रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद, तिचा शतकमहोत्सव आणि त्या निमित्तानं आलेली पुस्तकं...


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने माणगाव येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृतांच्या पहिल्या परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व उदयास आले. भारताच्या सामाजिक इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या घटनेला शंभर वर्षे यंदा पूर्ण झाली. या शतक महोत्सवावर कोरोनाचे सावट पडल्याने त्याच्या उत्सवीकरणावर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उत्साहाला मर्यादा पडल्या असल्या तरी डॉक्युमेंटेशनच्या अंगाने या वर्षभरात काही महत्त्वाचे कार्य झाले आहे. परिषदेला साठ वर्षे झाली, त्यावेळी म्हणजे सन १९८२मध्ये विशेष स्मरणिका काढण्यात आली, मात्र तिच्या मर्यादा आता पाहताना लक्षात येतात. त्या तुलनेत संपादक सन्मित्र अर्जुन देसाई, प्रा. गिरीष मोरे आदींनी माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने हाती घेतलेला तथ्यसंकलनाचा आणि इतिहासाचा वर्तमानाच्या अनुषंगाने वेध घेण्याचा प्रयत्न असणारा स्मारकग्रंथ हा अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. हे संपादनाचे काम प्रा. मोरे सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फार जीव लावून केले आहे. तो ग्रंथ पाहण्याची उत्सुकता खूप आहे.

दरम्यानच्या काळात या वर्षभरात काही महत्त्वाची पुस्तके माणगाव परिषदेच्या संदर्भाने वाचकांच्या भेटीला आलेली आहेत, त्यांची दखल घेणे आवश्यक वाटते. या मालिकेतील सर्वाधिक वेधक पुस्तक ठरले आहे, ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार-संपादक आयु. उत्तम कांबळे यांचे अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद होय. लोकवाङ्मय गृहाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात कांबळे सरांनी १८२० ते १९२० या शंभर वर्षांतील माणगाव परिषदेच्या पूर्वपिठिकेचा समग्र वेध घेतला आहे. कोणतीही क्रांतीकारी घटना किंवा एखाद्या क्रांतीकारकाचा, महापुरूषाचा जन्म ही काही आकस्मिक गोष्ट नसते, तर ते तत्कालीन समाजाचं, परिस्थितीचं अपत्य असतं. अशा घटनांच्या प्रसववेदना अनेक दिवस सुरू असतात. माणगाव परिषदेच्या जन्मकळाही शंभर वर्षं अगोदर अस्वस्थ शतकाच्या पोटात सुरू होत्या. बाबासाहेब काय, महाराज काय किंवा त्यांचे महागुरू महात्मा फुले काय, ही सारी त्या अस्वस्थ शतकाची, परिस्थितीची बंडखोर लेकरं आहेत. वैश्विक हालचालींशी त्यांनी नातं जोडलेलं आहे किंवा ते ओघानंच तयार झालेलं आहे. माणगाव परिषदेच्या शंभर वर्षं आधी म्हणजे १८२० म्हणजेच एकोणिसाव्या शतकापासून जग अधिक अस्वस्थ झालेलं आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ही अस्वस्थता दिसते. जगभर तिचे पडसाद उमटले. मानवमुक्ती, धर्मसुधारणा, समाज सुधारणा या क्षेत्रात तर या अस्वस्थतेची धग जास्तच पसरत होती. माणगाव परिषद हा त्या जगभरच्या अस्वस्थतेचा एक परिपाक आहे. पुढं येणाऱ्या भावी चळवळीसाठी, लढायांसाठी एक विषयपत्रिका आहे. आम्ही येतोय, आम्ही जागे होतोय, आम्ही लढतोय, असं निर्धारपूर्वक सांगणं आहे. व्यवस्थेला इशारा आणि हादरा आहे. धगधगते क्रांतीकारी विचार मुठीत घेऊन मुक्तीच्या प्रवासाकडे पाऊल टाकणं आहे. विचारांच्या जोरावर घडवून आणलेलं एक नवं युग होतं. आपण त्यास फुले, शाहू, आंबेडकरांचे युग म्हणतो. या पार्श्वभूमीवर झालेली माणगाव परिषद म्हणजे केवळ बहिष्कृतांचे एकत्रित येणं अगर शक्तीप्रदर्शन नव्हतं, तर तो एका मोठ्या परिवर्तनाचा प्रारंभ होता. या समग्र परिवर्तनाचा कॅनव्हास उत्तम कांबळे सरांनी या सुमारे २५० पानांच्या पुस्तकामध्ये चितारला आहे. मूलतत्त्ववाद हातपाय पसरत असल्याच्या काळात, प्रतिक्रांती उचल खात असल्याच्या काळात लिहीलेल्या या ग्रंथाद्वारे ज्यांच्या डोळ्यांवर जातींचे, गटांचे मोतीबिंदू वाढत आहेत, ते हलावेत, ही अपेक्षा कांबळे सरांनी व्यक्त केली आहे. माणगाव परिषद हा केवळ एक इव्हेंट नव्हता, तर शंभर वर्षांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि एका नव्या परिवर्तन पर्वाची सुरवात होती. हा सारा गाभा समजून घेण्यासाठी अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद वाचणे अगत्याचे ठरते.

मालिकेतील दुसरे पुस्तक म्हणजे डॉ. संभाजी बिरांजे संपादित छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र पत्रव्यवहार हे होय. मुंबईच्या राजरत्न ठोसर यांच्या विनिमय पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या अत्यंत मनोवेधक पुस्तकाची पहिली आवृत्ती अल्पावधीत संपली असून लवकरच याची दुसरी आवृत्ती वाचकांच्या भेटीसाठी येत आहे, यावरुनच या पुस्तकाने वाचकांना किती प्रभावित केले आहे, ते लक्षात येते. या पुस्तकाच्या आधी ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, सन्मित्र इंद्रजीत सावंत यांनी शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्या दरम्यानचा काही पत्रव्यवहार प्रकाशित केला. शाहूंचे समग्र वाङ्मय, गौरव ग्रंथ आणि पंचखंडात्मक चरित्र आदींमध्ये ती प्रकाशितही झाली आहेत. त्यापुढे जाऊन चिकित्सक संशोधकीय दृष्टीने डॉ. बिरांजे यांनी या संग्रहावर काम केले आहे. ज्येष्ठ आंबेडकरी अभ्यासक डॉ. विजय सुरवाडे यांच्या अत्यंत चिकित्सक नजरेखालून हे पुस्तक गेले आहेच, शिवाय, त्यांच्या व्यक्तीगत संग्रहातील आठ-नऊ पत्रे त्यांनी स्वतःहून यात समाविष्ट केली, ही मोठीच उपलब्धी आहे. महाराज आणि बाबासाहेब यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहवासाचा कालावधी अवघा अडीच ते तीन वर्षांइतका. मात्र, इतक्या अल्पावधीत सुद्धा त्यांच्यामध्ये जे सामाजिक सहोदराचे नातेसंबंध प्रस्थापित झाले, त्याने या देशाचा अवघा सामाजिक इतिहासाचा अवकाश व्यापला आहे. त्यांच्या पत्रव्यवहारामधून सामाजिक-राजकीय डिप्लोमसीचे, मैत्रीचे, एकमेकांप्रती आदरभावाचे, स्नेहाचे जे मनोज्ञ दर्शन घडते, ते अत्यंत अल्हाददायक आहे. या पत्रव्यवहाराव्यतिरिक्तही महाराज आणि बाबासाहेबांच्या तत्कालीन पूरक अशा अन्य पत्रव्यवहाराचाही यात परिशिष्टाद्वारे समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याची पार्श्वभूमी व पृष्ठभूमी यांचेही ज्ञान वाचकाला होते. त्याशिवाय, डॉ. बिरांजे यांनी संशोधक-अभ्यासकांसाठी अनेक संदर्भांची माहिती दिलेली आहे, ती वेगळीच. अत्यंत उत्तम संदर्भमूल्य असलेला हा समग्र पत्रव्यवहार वाचनीय, रंजक तर आहेच, पण त्याचे संग्रह्यमूल्यही वादातीत आहे.

तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते असलेले सन्मित्र सिद्धार्थ कांबळे यांची माणगाव परिषदेची शंभरी आणि आजचं सामाजिक वास्तव ही छोटेखानी पुस्तिका इतिहासाच्या खिडकीतून वर्तमानाचा वेध घेणारी आहे. वर्तमान सामाजिक परिस्थितीचे सजग भान देण्याचा प्रयत्न त्यात डोकावतो. ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांची प्रस्तावना लाभल्याने या पुस्तिकेचे मूल्य अधिकच वाढले आहे. जात्यंध व धर्मांध प्रवृत्तीचे वाढते प्राबल्य, समाजमानसातील वाढते अस्मिताकरण, ध्रुवीकरण आणि त्यातून समाजातील विविध घटकांमध्ये जाणीवपूर्वक दरी वाढविण्याचे सुरू असणारे प्रयत्न हाणून पाडण्याची गरज सिद्धार्थ व्यक्त करतात. महाराष्ट्र हा इतर कोणाचा नव्हे, तर फुले, शाहू, आंबेडकरांचा म्हणूनच ओळखला जातो. त्यांना अभिप्रेत असणारा जातिविहीन, अत्याचारविहीन, अंधश्रद्धाविहीन , द्वेषविहीन आणि प्रज्ञानी महाराष्ट्र घडविण्यासाठी मराठा, बौद्धांसह मुस्लीम, ख्रिश्चन, भटके-विमुक्त, आदिवासी, बौद्धेतर दलित, ओबीसी या सर्व समाजघटकांतील तरुण-तरूणींनी जाती-धर्मादी अस्मिता बाजूला ठेवून एकजूट होण्याची गरज अत्यंत कळकळीने त्यांनी यात व्यक्त केली आहे. तसे झाले नाही, तर धर्मांध शक्तींच्या हाती आपण स्वतःहून कोलीत दिल्यासारखेच आहे, याची जाणीव त्यांनी पानोपानी करून दिली आहे. माणगाव परिषदेची क्रांती तर खरीच, पण तिने दिलेला जातीय, धार्मिक सलोख्याचा संदेशही तितकाच महत्त्वाचा. ही जाणीव करून देण्याचे काम ही पुस्तिका करते.

माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित झालेली ही सर्व पुस्तके शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक सौहार्दाची महतीच नव्याने अधोरेखित करतात. माणगाव परिषदेच्या शंभरीनिमित्त पुढील शंभर वर्षांच्या प्रगतीचा आलेख मांडण्याऐवजी अद्यापही आपल्याला जातिनिर्मूलनासाठीचाच झगडा मांडावा लागतो आहे. जात्यंध शक्तींच्या विरोधातच ऊर्जा खर्च करावी लागते आहे. प्रतिगामी प्रवृत्तींना लगाम घालण्याऐवजी त्यांचे समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हे सारे आपल्या सामाजिक अधोगतीचे दर्शन घडविणारे आहे. या पार्श्वभूमीवर, ही पुस्तके पुनश्च एकदा आपल्याला आपल्या सच्च्या विचारधारेची आठवण करून देतात. आपले मार्गनिर्धारण करतात. अंधाराचे यात्रेकरू न होता आपण प्रकाशाच्या दिशेने चालत राहावयाचे आहे, हे पुनःपुन्हा सांगत राहतात. 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा