(माझा अत्यंत लाडका आणि टेक्नोसॅव्ही विद्यार्थीमित्र दिनेश कुडचे याने 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकाविषयीची पहिली प्रतिक्रिया फेसबुकवर शेअर केली आहे. ती इथे माझ्या वाचकांसाठी साभार...)
माणूस समाजशील प्राणी आहे. जगण्यासाठीच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी त्याला संवादाची आवश्यकता आहे आणि त्या नंतरही संपर्कासाठी, तसेच मनोरंजनासाठीही..! याकरता आवाज, खाणाखुणा, चित्रं ही माध्यमं. गेल्या हजारो वर्षात या माध्यमांत प्रगती होत गेली. या बदलांचा वेग छपाईच्या शोधानंतर वाढला. पुस्तके, वृत्तपत्रे, तारा यंत्र, रेडिओ, टेलिफोन, टेलिव्हिजन, संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन..... आणि मग २ जी, ३ जी, ४ जी, ५ जी अशी संपर्क क्रांती..! यातून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत ऑर्कुट, फेसबुक पासून ट्विटर, लिंक्डइन, इंस्टाग्राम, इत्यादी अनेक माध्यमे उदयाला आली, रुजली, फोफावली.
या अतिवेगवान माध्यमांचा, त्यांच्या अतिरेकाचा समाजावर, विशेषतः १५ ते ४० वयोगटातील तरुणाईवर विपरित परिणाम दिसू लागला आहे आणि म्हणून संपूर्ण समाजाला सावध करण्याच्या कळकळीतून एक लेखमाला डॉ. आलोककुमार नीलकुमार जत्राटकर यांच्या लेखणीतून साकारली. तिचे 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तकरुप. लेखक रसायनशास्त्र, संगणक आणि पत्रकारिता अशा वेगवेगळ्या विद्याशाखांतील पदवीधर. अनुभव आणि सखोल अभ्यास त्यांच्या लिखाणात ठायी ठायी जाणवतो. माध्यमांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम त्यांच्या चिंतनाचे विषय.
नवतंत्रज्ञानयुक्त, सशक्त अभिव्यक्तीची क्षमता असणाऱ्या मल्टीमिडियात लोकांचे भरकटणे आणि संकुचित स्वार्थासाठी पद्धतशीरपणे त्यांचा गैरवापर केला जाणे; त्यांनी अचूक हेरले आहे.
माध्यमप्रेरित सामाजिक - सांस्कृतिक साम्राज्यवाद, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, भेदांचे नव्याने बळकटीकरण, संविधानिक आणि मानवी मूल्यांची पायमल्ली, इत्यादी गोष्टी खरोखरच चिंताजनक आहेत. या सर्वांकडे सोदाहरण, आकडेवारी देत त्यांनी लक्ष वेधले आहे. त्या बरोबरच वैयक्तिक, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून आणि ग्लोबल कम्युनिटीसाठी माध्यमांचा सकारात्मक वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन त्यांनी केले आहे.
प्रत्येक लेखाचे समर्पक शीर्षक वाचकांना आकर्षित करेल.
१९८० मधील भारताच्या ८० कोटी लोकसंख्येत फक्त २५ लाख लोकांकडे फोन होते आणि केवळ १२००० सार्वजनिक फोन होते. ९७ टक्के गावांनी फोन पाहिलाच नव्हता. तिथून आजच्या १४५ कोटी लोकसंख्येतील ८७% टेलिडेन्सिटी, जगात दुसऱ्या क्रमांकाचे वायरलेस नेटवर्क इथपर्यंतची टेली-कॉम्प्युटर क्रांती पहिल्या लेखात आहे.
गटेनबर्गच्या छपाई यंत्रापासून आजच्या टिकटॉक, स्नॅप चॅट, वॉट्सॲप पर्यंतचं विश्वव्यापी माध्यमांतराचा आढावा दुसऱ्या लेखात घेतला आहे. भारताचे आजचे सरासरी वय २९ वर्षे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा सोशल मीडियात वापर, अभिव्यक्ती, प्रतिसाद, सोशल नेटवर्किंग साइटवर, ब्लॉग्स, मिडिया शेअरिंग, व्हॉईस ओव्हर आय पी, डॉक्युमेंट शेअरिंग, इत्यादी प्रकारचा असतो. या सर्वांचा विधायक उपयोग, तसेच विघातक पेरणी उदाहरणे देऊन समजावले आहे.
पुढील लेखांमध्ये फेसबुक, गुगल, त्यांची वाढ, तंत्रज्ञान प्रगती, मर्जर-ॲक्विझिशन्स, स्पर्धक उभा राहू न देण्याची प्रवृत्ती, इत्यादी आकडेवारीसह थोडक्यात सांगितले आहे.
पारंपरिक शिक्षणाला पूरक, त्याचवेळी छेद देणारे वाय फाय, स्मार्ट, ऑनलाईन शिक्षण, व्हर्चुअल क्लासरुम, डिजिटायझेशन, संशोधन क्रांती अशा बदलांचे विवेचन पुढे येते.
ऑनलाईन रिटेल क्षेत्रात प्रचंड प्रमाणात आलेले परकीय भांडवल, त्यामुळे कोलमडणारे भारतीय व्यवसाय, बचतीची सवय मोडणारे आक्रमक मार्केटिंग या माहितीकडे फार डोळसपणे बघायला हवे.
नोआम चॉम्स्की यांनी माध्यमांचे वर्तन नियंत्रित करणारी पंचसूत्री सांगितली आहे. माध्यमांची मालकी आणि नफेबाजी, जाहिरातींचा महसूल, अधिकृत स्रोतांशी हितसंबंध, व्यवस्थेतील उच्चपदस्थांशी संघर्ष आणि कृत्रिम भयनिर्मिती! या आधारे हल्लीची नवमाध्यमे, अर्धसत्य व असत्य मिसळून केला जाणारा प्रचार, ट्रोलिंग,... या सगळ्यांनी अपरिपक्व नवमतदारांना भ्रमित करणारे सोशल मिडियातील संकुचित राजकारण, मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन देशासाठी कसे खतरनाक आहे याचे प्रत्ययकारी विश्लेषण.
बदलते मनोरंजन क्षेत्र, ओटीटी, वेबसिरीज, त्यातील आक्रमक भाषा, अश्लीलता, हिंसा आणि त्यातच तरुण पिढीला अडकवून ठेवणे हे फारच भीषण वर्तमान पुढील लेखात मांडले आहे. पोर्नग्रस्त पिढी विशेषतः पौगंड, पोर्नबंदीचे वास्तव त्याच अनुषंगाने येते. तितकाच काळजी करायला लावणारा गेमिंग हा प्रकार. साध्या मनोरंजक टाईमपास पासून आताच्या ॲंग्री बर्ड, पबजी, पोकेमॉन, ब्ल्यू व्हेल, इत्यादी व्यसन लावणाऱ्या खेळांविषयीचा दीर्घ चिंतनात्मक लेख प्रभावी आहे.
याच संदर्भात हल्ली वाढू लागलेला लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार, त्याची कारणे, काही उदाहरणे, कायदे, गुंतागुंत, इ., लाईफस्टाईल, स्वकेंद्रित मानसिकता, करिअर निमित्ताने महानगरांकडे वाढलेला ओढा, हा पण मोठा विषय मर्यादितपणे हाताळला आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या संबंधित कायदे, काही उदाहरणे, वापरकर्त्यांची जबाबदारी, यावरील लेख सुद्धा वाचकांना सावध करणारा.
समारोपाचा लेख जागतिकीकरण, प्रसारमाध्यमे आणि कुटुंबव्यवस्था हा प्रत्येकानेच सदोदित सतर्क का राहावे लागणार आहे ते प्रभावीपणे मनावर बिंबवतो. मूठभर जागतिक कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी भारताला केवळ बाजारपेठ म्हणून वापरत आहेत. मोबाईल मार्फत बालपण हिरावले जात आहे. तरुणाईचा सारासार विवेक नष्ट केला जातो आहे. त्यांना जंकफूड, ड्रग्ज, अल्कोहोल, इत्यादी घातक गोष्टीत अडकवले जाते आहे. या सर्वांतून सामाजिक - आर्थिक दरी वाढत आहे. थेट संवाद संपत चालला आहे. आणि या सर्व नकारात्मक घडामोडी थोपवण्याचे सामर्थ्य आपल्या कुटुंबव्यवस्थेत आहे हा मोठा दिलासा. ती जपायलाच पाहिजे हा आग्रह.
या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य डॉ. राजन गवस यांची विचारगर्भ, विस्तृत प्रस्तावना आणि भावनिक अर्पणपत्रिका!
या समाजभान बाळगणाऱ्या व्यासंगी लेखकाचे, योग्य संदर्भ व तपशील देत केलेले पूर्वग्रहरहित, अभ्यासू तरीही सहजसुलभ भाषेतील हे लिखाण सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात पोहोचायलाच हवे. फारच गरजेचे आहे!
*समाज आणि माध्यमं*
लेखक : श्री. आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
प्रकाशक : अक्षर दालन, कोल्हापूर.
प्रस्तावना : डॉ. राजन गवस
प्रथम आवृत्ती : १७ जून २०२५
पृष्ठ संख्या : १८४
मूल्य : ३०० रु.
दिनेश कुडचे, सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा