लेख केले, जणू एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळाचे छोटे-छोटे तुकडे. या तुकड्यांमधून होम्सच्या पूर्वायुष्याची केवळ झलक मिळते. परंतु याच झलकांवर आधारित एक संपूर्ण साहित्यिक विश्व उभे करण्याचे काम लेखक ॲंन्ड्र्यू लेन यांनी केलं आहे. ते विश्वासार्ह वाटतं, खरं वाटतं, ही खरी त्यांच्या सर्जनशीलतेची कमाल आहे.
त्यांच्या लेखनावर आधारित 'यंग शेरलॉक' ही मालिका केवळ साहसकथा नाही; ती मूळ होम्स विश्वाचा सर्जनशील विस्तार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती मूळ कथांचा आदर राखत, त्यातील सूचक धाग्यांचं कल्पक रूपांतर करते.
डॉयल यांच्या कथांमध्ये होम्सच्या भूतकाळाबद्दल काही महत्त्वाचे संकेत वेगवेगळ्या कथांत विखुरलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास 'द ॲडव्हेंचर ऑफ ग्लोरिया स्कॉट' या कथेत होम्स आपल्या विद्यापीठातील दिवसांची आठवण सांगतो. त्याचा मित्र व्हिक्टर ट्रॅव्होर आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित घडलेल्या रहस्यामुळे होम्सला आपली विश्लेषणशक्ती गुन्हे तपासासाठी वापरता येते हे जाणवते. ही घटना त्याच्या गुप्तहेर कारकिर्दीची सुरुवात ठरते.
त्याचप्रमाणे 'अ स्टडी इन स्कार्लेट'मध्ये होम्स रसायनशास्त्राचे प्रयोग करताना दिसतो. यावरून त्याची वैज्ञानिक वृत्ती आणि प्रयोगशीलता दिसून येते. नंतरच्या कथांमध्ये त्याची निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास यांचा वारंवार उल्लेख येतो.
कुटुंबाबद्दलचा आणखी एक धागा म्हणजे त्याचा भाऊ मायक्रॉफ्ट होम्स. तो अत्यंत बुद्धिमान आणि सरकारी गुप्त यंत्रणेशी संबंधित असल्याचे सूचित केले आहे. या उल्लेखांमुळे होम्सचे बौद्धिक वातावरण कसे असेल, याची कल्पना येते.
या सर्व धाग्यांतून होम्सच्या पूर्वायुष्याचा एक आराखडा तयार होतो. एक विलक्षण बुद्धिमान, पण सामाजिकदृष्ट्या थोडा अलिप्त तरुण, ज्याची वैज्ञानिक जिज्ञासा आणि निरीक्षणशक्ती पुढे त्याला जगातील महान गुप्तहेर बनवते.
या सूचक उल्लेखांवर आधारित पूर्ण कथा उभारणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु लेखक ॲंन्ड्र्यू लेन यांनी ते अत्यंत कल्पकतेने केले आहे. 'यंग शेरलॉक' मालिकेत आपण होम्सला किशोरवयीन अवस्थेत पाहतो, जो अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही, मात्र त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेची चिन्हे येथे दिसताहेत.
मालिकेत त्याचे शिक्षण, त्याच्या आयुष्यात येणारे मार्गदर्शक, आणि त्याला भेटणारी धोकादायक साहसे यांचे चित्रण आहे. या अनुभवांमधून त्याची निरीक्षणशक्ती विकसित होते, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो, आणि गुन्हे उलगडण्याची आवड वाढते. मूळ कथांमध्ये दिसणाऱ्या प्रौढ होम्सच्या व्यक्तिमत्त्वाची बीजे या मालिकेत विकसित होताना दिसतात.
मालिकेतील सर्वात इंटरेस्टिंग कल्पना म्हणजे होम्स आणि त्याचा भविष्यातील शत्रू जेम्स मॉरियार्टी यांच्यातील संबंध. मूळ कथांमध्ये मोरीआर्टी हा गुन्हेगारी जगाचा अत्यंत बुद्धिमान सूत्रधार म्हणून दिसतो. परंतु या मालिकेत त्याला सुरुवातीला शेरलॉकचा मित्र म्हणून दाखवले आहे.
ही कल्पना साहित्यिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ती दाखवते की दोन असामान्य बुद्धिमत्ता वेगवेगळ्या दिशांनी कशी विकसित होऊ शकतात- एक न्यायाच्या मार्गावर आणि दुसरी सत्तेच्या आणि लोलुपतेच्या मार्गावर. अशा प्रकारे नायक आणि खलनायक यांच्या संघर्षाची बीजे त्यांच्या तरुणपणातच पेरली जातात.
यंग शेरलॉक होम्स मालिकेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील मानसशास्त्रीय सखोलता. मूळ कथांमध्ये होम्स अत्यंत तर्कप्रधान आणि भावनांपासून दूर दिसतो. मालिकेत या स्वभावामागील अनुभव दाखवून कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे वाचकाला प्रौढ होम्सच्या व्यक्तिमत्त्वाचा उगम समजतो. मालिकेने या व्यक्तिरेखेचा विकास दाखवला आहे.
या मालिकेचे मोठे यश म्हणजे ती दोन स्तरांवर अनुभवली जाऊ शकते. एका बाजूला ती किशोरवयीनांसाठी रोमांचक साहसकथा आहे. दुसऱ्या बाजूला मूळ होम्स साहित्याशी परिचित असलेल्या वाचकांसाठी ती एक प्रकारची साहित्यिक पुनर्रचना आहे.
मूळ कथांतील लहान-लहान संकेत, जसे की निरीक्षणशक्ती, वैज्ञानिक प्रयोग, मायक्रॉफ्टचा प्रभाव आणि मोरीआर्टीसोबतचा संघर्ष यांना लेखकाने विस्तृत कथानकात रूपांतरित केले आहे. त्यामुळे ही मालिका मूळ होम्स विश्वाचा आदर राखत त्याचा सर्जनशील विस्तार करते.
थोडक्यात, शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये आर्थर कॉनन डॉयल यांनी जाणीवपूर्वक किंवा नकळत दिलेले सूचक धागे जणू एका मोठ्या कथानकाची बीजे आहेत आणि त्या आधारे ॲंन्ड्र्यू लेन यांनी त्या बीजांपासून एक समृद्ध आणि रोमांचक विश्व निर्माण केले आहे.
म्हणून ही मालिका केवळ लोकप्रिय साहसकथा नाही; तर मूळ साहित्याशी संवाद साधणारी, त्याचा अर्थविस्तार करणारी आणि शेरलॉक होम्स या अमर पात्राच्या घडणीच्या अनुषंगाने नवा दृष्टीकोन देणारी एक आवर्जून पाहावी, अशी सर्जनशील निर्मिती आहे. त्यासाठी क्रिएटर मॅथ्यू पार्कहिल, दिग्दर्शक पीटर हार्नेस आणि गाय रिची यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे...
(ओटीटी: ॲमेझॉन प्राईम)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा