शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

‘शब्द’प्रिती!

 

कवी ना.वा. देशपांडे

दिवंगत कवी ना.वा. देशपांडे यांची ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठास देण्याबाबतचे पत्र उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांना प्रदान करताना श्रीमती सुनंदा देशपांडे


प्रा. शशिकांत चौधरी यांचा एकदा फोन आला. कोल्हापूरचे दिवंगत ज्येष्ठ कवी ना.वा. तथा नारायण वामन देशपांडे यांच्या पत्नी सुनंदा यांना त्यांचे ग्रंथ चांगल्या ठिकाणी द्यावयाचे आहेत. मी त्यांना विद्यापीठाखेरीज अन्य दुसरे उत्तम ठिकाण असू शकत नाही, असे म्हटले आहे. या कामी आपली मदत हवीय. काय करता येईल, पाहा. बाईंची कळकळ त्यांनी परोपरीनं मला सांगितली. त्यामुळं या ग्रंथदान प्रक्रियेला गती द्यावी, असं वाटून गेलं. आमचे उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांच्या कानी मी ही बाब घातली. तेही स्वभावानं अत्यंत सकारात्मक. म्हणाले, आधी जाऊन नेमके कोणती पुस्तके आहेत, अवस्था काय आहे, हे पाहून घेऊ, आणि मग ठरवू. एखादी व्यक्ती गेली, की तिच्या पुस्तकांची माघारी राहिलेल्या लोकांना घरात अचडण होऊ लागते. मग, घरातली ही अडगळ एखाद्या ग्रंथालयाला दान केल्याचे दाखवून घर रिकामे करून घेतात आणि वर फुकटचे पुण्य आणि प्रसिद्धीही पदरात पाडून घेत असतात.सुतार सरांनी त्यांच्या कारकीर्दीतील एक सार्वत्रिक अनुभव सांगितला.

दुसऱ्या दिवशी चौधरी सरांना फोन करून मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिराशेजारील देशपांडे यांच्या घरी गेलो. सुनंदाबाईंचं वय झालेलं. दोन खोल्यांच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये नावांच्या माघारी उरलेला एकटीचा संसार त्या रेटत असलेल्या दिसल्या. आमचं त्यांनी अतिशय आपुलकीनं स्वागत केलं. आधी चहा दिला. आणि बोलता बोलता त्या आमच्याशी कमी आणि स्वतःशीच अधिक असं सांगू लागल्या. यातून समजलं ते असं...

कवी ना.वा. देशपांडे हे कोल्हापुरातल्या अनेक नामवंत शाहीरांचे लाडके रचनाकार होते. अनेक पोवाडे, गीते, छंदबद्ध रचना त्यांनी केल्या. दिवंगत संगीतकार दिनकरराव पोवार यांनी त्यातल्या अनेक संगीतबद्धही केल्या. शीघ्रकवी लहरी हैदर, ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत यांच्याशी त्यांचा मोठा स्नेह होता. माडगूळकर तर त्यांना मानसपुत्रच मानत असत. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारकार्यावर देशपांडे यांची नितांत श्रद्धा होती. असे हे देशपांडे वयाच्या ८६व्या वर्षी गेले. प्रथेप्रमाणे पिंडदान वगैरे कार्यक्रमाच्या वेळी कावळा काही केल्या पिंडाला शिवेना. बऱ्याच नातेवाईकांनी काहीबाही सांगून पाहिलं, पण भोवती नाचणारे कावळे शिवायला मात्र तयार होईनात. त्यावेळी आपलं पराकोटीचं दुःख सांभाळत सुनंदाबाई नैवेद्यापुढे हात जोडून उभ्या राहिल्या. म्हणाल्या, मला माहितीय, तुमचा जीव तुमच्या पुस्तकांत अडकलाय. मी ती सांभाळेन का? की रद्दीत घालून रिकामी होईन, असंही वाटत असेल तुम्हाला. मात्र, या क्षणी तुम्हाला एकच आश्वासन देते की मी असेपर्यंत आपली सगळी पुस्तकं जीवापाड सांभाळेनच, शिवाय, माझ्या हयातीतच ती एखाद्या चांगल्या ठिकाणी देण्याची व्यवस्थाही करेन. असं त्यांनी म्हणताक्षणी कावळा पिंडाला शिवला आणि तत्क्षणी देशपांडेंच्या पुस्तकांची योग्य निरवानिरव या गोष्टीचं त्यांच्या अंतिम इच्छेत रुपांतर झालं आणि वयोज्येष्ठ सुनंदाबाईंनाही त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठीचं ध्येय गवसलं.

आता कावळा शिवणं वगैरे गोष्टी माझ्यासारख्या माणसाला कधीही न रुचणाऱ्या वा पटणाऱ्या. मात्र, या गोष्टी मेलेल्यांसाठी नसतातच मुळी. त्या असतात, मागे उरलेल्यांच्या मनाचे खेळ पुरविण्यासाठी. पाहा ना, एखाद्याच्या पिंडावर समस्त नातेवाईक नैवेद्याचा इतका ढीग घालतात आणि प्रत्येक जण रोखून आपापल्या पदार्थावर बारकाईनं लक्ष ठेवून असतो. स्मशानात सगळ्यांचाच नैवेद्य खावून पोटे ढिम्म भरलेले कावळे या सर्व कार्यक्रमाचा कधी नव्हे ते केंद्रबिंदू असतात. कावळा शिवेपर्यंत उपस्थितांमध्ये त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या कावळा शिवण्याच्या गोष्टींना ऊत आलेला असतो. केवळ जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूदरम्यानचाच प्रवास मान्य असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला उपस्थितांच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकत हो ला हो मिळविण्याखेरीज पर्यायही राहात नाही. अशा वेळी कावळा मग एखाद्याच्या भजीच्या तुकड्याला स्पर्श करतो आणि मग त्यानंतर कावळ्यावरचा केंद्रबिंदू त्याच्याकडे सरकतो. मग, त्या माणसाला भजी कशी आवडायची; ज्याने तो नैवेद्य आणला, त्याच्याशी त्याचे कसे बरेवाईट संबंध होते, अशा गोष्टींची चर्चा सुरू होते. मग चर्चेचे केंद्रस्थान आपसूकच प्राप्त झालेला तो डोमकावळा स्वतःही मग मृतासोबतचे त्याचे असले नसलेले संबंध आणखी खुलवून सांगत आपल्यावरचा फोकस अन्यत्र सरकणार नाही, याची दक्षता घेऊ लागतो. असो! विषयांतर झालं. आपला विषय आहे सुनंदाबाईंनी देशपांडेंना दिलेल्या वचनाचा!

त्यानंतरच्या दोनेक वर्षांत अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांनी त्यांच्याकडे देशपांडेंच्या ग्रंथसंग्रहाची मागणी केली. पैसे देण्याचीही तयारी दर्शविली. मात्र, सुनंदाबाईंनी चाणाक्षपणे त्यांची चाचपणी करून गोड बोलून मार्गी लावले. प्रा. चौधरी आणि देशपांडे यांचेही खूप चांगले संबंध होते. चौधरींना ते मुलासारखे प्रेमाने वागवायचे. ते सुनंदाबाईंना अधूनमधून भेटायला जात. कोरोनाचे सावट वाढू लागले, तशी सुनंदाबाईंची वचनपूर्तीविषयीची चिंताही वाढू लागली. ती त्यांनी चौधरींच्या कानी घातली आणि मग त्यानुसार पुढील गोष्टी घडून आम्ही सुनंदाबाईंच्या पुढ्यात होतो.

हा सारा वृत्तांत सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वाहात होत्या. देशपांडेंना दिलेल्या वचनपूर्तीतून मोकळे होण्याची वेळ जवळ आली आहे, याचे समाधान एकीकडे तर त्यांचा हस्तस्पर्श झालेला ठेवा आता दुरावणार, याचे थोडे वाईटही वाटत असणार त्यांना. मात्र, त्याचवेळी जोपर्यंत विद्यापीठ आहे, तोपर्यंत ना.वा. देशपांडे यांची ग्रंथसंपदा तिथे असणार, त्यातून वाचक ना.वां.शी जोडला जात राहणार, याचा आत्मिक आनंदही त्यांना होता.

एका लाकडी फडताळाला पडदा लावून त्यांनी अतिशय नेटकेपणाने ना.वां.ची पुस्तके जपून ठेवली होती. तो पडदा त्यांनी बाजूला केला आणि आम्ही थक्क झालो. एखाद्या माणसाचं पुस्तकप्रेम कसं असावं, याचा एक दाखलाच जणू आम्ही पाहात होतो. सुनंदाबाईंनी सांगितल्यानुसार एखादं नव पुस्तक घरी आलं किंवा आणलं, तर ते दिवसरात्र बसून वाचल्याखेरीज देशपांडेंना चैन पडत नसे. आणि त्याचवेळी त्या पुस्तकाला छानसं कव्हर घालून बोरूच्या टाकेनं त्यावर अतिशय सुंदर स्वहस्ताक्षरात ते पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव लिहीत. स्पाईनवरही तशाच टपोऱ्या अक्षरात त्यांनी पुस्तकाचं नाव लिहीलेलं होतं. त्या फडताळातल्या पुस्तकांच्या केवळ स्पाईनवर नजर फिरवून देशपांडेंच्या प्रगल्भ आणि चौफेर वाचनाची साक्ष आम्हाला पटत होती. किती तरी जुनी, दुर्मिळ पुस्तकेही त्या संग्रहात दिसली. मात्र, आजही जर त्यांचे कव्हर काढले, तर जणू आजच ते बाजारातून आणले आहे की काय, असे वाटेल, इतक्या आत्मियतेनं ती जोपासलेली.

काही दिवसांनी आम्ही जाऊन तो ४५६ पुस्तकांचा संग्रह शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं ताब्यात घेतला. सुनंदाबाईंनी आपले काही जवळचे नातेवाईक, शेजारी-पाजारी यांना बोलावून त्यांच्या साक्षीनं तो ठेवा आमच्याकडं सुपूर्द केला. आता कोणत्याही क्षणी मृत्यू आला तरी मी निश्चिंत मनानं जायला मोकळी झाले, हे त्यांचे निरोप घेतानाचे अखेरचे शब्द माझ्या कानात आणि मनात घुमत राहिले. एका अनोख्या शब्दप्रितीचा साक्षीदार होताना मी मात्र पूर्णतः निःशब्द झालेलो होतो.


स्पर्श!

 



तो... 

त्याला भेटायचा अधून-मधून... 

सुहास्य वदनानं ग्रीट करायचा... 

प्रेमानं विचारपूस करायचा... 

कधीकधी हातही हातात घ्यायचा... 

लवकर सोडायचा नाही... 

यालाही त्यात काही वावगं वाटायचं नाही... 

कधी कधी त्याला त्याची नजर वेगळी वाटायची... 

पण, त्यातही खटकावं असं काही वाटायचं नाही... 

किंवा तो वाटून घ्यायचा नाही... 

एकदा तो त्याला वाटेत दिसला... चालत जाताना... 

त्यानं आपली दुचाकी थांबवली...

आणि कर्टसी म्हणून पुढच्या चौकापर्यंत लिफ्ट दिली... 

तोही आनंदला... 

गाडीवर मागं बसला... 

गाडी सुरू झाली... 

त्यानं मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला... 

बोलता बोलता अगदी सहजपणे...

त्याचा हात कमरेकडे आणि हळूच मांडीवर सरकला... 

आणि सहज फिरवावा तसा फिरवू लागला... 

गाडी चालविता चालविता तो चमकला... 

स्साला... हे काही वेगळं आहे... 

हा स्पर्श वेगळाच आहे... 

त्याला अस्वस्थ अन् कसंसंच वाटू लागलं... 

त्यानं गाडीचा स्पीड वाढवला... 

चौक गाठला... 

गाडीला कचकन ब्रेक मारुन थांबवली... 

मागचा तो बहुधा जड अंतःकरणानंच उतरला... 

तो निरोपाचं काही बोलण्याआधीच...

यानं त्याच्याकडं वळून न पाहताच गाडी दामटली... 

झाला प्रकार त्याची पाठ सोडत नव्हता... 

त्याला मागचेही काही प्रसंग आठवू लागले... 

शेक हँडसाठी पुढं केलेला हात हातात तसाच घेऊन थांबणं किंवा न सोडणं... 

त्याची काही सुचवू पाहणारी नजर... 

तिचा अर्थ आता लक्षात येऊ लागला... 

आणि अचानक त्याच्या मनात गाडीच्या वेगापेक्षाही गतीनं एक विचार आला... 

आपली ही अवस्था, तर बायका-मुलींची काय अवस्था होत असेल... 

आपण हरामखोर... 

त्यांच्याकडे येता-जाता पाहतो... अगदी टक लावून... 

केवळ नजरेनंच त्यांच्या अंगांगाला झोंबत राहतो... 

त्यांच्या माना खाली जाईपर्यंत... 

नजरा अगदी पायाच्या अंगठ्याकडं जाईपर्यंत... 

गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करतो... 

ती नजर, तो स्पर्श... त्यांना किती किळसवाणा वाटत असेल... 

त्यांच्या मनात आपल्याविषयी किती तिरस्कारचीड निर्माण करीत असेल... 

हे आणि असे बरेच काही त्याच्या मनात येत राहिले... 

त्या एका स्पर्शानं त्याला त्याच्यातल्या या चुकीच्या पुरूषार्थ-भावनेची जाणीव करून दिली होती... 

आणि त्या जाणीवेच्या बरोबरच त्याच्यातला सच्चा पुरूष उदयास येऊ पाहात होता...

 

-    आलोक प्रियदर्शन

शनिवार, १० जुलै, २०२१

स्वागत ‘समतेशी करारा’चे!


सामाजिक जाणीव म्हणजे काय? माझ्यावर अन्याय झाला, तसा इतर कोणावर होऊ नये, होत असेल तर त्याविरोधात मी उभा राहीन, ही भावना म्हणजे सामाजिक जाणीव. जातिव्यवस्थेने ठरविलेल्या उच्च वर्णीयांमध्येही गरीबी, बेकारी वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, ही स्थिती कोणाला तरी आरक्षण दिले म्हणून निर्माण झाली का? तर नाही. अस्पृश्यांच्या गरीबीचे मूळ जसे समाजव्यवस्थेत आहे, तसेच खुल्या प्रवर्गातील गरीबीचे मूळ हे मला राजकीय व्यवस्थेत दिसते. चुकीच्या राजकीय धोरणांचा हा परिपाक आहे. परंतु दोष आरक्षणाला दिला जातो. त्यातून सतत एक सामाजिक संघर्ष सुरू राहतो.

ज्यांना जातिव्यवस्था संपवायची आहे, त्यांची तरी जातीय मानसिकतेतून सुटका झाली आहे का? ज्याला समता अभिप्रेत आहे, तो बहुजन-अभिजन असे समाजाचे दोन तुकडे कसे करू शकतो? बरे, या नवबहुजनांमधील प्रत्येक जातीला वाटते, आपल्या डोक्यावर कोणी नसला पाहिजे; परंतु खाली कोणी तरी हवे, कारण त्याला वरचा व्हायचे आहे. म्हणजे नवबहुजनवाद वर्चस्ववाद नाकारत नाही आणि वर्चस्ववाद हा समताविरोधी आहे. समतेच्या चळवळीच्या संकल्पना स्पष्ट असायला हव्यात. ज्या चळवळीला लोकशाही मान्य आहे, तिने प्रथम हुकूमशाही-सरंजामशाही मानसिकतेतून मुक्त व्हायला हवे. ज्या चळवळीला बंधुभाव हवा आहे, तिने आधी वैरभाव सोडून दिला पाहिजे. ज्या चळवळीला समता हवी आहे, तिने आधी विषमतामूलक जातीय मानसिकतेतून सुटका करून घेतली पाहिजे. पण, प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. म्हणून मी अस्वस्थ...

अशा एका मनस्वी अस्वस्थतेतून आणि सजग समाजभानातून साकारला आहे, ज्येष्ठ पत्रकार आणि सुहृद मधु कांबळे यांचा समतेशी करार. सामाजिक जाणिवांनी समृद्ध असणारे महाराष्ट्राच्या भूमीत जे काही थोडे पत्रकार आहेत, त्यामध्ये मधु कांबळे यांचे स्थान खूपच वरचे आहे. मी स्वतःला अतिशय संपन्न मानतो की त्यांच्यासारख्या अत्यंत निर्मळ, सहृदयी व्यक्तीचे मैत्र, सहवास प्रदीर्घ लाभला. पत्रकारिता करीत असताना कोणत्याही प्रश्नाकडे माणुसकीच्या भावनेतून कसे पाहावे, संबंधित प्रश्नाचा बाजार न होऊ देता नैसर्गिक सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्याची सोडवणूक कशी करता येईल, याचा विचार करणारे मधु कांबळे. लोकसत्तेतील समाजमंथन या मालिकेतून त्यांनी अशाच काही समकालीन सामाजिक प्रश्नांचा अतिशय चिकित्सक वेध घेतला. त्याचे प्रचंड स्वागत राज्यभरातून झाले. याचे कारण म्हणजे आरक्षण, अट्रॉसिटी आणि जातीय व्यवस्था यांचा कोणत्याही जातिनिष्ठ जाणीवांतून वेध न घेता त्यांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर आणि भारतीय संविधान यांच्या मानवी मूल्याधिष्ठित बाजूने घेतला. स्वाभाविकच त्यांच्या लेखनातून सामोरे आलेले पर्याय हे संवैधानिक स्वरुपाचे आहेत. ते सर्व प्रकारच्या विचारसरणीच्या लोकांना पटतीलच, असे नाही; ते पटवून घेतीलच, असेही नाही. मात्र, हे पर्याय नैसर्गिक न्यायाच्या बाजूने झुकलेले, समतेच्या दिशेने घेऊन जाणारे निश्चितच आहेत. संपादक गिरीष कुबेर यांनी या लेखनासाठी त्यांना दिलेले स्वातंत्र्य, प्रोत्साहन आणि मुबलक जागा आजच्या भोवतालात फार म्हणजे फारच महत्त्वाच्या बाबी आहेत.

मधु सरांच्या या लेखमालेचे पुस्तक झाले, ही बाबच माझ्यासारख्या चाहत्याला प्रचंड सुखावणारी आहे. दोनच दिवसांपूर्वी साक्षात डॉ. गौतमीपुत्र सरांच्या हस्ते ते घेताना झालेला आनंद अवर्णनीय. पुस्तक पाहिले आणि एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊसचे आमचे प्रकाशक सन्मित्र आयु. अर्जुन देसाई यांच्याबद्दलही कौतुक दाटले, इतकी उत्तम निर्मितीमूल्ये त्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीत जपलेली आहेत. सरांनी पुस्तक दिले, त्यावेळी औरंगाबादचे ज्येष्ठ चित्रकार प्रा. दिलीप बडे, त्यांचे आर्किटेक्ट चिरंजीव शोमित आणि उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आदी उपस्थित होते.

चंबुखडी ड्रीम्स: युवांसाठी पथदर्शक स्वप्नदीप

 



एखादी व्यक्ती चिरपरिचित असते. तिचं आयुष्य, त्यातल्या घडामोडी बऱ्याचशा आपल्याला ठाऊक असतात. अशी व्यक्ती जेव्हा आत्मपर स्वरुपाचं काही लिहीते, तेव्हा त्या परिचयाच्या खुणा आपण त्यात शोधू लागतो. आत्मपर लेखनाचे हेतू अनेक असतात. आपल्या आयुष्यातील घडामोडींची नोंद घेणं, वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर एका तटस्थ, त्रयस्थ नजरेनं गतायुष्याचा पुनर्वेध घेऊन त्यातील भल्याबुऱ्याचा हिशोब मांडणं इत्यादी इत्यादी. मात्र, डॉ. जगन्नाथ पाटील यांच्यासारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संज्ञापक वयाच्या अगदी मधल्या टप्प्यावर आत्मपर लेखनाचा घाट घालतो, तेव्हा त्या लेखनातील संप्रेषण-संदेशाकडे अधिक सजगपणे पाहावे लागते.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांचे चंबुखडी ड्रीम्स हे आत्मलेखन वाचनात आले आणि उपरोक्त विचारतरंग मनात निर्माण झाले. तथापि, त्यांनी सुरवातीलाच हे काही माझं संपूर्ण आत्मकथन नव्हे, असं सांगतानाच यातून प्रेरणा आणि स्वप्नं घेणारे आणखी काही युवक-युवती निर्माण झाले, तर या लेखनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल, अशी भूमिका मांडली आहे.

डॉ. पाटील यांच्याशी माझा गेल्या वीस-बावीस वर्षांचा स्नेह आहे. एक उमदा शिक्षक, मार्गदर्शक आणि सन्मित्र असं हे सख्य तिहेरी पद्धतीनं फुललं आहे. त्यामुळं या कालखंडातील त्यांच्या वाटचालीचा, संघर्षाचा आणि प्रगतीचा त्यांच्या भल्या थोरल्या मित्र परिवारापैकी मी एक साक्षीदार. पण, चंबुखडी ड्रीम्स मी जसजसा वाचत गेलो, तसतसा त्यामधील संघर्षात मी अधिकाधिक गुंतत गेलो. आपण ज्या ओळखतो, असं आपल्याला वाटतं, ते किती वरवरचं असतं, ते जाणवलं. माझा सरांशी परिचय होण्यापूर्वीच्या कालखंडातला आणि अगदी या नजीकच्या काळातलाही त्यांचा संघर्ष वाचताना अचंबित झालो, पुन्हा नव्यानं प्रभावित झालो आणि खरोखरीच आजच्या तरुणांसाठी हे पुस्तक म्हणजे एक पथदर्शक स्वप्नदीप आहे, अशी भावना निर्माण झाली.

ज्याचा जन्म होण्यापूर्वीच वडील सीमेवर शहीद झाले, ज्याच्या आईनं प्रचंड कष्टानं आणि संघर्षमय परिस्थितीतून त्याला वाढवलं, जो प्रचंड हुशार होता, पण बिघडण्याच्याही सर्व शक्यता ज्याच्यात ओतप्रोत भरलेल्या होत्या, अशा विद्यार्थ्याला चांगल्या शिक्षकांचा परीसस्पर्श लाभला, तर त्याचं किती सोनं होऊन जातं आणि पुढं हा मनुष्य केवळ देशाच्याच नव्हे, जगाच्या शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्तावर्धनासाठी किती असोशीनं योगदान देतो, या साऱ्याचं कथन म्हणजे चंबुखडी ड्रीम्स.

मला या कथनामध्ये आवडलेली बाब म्हणजे, यामध्ये मोठेपणाचा अभिनिवेश नाही, तर अत्यंत ओघवत्या शैलीत त्यांची कारकीर्द आपल्यासमोर ते मांडत राहतात. विविध ठिकाणी काम केल्याच्या तसेच काम करीत असल्याच्या मर्यादांमध्ये राहून त्या त्या संस्था, संघटनांचं श्रेय ते त्यांच्या त्यांच्या पदरात टाकतात. प्रसंगी दोन पावलं मागं येऊन संधी प्राप्त होताच चार पावलं पुढं टाकण्यासाठीची तयारी करणं, चूक झाल्याचं लक्षात येताच पटकन क्षमा मागून रिकामं होणं, अगर समोरच्याबद्दल काही मनात न ठेवता पटकन त्यालाही माफ करून टाकणं, हे स्वभावविशेष दिसतातच, पण या बाबींचं आयुष्याच्या वाटचालीतलं मोलही अधोरेखित करतात. राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर प्रांतवाद, वंशभेद, वर्णभेद या साऱ्या बाबींचा सामना करावयास लागूनही जगन्मैत्री प्रस्थापित करण्यात त्यांनी मिळविलेलं यश वादातीत आहे.

आजकाल तरुणांची नोकरी, व्यवसाय, रोजगारासाठी आपले सुरक्षा क्षेत्र सोडण्याची तयारी नसते. विशेषतः महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील सधन, संपन्न परिसरातील युवकांच्या बाबतीत तर ही बाब प्रकर्षानं जाणवते. देश-विदेशात फिरताना डॉ. पाटील यांनी देशाच्या इतर प्रांतांतील युवकांमध्ये आपले घर, कुटुंब, जिल्हा, राज्य इतकेच नव्हे तर विदेशांतही करिअरसाठी जाण्याची मानसिक तयारी दिसते. महाराष्ट्रीय युवक-युवतींमध्ये क्षमता असूनही भाषाविषयक तसेच अन्य क्षमतांबद्दल न्यूनगंडाची भावना अधिक डोकावते. सर्वप्रथम ते मनातच पराभव स्वीकारून मोकळे होतात. परिस्थितीला भिडण्यासाठी तयार होत नाहीत. यातून बाहेर पडण्याची गरज डॉ. पाटील स्वानुभवातून व्यक्त करतात.

नॅक, एपीक्यूएन, इन्क्वाहे यांसह जगभरातल्या अनेक शैक्षणिक गुणवत्ता निर्धारण क्षेत्रांत कार्यरत संघटनांमध्ये अध्यक्षपदासह विविध पदे भूषविल्यानंतर आणि सुमारे साठहून अधिक देशांचा दौरा केल्यानंतरही त्या त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण-परिसरातही आपल्या परिचयाच्या खुणा शोधण्याचा डॉ. पाटील यांचा गुणविशेषही फार प्रकर्षानं जाणवत राहतो. लंडनचा ट्रायफलगर स्क्वेअर पाहताना त्यांना बिंदू चौक आठवतो. बार्सिलोनाच्या जगप्रसिद्ध ला-रांबला रोडवर फिरताना महाद्वार रोड आठवतो. जगभरातले महाकाय तलाव पाहताना मनात रंकाळा तरळतो. लंडन ब्रिज पाहताना पंचगंगेवरचा शिवाजी पूल, सिडनी हार्बर पाहताना गेटवे ऑफ इंडिया तर पॅरिसमधला श्वांझेनिझे चौक आणि भव्य रस्ता पाहताना राजपथ आठवतो. इंग्लंडमधील विविध पॅलेस, भव्य राजवाडे पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा खजिना त्यांना आठवतो आणि त्यांना वेदना होतात. विदेशाला आपल्या समृद्ध वारशांचे महत्त्व कळले आहे, मात्र आपण त्या बाबतीत जागे कधी होणार, ही दुरवस्था दूर होऊन या साऱ्या वारशाला उर्जितावस्था कधी येणार, असा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत राहतो. त्यांची ही संवेदनशील सजगताही आपल्याला हलवून जागे करते.

भारतीय शिक्षण व्यवस्थेबद्दलचं चिंतन हा स्वाभाविकपणे या कथानाचा एक महत्त्वाचा गाभा आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांना प्राप्त झालेलं विदारक व्यावसायिक स्वरुप आणि त्यांचं झालेलं बाजारीकरण, त्यातून विकसित झालेली खाजगी शिकवण्यांची मक्तेदारी आणि तिनं विद्यार्थी-पालकांसह शिक्षण व्यवस्थेभोवती आवळलेला पाश याबद्दल तर ते सचिंत खंत व्यक्त करतातच. पण, भारतातील आजच्या आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक या सर्व समस्यांचे मूळ म्हणजे शैक्षणिक कुपोषण असे एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण ते नोंदवितात. किंबहुना, त्यापुढे जाऊन दारिद्र्य, बेरोजगारी, नैतिक अधःपतन अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी हेच कारण असल्याचा दावाही करतात. ही थिअरी ऑफ एज्युकेशनल मालन्युट्रिशन हे या पुस्तकाचे फलित आहे, असे मला वाटते. कारण हा धागा आपल्याला थेट महात्मा फुले यांच्यापर्यंत मागे घेऊन जातो आणि पुन्हा नव्याने आपण शिक्षणाच्या बाबतीत मिळवलं काय अन् गमावलं काय, याविषयी नव्यानं विचारप्रवण करतो. हे कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची मांडणीही डॉ. पाटील इथे करतात. सध्याची शिक्षककेंद्री, संस्थाकेंद्री शिक्षणव्यवस्था बदलून पूर्णपणे विद्यार्थीकेंद्री आणि देशकेंद्रित शिक्षणव्यवस्था आणावी लागेल, असे सांगतानाच त्यासाठी स्वतःची प्रतिबद्धताही ते व्यक्त करतात.

केवळ समस्या मांडणं हे कोणाही प्रभावी संवादकाचं काम असत नाही, तर त्यावरील उपायांचं सूचन करणं, हे त्या संवादाला पूर्णत्व देत असतं. त्यामुळं डॉ. पाटील यांनी युवक-युवतींना एक जगभरारीचं, यशस्वितेचं टूलकीटही दिलेलं आहे. त्यांच्या भात्यात जागेपणी पाहावयाची स्वप्नं, उत्तम आणि दर्जेदार वाचन, संवाद कौशल्याचं परिश्रमपूर्वक विकसन, भाषाप्रभुत्व आणि कृतज्ञता, समर्पण, त्याग, निसर्गप्रेम इत्यादी मूल्यांची जोपासना अशी पंचसूत्री ते देतात. हे सारं काही लेखकाच्या स्वानुभवातून आल्यामुळं त्याचं मोल मोठं आहे. चहुबाजूंनी नैराश्यानं ग्रासलेल्या परिस्थितीत आजच्या युवकाला त्याच्या भाषेत, त्याच्या शैलीत काहीएक सांगण्याचा डॉ. पाटील यांची ही स्वप्नगाथा अपेक्षेपलिकडे यशस्वी झाली आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणं- हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है..। असे अनेकानेक ट्रेलर त्यांच्या हातून निर्माण व्हावेत आणि अंतिमतः गुणवत्तापूर्ण शिक्षणाधिष्ठित भारताचं भव्यदिव्य पिक्चर साकार व्हावं, ही अपेक्षा!


शनिवार, २६ जून, २०२१

शाहू महाराजांच्या धोरणांचे जागतिक लोकशाही मूल्यांशी नाते: डॉ. सुधीर गव्हाणे

 

डॉ. सुधीर गव्हाणे

डॉ. सुधीर गव्हाणे


कोल्हापूर, दि. २६ जून: राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या छोट्याशा करवीर संस्थानामध्ये राबविलेली धोरणे ही लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणारी होती, जागतिक मूल्यांशी नाते सांगणारी होती, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ या विशेषणाला पात्र होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे (औरंगाबाद) यांनी आज येथे केले.

येथील डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू महाराज: सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभया विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. गव्हाणे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे असे समाजपुरूष होते, ज्यांनी सत्तेलाच परिवर्तनाचे साधन बनविले. त्याचे पडसाद पुढे वर्षानुवर्षे उमटत राहिलेले आपल्याला दिसतात. शाहू महाराजांनी सामाजिक स्वातंत्र्यासाठीचे जे कार्य उभे केले, त्या कार्याला राजकीय स्वातंत्र्य चळवळीपासून वेगळे काढता येणार नाही. किंबहुना, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, र.धों. कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी प्रभृतींनी जे सामाजिक चळवळीचे कार्य केले, ते राजकीय चळवळीइतकेच महत्त्वाचे आणि पूरक होते. सामाजिक स्वातंत्र्याखेरीज हाती आलेल्या राजकीय स्वातंत्र्याला काडीचाही अर्थ उरला नसता, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.

डॉ. गव्हाणे पुढे म्हणाले, राजकीय लोकशाहीइतकेच महत्त्व सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी प्रकारच्या लोकशाहीलाही आहे. वंचितांना हक्क, अधिकार, न्याय प्रदान करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. या लोकशाहीमध्ये परस्परविरोधी विचारांचा आदर आहे, वैविध्यपूर्ण संस्कृतींचा सन्मान आहे. बहुविध संस्कृती हे लोकशाहीचे महत्त्वाचे लक्षण आहे. अशा लोकशाहीचा विकास आपल्या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केला. त्याचप्रमाणे जेथे जेथे अशा प्रकारचे कार्य चालू होते, त्या कार्यामध्ये आपल्या परीने सहभाग, पाठिंबा दिला. बहुजनांच्या कल्याणासाठी त्यांनी अथक लढा दिला. धाडसी वृत्तीबरोबरच अजस्त्र बुद्धिमत्ता त्यांच्या ठायी होती. तिचा उपयोग त्यांनी बहुजनांचे समाजकारण सक्षम करण्यासाठी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच त्यांचा सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभअशा शब्दांत सार्थ गौरव केला.

शाहू महाराजांच्या नावे राज्यात एकही विद्यापीठ नाही, याची खंत

मायावती यांच्या राजकारणाबद्दल दुमत असू शकेल, मात्र त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या नावे विद्यापीठ स्थापन केले. शाहू महाराजांच्या नावाचा जिल्हा स्थापन केला. महाराष्ट्रात मात्र शाहू महाराजांच्या नावे एकही विद्यापीठ नाही, याची खंत डॉ. सुधीर गव्हाणे यांनी या प्रसंगी व्यक्त केली.