मित्र-मैत्रिणींनो, काल, शनिवारी (दि. ५ जुलै) माझ्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ (भाग्यश्री प्रकाशन) या मुक्तचिंतनपर ललित लेख संग्रहाचे आणि ‘समाज आणि माध्यमं’ (अक्षर दालन) या माध्यमविषयक पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. रघुनाथ कडाकणे यांचे दोन्ही पुस्तकांवर सविस्तर प्रसंगोचित भाष्य झाले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनीही ‘समाज, माध्यमं आणि संविधानिक मूल्ये’ या विषयावर उपस्थितांना प्रबोधित केले. त्याविषयी सविस्तर पोस्ट स्वतंत्रपणे दिलेली आहेच. पण ही पोस्ट करण्याचे कारण म्हणजे या कार्यक्रमास लाभलेला प्रचंड प्रतिसाद.
खरे तर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम करायचा म्हणजे लेखक-प्रकाशकांची छाती दडपते, ती अशासाठी की, कार्यक्रम तर करू, पण लोक येतील काय? स्वाभाविकपणे हाच प्रश्न माझ्यासह भाग्यश्री कासोटे-पाटील आणि अमेय जोशी यांच्यासमोरही होता. तशातच या दिवशी हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिलेला. म्हणजे आमच्या हृदयात ही सुद्धा भीतीची घंटा वाजली होतीच. त्यामुळे ऑन दि व्हेरी सेफर साईड आम्ही राजर्षी शाहू स्मारक भवनमधील मिनी हॉल कार्यक्रमासाठी बुक केला. मिनी म्हटला तरी १२५ ते १५० क्षमता आहेच याची. हा निम्मा भरला तरी कार्यक्रम यशस्वी, असा आमचा ‘धोरणी’ हेतू होता. मात्र, कार्यक्रमाला शिक्षण, साहित्यासह विविध क्षेत्रांतील जाणकार नागरिक, मान्यवरांची इतकी मांदियाळी जमली की, कार्यक्रम सुरू होता होता हॉल पुरेपूर भरला. आणि सुरू झाल्यानंतरही पुन्हा पन्नासेक खुर्च्या वाढवून लोकांना बसण्याची सोय करावी लागली. हे आमच्यासमोरचे दृश्य होते. पण, बंधू अनुप, डॉ. विनोद यांच्यासह आमचा बराचसा मित्र परिवार अभ्यागतांना सभागृहात जागा देऊन बाहेर थांबला होता. त्यांनी सांगितले की, जवळजवळ दोनशेभर लोक सभास्थानी आले, मात्र, त्यांना केवळ जागेअभावी परत जावे लागले. हा प्रसंग फारच विरळा होता. अनुप यांच्या ‘दि प्रॉमिस’ या लघुपटाचा प्रिमिअर शो येथील मोठ्या हॉलमध्ये आम्ही केला होता, तेव्हा पाय ठेवायलाही जागा नव्हती, इतकी दर्शकांची गर्दी होती. त्या अनुभवाची पुनरावृत्ती करणारा हा प्रसंग ठरला. आज आपण सर्वांनी जे प्रेम दर्शवलं, त्यानं एकीकडं हृदय भरून आलं, मनी कृतज्ञता दाटून आली, तर दुसरीकडं अनेक श्रोत्यांना जागेअभावी परत जावं लागलं, याचा विषादही वाटला. त्यामुळं एकाच वेळी जाहीर कृतज्ञता व्यक्त करत असतानाच दिलगिरी सुद्धा व्यक्त करणे मला उचित वाटते. आपण मोठ्या मनाने तिचा स्वीकार कराल, याची खात्री वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा