वर्धा येथे काल (शनिवार, दि. २५ एप्रिल) मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय वैचारिक साहित्याचा वाङ्मय पुरस्कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते स्वीकारण्याचा सन्मान मला लाभला.
हा पुरस्कार प्रदान सोहळा अत्यंत भव्य, दिमाखदार आणि मनात दीर्घकाळ ठसा उमटवणारा ठरला. वर्ध्यातील बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात, मूळ आसनक्षमतेपलीकडे अतिरिक्त व्यवस्था करूनही, आणि त्याही पुढे उभ्या राहून कार्यक्रम ऐकणाऱ्या रसिकांच्या उपस्थितीत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी दिलेला प्रतिसाद खरोखरच उल्लेखनीय होता.
आम्ही केवळ पाच पुरस्कार विजेते असताना, आमच्या सन्मानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणे, हीच नारायणे प्रतिष्ठानची खरी कमाई आहे, असे मला मनापासून वाटते. अवघ्या पाच वर्षांत या प्रतिष्ठानने निर्माण केलेला विश्वास आणि सामाजिक सन्मान विशेष उल्लेखनीय आहे.
या सोहळ्याच्या यशामागे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे आणि कार्यकारिणीतील प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहुल भस्मे, जिगीषा नारायणे यांच्यासह पुरस्कार संयोजन समितीचे श्रीकांत पेटकर, डॉ. संदीप भेले, किशोर पेटकर, सूर्यकांत पाटील यांचे परिश्रम अत्यंत मोलाचे आहेत.
विशेषतः, पुरस्कार विजेत्यांसाठी राहण्यापासून ते सेवाग्राम आणि आनंदवन दर्शनापर्यंतची केलेली आदरपूर्वक व्यवस्था हा एक वेगळाच आणि प्रेरणादायी अनुभव होता. केवळ पुरस्कार देणे नव्हे, तर पाहुणचाराची ही समृद्ध परंपरा जपण्याचा त्यांचा दृष्टिकोन निश्चितच अनुकरणीय आहे.
या सर्व अनुभवांमुळे हा पुरस्कार आज राज्यभरात एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानबिंदू बनत असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
हा सन्मान स्वीकारताना माझ्या मनात आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ इतिहासकार आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या स्मृती तेवत होत्या. या भावनेतून हा पुरस्कार मी त्यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करीत आहे.
या सन्मानासाठी आणि प्रेमासाठी मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!
या निमित्ताने मित्रवर्य मंगेश वरकड, बुद्धदेव मिरगे यांची बऱ्याच कालावधीनंतर आनंददायी भेट झाली, हेही महत्त्वाचे!



.jpeg)
.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा