सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

‘जनसंपर्काच्या अंतरंगा’चा सर्वंकष वेध घेणारे पुस्तक

 




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच (दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी) सोलापूर येथे झाले. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक या निमित्ताने मराठीत निर्माण झाले आहे. या पुस्तकाविषयी...

---

डॉ. रवींद्र चिंचोलकर सर जनसंपर्काच्या संदर्भात पुस्तक लिहीत आहेत, याची माहिती होती. त्यामुळे पुस्तक पूर्ण कधी होते, याची अत्यंत उत्कंठा लागून राहिलेली होती. त्याचा कळसाध्याय म्हणजे ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन होय.

यापूर्वी डॉ. सुरेश पुरी यांनी सन १९८४मध्ये ‘जनसंपर्क: संकल्पना आणि सिद्धांत’ हे जनसंपर्काविषयी मराठीतले पहिले पुस्तक लिहीले. तेच आजवर पत्रकारिता व जनसंपर्काचे शिक्षण-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्यांनी संदर्भासाठी वापरले. मराठीत डॉ. पुरी यांच्या या पुस्तकानंतर सुमारे ३६ वर्षांनी जनसंपर्काविषयी आलेले सकस आणि दर्जेदार पुस्तक म्हणजे डॉ. चिंचोलकर सरांचे ‘जनसंपर्काचं अंतरंग’ होय. ही दोन पुस्तके म्हणजे मराठीतली जनसंपर्क या विषयामधील मैलाचा दगड ठरावीत, अशी आहेत.

या पुस्तकाच्या निमित्ताने एक फार महत्त्वाचा योगायोग घडून आला आहे. पुरी सरांच्या पुस्तकाला त्यांचे गुरू डॉ. सुधाकर पवार यांची प्रस्तावना लाभलेली आहे. तर, चिंचोलकर सरांच्या या पुस्तकाला त्यांचे गुरू डॉ. सुरेश पुरी यांची प्रस्तावना प्राप्त झाली आहे. आधुनिक काळात गुरू-शिष्य परंपरा जोपासनेचे यापेक्षा अधिक सकारात्मक उदाहरण दुसरे कोणते बरे असेल?

एक बाब आपण लक्षात घ्यायला हवी की, पत्रकारिता अगर जनसंपर्क ही क्षेत्रे अनुभवाधिष्ठित आहेत. पत्रकारांच्या, प्रॅक्टीशनर्सच्या अनुभवातून या ज्ञानक्षेत्रांचा विस्तार झाला आहे. डॉ. चिंचोलकर यांच्या या पुस्तकालाही त्यांच्या अनुभवाचा भरभक्कम पाया लाभल्याने त्याची मांडणी अतिशय संवादी झालेली आहे. पुरी सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, चिंचोलकर सरांनी ज्या संघर्षमय परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले, त्याचा उल्लेख केलेला आहे. चिंचोलकर सरांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात दहा वर्षे वार्ताहर, आवृत्ती प्रमुख आदी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या. त्यानंतर जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले जनसंपर्क अधिकारी म्हणून बारा वर्षांहून अधिक काळ काम केले. ऑक्टोबर २००८पासून ते सोलापूर विद्यापीठात वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. सरांच्या या समग्र वाटचालीतील अनुभवाचा अर्क त्यांच्या पुस्तकामध्ये उतरल्याचे आपल्याला दिसते.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान आवश्यक आहेच; मात्र फिल्ड वर्क आणि पत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो. बातमी लेखनापासून ते संपादनाच्या विविध प्रक्रिया, उत्तम जनसंपर्कासाठी आत्मसात करावयाच्या नेमक्या बाबी, आपत्कालीन स्वरुपाच्या परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय अशा अनेक बाबी क्रमिक पुस्तकांतून वाचून शिकणे आणि प्रत्यक्ष फिल्ड वर्क केलेल्या व्यक्तीच्या तोंडून समजावून घेणे यात फरक आहे. सदर कामातील खाचाखोचा, अचानक उद्भवणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदी बाबींची माहिती सर्वांगीण अनुभवसिद्ध शिक्षक उत्तम प्रकारे देऊ शकतो. डॉ. चिंचोलकर सरांनी त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून सदर पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

अगदी मुखपृष्ठापासूनच त्याची सुरवात झालेली आहे. सर्व माध्यमे- अगदी उपग्रहापर्यंतची अत्याधुनिक साधने भोवतीने आहेत. मात्र, त्यांच्या केंद्रस्थानी माणूसच आहे. सारी माध्यमे, समस्त जनसंपर्क यांचा आटापिटा कशासाठी? तर, मानवाची संवादाची भूक भागविण्यासाठी. संवाद नसेल, तर माणूस वेडा होऊन जातो. लॉकडाऊनच्या काळात सर्वांनीच त्याचा अनुभव घेतला आहे. ऑनलाईन, व्हर्चुअल माध्यमांद्वारे कितीही संवाद साधा; प्रत्यक्ष संवादाची उत्कटता त्याला कधीही लाभणार नाही. पूर्वी आपण म्हणायचो, पारंपरिक शिक्षणाचे भवितव्य ऑनलाईन शिक्षण आहे. मात्र, आपले विधान अर्धसत्य असल्याचे या काळात सिद्ध झाले. पारंपरिक शिक्षणाला ही माध्यमे पूरक म्हणूनच उत्तम काम करतील, असे आता चित्र आहे. अशा प्रकारे मानवाचे संवाद प्रक्रियेतील मध्यवर्तीपण अधोरेखित करीतच डॉ. चिंचोलकर त्यांच्या जनसंपर्काच्या अंतरंगाची मांडणी करताना दिसताहेत.

