बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

किस्से ‘लोकराज्य’चे! (भाग-१)




आपण काम करीत असताना अनेक गोष्टी हाताखालून जात असतात. जनसंपर्कासारख्या क्षेत्रात तर विविध विषयांवर लिहीणं, ही तर नित्याची बाब! प्रत्यक्ष पत्रकारितेत उपसंपादक म्हणून काम करीत असलो तरी, ऑन आणि ऑफ फिल्ड असं बरंच आणि बऱ्याच विषयांवर लिहीता आलं, तेही सकाळसारख्या व्यासपीठावरुन! त्यानंतर शासकीय जनसंपर्क सांभाळत असतानाही बऱ्याच विषयांवर लोकराज्य, महान्यूज आदी व्यासपीठांवरुन लिहीता आलं. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या तत्कालीन महासंचालक मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या प्रोत्साहनानं संचालक प्रल्हाद जाधव आणि श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय चौकटीत राहूनही विविधांगी लेखन करता आलं. लोकराज्यमध्ये सहसंपादक असताना सतीश लळित, सतीश जाधव, दिगंबर पालवे, डॉ. संभाजी खराट, अजय जाधव यांच्यासोबत जोरदार काम करता आले. या काळातल्या लोकराज्यशी निगडित काही आठवणी व किस्से म्हैसकर मॅडमनी माझ्याकडून लिहून घेतले होते. त्यातले काही महान्यूजवरील लोकराज्य या सदरांतर्गत अगदी सुरवातीच्या काळात प्रकाशित करण्यात आल्याचंही स्मरतंय. काही दिवसांपूर्वी घरात जुन्या फाइल्स पाहात असताना हे लोकराज्यच्या संदर्भातले साधारणतः २००७ ते २००९ च्या काळातले किस्से हाती लागले. किस्से जुने असले, त्यातले विलासराव देशमुख, आर.आर. आबांसारखे नेते आता आपल्याला दुरावले असले तरी, त्यांच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या. यातले काही निवडक किस्से या ठिकाणी आपल्यासमवेत शेअर करतो आहे. आपल्याला आवडतील, अशी आशा आहे.
***

ऊर्दू लोकराज्य आणि सीएम!
महाराष्ट्र शासनानं अगदी निर्मितीपासूनच आपला पुरोगामी चेहरा जपला आहे. हा केवळ मुखवटा नाही; तर, राज्याच्या वाटचाली महत्त्वपूर्ण योदान देणाऱ्या धुरिणांनी जाणीवपूर्वक समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. इथं सर्वधर्मसमभावाचा केवळ नारा दिला जात नाही; तर, सामाजिक समता प्रस्थापनेच्या चळवळीची ज्योत इथं कायमच तेवत राहिली आहे. शासनाच्या मुखपत्रांनाही हीच बाब लागू होते. मराठी लोकराज्यचं स्वरुप बदलल्यानंतर या चळवळीचा पुढवा टप्पा होता तो म्हणजे, राज्यातील अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या समस्यांचा वेध घेणं आणि त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांवर उपाययोजना करणं.  यासाठीच माहिती जनसंपर्क महासंचालनालयानं ऑक्टोबर २००७ पासून ऊर्दू लोकराज्यच्या प्रकाशनास सुरवात केली. केवळ राज्यातूनच नव्हे; तर, देशभरातून त्याला मिळालेला प्रतिसाद थक्क करुन टाकणारा होता.
ऊर्दू लोकराज्य म्हणजे शासन आणि मुस्लीम समाज यांना जोडणारा एक पूलच ठरला. विविध समस्यांवर चर्चा घडवून आणण्याचं आणि त्याबाबत केलेली कार्यवाही दर्शवणारं ते एक व्यासपीठच ठरलं.
गेल्या शनिवारी (दि. ३० ऑगस्ट २००८) ह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासमवेत अल्पसंख्याक समाजाच्या मागण्यांबाबत चर्चासत्र झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. यामध्ये ऊर्दू अकादमीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद, ऊर्दू शाळांत शिक्षकांची प्राधान्यानं भरती, अल्पसंख्याक आयोगाला वैधानिक दर्जा देण्याबाबत विचार, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अल्पसंख्याक समाजाला शासकीय नोकरीत आरक्षण देण्याच्या दृष्टीनं अभ्यास, मशिदींना वाढीव एफएसआय आदी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यावेळी अनेक कार्यकर्ते विविध प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांवर वर्षाव करत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना एकदा नव्हे तर तीनदा असं सांगितलं की, या समाजाच्या समस्यांचं आणि त्या निराकरण करण्याचं व्यासपीठ म्हणून महाराष्ट्र शासनानं ऊर्दू लोकराज्य सुरु केलंय. त्याच आपण नियमित वाचन केलंत, तरी शासन आपल्यासाठी काय करत आहे, याबरोबरच आपल्यासाठी नेमक्या योजना काय आहेत, त्या राबविण्यासाठी काय करावं लागेल, याची माहितीही एकाच ठिकाणी मिळेल. त्यामुळे ऊर्दू लोकराज्य मुस्लीम समाजानं वाचलाच पाहिजे, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. कित्येकांनी आपण त्याचे नियमित वाचक असल्याचं सांगितलं, तर अन्य लोकांनी त्याविषयी जाणून घेतलं. यावेळी महासंचालनालयाच्या वतीनं ऊर्दू लोकराज्यचे काही अंक चर्चासत्राच्या ठिकाणी नमुन्यादाखल आणले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार तिथं उपस्थित असलेल्या बहुतेक सर्व ऊर्दू भाषिकांनी हे अंक पाहण्यात तसेच खरेदी करण्यात मोठा रस दाखविला. ज्या लोकांसाठी आपण सारी धडपड करत आहोत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश येतंय, ही बाबच सुखावणारी तर होती आणि आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रेरणादायीसुध्दा!
***

मुख्यमंत्र्यांकडून ॲप्रिसिएशन!
खपाचा आकडा फुगवून सांगून जाहिरातदारांची दिशाभूल करण्यात येऊ नये, यासाठी वृत्तपत्रं आणि नियतकालिकांच्या खपाचं नेमकं ऑडिट करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ऑडिट ब्युरो ऑफ र्क्युलेशन (एबीसी) ही संस्था काम करते. जाहिरात दराचे निकष त्या आधारावरच ठरवले जात असल्यानं नियतकालिकांच्या विश्वात या एबीसीचा वचक मोठाच- कारण दर सहा महिन्यांनी अत्यंत कठोर अशा अनेक कसोट्यांची पूर्तता केल्यानंतरच त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येतं.  त्यामुळंच प्रत्येक नियतकालिकाला हे प्रमाणीकरण आवश्यकच वाटतं.
आजपर्यंत देशातल्या कोणत्याही शासकीय मुखपत्राला त्याची आवश्यकता वाटली नव्हती. वाटण्याचं कारणही नव्हतं. कारण शासकीय अनुदानं, शासकीय मुद्रणालयात छपाई, होईल तेवढा खप आणि मिळेल तेवढा वाचक, असं त्यांचं धोरण असतं. त्यात अन्य कोणाशीही स्पर्धा असण्याचंही कारण नसतं. त्यामुळं त्यांनी एबीसी प्रमाणपत्राचा विचार करणंच दूरची गोष्ट. पण, हे करुन दाखवलं आपल्या लोकराज्यनं. 
दोन वर्षांपूर्वी जुनी कात टाकून नवं रुप धारण करणाऱ्या लोकराज्यनं शासकीय चौकटीत राहूनही कॉर्पोरेटायझेशनची वाट चोखळली. मजकूर, संपादन आणि मांडणीवर अत्यंत नियोजनपूर्वक कष्ट घेण्याबरोबरच वितरणासाठीही विशेष प्रयत्न केले.  यासाठी राज्यभरातील विभागीय आणि जिल्हा कार्यालयांच योगदानही मोठं ठरलं. अगदी अग्रेसिव्ह म्हटलं नाही, तरी 'लोकराज्य घरोघरी' हे ब्रीद घेऊन आमचे अधिकारी, कर्मचारी फिल्डवर उतरले. सर्वसामान्यांच्या घरात लोकराज्य पोहोचला. पुढचं काम सोपं झालं. खपाचा आकडा वाढत गेला. जनमानसातली विश्वासार्हता जपत लोकराज्यनं पाहता पाहता एक लाख, दोन लाख, तीन लाख अशी खपाची शिखरं पादाक्रांत केली. एका अंकामागे दहा वाचक या हिशोबानं वाचकसंख्या तीस लाखांवर गेली. ही बाब सोपी नव्हती. शासकीय मुखपत्रानं इतका मोठा खप मिळवणं, हीच विशेष बाब होती. महासंचालकांनी आता पुढची मोहीम आखली- ती एबीसी प्रमाणपत्र मिळवण्याची! काहीच माहिती नसताना सर्व बाजूंनी याची माहिती घेऊन अथक परिश्रमांती लोकराज्यनं एबीसी प्रमाणपत्र मिळवलं. अत्यंत वेगळी आणि अभिमानास्पद अशी ही घटना.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना एबीसी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती महासंचालकांनी दिली.  त्यांनी शाबासकी दिली आणि लोकराज्यच्या वाटचालीला शुभेच्छाही! त्यापेक्षा अधिक आम्हाला अपेक्षाही नव्हती. पण, दोन दिवसांत लोकराज्य टीममधील प्रत्येकाचं अभिनंदन प्रशंसा करणारं साक्षात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं पत्र महासंचालकांकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलं. हे ॲप्रिसिएशन अगदी अनपेक्षित अन् सुखावह होतं. यापुढची गोष्ट तर आणखी सांगण्यासारखी.  महासंचालकांनी ती पत्रं लगेच आमच्या हातात दिली नाहीत. त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. पुढे काही दिवसांनी महासंचालनालयाच्या गुणवंत अधिकारी- कर्मचाऱ्यांचा कार्यसंस्कृती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी अगदी समारंभपूर्वक मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीच्या लॅमिनेटेड प्रमाणपत्रांच वितरण लोकराज्य टीमला केलं.  ही बाबही अनपेक्षितच होती. अधिक जोमानं आणि जबाबदारीनं काम करण्याची प्रेरणा या कौतुकसोहळ्यानं दिली, एवढं मात्र नक्की!
***

एक शाम, आबा के नाम!
अगदी ग्रासरुटपासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंत वाटचाल केलेले अनेक मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत. त्यापैकी एक नाव आर.आर.पाटील. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या निरलस, निगर्वी आणि आपुलकीच्या वागण्यानं जनमानसात इतकं भक्कम स्थान मिळवलंय की सारेच त्यांना 'आबा' म्हणतात. त्यांनाही 'सर' म्हटलं की तितकंसं रुचत नाही. आबांच्या दिलदारपणाचा अनुभव मला गेल्या एप्रिलमध्ये आला.
लोकराज्यचा मेचा अंक महाराष्ट्र दिन विशेष होता. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी, पुढील वाटचालीविषयी मनोगत समाविष्ट करायची होती. आबांच्या नावाचाही त्यात समावेश होताच. महासंचालकांनी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मला जायला सांगितलं. त्यानुसार त्यांचे पीआरओ जयंत करंजवकर आणि वसंत पिटके गुरुजी यांच्याशी बोलून वेळ ठरवली. विधिमंडळ अधिवेशन सुरु असल्यानं आबांनी संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर बंगल्यावरचीच वेळ दिली. करंजवकर सरांबरोबर मी आणि रेकॉर्डीस्ट बंगल्यावर पोहोचलो. त्या दिवसाचं कामकाज लांबल्यानं आबांच्या पूर्वनियोजित बैठकाही लांबल्या.
त्यांनी आल्याबरोबर नियोजनानुसार भेटी सुरु केल्या. मुलाखत घ्यायची असल्यानं मला सर्वात शेवटची वेळ दिलेली. मुलाखत संपायला साधारण सव्वादहा वाजले. खुर्चीतून उठता-उठता आबा म्हणाले, 'चला, जेवण करुन घेऊ.' आणि ते आत गेले. आम्ही बाहेर द्विधा मन:स्थितीत उभेच.  सर्वसामान्यांचे आबा असले तरी ते आम्हा शासकीय अधिकाऱ्यांचे प्रमुख होते. थोडंसं दडपण आलंच. आत जावं की जावं, अशीच मन:स्थिती. त्यात आता इथून पुढं सीएसटीला पोहोचून कुठलीतरी स्लो ट्रेन पकडून घरी पोहोचायलाही साडेबारा-एक वाजतील, असं वाटलं. आपण निघून गेल्यानं आबांना काय फरक पडणार आहे? असं वाटलं. आम्ही गाडीत बसून निघालोही.
वाळकेश्वरच्या चौकात पोहोचलो असू, इतक्यात करंजवकरांच्या मोबाईलवर बंगल्यावरुन फोन आला.  'अहो, कुठे आहात? आबा जेवणासाठी वाट बघत आहेत.'  करंजवकरांनी बंगल्याच्या जवळच असल्याचं सांगितलं. आम्हाला टेन्शन आलं. आता आपली काही खैर नाही, असं वाटलं.  आम्ही गाडी परत फिरवली. बंगल्याच्या आवारात शिरलो. तिथल्या सिक्युरिटीच्या पोलिसांनीही 'अहो, पळा लवकर. किती वेळ झाला?' असं म्हणून टेन्शन आणखीच वाढवलं. मग तर बिचकत-घाबरतच आत गेलो. वाट बघून आबांनी जेवायला सुरुवात केलेली. आम्हाला बघताच म्हणाले, 'अरे, काय तुम्ही? मी जेवायला चला म्हटलं तरी कसे काय गेलात?' यावर 'सॉरी सर' म्हणण्यापलिकडं काहीच बोलू शकलो नाही. तेव्हा आबाच हसून म्हणाले, 'आता माझ्याशिवाय एकटंच जेवायची शिक्षा तुम्हाला!' आम्हीही मग हसून त्यांच्या पंगतीत सामील झालो. जेवणाचा बेत एकदम साधा-अगदी गावाकडचा. छान भरलेली वांगी, बटाट्याची भाजी, आमटी आणि गरमागरम चपात्या. भुकेल्या पोटाला या गावाकडच्या जेवणाच्या वासानं अगदी खेचून घेतलं.  करंजवकर साहेबांबरोबरच मी, रेकॉर्डिस्ट आणि ड्रायव्हरही आबांच्या पंक्तीला बसून जेवलो.  सर्वांचीच त्यांनी आपुलकीनं ओळख करुन घेतली. आबांचं जेवण झालं तरी ते आमच्यासाठी बसून राहिले. जेवण झालं. आबांना विचारलं, 'निघावं का?' त्यावर हसून म्हणाले, 'आता माझी काहीच हरकत नाही.'  आम्हीही मनमोकळे हसलो. त्यांना 'गुडनाइट' म्हणून बाहेर पडलो.
साऱ्यांच्याच मनावर आबांच्या आपुलकीनं छाप टाकली होती. तसं पाहायला गेलं तर, ना आम्ही आबांचे कार्यकर्ते होतो, ना त्यांचे मतदार! आणि नेमणूक त्यांच्या चांगल्या प्रसिद्धीसाठीच केली असल्यानं त्यांनी आम्हाला जेवायला दिलं असतं काय अन् नसतं काय, त्या प्रसिद्धी काही कमी-जास्त होणार नव्हतं. पण आर.आर. पाटील या व्यक्तीमधल्या गृहमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी नव्हे, तर त्यांच्यातील हृदय आबांनी आम्हाला जेवू घातलं होतं. पदाची शाश्वती कधीच नसते, पण आबांची माणुसकी, चांगुलपणा मात्र अगदी चिरकाळ स्मरणात राहणारा आहे.
***

कौतुकाची थाप!
प्रसंग २००८च्या फेब्रुवारीतला. महासंचालनालयाचे अधिकारी वरळीला दूरदर्शनच्या आवारात एका मोठया असामीची आतुरतेने वाट पाहात होते. महासंचालनालयातर्फे दूरदर्शनवरुन प्रक्षेपित होणाऱ्या 'जय महाराष्ट्र' या मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ही व्यक्ती येणार होती. एका फिकट पिवळसर मोटारीनं दूरदर्शनच्या आवारात प्रवेश केला. चालकाशेजारी बसलेल्या शुभ्र वेषातील गांधी टोपीधारी असामीकडं सगळ्यांचं लक्ष गेलं. आपल्या समाजोपयोगी मागण्यांपुढं सरकारलाही नमवण्याची ताकद असलेली ही व्यक्ती म्हणजे माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे!
लोकहितासाठी शासन स्तरावर घेण्यात आलेले सर्व निर्णय कशा प्रकारे घेण्यात आले, याची माहिती जनतेला समजलीच पाहिजे, माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत १९९६ सालापासून अण्णांनी तब्बल दहा आंदोलनं केली. कायद्याबाबत अनुकुल जनमत तयार करण्यासाठी राज्यभर दौरे केले. विद्यार्थ्यांना कायदा माहिती झाला तर तो घराघरांत पोहोचेल, हे जाणून महाविद्यालयांमधील युवकांशी संवाद साधण्यावर भर दिला. मुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते, बुद्धिजीवी यांच्याशी सातत्याने चर्चा करुन त्यांना या कायद्याचे महत्त्व पटवून दिलं. यासाठी प्रसंगी त्यांनी राज्यकर्त्यांचा रोषही पत्करला.  अण्णांच्या या न्याय्य आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र शासनानं माहितीचा अधिकार कायदा २००२ मध्ये लागू केला.
या कायद्याची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारनंही २००५ मध्ये त्यातच थोडे फेरफार करून संपूर्ण देशभर माहितीचा अधिकार कायदा लागू केला. या कायद्याचा राज्यात सर्वदूर प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले. महासंचालनालय आपल्या 'लोकराज्य', 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमांद्वारे या कायद्याच्या प्रसारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. डिसेंबर २००७मध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अण्णांनी माहितीचा अधिकार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ग्रामसभा इत्यादी विषयांवर आपली मतं मांडली होती. त्या अनुषंगाने या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रसाराबाबत अण्णांची भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी महासंचालनालयानं त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं होतं.
मुलाखतीपूर्वी अण्णांना माहिती अधिकार कायद्याबाबत माहितीचा समावेश असणारे 'लोकराज्य'चे अंक भेट देण्यात आले. हे अंक अण्णांनी अगदी बारकाईनं चाळले. महाराष्ट्र शासन या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. 'लोकराज्य'नं हा कायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे. या कायद्याच्या प्रचार प्रसारात अशी ठाम भूमिका घेतल्यामुळंच माहती अधिकार कायद्याची महाराष्ट्राइतकी प्रभावी अंमलबजावणी अन्य कुठल्याही राज्यात झालेली नाही, अशा शब्दांत अण्णांनी स्तुती केली. लोकशिक्षणाची ही परंपरा लोकराज्यनं यापुढील काळातही कायम ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. अण्णांसारख्या व्यक्तीची ही अपेक्षापूर्ती करत राहणं हेच लोकराज्यचं पहिलं आणि अंतिम ध्येय राहिलं आहे, यापुढेही राहणार आहे!
***

...और किताब बन गयी!
Sunjay Awate
नव्या स्वरुपातील 'लोकराज्य'चं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे बाहेरील लेखकांचा वाढवलेला सहभाग. शासकीय अधिकारी आणि शासनाच्या सेवेतील लेखक हे शासनाच्या बाजूने लिहीणार, हे गृहित असतं. पण बाहेरचे लेखक आणि तेही मान्यवर पत्रकार संपादक यांना 'लोकराज्य'साठी लिहीतं करणं, ही बाब खरंच अवघड होती; मात्र, महासंचालकांनी ती साध्य केली.  आता तर हे साहचर्य अतिशय चांगल्या द्धतीनं एस्टॅब्लिशही झालंय. शासनाच्या एखाद्या निर्णयाबाबत चांगलं लिहीण्याबरोबरच मौलिक सूचना हे लेखक करतात. त्यांना 'लोकराज्य' प्रसिध्दी देतं.
'लोकराज्य'च्या आग्रहाचा एखाद्या लेखकाला कसा लाभ होऊ शकतो, याचा किस्सा अगदी गेल्याच महिन्यात (ऑगस्ट- २००८) घडला. झालं असं की, सप्टेंबरच्या अंकात वाचकांना अणुकराराविषयी साद्यंत माहिती द्यावयाची, असं ठरलं.
मग चांगलं कोण लिहू शकेल, यावर बरंच विचारमंथन झालं, बरीच नावं सामोरी आली. यातून 'लोकसत्त'चे सहसंपादक संजय आवटे यांच्या नावावर एकमत झालं. महासंचालकांना श्री.आवटे यांना अणुकराराविषयी लिहावयास राजी केलं.
आपल्या व्यापातून वेळ काढत के रात्री बाराच्या सुमारास ते लिहावयास बसले. लिहीत गेले, लिहीत गेले. लिहीता लिहीता वेळेचं भान हरपलं. लेख लिहून संपला आणि मग त्यांनी ड्या पाहिलं, तर साडेदहा वाजून गेलेले- दुसऱ्या दिवशी रात्रीचे. सलग तेवीस तास हा माणूस लिहीतच राहिला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी हा लेख संपादक कुमार केतकर यांच्या नजरेखालून घातला. त्यांनी काही दुरुस्त्या सूचना केल्या. त्याही त्यांनी विनाविलंब अंमलात आणल्या. मग एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली ती म्हणजे, 'लोकराज्य'च्या सेकंड स्टोरीच्या मानानं हा लेख बराच म्हणजे बराच मोठा होणार होता; मात्र या लिखाणाचं एक सुंदर पुस्तक होऊ शकतं, असं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी त्या स्टोरीचं संक्षिप्त रुप 'लोकराज्य'साठी दिलं आणि त्यांच्या सविस्तर लिखाणाचं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीसाठीही येतंय.
अशा प्रकारे 'लोकराज्य'साठी लिहायला बसलेल्या आवटे सरांचं त्या विषयावरचं पुस्तक असं अचानकपणे अन् अभावितपणे लिहून तयारही झालं. यावर त्यांची स्वत:ची प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे, 'अणुकराराविषयी लेख आपल्याकडूनच हवा, असा मनिषा (म्हैसकर) मॅडमचा फोन आला. त्यांच्या फोननं उत्प्रेरकाचं काम केलं. लिहायला बसलो, अन् पुस्तकच झालं.' आवटे साहेबांच्या या नव्या पुस्तकाला आमच्या प्रकाशनपूर्व शुभेच्छा! अन्य पत्रकार मित्रांसाठीही ही बाब प्रेरणादायी आहे. एखाद्या विषयावर सखोल संशोधन आणि चिंतन करण्याची संधी मिळाली तर ती मिळवलीच पाहिजे. त्यातून असा एखादा सुंदर आविष्कार घडू शकतो. त्यासाठी 'लोकराज्य' मध्ये तर आपलं नेहमीच स्वागत आहे.
***

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

संविधान साकारताना...




(दै. सकाळ, कोल्हापूरच्या ३८व्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या 'लोकशाही आणि निवडणुका' या विशेष पुरवणीत माझा 'संविधान साकारताना...' हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. वाचकांच्या आग्रहास्तव हा लेख दैनिक सकाळच्या सौजन्याने माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत या नवस्वतंत्र देशात झालेली अपूर्व घटना म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती होय. अनेक प्रांत, साडेपाचशेहून अधिक संस्थाने, शेकडो भाषा, हजारो जाती, अनेक भेद अशा अतिशय विभिन्न आणि विपरित परिस्थितीत ब्रिटीशांच्या अखत्यारीखालील प्रदेश म्हणून ब्रिटीश इंडिया मानल्या गेलेल्या या खंडप्राय देशाला खऱ्या अर्थाने एक देशम्हणून एका सूत्रात जर कोणी बांधले असेल, तर ते केवळ राज्यघटनेनेच होय. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी जरी आपण स्वातंत्र्यासाठी झगडत असलो, तरी स्वतंत्र झाल्यानंतर त्या स्वातंत्र्याचे स्वरुप काय आणि कसे असेल, याविषयी एक मोठा संभ्रम होता. त्यातही राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी झगडा मांडणाऱ्या नेतृत्वांमधील कट्टर भूमिकेमुळे तर दोन गट समोरासमोर उभे ठाकले होते. प्रत्यक्षात या दोन्ही प्रकारच्या चळवळींमध्ये महत्त्वाची परस्परपूरकता होती, ज्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशाच्या समताधिष्ठित समाजरचनेच्या जडणघडणीस चालना मिळाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्या. रानडे आदींच्या अभ्यासपूर्ण सामाजिक-धार्मिक सुधारणांचा आग्रह धरणाऱ्या भूमिकांमुळे राजकीय स्वातंत्र्यापलिकडील सामाजिक-धार्मिक सुधारणांची गरज अधोरेखित झाली. महात्मा फुले यांनी तर त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून शोषित महिला वर्गाच्या समस्यांनाही तोंड फोडले. शैक्षणिक सुधारणांचा आणि तळागाळापर्यंत विस्ताराचा मुद्दाही त्यांनीच लावून धरला. पुढे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध उठविलेला आवाज आणि सुरू केलेली चळवळ यामुळे भारतीय लोकशाहीच्या मागणीला समतेचे परिमाण लाभले. डावी चळवळ, शेतकरी-कामगारांची आंदोलने यामुळे शोषित, वंचित वर्गाचा पारतंत्र्यातील पारतंत्र्याविरुद्धचा आवाजही बुलंद होत होता. याचवेळी लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, सावरकर यांनी परंपरानिष्ठ दृष्टीकोनातून सामाजिक पुनरुज्जीवनवादाचा पुरस्कार केला. तर महात्मा गांधी यांच्यासारखा महान नेता समन्वयवादी भूमिका घेऊन ती पटवून देण्यासाठी, तिच्या सर्वसमावेशकतेसाठी जीवाचे रान करीत होता. ब्रिटीशांमुळे या देशात वाहू लागलेल्या आधुनिक विचारसरणीच्या वाऱ्याच्या बरोबरीने उपरोक्त विविध अंतर्प्रवाहसुद्धा या देशात गतिमान होते. या देशाच्या अत्यंत गतिमान कालखंडात कार्यरत असणाऱ्या या साऱ्या बाबींची पार्श्वभूमी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीला लाभलेली आहे.
उपरोक्त बाबींच्या बरोबरीनेच घटनानिर्मितीच्या प्रक्रियेत जगातील अन्य संविधानांचा प्रभावही लक्षात घ्यायला हवा. भारतीय घटनेतील संसदीय पद्धतीच्या बाबतीत इंग्लंड, संघराज्यीय पद्धतीबाबत अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत आयर्लंड, घटनादुरुस्तीबाबत दक्षिण आफ्रिका तर आणीबाणीविषयक तरतुदींच्या बाबतीत जर्मन संविधानाचा प्रभाव दिसून येतो. अर्थात, वरील तरतुदी इतर संविधानांतून जशास तशा न स्वीकारता भारतीय परिस्थितीला अनुलक्षून घटनाकर्त्यांनी त्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आणि त्यातील सर्वोत्तम ते घटनेत समाविष्ट केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता व सहिष्णुता या मानवी मूल्यांचा अंगिकार करीत प्रजासत्ताक संघराज्याच्या निर्मितीचा उद्घोष करणाऱ्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास अत्यंत रोमांचक स्वरुपाचा आहे.
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रत्यक्ष प्रवास ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाला असला तरी, तिचा अप्रत्यक्ष प्रवास हा त्याच्या कितीतरी आधीपासून सुरू झालेला होता, हे लक्षात घ्यायला हवे. सन १९३५चा भारत सरकार कायदा हा राज्यघटनेचा संरचनात्मक स्रोत मानला जातो. राज्यघटनेमधील संघीय स्वरुपाची पायाभूत चौकट ही या कायद्यातूनच स्वीकारल्याचे दिसून येते. तथापि, त्यापूर्वी प्लासीच्या लढाईतील विजयानंतर १७७३ साली रेग्युलेटिंग एक्ट नावाचा पहिला कायदा ब्रिटीशांनी अंमलात आणला. तथापि, १८५७च्या उठावानंतर भारतासारख्या खंडप्राय देशात एकतंत्री कारभार चालविणे सोपे नाही, हे लक्षात आल्यानंतर १८५८च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीकडील कारभार ब्रिटीश राजपदाने भारतावर सार्वभौमत्व प्रस्थापित केले. १८६१च्या कायद्याने प्रांतांना काही अधिकार देण्यात आले. १८९२ साली इंडियन कौन्सिल कायद्यानुसार विधीमंडळांना जादा अधिकार देण्यात आले. दरम्यानच्या काळात १८८५ साली राष्ट्रीय काँग्रेस आणि १९०६ साली मुस्लीम लीगची स्थापना झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतीयांचा ब्रिटीशविरोधी असंतोष तीव्रतर होत चालल्याचे लक्षात आल्यानंतर तो शमविण्यासाठी म्हणून १९०९ साली मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, १९१९ साली माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा आणि त्यानंतर १९३५चा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यांनी तात्कालिक राजकीय पेचप्रसंगानुरुप अगर मागणीनुसार तोडगा काढण्याच्या अनुषंगाने विविध राजकीय सुधारणा भारतीयांच्या पदरात टाकण्याचा ब्रिटीश सरकारचा प्रयत्न राहिला.
संविधान सभा:
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांना त्यांच्या साम्राज्याचा व्याप सांभाळणे अवघड बनले. निवडणुकीतही सत्तांतर होऊन मजूर पक्षाचे सरकार आले. विन्स्टन चर्चिल यांच्या जागी क्लेमेंट एटली पंतप्रधान झाले आणि त्यांनी भारताविषयीचे धोरण मृदू केले. भारतीयांच्या आशाआकांक्षा समजून घेऊन त्यांना कॅनडा, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर ब्रिटीश साम्राज्याच्या अंतर्गत राज्य बनविण्याच्या उद्देशाने सर स्टेफॉर्ड क्रिप्स यांचा समावेश असणारे त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन २४ मार्च १९४६ रोजी भारतात पाठविले. भारताकडे शांततापूर्वक सत्तेचे हस्तांतर करण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांशी विचारविमर्श करून तोडगा काढण्याचा विशेषाधिकार या समितीकडे होता. तथापि, काँग्रेस अगर मुस्लीम लीगशी चर्चेतून कोणताही तोडगा न निघू शकल्याने मिशनने स्वतःची संविधान निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करणारी योजना मे १९४६मध्ये प्रसिद्ध केली.
संविधान सभेच्या सदस्यांची निवड करण्यासाठी तत्कालीन प्रांतीय सभेचा वापर करण्यात आला. १० लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी असे प्रमाण ठरविण्यात आले. संविधान सभेची एकूण सदस्य संख्या ३८५ ठरविण्यात आली, त्यात प्रांतांना २९२ तर संस्थान प्रतिनिधींना ९३ जागा देण्याचे ठरले. त्यानुसार निवडी होऊन ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेचे पहिले अधिवेशन भरले, ते २३ डिसेंबरपर्यंत चालले. मुस्लीम लीगचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहिले नाहीत. घटना समितीत पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन्, मौलाना आझाद, एम. गोपाल स्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी.टी. कृष्णम्माचारी, पंडित गोविंद वल्लभ पंत, बॅ. बी.जी. खेर, सी. राजगोपालाचारी, बॅ. जयकर यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे महंमद सादुल्ला, हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, रेणुका रे आदी महिला सदस्यांचाही समावेश होता. ज्येष्ठ सदस्य डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते सभापतीपद देण्यात आले. त्यांनी सभेला संबोधित केले. त्यानंतर सदस्यांनी आपापले परिचयपत्र जमा करून नोंदवहीत स्वाक्षरी केली. पुढे दोन दिवसांनी ११ डिसेंबर रोजी सभापतीपदी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची रितसर नियुक्ती करण्यात आली.
दरम्यानच्या काळात अशा काही घटना घडल्या की, ज्या भारतीय स्वातंत्र्य कायदा निर्मितीस कारणीभूत ठरल्या. ३ जून १९४७च्या योजनेनुसार, मुस्लीमबहुल क्षेत्र भारतापासून वेगळे करण्याची योजना मांडण्यात आली. १९४७च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार, अखंड भारताचे भारत व पाकिस्तान असे विभाजन करण्याची व पाकिस्तानसाठी स्वतंत्र संविधान सभेची निर्मिती झाली. ब्रिटीश पार्लमेंटने त्यांना आपापल्या राज्यांसाठी कायदा बनविण्याचे अधिकारही प्रदान केले. मात्र, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर ब्रिटीश पार्लमेंटचे वर्चस्व संपुष्टात आले.
ब्रिटीश पार्लमेंटच्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या संविधान सभेची चार सत्रे ब्रिटीश शासनांतर्गत झाली. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री पाचव्या सत्राची सुरवात झाली.१५ ऑगस्टला भारतातले ब्रिटीश शासन संपुष्टात आले. त्या दिवशी सकाळी ८ वाजता संसद भवनातील ब्रिटीश ध्वज उतरवून तेथे भारतीय ध्वज फडकविण्यात आला. लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली तर पंतप्रधानपदी नेहरूंची. या नियुक्तीमुळे भारतीय संविधान सभेवरील कॅबिनेट मिशनचे बंधन संपुष्टात आले, त्याचबरोबर संविधान सभा ही ब्रिटीश भारताची राजकीय संस्था न राहता भारताची संप्रभू राजकीय सत्ता बनविण्यात आली. या संप्रभू संविधान सभेला संपूर्ण स्वातंत्र्य प्रदान करून भारताला लोकशाही संसदीय शासन पद्धती अंगिकृत करणारे संविधान बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राज्यघटनेचे प्रारुप तयार करण्यासाठी २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समिती (Drafting Committee) नियुक्त केली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. समितीत के.एम. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डी.पी. खेतान यांची नियुक्ती करण्यात आली. मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी एन. माधव राऊ यांची तर खेतान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी यांची नियुक्त करण्यात आली. संविधान सभेच्या सल्लागार विभागातर्फे तयार केलेल्या संविधानाचे परीक्षण करणे, संविधान सभेत संविधानाबाबात झालेल्या निर्णयांचे प्रारुप संविधानात समाविष्ट करणे, तसेच प्रारुप संविधानातील मसुद्यांना संविधान सभेसमोर चर्चा व विचारविनिमयासाठी प्रस्तुत करणे, अशी कामे मसुदा समितीकडे सोपविण्यात आली.
मसुदा समितीखेरीज घटना समितीने एकूण २२ विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील बारा विशेष कामकाजासाठी तर दहा कार्यपद्धतीशी संबंधित होत्या. विशेष कामकाजासाठी नेमलेल्या समित्यांमध्ये मसुदा समितीसह मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती (अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल), घटकराज्यांबरोबर बोलणी करणारी समिती (डॉ. राजेंद्र प्रसाद), केंद्र राज्यघटना समिती (जवाहरलाल नेहरू), मसुदा चिकित्सा समिती (अल्लादी कृष्णस्वामी अय्यर) यांचा समावेश होता.
मसुदा समितीची पहिली बैठक ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाली. त्यानंतर समितीच्या एकूण १४१ बैठका झाल्या. त्यांमध्ये संविधानाच्या विविध कलमांना अंतिम रुप दिले गेले. २१ फेब्रुवारी १९४८ रोजी समितीने संविधानाचा अधिकृत मसुदा घटना समितीला सुपूर्द केला. घटना समितीत त्यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली. सुमारे ११४ दिवस विचारविनिमय झाला. ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८ (प्रथम वाचन), १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर १९४९ (दुसरे वाचन) आणि १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९ (तृतीय वाचन) अशी अंतिम मसुद्याची तीन वाचने झाली. मसुद्यात ३४३ कलमे व १३ परिशिष्टे होती. या कलमांना ७६३५ दुरुस्त्या सुचविण्यात आल्या, त्यापैकी २४७३ मंजूर करण्यात आल्या. पुढे कलमांची संख्या वाढून ३९५ झाली, तर ८ परिशिष्टे मंजूर झाली. पहिल्या बैठकीपासून सुमारे दोन वर्षे ११ महिने व १७ दिवसांत घटनेचा अंतिम मसुदा निर्माण झाला.
डॉ.आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मांडला. तो मंजूर झाल्याचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घोषित करण्यात आले. त्या दिवशी समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांची त्यावर स्वाक्षरी झाली. त्यानंतर त्या दिवशी उपस्थित २८४ सदस्यांनीही स्वाक्षरी केल्या. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. भारत एक प्रजासत्ताक संघराज्य म्हणून उदयास आले आणि संविधान सभेने या संघराज्याच्या काळजीवाहू संसदेचे रुप प्राप्त केले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. २२ जानेवारी १९४७ रोजी हा ठराव घटना समितीने एकमताने मंजूर केला. या ठरावाने घटना समितीला दिशा देण्याचे व तिचे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्याचे काम केले. यातील काही तरतुदी अशा- भारत हे एक सार्वभौम, प्रजासत्ताक गणराज्य असेल. सत्तेचे उगमस्थान- भारतीय जनता आहे. सर्व लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता इ.ची हमी व संरक्षण दिले जाईल. अल्पसंख्याक, मागास आदिवासी, वंचित व मागासवर्ग यांच्यासाठी संरक्षक तरतुदी असतील. राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल. या सर्व बाबींचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेमध्ये उमटल्याचे दिसते.
राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये:
·         भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. सुरवातीला घटनेत २२ प्रकरणे ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. आज २४ प्रकरणे ४४८ कलमे आणि १२ परिशिष्टे आहेत.
·         भारतीय राज्यघटना अंशतः ताठर व अंशतः लवचिक आहे. या दोन्ही बाबींचा योग्य समन्वय घटनेत दिसतो. उदा. घटनादुरुस्तीची प्रक्रिया सर्वसामान्य बाबींसाठी पुरेशी लवचिक व महत्त्वाच्या बाबींसाठी पुरेशी ताठर आहे.
·         भारतीय राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला आहे. घटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वांगीण विकास साध्य करून कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा आहे.
·         राज्यघटनेतील १२ ते ३५ कलमे नागरिकांचे मूलभूत हक्क स्पष्ट करतात. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, संपत्तीचा अधिकार (हा ४४व्या घटनादुरुस्तीने निरसित करण्यात आला.) आणि संवैधानिक उपायांचा अधिकार यांचा यात समावेश आहे.
·         संसदीय शासनपद्धती ही देशाच्या राज्यकारभारात केंद्रस्थानी आहे. संसद शासन पद्धतीची दिशा निश्चित करते. येथे पंतप्रधान मंत्रीमंडळासह लोकसभेला जबाबदार आहे. राष्ट्रपतींच्या नावे कारभार चालत असला तर त्यांना मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागते. या पद्धतीत पंतप्रधान हेच वास्तविक प्रमुख असतात.
·         संघराज्य शासनपद्धती हे आणखी एक वैशिष्ट्य. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असले तरी घटक राज्यांसाठी स्वतंत्र शासनव्यवस्था आहे. घटनेच्या सातव्या परिशिष्टात केंद्र व राज्य यांच्या अधिकारांतील विभागणी स्पष्ट केली आहे. त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्थाही निर्माण केली आहे.
·         कोणत्याही दबावापासून मुक्त अशी स्वतंत्र न्यायव्यवस्था हेही राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
·         भारतीय राज्यघटनेने धर्म, वंश, जात, लिंग असा कोणताही भेद न करता प्रत्येक प्रौढ भारतीय नागरिकाला मताधिकार प्रदान केला आहे. सुरवातीला २१ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकाला असणारा हा अधिकार १९८९ साली ६१व्या घटनादुरुस्तीने १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला प्रदान करण्यात आला. एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हा टप्पा घटनाकारांना अभिप्रेत होता. त्यातील पहिला टप्पा आपण सर केला असला तरी एक व्यक्ती, एक मूल्य हा टप्पा गाठण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.
·         भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असल्याचे उद्देशिकेमध्येच स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याची अंतिम सत्ता लोकांच्या हाती असून भारतीय राज्यव्यवस्था परकीय नियंत्रणापासून मुक्त असल्याचे उद्देशिकेतच स्पष्ट केले आहे. कोणत्याही देवाला अगर व्यक्तीला अर्पण न करता देशाच्या नागरिकांनी स्वतःप्रत अर्पण करण्याचा स्पष्टोच्चार करणारी उद्देशिका हे भारतीय संविधानाचे परमोच्च वैशिष्ट्य आहे.
·         एकेरी नागरिकत्व हेही भारतीय राज्यघटनेचे वेगळे वैशिष्ट्य मानले जाते.
·         मागासलेल्या जाती, जमाती, अल्पसंख्याकांच्या हिताच्या संरक्षणासाठी व विकासासाठी राज्यघटनेत अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेवर सोपविण्यात आली आहे.
घटनानिर्मितीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान:
मसुदा समितीमध्ये अनेक सदस्य असले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी जे जीवतोड परिश्रम घेतले, त्याची घटना समितीतील सदस्यांनी मोठी प्रशंसा केली आहे. संविधान सभेत टी.टी. कृष्णम्माचारी यांनी या संदर्भात सभागृहाला सांगितले की, सभागृहाला जाणीव असेल की, तुम्ही नियुक्त केलेल्या सात सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला व त्याचे जागी दुसरा नेमण्यात आला. एक सदस्य मरण पावले, ती जागा भरण्यातच आली नाही. एक सदस्य दूर अमेरिकेत होते, त्यांचीही जागा भरली नाही. अन्य एक जण संस्थानाच्या कामात गुंतला होता, तीही जागा रिकामीच राहिली. दोन सदस्य दिल्लीपासून बरेच दूर राहात व प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत. तेव्हा संविधान तयार करण्याचे हे ओझे अंतिमतः डॉ. आंबेडकरांवर पडले व त्यांनी हे काम यशस्वीरित्या पार पाडले. हे त्यांचे कार्य निःसंशय प्रशंसनीय आहे व याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. याखेरीज, काझी सय्यद करिमुद्दीन, डॉ. पी.एस. देशमुख, डॉ. जोसेफ अल्बन डिसूझा, आर.के. सिधवा, पं. ठाकूरदास भार्गव, बेगम एजाझ रसूल, घटनातज्ज्ञ एस.व्ही. पायली यांनीही बाबासाहेबांची प्रशंसा केली.
संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान संमत करताना केलेल्या अखेरच्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, या खुर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. संविधान सभेच्या मसुदा समिती सभासदांनी किती उत्साहाने, चिकाटीने व निष्ठेने कार्य पार पाडले, याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषतः त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला, त्याच्याइतका अचूक निर्णय दुसरा कोणताही घेतलेला नाही. त्यांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली. इतकेच नव्हे, तर त्यांनी जे हे कार्य केले, त्याला एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला.
नेहरू: अ पोलिटिकल बायोग्राफी (१९५९) या ग्रंथात लेखक मायकेल ब्रेचर यांनीही दाखवून दिले आहे की, संविधान सभेचे सल्लागार सर बेनेगल राज, मुख्य ड्राफ्ट्समन एस.एन. मुकर्जी आणि सचिव एच.व्ही.आर. अय्यंगार यांनी घटनेची तांत्रिक बाजू सांभाळली तरी घटनेत जीव निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमांती केले. बाबासाहेबांचे चरित्रकार चां.भ. खैरमोडे अशी माहिती देतात की, बाबासाहेब रात्री २-३ वाजेपर्यंत दररोज जागरणे करीत. प्रत्येक कलमाची भाषा सोपी पण कायदेशीर व्हावी म्हणून प्रत्येक कलमासाठी आलटून पालटून खर्डा तयार करीत. त्यावेळी त्यांच्या गुडघ्याचा आजार बळावला होता. त्यामुळे संदर्भग्रंथांचा सारा भार आसपासच्या टेबलांवर ठेवीत असत अगर लंगडत जाऊन संदर्भग्रंथ शोधून काढीत असत. घटनेची कलमे तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी जे परिश्रम केले, त्याला तोड नाही.
घटनाकार डॉ. आंबेडकर यांचा इशारा:
संविधान सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संमत करण्यापूर्वी सुमारे ५५ मिनिटांचे अंतिम ऐतिहासिक भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी संविधानाच्या समोरील प्रमुख आव्हानांचा वेध घेऊन काही बाबींच्या संदर्भात निःसंदिग्ध इशारा देऊन ठेवला आहे. ते म्हणतात, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील, तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच, संविधान कितीही वाईट असो, ते राबविणारे जर प्रामाणिक असतील, तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. भारतातील लोक आणि राजकीय पक्ष कसे वागतील, हे कोण सांगू शकेल? आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गांचा अवलंब करतील की क्रांतीकारी मार्गांचा? त्यांनी क्रांतीकारी मार्गांचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असो, ते अयशस्वी होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही. म्हणून भारतीय लोक आणि त्यांचे राजकीय पक्ष कसे वागतील, हे जाणून घेतल्याशिवाय संविधानाबाबत कोणताही निर्णय घेणे निरर्थक ठरेल. जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही, इतकी विभूतीपूजा भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल; परंतु, राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. असा इशारा बाबासाहेब देतात. त्याचबरोबर राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तनाची गरजही अधोरेखित करतात. ते म्हणतात, राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही एक असा मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो. या त्रयीची एकमेकांपासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. हजारो जातींमध्ये विखुरलेल्या लोकांचे एक राष्ट्र होऊ शकत नाही. सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही, याची जाणीव आम्हाला जेवढ्या लवकर होईल, तितके ते आमच्या हिताचे ठरेल, असेही बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे.


