Jyoti Prakash Kulkarni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Jyoti Prakash Kulkarni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ मार्च, २०२६

माझ्या संस्कृतमाता ‘जेपीके’ मॅडम!

 

ज्योती प्रकाश कुलकर्णी

मित्र-मैत्रिणींनो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक अस्वस्थ दिवसांपैकी एक. याचे कारण म्हणजे ज्यांनी माझ्यावर निरतिशय प्रेम केले, त्या माझ्या संस्कृतच्या शिक्षिका, नव्हे, माझ्या संस्कृतमाता आदरणीय ज्योती प्रकाश कुलकर्णी अर्थात आम्हा विद्यार्थ्यांच्या लाडक्या जेपीके मॅडम यांचे अचानकपणे निधन झाल्याची वार्ता आज माझे काळीज चिरुन गेली. वयाच्या ७० व्या वर्षी तशी कोणतीही हिस्टरी नसताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्या गेल्या. आज दिवसभरात मॅडमच्या सान्निध्यातील अनेक स्मृती मनात गर्दी करून उभ्या आहेत. त्या कागदावर उतरल्याखेरीज या दुःखाचा भार हलका होणे नाही. म्हणून हा लेखनप्रपंच.

मॅडमचा मुलगा, माझा वर्गबंधू किरण याला गेल्या वर्षी मी माझे निखळ: जागर संवेदनांचा हे पुस्तक भेट दिले. ते घरी गेल्यावर त्याने मॅडमना दाखवले, तर मॅडमनी ते रात्रीत वाचून काढले आणि दुसऱ्याच दिवशी मला व्हिडिओ कॉल केला. खूप वेळ गप्पा मारल्या. नेहमीसारख्या प्रसन्नचित्त होत्या, जणू काही कालच निवृत्त झाल्या असाव्यात. माझं त्यांनी खूप कौतुक केलं, अभिमान व्यक्त केला आणि भेटायला ये निवांत एकदा, असं म्हणाल्या. मी खरंच खूप गांभीर्यानं हो म्हणालो, पण ते जमवू शकलो नाही. अवघं पाऊण तासाचं अंतर मी वर्षभरात कापू शकलो नाही. आज मॅडम गेल्यानंतर मात्र तितक्याच वेळात किरणला भेटायला पोहोचलो. मित्रांनो, माझं एकच सांगणं की, आपण या अनिश्चिततेच्या जगात आपल्या आपुलकीच्या माणसांना भेटत राहिलं पाहिजे. अन्यथा, आयुष्यभराची बोच सोबत घेऊन जगावं लागतं- जी मला आज सलते आहे.

जेपीके मॅडम यांच्याशी माझं खूप वेगळं नातं होतं. मोहनलाल दोशी विद्यालयात त्या माझ्या संस्कृतच्या गुरू खऱ्याच; पण, त्याही आधी त्या माझ्या लतामावशी होत्या. याचं कारण असं की, कागल विद्यालयाच्या (सध्याचं यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल) तत्कालीन मुख्याध्यापिका डिंगणकर बाई यांच्या त्या कन्या. आई त्या शाळेत शिक्षिका. बाईंमुळं जेपीके मॅडमची आणि आईची मैत्री. घरी येणं-जाणं. त्यामुळं त्या लहान वयात त्या माझ्या लतामावशी. पुढं अनेक वर्षांनी निपाणीत माझ्या शिक्षिका झाल्या. पण, त्यांचं माझ्यावरचं प्रेम मात्र तसंच.

नववीला मी निपाणीच्या मोहनलाल दोशी विद्यालयात प्रवेश घेतला. तिथं संस्कृत विषय आठवीपासून होता. पण माझ्या पूर्वीच्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये संस्कृत विषय नसल्याने माझा हिंदी विषय होता. इथे संस्कृत आहे म्हटल्यावर पूर्ण शंभर गुणांचे संस्कृत शिकायची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. पण मागील वर्षी काहीच न शिकल्याने हिंदी-संस्कृत असा प्रत्येकी ५० गुणांचा जोडविषय घेतला. माझी ही संस्कृतची ओढ लक्षात आल्यानं जेपीके मॅडमनी माझे आठवीचे संस्कृत तीन महिन्यांत करवून घेण्याचे ठरविले. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जायचो. स्वयंपाकपाणी करता करता त्यांनी मला मोफत संस्कृत शिकविले, व्याकरणाचा पाया पक्का करून घेतला. दोनेक महिन्यांतच त्यांनी मला इतरांच्या बरोबरीने आणून ठेवले. पुढेही दहावीपर्यंत आम्ही किती तरी मुलं त्यांच्या घरी शिकायला जायचो. पण, मॅडमनी कधी आमच्याकडून एक पैही शुल्क घेतले नाही. इतक्या निरलसपणाने त्यांनी संस्कृत भाषेची सेवा केली. आजच्या शिक्षकांच्या दृष्टीनं मोफत शिकविणाऱ्या जेपीके मॅडम वेड्याच ठराव्यात. पण मॅडमनी तसं वेडं असणं स्वीकारलं होतं. मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. त्यापोटी त्यांची सारी धडपड होती. शाळेच्या चार भिंतींच्या पलिकडलं शिक्षण देण्यासाठी आसुसलेलं मन त्यांच्याकडं होतं. त्यांच्या या शिकवण्यामुळंच पुढं बारावीपर्यंत शंभर मार्कांचं संस्कृत घेण्याचं धाडस मनी निर्माण झालं. त्या अर्थानं त्या माझ्या संस्कृतमाताच होत्या.

त्यांनी केवळ मला संस्कृत शिकवलं, असं नाही. तर, शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून सहभागी होण्याबरोबरच त्यांचं संचालन करण्याची संधीही त्यांनी त्या दोन वर्षांत मला दिली. अगदी गॅदरिंगच्या सूत्रसंचालनाचीही. त्या काळात त्यांनी नाटक, काव्यवाचन, गीतगायन यांसह मला तर कथाकथन करण्यासाठीही प्रोत्साहन दिलं. शंकर पाटील यांच्या दोन कथा त्यांनी माझ्याकडून बसवून घेतल्या आणि शाळेत त्या कथाकथनाचा एक स्वतंत्र कार्यक्रमही घडवून आणला होता. या साऱ्या प्रेरणा आजही माझ्या आत कुठंतरी सातत्यानं जिवंत आहेत. कारणीभूत केवळ जेपीके मॅडम.

सदैव हसतमुख, कधी कोणावर चिडणं नाही, रागावणं नाही की ओरडणं नाही. अगदी त्यांना एखाद्याला रागे भरावंसं वाटलं तरी तो राग लटकाच ठरे. फार काळ न टिकणारा. हसणं अगदी दिलखुलास आणि मनमुराद. निर्मळ आणि वात्सल्यानं ओतप्रोत. हे प्रेम पुढंही आम्हाला लाभत राहिलंच. माझ्या लग्नानंतर आम्हा नवदांपत्याला आवर्जून घरी बोलावून त्यांनी स्नेहभोजनाचा बेत रंगवला. प्रकाशकाका सुद्धा अत्यंत हसतमुख आणि दिलखुलास माणूस. थट्टामस्करी, क्वचित थोडे उपरोधिक चिमटे घेत पण बोचणार नाही असं बोलणं. या दोघांसोबत बसलं की, बोलणं कमी आणि पोटभर हसणंच होत असे. ते पुढच्या भेटीपर्यंत निश्चित पुरत असे.

इथून पुढं मात्र त्यांचं हसणं, असणं हे सारं आता स्मृतींच्या स्वरुपातच जपायचं. अशी माणसं आपल्याला दीर्घकाळ हवी असतात. काळाकडे मात्र त्या दीर्घाची लांबी कमीअधिक करण्याची ताकद असते. म्हणून माणसं असतानाच त्यांचं अस्तित्व साजरं करणं महत्त्वाचं असतं. अन्यथा, दुःखाखेरीज पदरी काही पडत नाही. काळच त्यावर औषध, पण अशा जखमांच्या खुणा मनावर कायम राहतात. त्याला कोणी काही करू शकत नाही. अशी माणसं, असे शिक्षक आता पुन्हा होणे नाहीत.

जेपीके मॅडमना भावपूर्ण श्रद्धांजली!