जनसंपर्काची प्रक्रिया आणि स्वरुप या बाबी अतिव्यापक आहेत. केवळ बोलणे, संवाद साधणे अगर माहिती देणे असा जनसंपर्क व्यवसायाचा संकुचित अर्थ आजही काढला जातो. स्वाभाविकपणे जनसंपर्काचा अर्थ तेथे मर्यादित राहतो. त्याचप्रमाणे जाहिरात, विक्री, विपणन, उत्पादन वृद्धी, प्रेस एजंट्री अगर प्रसिद्धी या संकल्पनाही जनसंपर्कसदृश समजल्या जातात. मात्र, जनसंपर्काची संकल्पना ही त्याहून वेगळी आणि या सर्वच बाबींना कमीअधिक प्रमाणात सामावून घेणारी आहे. उपरोक्त सर्व बाबींचा अंतर्गत आणि बाह्य घटकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी वापर करून अंतिमतः संस्थेच्या हितास्तव व्यापक सामाजिक स्तरावर दूरगामी सदिच्छा प्रस्थापना करणे, यासाठी जे सकारात्मक वस्तुनिष्ठ प्रयत्न केले जातात, त्या बाबींचा जनसंपर्काच्या कक्षेत समावेश होतो. जनसंपर्काचे क्षेत्र हे तुलनेत आधुनिक आहे. गेल्या शतकभरामध्ये त्याचा संकल्पनात्मक, सैद्धांतिक आणि क्षेत्रीय विकास आणि विस्तार झाला आहे. शासकीय विभागांसह खासगी उद्योग-व्यवसायांनी जनसंपर्काचा अंगिकार करून आपली प्रगती साधलेली असल्याचे आपल्याला दिसते.

जनसंपर्काच्या विविध पैलूंचा साकल्याने वेध घेण्याचे काम ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाद्वारे डॉ. चिंचोलकर यांनी केले आहे. अत्यंत मुद्देसूद आणि तपशीलवार मांडणी, त्याच्या जोडीला समजावून सांगण्याची संवादी, प्रवाही शैली आणि त्याला पूरक छायाचित्रे, रेखाचित्रे यांचा सुरेख मेळ घालत त्यांनी हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकात एकूण ४४४ पृष्ठांमध्ये नऊ प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. जनसंपर्काचा उदय आणि विकास, जनसंपर्क: संकल्पना आणि सिद्धांत, जनसंपर्क आराखडा, जनसंपर्काची माध्यमे, जनसंपर्काची साधने आणि लेखन तंत्रे, जनसंपर्काच्या व्यावसायिक संस्था आणि आचारसंहिता, जनसंपर्काची विविध क्षेत्रे, कॉर्पोरेट संवाद आणि जनसंपर्क संशोधन अशी ही अगदी क्रमवार प्रकरणे आहेत. जनसंपर्काच्या प्रारंभापासून ते समकाळातील जनसंपर्क क्षेत्राच्या डिजीटल विस्तारापर्यंत सर्वंकष वेध लेखकाने घेतला आहे. पारंपरिक, प्रस्थापित माध्यमांबरोबरच नवमाध्यमांच्या आधारे जनसंपर्क कसा साधावा, याचे दिग्दर्शनही यात त्यांनी केले आहे. विद्या बुक पब्लिशर्सचे प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे यांनी निर्मितीमूल्यांच्या बाबतीत कोठेही तडजोड केलेली नाही, याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावरील पी.टी. बार्नम यांच्यापासून ते आयव्ही लेड बेटर ली, वॉल्टर लिपमन, जॉर्ज क्रील, एडवर्ड बार्नेस यांच्या योगदानाचा साद्यंत आढावा तर या पुस्तकात घेण्यात आला आहेच; शिवाय, भारतीय परिप्रेक्ष्यात सम्राट अशोक यांनी शिलालेख, स्तंभ या माध्यमातून तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची राजमुद्रा, विविध हुकूमनामे यांद्वारे प्रस्थापित केलेल्या जनसंपर्काचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे.

भारतीय जनसंपर्काचे जनक म्हणून महात्मा गांधी यांचा सार्थ गौरव करीत असतानाच भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचीही जनसंपर्काच्या अंगाने त्यांनी केलेली मांडणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे. फाळके यांनी चित्रपट माध्यमाच्या प्रसारासाठी जनसंपर्काच्या वापरलेल्या विविध क्लृप्त्यांचा वेध यात घेतला आहे. विशेषतः डॉ. आंबेडकर यांच्या संदर्भातील मांडणी अतिशय लक्षणीय स्वरुपाची आहे.

कोणत्याही ज्ञानशाखेची वृद्धी आणि विस्तार या बाबी त्या क्षेत्राशी निगडित उपलब्ध असणारे संदर्भ साहित्य आणि त्या क्षेत्रात सुरू असणारे संशोधन यावर अवलंबून असतात. पत्रकारिता आणि जनसंपर्काचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तथापि, मराठीमध्ये या संशोधन सिद्धांतांचा गांभीर्यपूर्वक साद्यंत मांडणीचा मोठा अभाव होता. ही उणीव सदर पुस्तकामध्ये चिंचोलकर सरांनी भरून काढली आहे. जनसंपर्क आराखडा, संशोधन, सर्वेक्षण प्रकार, जनसंपर्क मोहीम, उपक्रम मूल्यमापन, आशय विश्लेषण अशा सर्व संशोधकीय बाबींचा परिचय पुस्तकात सविस्तर करून देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे शासकीय, कॉर्पोरेट, वित्तीय, शैक्षणिक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य, संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रांमधील जनसंपर्काचा वेधही सरांनी घेतलेला आहे. हा वेध घेत असताना त्या त्या क्षेत्रातील अनेकविध समकालीन उदाहरणे देऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यातील क्लिष्टता जाऊन विषय समजावून घेणे सोपे झाले आहे. शैक्षणिक जनसंपर्काच्या संदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या महापूर काळातील सामाजिक कार्याचाही पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

हे पुस्तक पत्रकारिता आणि संवादशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड उपयुक्त ठरणारे आहेच; मात्र, त्याचबरोबर विविध शासकीय, खासगी आस्थापना, संस्था, उद्योग-व्यवसाय यांनाही आदर्श जनसंपर्क कशा प्रकारे असावा, याबाबत मार्गदर्शन करणारे आहे. आजच्या माध्यमांनी घेरलेल्या काळात उत्तम जनसंपर्काची आवश्यकता प्रत्येकालाच वाटू लागली आहे. संस्थाच नव्हे, तर सेलिब्रिटी नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा व्यक्तीगत पातळीवर आपला जनसंपर्क वृद्धिंगत करण्याची, आपली स्वतंत्र ओळख, छबी निर्माण करण्याची आस लागलेली आहे. या पुस्तकाच्या आधारे ही बाब सहजसाध्य आहे. खरे तर, या पुस्तकाला केवळ क्रमिक पुस्तक म्हणणे, त्याच्यावर अन्याय करणारे ठरेल. कारण जनसंपर्क ही पुस्तकात कमी आणि व्यवहारात अधिक अंमलात आणावयाची संकल्पना आहे. जनसंपर्क जितका प्रभावी, तितकी उत्तम प्रतिमा निर्मिती असे थेट समीकरण आहे. म्हणूनच माध्यमकर्मी, जनसंपर्क व्यावसायिक, जनसंपर्काचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह जनसंपर्काची आस असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हाती हे पुस्तक असलेच पाहिजे, असे त्याचे स्वरुप आहे.