गुरुवार, २६ जुलै, २०१८

जागर ‘गुरू’ आठवणींचा!



(दर गुरूपौर्णिमेला एका गुरूची आठवण हमखास येते आणि त्या गुरूच्या निर्व्याज प्रेमाच्या आठवणींनी आजही हृदय उचंबळून येते. त्या गुरूला यंदाच्या गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वाहिलेली शब्दसुमनांजली!)

Picture for representation purpose only


गुरुपौर्णिमा आली की, अनेक गुरूंच्या आठवणी मनात येतात; मात्र, गुरूपौर्णिमा शब्दाचा कधीही उच्चार किंवा आठव झाला तरी एका गुरूची आठवण मनात सदैव दाटून येते, हे गुरू म्हणजे माझे गायनाचे गुरू मधुकर लकडे गुरूजी.
गाण्याचा कीडा लहानपणापासूनच मला चावलेला. बाथरुमपासून ते शाळेचे वर्ग आणि त्या वर्गापासून गॅदरिंगपर्यंत असा हा गायन प्रवास झालेला. किशोरदा, कुमार सानु, रफी वगळले, तर रितसर गुरू असा कधी नव्हताच. नाही म्हणायला कागलमध्ये शौकतमामांच्या (शौकत शेख) गायनाचा प्रभाव होताच. गॅदरिंगमधल्या गाण्याची तयारीही शौकतमामाच्या देखरेखीखालीच व्हायची माझी. त्या अर्थानं शौकतमामा माझा पहिला गायनगुरू. मेघा रे मेघा रे.. म्हणावं तर त्यांनीच. हे गाणं कधीही ऐकताना सुरेश वाडकरांच्याही आधी माझ्या डोळ्यांसमोर शौकतमामाच उभा राहतो, आजही! एरव्ही बोलताना अडखळणारा शौकतमामा गायला लागला की, नुस्तं ऐकत राहावंसं वाटायचं.
पुढं आम्ही निपाणीला शिफ्ट झालो. गाण्याचा प्रवास कॉलेजच्या स्टेजपर्यंत झालेला होता. परिसरातल्या एक-दोन अंताक्षरीच्या स्पर्धाही आम्ही मारलेल्या. त्यामुळं गावातल्या स्थानिक ऑर्केस्ट्रामध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. गायन स्पर्धांतून भाग घेतला. कोल्हापूरच्या झंकारच्या साथीनं आम्ही आधी दांडियाच्या आयोजनापासून एकदम रंगारंग सुरवात केली. मग पुढं चॅरिटी शो वगैरे सुरू झालेलं. तिथं खऱ्या अर्थानं गायनाचं नेमकं व रितसर प्रशिक्षण घेण्याची जाणीव निर्माण होऊ लागली. उल्हासकाका आणि सुजातादीदी (जोशी) यांनीही तसा सल्ला दिलेला. तिथून गुरूचा शोध सुरू झाला. सोबतीला मित्रवर्य नामादा पण होते. दोघांनाही गुरूची निकड होती. हा आमचा शोध राममंदिरातल्या एका खोलीत शिकविणाऱ्या मधुकर लकडे (मूळ यरनाळचे) गुरूजींपर्यंत येऊन थांबला. आम्ही गुरूजींकडं गेलो, त्यांना आम्हा शिष्य करून घेण्याची विनंती केली. दोघांनाही सुगम संगीतात रस होता, पण बैठक तयार करावयाची होती, शास्त्रीय पद्धतीची. सुरांची, स्वरांची जाणीव निर्माण होण्यासाठी गुरूजींनी पेटीबरोबर व्होकल शिकायचा सल्ला दिला. आम्ही होकार दिला आणि आमची संगीत साधना सुरू झाली अगदी सारेगमपधनीसापासून. गुरूजींनी महिनाभर तेच घोटून घेतले. म्हणता म्हणता एकेक सूर समजू लागला. गळ्याला जरा वळण लागू लागले. पुढे महिनाभरानंतर मग पहिल्या भूप रागात आम्ही प्रविष्ट झालो. मंगलमय जय वाणी गजानन... म्हणताना सारेगमच्या पुढे सरकल्याचा आनंद व्हायचा, पण अजून मोठा पल्ला गाठायचाय, याची जाणीवही होती. पुढे मग मालकंस, बागेश्री, जयजयवंती असा टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू झाला. गुरूजी घोटून घोटून तयारी करून घेत होते. कधीही रागावणं नाही की ओरडणं. चुकलं तरी स्वतः गाऊन दाखवायचं, स्वर कसा लावायचा, लावून धरायचा ते सांगायचं, मात्र कधीही रागावल्याचं स्मरत नाही.
गुरुपौर्णिमा जवळ आलेली. नामादानं गुरूजींना यंदा गुरूपौर्णिमा साजरी करू या का, म्हणून थोडं घाबरतच विचारलं. आम्ही चार पाच विद्यार्थीही होतोच. गुरूजींनी नकार दिला नाही, पण थोड्या साशंकतेनंच आम्हाला नाराज करायचं नाही, म्हणून त्यांनी होकार दिला की काय, असं आम्हाला वाटून गेलं. तोपर्यंत गुरूजींनी आणि आम्हीही तशा पद्धतीचा कार्यक्रम कधी केलेला नव्हता. पण, आम्हाला तेवढाही होकार पुरेसा होता. आम्ही रियाज आणि कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू केली. गुरूंप्रती आपल्या गायनातून कृतज्ञता अर्पण करायची, असं आम्ही ठरवलं. भाड्यानं स्टेज आणण्यापासून ते गुरूजींना विचारून निवडक दर्दी रसिक श्रोत्यांना प्रत्यक्ष भेटून आमंत्रित करणं, अशी कामं केली.
राम मंदिराच्या आवारातली ती सायंकाळ गुरूंना वंदन म्हणून जशी अविस्मरणीय ठरली, तशीच आम्हा विद्यार्थ्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरली. जमलेल्या निवडक जाणकार श्रोत्यांसमोर आपल्या गुरूंना अजिबात उणेपणा येऊ द्यायचा नाही, उलट परिसरात त्यांचा लौकिक पसरला पाहिजे, हा हेतू समोर ठेवून आम्ही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं. कार्यक्रमाच्या अखेरीस गुरूजींनीही अतिशय बहारदार सादरीकरण केलं, आम्हा विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या.
साधारण वर्षभराच्या या गायन शिक्षणानंतर माझी बीएस्सी फर्स्टची परीक्षा जवळ आली, तेव्हा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पुढं पुन्हा सुरू करण्याचं ठरवलं. पण, फर्स्ट इयरला मार्कांची गाडी अपेक्षेपेक्षा खाली घसरल्यानं पुढं केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवून गायन बॅकसीटलाच नव्हे, तर डिक्कीतच बंद झालं. त्यामुळं गुरूजींच्या समोरुनही जायला कसं तरीच वाटायचं. तरीही कुठं बाजारात किंवा रस्त्यात भेट झाली तर तू गाणं कधी सोडू नकोस, हे एवढंच वाक्य अगदी मनापासून सांगायचे. पण, माझ्या प्रायोरिटीज तोपर्यंत वेगळ्या झाल्या होत्या. पत्रकारितेचा रस्ता मी धरलेला होता. पण, कधी खुशियों में, खामोशियों में, तनहाईयों में गाणं गुणगुणताना गुरूजींचं वाक्य सदैव आठवायचं. आजही आठवतंय. आज गुरूजी हयात नाहीत, पण, त्यांचा संदेश मन पोखरत राहतो. गाणं म्हणताना पेटीवर लयदार बोटं फिरवीत शिकविणारी गुरूजींची विठूसावळी बैठी मूर्ती नजरेसमोर तरळत राहते. जणू काही आजही माझ्यासोबत असल्याचा भास निर्माण करीत राहते. त्या एका गुरुपौर्णिमेनंतर पुन्हा कधी तशा पद्धतीने गुरूपौर्णिमा साजरी केली नाही, मात्र तिच्या आठवणी दर गुरूपौर्णिमेला मनात रुंजी घालतात आणि बरोबरीने गुरूजींच्या आठवणीही मनात दाटून येतात.

रविवार, १ जुलै, २०१८

कोल्हापूर ‘पीआरसीआय’तर्फे वृक्षारोपण


PRCI Kolhapur chapter's officials with Dr. Devanand Shide, Vice Chancellor of Shivaji University, Dr. D.T. Shirke, Pro-Vice Chancellor and other senior officers of the University.


Alok Jatratkar, Satish Thombare and Rajesh Shinde planting the Bodhivriksha

Alok Jatratkar, Satish Thombare and Rajesh Shinde planting the Bodhivriksha

Raviraj Gaikwad planting a Bodhivriksha

कोल्हापूर, दि. १ जुलै: महाराष्ट्र शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेला प्रतिसादादाखल पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीआरसीआय) कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने आज सकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरात पिंपळ रोपे लावण्यात आली.
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाने राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी हरित संदेश देण्याचे व्रत जोपासले आहे. पुनर्वापरातून बनविलेले कागद, प्रमाणपत्रे आदींचा वापर करण्याबरोबरच ग्रीन सर्टिफिकेट देण्याचा प्रघातही जोपासला आहे. पीआरसीआयच्या या पर्यावरण रक्षण मोहिमेचा एक भाग म्हणून आज महाराष्ट्र शासनाच्या आवाहनानुसार पीआरसीआयच्या कोल्हापूर चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठ परिसरात बोधिवृक्षांची लागवड केली. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह पीआरसीआयच्या कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष आलोक जत्राटकर, उपाध्यक्ष सतीश ठोंबरे, खजिनदार राजेश शिंदे, सहसचिव रविराज गायकवाड आदी उपस्थित होते.
--

PRCI-Kolhapur responds to Green Initiative of GoM

Kolhapur, 1st July 2018: Responding to the announcement of Government of Maharashtra’s 13 crore plantation drive, Public Relations Council of India’s Kolhapur chapter plants Bodhivrikshas on the campus of Shivaji University, Kolhapur.
Mr. Alok Jatratkar, Chairman, PRCI-Kolhapur Chapter, Mr. Satish Thombare, Vice-Chairman, Mr. Rajesh Shinde, Treasurer and Mr. Raviraj Gaikwad, Joint-Secretary took part in the plantation drive.
PRCI has always supported environment friendly activities from its various platforms at national level. It has also promoted various green initiatives like use recycled paper, green certificates along with plantation drive through its chapters spread all over the country. Members of Kolhapur chapter of PRCI today took part in the plantation drive of Government of Maharashtra and planted Bodhivrikshas on the campus of University in presence of Dr. Devanand Shinde, Vice Chancellor, Dr. D.T. Shirke, Pro Vice Chancellor, Dr. Vilas Nandavadekar, Registrar, Dr. D.R. More, Academic Advisor, Mr. V.T. Patil, Finance & Accounts Officer, Dr. P.D. Raut, Dean of IDS faculty, Dr. A.M. Gurav, Dean of Commerce & Management faculty and senior officials.