या पुस्तकाचे गुणवैशिष्ट्य अगदी एका शब्दात सांगायचे तर ‘समग्रता’ हाच शब्द त्याला लागू पडेल. जनसंपर्काचे सर्व घटक, सर्व बाजू यांचा साकल्याने वेध त्यात आहे. पण, त्या समग्रतेला पृष्ठसंख्येच्या मर्यादा पडल्यामुळे अनेक संकल्पनांना धावता स्पर्श करावा लागलेला आहे. यातील जवळपास प्रत्येक संकल्पनेवर एकेक पुस्तक होईल, अशी त्यांची व्याप्ती आहे. इंग्रजीत तशी ती आहेतही. मराठीत मात्र आता तशा प्रकारची पुस्तके निर्माण होण्याची निकड या पुस्तकामुळे नव्याने अधोरेखित झालेली आहे.

एकूणातच, जनसंपर्काविषयी मराठीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाच्या रुपाने दाखल होते आहे. येथून पुढील काळात महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, शिक्षण संस्था, विद्यापीठे, विद्यार्थी यांना या पुस्तकाचा अभ्यास केल्याखेरीज पुढे जाता येणार नाही. जनसंपर्क व्यावसायिक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी तर एक महत्त्वाचा दस्तावेज मातृभाषेत उपलब्ध होतो आहे. हे सर्वच घटक चिंचोलकर सरांच्या या पुस्तकाचे स्वागत केल्याखेरीज राहणार नाहीत, याची खात्री आहे.

 

पुस्तकाचे नाव: जनसंपर्काचे अंतरंग

लेखक: डॉ. रवींद्र चिंचोलकर

प्रकाशन: विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगपुरा, औरंगाबाद

पृष्ठसंख्या: ४४४

किंमत: रु. ५००/-

 

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

आम्ही तो येरागबाळे...

 

संत तुकाराम (प्रातिनिधिक छायाचित्र)


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होतो. त्यावेळी गांधीजींच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने बोलताना बोलून गेलो की, ‘महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान जितके सोपे वाटते, तितकेच ते अंगिकारण्यास अवघड आहे. गांधी तत्त्वज्ञान आचरणात आणणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. याचे कारण म्हणजे आपल्या सर्वांभोवती चढलेली भौतिकवादाची, चंगळवादाची पुटे होय. जोवर आपण ती दूर करीत नाही, तोवर गांधींची सत्य, अहिंसा आणि मानवतावादी मूल्ये यांपासून आपण दूरच राहू...’ असे मला समजलेल्या गांधींबाबत मी बोलून गेलो. कार्यक्रम झाला. उत्तमच झाला.

रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास साताऱ्याहून एका ‘अॅकॅडेमिशियन’ व्यक्तीचा फोन आला. इतक्या उशीरा फोन केला म्हटल्यावर त्यांनी मोठ्या कष्टानेच माझा क्रमांक शोधला असावा. त्यांनी बोलायला सुरवात केली. म्हणाले, ‘सर, कार्यक्रम चांगला झाला. मात्र, इतक्या मोठ्या अॅकॅडेमिक कार्यक्रमात तुम्ही अत्यंत नॉन-अॅकॅडेमिक शब्द वापरलात. विशेषतः गांधीजींच्या संदर्भात हा शब्द वापरल्याने तो अधिक खटकला. तुम्हाला कदाचित दिवसभरातही अनेकांचे फोन आले असतील त्यासाठी. पण म्हटले आपणही सांगायला हवे, म्हणून फोन केला.’

इकडे त्याच्या शब्दागणिक माझी हवा टाइट होत चाललेली. फोन तर इतर कोणाचाही नव्हता आलेला. सध्याचा काळ काही बोलण्या-लिहीण्यासाठी अत्यंत बेकार स्वरुपाचा आहे. कोणाच्या भावना कुठे दुखावल्या जातील अन् कोणाच्या अस्मितांना कधी धक्का पोहोचेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे नाही म्हटलं तरी मी टेन्शनमध्ये येत चाललो होतोच. मी विचारलं, ‘अहो, कोणता शब्द, ते तरी सांगा.’ त्यावर महोदय उत्तरले, ‘येरागबाळा हा शब्द तुम्ही वापरलात, हे काही योग्य केले नाहीत. विद्यापीठासारख्या अॅकॅडेमिक व्यासपीठावरुन असा नॉन-अॅकॅडेमिक शब्द वापरला जाणेच मुळात आक्षेपार्ह आहे.’ मनात म्हटलं, ‘बाप रे! आता या शब्दाचा वापर ज्या संदर्भात केला आहे, ते लक्षात न घेता या महोदयांची गाडी या शब्दावरच अडून बसलेली आहे.’ आजकाल असा ट्रेन्डच झालाय म्हणा. एखाद्या वाक्याचा मागील पुढील संदर्भ काढून टाकायचा आणि आपल्याला हव्या त्या संदर्भानं तो पेश करायचा की झालं. आपली ठरविलेला मोहीम यशस्वी होते. इथे मात्र यांचा रोख तसा थेट नव्हता. नसला तरी त्यांनी फोन करून सांगण्याची भूमिका मला आजच्या भोवतालात स्वागतार्ह वाटली. म्हणून मग त्यांचं निरसन करायचं ठरवलं. सुरवातीला उद्धृत केलेलं वाक्य आठवून मी पुन्हा त्यांना सांगितलं. आणि मग म्हणालो, येरागबाळा हा काही नॉन-अॅकॅडेमिक अथवा असंसदीय शब्द आहे, असं म्हणता येणार नाही. संत तुकोबारायांनी योजलेला शब्द आहे तो. पर्यायी इंग्रजीत सांगायचं तर, गांधी तत्त्वज्ञानावर बोलणं आणि त्याहूनही ते आचरणात आणायचं म्हणजे कोणाही ‘टॉम, डिक वा हॅरी’चं काम नाहीये ते! हिंदीमध्ये आपण त्यांना ‘लल्लू-पंजू’ असंही म्हणतो. मी त्यांना असं बरंच काही सांगत राहिलो. त्यांचं समाधान झालं की नाही, त्यांनी समाधान मानून घेतलं की नाही, माहीत नाही. पण, या शब्दाच्या नॉन-अॅकॅडेमित्वात मात्र मी गुरफटला गेलो.

कोणत्याही विद्यापीठात न शिकलेले तुकोबाराया हे स्वतःच एक संतपीठाचे महान विद्यापीठ बनून राहिले आहेत. त्यांच्यावर, त्यांच्या गाथेतील शब्दावर नॉन-अॅकॅडेमित्वाचा आरोप करणाऱ्या तथाकथित अॅकॅडेमिशियन्सच्या तुकाराम शिकवायच्या अधिकारावरचंच प्रश्नचिन्ह वाटलं ते मला. अनुभवाशिवाय बोलणाऱ्यांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेताना संत तुकारामांनी म्हटले आहे की,

नका दंतकथा येथे सांगू कोणी।

कोरडे ते मानी बोल कोण।।

अनुभव येथे व्हावा शिष्टाचार।

न चलती चार आम्हांपुढे।।

निवडी वेगळे क्षीर आणि पाणी।

राजहंस दोन्ही वेगळाली।।

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे।

येरागबाळाचे काय काम।।

अर्थात, कोणत्याही विषयातले (विशेषतः अध्यात्मातील) तुम्हाला काहीही कळत नसताना आपल्याला खूपच कळते, असा आव आणून त्यासंदर्भात कपोलकल्पित कथा रचून लोकांना सांगणारे वाचाळवीर खूप असतात. त्यांना फटकारताना तुकोबाराय म्हणतात की, तुम्ही मंडळी, येथे लोकांना दंतकथा सांगत बसू नका. अनुभवविरहित असे ते आपले बोलणे कोण बरे ऐकत बसेल? अनुभव असेल तरच बोलावे, हाच शिष्टाचार बनला पाहिजे. अन्यथा अनुभवाविना बोलणाऱ्यांची आमच्यापुढे काही खैर नाही.

राजहंस जसा पाण्यात मिसळलेले दूध पाण्यापासून वेगळे काढून पितो, त्याप्रमाणे अनुभवी व्यक्ती भल्याबुऱ्याचा विवेकाने विचार, निवाडा करतात. असा राजहंसीय नीरक्षीरविवेक करण्यासाठी असा जातीचाच (अर्थात अनुभवी) व्यक्ती लागतो. ते कोणाही येरागबाळ्याचे काम नाही.

आता साक्षात संत तुकारामांनीच अधिकृत केलेल्या या शब्दाला अशैक्षणिक, असंसदीय मानावे तरी कसे बरे? त्यानंतरच्या गेल्या शेकडो वर्षांत तुकारामांचा हा शब्दप्रयोग अनेक संत, साहित्यिक, पत्रकार, लेखकांनी आपापल्या लेखनामध्ये आवर्जून वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्येष्ठ अभिनेते नीळू फुले यांनी ‘येरागबाळ्याचे काम नोहे’ या शीर्षकाच्या नाटकातूनच मराठी रंगभूमीवर तसेच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते, हेही लक्षात घ्यावे लागेल. खरे तर तुकारामांचे लेखन हा सार्वकालिक संदर्भाचा प्रमुख स्रोत आहे, असे म्हणता येईल इतका सुवचनांचा, शब्दप्रयोगांचा, वाक्प्रचार, म्हणींचे त्यात उपयोजन आहे.

तुकारामांचा विषय येथे ताणवण्याचे कारण नाही, मात्र हे सारे विवेचन यासाठीच की आपली शैक्षणिक आणि अशैक्षणिकत्वाची समज खुरटत, खुंटत चालली आहे का, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. आपण आपली समज विवेकापेक्षा सध्या भोवतालात सुरू असलेल्या गदारोळाच्या दावणीला बांधू लागलो आहोत का, याचा विचार करण्याचीही नितांत गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ‘अॅकॅडेमिक्स’भोवती आधीच घोंघावू लागलेले मळभ अधिकच दाट होऊन काळोख वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.

 

 

 

कृतज्ञ आठवांचा प्रवाहो!


 

'सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा' हे आपले ध्येयवेड्या जीवनप्रवास वर्णनपर पुस्तक भेट देताना डॉ. बाळासाहेब गोफणे.

डॉ. बी.एन. तथा बाळासाहेब गोफणे... माझ्या परिचयातील एक ज्येष्ठ उमदे व्यक्तीमत्त्व... खरे म्हणजे गोफणे सर हे माझ्या वडिलांच्या पिढीतील... स्वातंत्र्योत्तर कालखंडात जन्मलेली आणि शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही पहिली पिढी... शिक्षणासाठीच्या खस्ता त्यांनी आपापल्या परीनं खाल्लेल्या... संघर्ष रेटलेला... या संघर्षाच्या धुमीत तेजाळून निघालेले त्यांचे अनुकरणीय ज्ञानकर्तृत्व... अशी ही पिढी...

गोफणे सरांचा माझा परिचय हा मी शिवाजी विद्यापीठात सन २०१२ साली सहाय्यक कुलसचिव पदावर रूजू झाल्यानंतरचा... तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी मी सर्वात शेवटी रुजू होणारा उमेदवार असूनही माझ्यासाठी जणू सभा व निवडणुका विभागाची जबाबदारी राखून ठेवलेली... या विभागामुळं संपूर्ण विद्यापीठाचंच नव्हे, तर विद्यापीठ परिक्षेत्राचंही कामकाज समजावून घेण्याची, निर्णय प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अंगानं विशिष्ट भूमिका बजावण्याची संधीच जणू मला लाभलेली... विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा इत्यादींच्या बैठकांचं नियोजन, कामकाजाचे मिनिट्स, ठराव इत्यादी विहीत मुदतीत मार्गी लावण्याची जबाबदारी या विभागाकडं आहे. त्यावेळी डॉ. गोफणे सर हे विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून संपर्कात आले. एक अत्यंत गोड वाणीचे, मृदूभाषी, निर्मळ मनाचे आणि कर्तव्यतत्पर सदस्य म्हणून त्यांच्याबद्दल मला विशेष आदर वाटत असे. प्रत्येक बैठकीच्या वेळी आले की, हमखास विचारपूस करणारे आणि अन्य वेळी कधी काही कामानिमित्तानं विभागात आले तरी अनेक बाबी चिकित्सक आणि जिज्ञासापूर्ण पद्धतीनं जाणून घेणारे म्हणूनही त्यांच्याबद्दलचा आदर दुणावलेला. त्यांची मुदत संपली तरी, समाजमाध्यमांपासून ते प्रत्यक्ष कधीही आले तरी काही क्षण का असे ना, भेट घेऊन चौकशी केल्याखेरीज कधीही पुढे न जाणारे, असे गोफणे सर!

नुकतंच त्यांचं ‘सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा: एक ध्येयवेडा प्रवास’ हे आत्मनिवेदनपर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच आवर्जून भेट घेऊन त्यांनी ते भेट दिलं. त्यांच्या सहृदयी स्वभावाला ते साजेसंच आहे. पुस्तक वाचून हातावेगळं केलं, तेव्हा गोफणे सरांच्या आयुष्यातील सकारात्मकतेचं, सहृदयतेचं गमक ध्यानी आलं. आईच्या ममतेसाठी आसुसलेलं कोवळं मन आजही त्यांच्याआत खोलवर कुठं तरी आहे. त्यामुळं भेटणाऱ्या प्रत्येकाविषयी एक माया, ममता, कणव अथवा वात्सल्य या भावना त्यांच्या हृदयातून ओसंडून वाहू लागतात. पुस्तक वाचताना पानोपानी त्याची प्रचिती येते. प्रस्तावनेत डॉ. रणधीर शिंदे म्हणतात, त्याप्रमाणं या निवेदनात व्यक्तीगत, सामाजिक, संस्थात्मक अंतर्विरोधाला अजिबात स्थान नसल्यानं त्याला एकरेषीयता प्राप्त झाली आहे. मात्र, याचं कारण त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनातच असल्यामुळं त्यांच्यातील सकारात्मक दृष्टीनं त्यावर मात केली आहे. डॉ. शिंदे यांचं म्हणणं खरंच आहे. गोफणे सरांना अडचणीत आणायचं म्हणून सुरवातीला अनुमोदक म्हणून सही देणाऱ्या आणि अगदी ऐनवेळी पाठिंबा मागं घेत असल्याचं पत्र देणाऱ्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाचं नाव न छापण्याचा विशालहृदयी दृष्टीकोन गोफणे सरांच्या या जीवनदृष्टीमुळंच त्यांच्यात आलेला आहे. अन्यथा, दुसरा एखादा ते नाव सहजी छापून गेला असता. नेमकं हेच गोफणे सरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

कृतज्ञतेनं ओथंबलेल्या आठवांचा प्रवाह असं एका वाक्यात त्यांच्या या आत्मनिवेदनाचं वर्णन मी करेन. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या विविध व्यक्तीमत्त्वांबद्दल केवळ अन् केवळ कृतज्ञताभाव बाळगणं आणि त्याचा आवर्जून निर्देश करणं, हा आजच्या काळात एक वस्तुपाठ म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्याचप्रमाणं आत्मनिवेदनामध्ये ‘स्व’शय येणं, ‘स्व’ असणं हे अनिवार्यच असतं. मात्र, हा ‘स्व’ मांडत असताना त्यामध्ये ‘मी’पणा डोकावणार नाही, ‘मी’ लाऊड होणार नाही, याची दक्षता घेणं, तारेवरची कसरत असते. या दोहोंमध्ये एक धूसर, बारीक सीमारेषा असते. ती सांभाळणं भल्याभल्यांना जमत नाही. मात्र, स्वभावतःच कृतज्ञशील असलेल्या गोफणे सरांना मात्र ते सहजी जमलेलं आहे, असं पुस्तक वाचताना जाणवतं. या पुस्तकातील कन्टेन्टबद्दल मी लिहीणार नाही कारण गोफणे सरांनी अत्यंत सुबोध, ओघवत्या आणि रसाळ शब्दांमध्ये मांडलेला सीनेच्या वाळवंटापासून सुरू झालेला आणि पंचगंगेद्वारा प्रितीसंगमापर्यंत येऊन ठेपलेला ध्येयवेडा प्रवास मुळातूनच एकदा वाचनानुभवण्यासारखा आहे.

कोविड-१९ लॉकडाऊनच्या कालखंडात आपण सारेच बऱ्याच सहृदजनांना दुरावलो. मात्र, याच कालखंडानं गोफणे सरांसारख्यांना लिहीण्यासाठी अवधी मिळवून दिला आणि त्या काळात एक मार्गदर्शक, कृतज्ञताभावानं ओथंबलेली साहित्यकृती निर्माण होऊ शकली, हेही नाकारता येणार नाही. गोफणे सरांची ही भावगाथा आजच्या तरुणाईला स्वातंत्र्योत्तर पहिल्या पिढीचा संघर्ष सांगणारी तर आहेच, शिवाय, स्वतःमध्ये मूल्ये कशी रुजवून घ्यावीत, त्यांचा अंगिकार, प्रसार कसा करावा, याचेही धडे देणारी आहे. त्या दृष्टीने गोफणे सरांच्या या साहित्यकृतीकडे पाहायला हवे, तिचे स्वागत करायला हवे.

 

पुस्तकाचे नाव: सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा: एक ध्येयवेडा प्रवास

लेखक: डॉ. बाळासाहेब गोफणे

लेखकाचा संपर्क: ९४२२३८४०३५  

प्रकाशक: शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा, सोलापूर

पृष्ठसंख्या: २४०

किंमत: रु. ३००/-


शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

निपाणीतील प्रबोधनपर्वाचा सच्चा पाईक: आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ चिकोडे

 

आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ चिकोडे



चिकोडे कुटुंबियांनी जतन केलेली आयुर्वेदाचार्यांची उपचार सामग्री

आयुर्वेदाचार्य चिकोडे यांच्या संग्रहातील आयुर्वेदिक व युनानी उपचार पद्धतींवरील दुर्मिळ ग्रंथ


निपाणी येथील चिकोडे वाड्यातील राजा रविवर्मा यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेंटिंगची प्रतिकृती  

प्रा. राजन चिकोडे यांनी चिकोडे प्रतिष्ठानतर्फे स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित केले.



निपाणी या सीमाभागातील महत्त्वाच्या व्यापारी गावात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ तुकाराम चिकोडे हे एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व होतं. खरं तर मच्छिंद्रनाथांच्या नावावरुन त्यांचं नाव ठेवलेलं असल्यानं ते तसं लिहीणं अपेक्षित होतं; मात्र, स्वतः त्यांनीच ठिकठिकाणी स्वतःचं नाव मच्छेंद्रनाथ असं लिहील्यानं लेखात सर्वत्र ते तसंच वापरलं आहे. असो! तर, या मच्छेंद्रनाथांची यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करण्यात येत आहे. १७ फेब्रुवारी १८९७ ते ९ जानेवारी १९५१ असं अवघं ५४ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या मच्छेंद्रनाथांची १२५ वी जयंती साजरी करावी, असं काय वेगळं कर्तृत्व त्यांनी गाजवलं असेल, असा प्रश्न पडला. म्हणून त्यांचे नातू आणि आमचे ज्येष्ठ स्नेही प्रा. राजन चिकोडे यांच्यासमवेत चर्चा केली. खरं तर, कोणत्याही घरातल्या तिसऱ्या-चौथ्या पिढीला आपल्या वारशाबद्दल फारसं काही देणंघेणं असल्याचं सहसा आढळत नाही; मात्र, राजन सर त्याला अपवाद. आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ, त्यांचे बंधू ज्योतिषाचार्य वैद्य गोरखनाथ तुकाराम चिकोडे, त्यांच्या मातोश्री श्रीमती चंद्राबाई तुकाराम चिकोडे, त्यांचे पुतणे स्वातंत्र्यसैनिक गोपाळराव व गणपतराव ज्ञानोबा चिकोडे या सर्वांचा वारसा राजन सरांनी अत्यंत अभिमानपूर्वक जपला आहे. या सर्वांच्या कार्याचे आपण वारसदार आहोत, त्या लौकिकाला साजेसे कार्य आपण करीत राहिले पाहिजे, अशी एक आंतरिक तळमळ त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिली.

राजन सरांनी आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथांसह उपरोक्त सर्वच लोकांच्या कार्याची माहिती संकलित स्वरुपात वाचावयास दिली. ती वाचून माझ्या नजरेसमोर एक वेगळेच मच्छेंद्रनाथ उभे राहिले. निपाणी परिसरातील एक वैद्यकीय सेवाव्रती म्हणून तर त्यांनी लौकिक मिळविला होताच, पण त्यापलिकडे जाऊन निपाणी विभागातील प्रबोधन पर्वाचे एक सच्चे पाईक म्हणून त्यांची प्रतिमा माझ्या मनात निर्माण झाली. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या विचार व कार्याचा धागा हा पूर्णांशाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी परंपरेशी जुळणारा आहे. या परंपरेची गांधीवादाशी सांगड घालून आपले सामाजिक व आरोग्यविषयक कार्य लोकाभिमुख पद्धतीने चालविण्याची किमया त्यांनी आपल्या अवघ्या अर्धशतकी आयुष्यात साधली होती. हा संस्कार पुढच्या पिढ्यांमध्ये प्रवाहित करण्याचे महत्त्वाचे कामही त्यांनी केले.

मच्छेंद्रनाथ हे खरे तर मूळचे आयुर्वेदिक व युनानी उपचारांचे जाणकार वैद्य. माहितीने व परंपरेने त्यांनी हा व्यवसाय सेवाव्रत म्हणून अंगिकारला होता. निपाणीतील मोजक्या  नोंदणीकृत आरोग्य चिकित्सकांपैकी ते एक सुपरिचित वैद्य होते. त्यांच्या वैद्यकीय कार्याचा लौकिक केवळ परिसरातच नव्हे, तर अगदी मुंबई, पुण्यापर्यंत पसरला होता. तेथून लोक उपचारांसाठी त्यांच्याकडे येत असत. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाचा वैयक्तिक तपशील, त्याच्या व्याधीचे स्वरुप, त्याची लक्षणे आणि त्याच्यासाठी योजलेली चिकित्सा उपचार पद्धती याच्या अत्यंत तपशीलवार नोंदी वैद्यराजांनी त्यांच्या चोपड्यांमध्ये सुवाच्य हस्ताक्षरात नोंदवून ठेवलेल्या आहेत. महिलांचे आजार, पुरूषांच्या जुनाट व्याधी यावर त्यांचे उपचार प्रभावी ठरल्याचे या नोंदींवरुन दिसून येते. निपाणी ही तंबाखूची व्यापारपेठ. इथे वखारी भरपूर, तसेच तिथला कामगार स्त्री-पुरूष वर्गही मोठा. तंबाखूच्या वखारींमध्ये काम करणाऱ्या या लोकांना दमा, धापेसह श्वसनाचे विविध विकार असत. या आजारांवर मच्छेंद्रनाथांनी रामबाण उपचार पद्धती विकसित केल्याचे या संदर्भात त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरुन लक्षात येते. गरीब लोकांवर ते मोफत उपचार करतच, पण, दूरवरुन आलेल्या एखाद्या रुग्णाला परतीच्या प्रवासासाठी आर्थिक मदतही करत. मच्छेंद्रनाथ हे एक सच्चे आरोग्यकर्मी होते, असे म्हणता येते कारण त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या यादीमध्ये गुजराथी ,मुस्लिम बंधू-भगिनींपासून ते मागासवर्गीय रुग्णाईतांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसते. खऱ्या अर्थाने आरोग्यसेवेचे व्रत त्यांनी सांभाळल्याचे यातून दिसून येते. त्यांचा हातगुण चांगला असल्याची प्रचिती ठिकठिकाणच्या रुग्णांनी पाठविलेल्या पत्रांवरुन येते. त्याचप्रमाणे आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे अनेक वैद्य हे आपल्या औषधांच्या फॉर्म्युल्यांबाबत खूप जागरुक असतात. सहसा ते हा फॉर्म्युला कोणाला सांगत नाहीत. तथापि, मच्छेंद्रनाथ यांनी मात्र या संदर्भात अत्यंत खुले धोरण स्वीकारल्याचे दिसते. आपल्या प्रत्येक रुग्णासाठी अवलंबलेली उपचार पद्धती त्यांनी तपशीलात दिली आहेच; शिवाय, त्यांनी आपले स्वतःचे ‘मच्छेंद्रनाथ चूर्ण’ तयार केले होते, ते बहुरोगांवर गुणकारी असल्याचे सिद्ध झाले होते. लोकप्रियही होते. त्या चूर्णाचा फॉर्म्युला सुद्धा मच्छेंद्रनाथांनी त्यांच्या एका चोपडीत ठळकपणाने नोंदवून ठेवला आहे. अगदी आजही कोणा आयुर्वेदाचार्याला त्यावरुन पुन्हा ‘मच्छेंद्रनाथ चूर्ण’ तयार करून बाजारात उपलब्ध करता येईल, इतका काळाच्या पुढचा पारदर्शीपणा त्यांच्या उपचारांमध्ये दिसून येतो. त्यांच्या या सवयीचा फायदा त्यांच्या निधनानंतरही रुग्णांना होऊ शकला. वयाच्या ५४व्या वर्षी ते अकाली निवर्तल्यानंतर त्यांचे ज्योतिषाचार्य बंधू गोरखनाथांनी वैद्यकीय व्यवसायाची धुरा सांभाळली. मच्छेंद्रनाथांनी सर्व नोंदी अचूक व तपशीलवार नोंदविल्यामुळे ते उपचार पुढे चालविणे सोपे गेले. स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याकडे मोफत उपचार मिळत, हे आणखी एक वैशिष्ट्य आणि महत्त्वाचे योगदान.

मच्छेंद्रनाथांचे घर हे स्वातंत्र्यसैनिकांचे हक्काचे ठिकाण असे. मातोश्री चंद्राबाई उर्फ अम्माई त्या बाबतीत धडाडीच्या होत्या. रात्री अपरात्री आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना जेऊ-खाऊ घालण्याची जबाबदारी त्या आनंदाने पेलत. घरातलेच दोन तरुण गोपाळराव व गणपती हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होतेच. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याबरोबर जेजुरीच्या लुटीसह कोल्हापूरमधला विल्सनचा पुतळा फोडण्यामध्ये तसेच निपाणीतील पोस्ट ऑफिस व चावडी जाळण्यात त्यांच्या सहभाग होता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह येरवडा जेलमध्ये त्यांनी तुरुंगवासही भोगला. या दोघा बंधूंना मच्छेंद्रनाथांची प्रेरणा लाभलेली होती.

वैद्यकीय सेवेच्या पलिकडे सामाजिक कार्यातही मच्छेंद्रनाथांचा प्रभावी वावर होता. निपाणीतील सुप्रसिद्ध श्री सिद्धेश्वर बिरदेव मंदिराचे ते प्रमुख संकल्पक. अगदी मंदिराच्या आराखड्यापासून ते रचनेपर्यंत सारी कल्पना त्यांचीच. त्यासाठी आवश्यक निधी जमवून मंदिर उभे करेपर्यंत साऱ्या कामाची जबाबदारी त्यांनीच पुढे होऊन पेललेली. मात्र, त्यांच्या या कामातील पुढाकारावरुन त्यांच्यावर धर्मभोळेपणाचे आरोपण मात्र करता येणार नाही. ते धर्मश्रद्ध जरुर होते, पण ती श्रद्धा डोळस होती. मोठ्या संख्येने पसरलेल्या धनगर व खाटिक समाजाच्या शैक्षणिक व वैचारिक प्रबोधनासाठी त्यांना एका व्यासपीठाची गरज होती. ती गरज या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केली. हे केवळ देवाचे मंदिर नव्हते, तर निपाणीत उभारले गेलेले पहिले समाज मंदिर होते. मच्छेंद्रनाथ धर्मभोळे असते, तर समाजाच्या प्रथेनुसार मंदिराच्या पायरीवर देवासमोर पशुबळी देऊन त्यांनी परंपरेचे पालन केले असते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी या मंदिरात कोणत्याही प्रकारच्या पशुपक्ष्याचा बळी देण्यास विरोध केला. त्यांच्या या निर्णयाविरोधात समाजातील अनेक घटक त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले. मात्र, मच्छेंद्रनाथ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या निर्धारासमोर समाजाला नमते घ्यावेच लागले. मंदिराच्या परिसराला त्यांनी आपल्या प्रबोधनाचे केंद्रच बनविले होते. मंदिर परिसरात फिरायला जाताना सोबत ते वाटेत भेटणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या छोट्या मुलांना घेऊन जात. त्यांच्या हातून त्यांनी मंदिराच्या भोवती औषधी वनस्पतींची लागवड केली आणि त्यांची निगा राखण्याचे धडे देत. त्याचप्रमाणे त्या औषधी वनस्पतींचे गुणधर्मही ते त्या मुलांना समजावून सांगत. आपोआपच वृक्षारोपणासह वनस्पतींविषयक ज्ञानाचा प्रसारही अशा पद्धतीने ते करत. या मंदिरात वेळोवेळी भरणाऱ्या सभांमधून ते समाजातील मुलांना, युवकांना शिक्षण घेण्यासाठी सातत्याने प्रेरित करीत असत. मुलांसाठी त्यांनी गणितांजली, अंकगणित, पदार्थविज्ञान अथवा सृष्टीशास्त्र ही पुस्तके अत्यंत सोप्या भाषेत लिहीलेली आहेत. या विषयांचा सराव ते विद्यार्थ्यांकडून करून घेत असावेत, असे दिसते. नाडीपरीक्षेविषयीही त्यांनी एक पुस्तक लिहीले आहे.

समाजबांधवांमध्ये अज्ञानाच्या बरोबरीनेच व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. व्यसनामुळे लोकांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे पाहून मच्छेंद्रनाथांनी मद्यपान व्यसनमुक्ती चळवळीस प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी पिंकेटिंगसारखी चळवळ त्या काळात मोठ्या जोमाने चालविली आणि अनेक कुटुंबांची वाताहत वाचविली. हे त्यांचे फार मोठे कार्य आहे.

त्या काळात आणखी एक महत्त्वाचे कार्य त्यांनी उभारले, ते म्हणजे निपाणीत वक्तृत्वोत्तेजक मंडळाची स्थापना होय. अशा प्रकारचे मंडळ हे त्या काळात केवळ पुण्यासारख्या ठिकाणीच काय ते पाहावयास मिळायचे. मात्र, निपाणीत अशा प्रकारे वक्तृत्वोत्तेजक मंडळ स्थापन करून युवकांना तेथे वक्तृत्वासाठी प्रेरित करण्याचे महत्कार्य मच्छेंद्रनाथांनी केले. त्यासाठी ते स्वतःच्या संग्रहातील वृत्तपत्रांसह भगवद्गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, नवनाथ कथासार, पांडव प्रताप, रुक्मिणी स्वयंवर आदी ग्रंथ युवकांकडून वाचून घेत असत. आयुर्वेदासह विविध उपचार पद्धतींवरील ग्रंथ तर त्यांच्या संग्रही होतेच, शिवाय स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचे ग्रंथही होते. चिकोडे परिवाराने ते आजही प्राणापल्याड जपले आहेत. या संग्रहात बायबलची एक दुर्मिळ प्रतही पाहावयास मिळाली. वाचनाबरोबरच कलासक्तपणाही मच्छेंद्रनाथांचा महत्त्वाचा पैलू होता. राजा रविवर्मा यांच्या अनेक जगप्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती थेट रविवर्मा यांच्या कार्ला-लोणावळा इथल्या प्रेसमधून त्यांनी मागविल्या. चिकोडे वाड्याच्या भिंती आजही त्या चित्रकृतींनी सालंकृत आहेत.

मच्छेंद्रनाथांनी तरुण वयात टिळक पर्वाची प्रखरता आणि अस्त, त्याचप्रमाणे गांधीपर्वाचा उदय पाहिला. स्वाभाविकपणे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानासाठी त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. गांधीजींच्या विचार व कार्याचा एक स्वाभाविक प्रभाव त्यांच्यावर पडल्याचे दिसते. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांनी जो श्रद्धांजलीपर लेख लिहीला, त्यामधून हा प्रभाव नेमका कशा पद्धतीचा होता, ते आपल्या लक्षात येते. ‘महात्माजींसारख्या अलौकिक, थोर विभूतीच्या गुणांचे, उपकाराचे माप घेणे म्हणजे समुद्राचे पाणी मापून जमिनीवर ओतून घेणे जसे अशक्य आहे; तसेच, महात्माजींच्याही ज्ञानाचे महात्म्य सांगणे कोणासही दुर्गम्य आहे, इतके ते अगाध आहे,’ असे त्या लेखात मच्छेंद्रनाथ म्हणतात. मात्र, त्याच लेखात त्यांनी महात्माजींची तीन वचने दिली आहेत, ती अशी:-

१.     “नाशवंत अशा इहलोकीच्या राज्याची मला इच्छा नाही. स्वर्गराज्यासाठी म्हणजेच मुक्तीसाठी मी धडपडत आहे. माझ्या देशाची आणि मानव समाजाची सेवा करता करता अखंड झिजणे हाच माझ्या मोक्षाचा मार्ग.”

२.     “मैं इस बात का सबूत देता हूँ कि, बिना हवा और पानी के, चाहे मैं जी जाऊँ, परंतु बिना ईश्वर के जिना असम्भव है। आप मेरी आँखे निकाल लें, मैं मरुंगा नहीं। आप मेरी नाक काट लें, उससे भी मैं मरुंगा नहीं। परंतु ईश्वर में मेरे विश्वास को उडा दें, तो मैं मरा पडा ही मिलूँगा।”

३.     “जिस एक प्रशंसा को मैं पसंद करूँगा और किंमती समझूँगा वह तो उन प्रवृत्तियों में योग देना है, जिनसे मेरी जिन्दगी लग गई है। हर एक स्त्री-पुरूष जो साम्प्रदायिक मेल पैदा करने या अस्पृश्यता के कलंक को मिटाने या गाँव का हितसाधन करने में कोई एक भी काम करता है, वह मुझे सच्चा सुख और शांति पहुँचाता है।”

ही विधाने येथे सविस्तर देण्याचे कारण म्हणजे मच्छेंद्रनाथ गांधीजींच्या कार्याकडे किती सजगपणाने पाहात होते, त्याची प्रचिती त्यांमधून येते. पहिले विधान हे गांधीजींच्या मानवतावादी भूमिकेचे निदर्शक आहे, दुसरे विधान हे त्यांची सश्रद्ध ईश्वरनिष्ठा दर्शविते, तर तिसऱ्या विधानातून समता व सहिष्णुता या सांवैधानिक मूल्यांचा आग्रह प्रतिपादित झालेला दिसतो. म्हणजेच मच्छेंद्रनाथ गांधीजींच्या मानवतावादी व मानवी मूल्याधिष्ठित समाजाचा आग्रह धरणाऱ्या विचारसरणीचे चाहते आहेत, असा निष्कर्ष आपणास काढता येतो.

उपरोक्त चर्चेवरुन आपल्याला थोडक्यात असे म्हणता येईल की, आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ तुकाराम चिकोडे हे एक तळमळीचे सत्यशोधक प्रबोधनकर्ते होते. त्यांनी केलेले सामाजिक, शैक्षणिक प्रबोधनाचे कार्य, उभारलेल्या चळवळी या साऱ्यांचा सांधा आपल्याला थेट सत्यशोधक चळवळीशी जोडता येऊ शकतो. महात्मा गांधी यांच्या ज्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला, ती मानवतावादी भूमिका ही स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांशी, अर्थातच पुन्हा महात्मा फुले यांच्या विचार-कार्याशी नाते सांगणारी आहे. त्यांचे समग्र जीवनकार्यही फुले यांच्याप्रमाणेच अत्यंत सेवाव्रती स्वरुपाचे असल्याचे दिसून येते. त्या काळात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने सत्यशोधक चळवळीचा जो प्रसार संयुक्त महाराष्ट्राच्या व्यापक भूगोलावर झाला, त्यामध्ये बेळगाव-निपाणी परिसराचाही समावेश होता. या विभागात प्रबोधनाची चळवळ मूळ धरून होती. त्या झाडाचीच एक महत्त्वाची शाखा मच्छेंद्रनाथांच्या रुपाने निपाणीत विकसित झाली आणि तिने या विभागाच्या प्रबोधनपर्वात आपले योगदान दिले, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.