(बंधूवर्य डॉ. विनोद कांबळे यांनी शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' आणि 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने कर्टन रेझर लेख लिहीला आहे. तो येथे शेअर करीत आहे. या लेखातीलच संपादित अंश दि. १३ जुलै रोजी 'दै. लोकमत'मध्ये 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकाच्या परिचयात्मक स्वरुपात प्रकाशित झाला आहे. त्याचेही कात्रण येथे देत आहे.)
![]() |
(छाया. डॉ. विनोद कांबळे) |
(व्हिडिओ संकल्पना व चित्रीकरण- डॉ. विनोद कांबळे)
डॉ. आलोक जत्राटकर यांचे हार्दिक अभिनंदन!
सन्मित्र बंधू डॉ. आलोक जत्राटकर यांचा 'ब्लॅक व्हाईट अन ग्रे ' हा मुक्तचिंतनपर लेखसंग्रह, 'समाज आणि माध्यमं' या दोन ग्रंथांचे प्रकाशन आज शाहू स्मारक भवन,दसरा चौक,कोल्हापूर या ठिकाणी सायंकाळी ६. ००वा. होत आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
डॉ.आलोक जत्राटकर यांची ओळख पत्रकार,लेखक,संवादक वक्ते आणि ब्लॉग लेखक म्हणून आहे. गेली जवळपास २५ वर्षे ते पत्रकारिता,प्रशासन आणि जनसंपर्क क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सध्या ते शिवाजी विद्यापीठाचे 'जनसंपर्क अधिकारी' म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांचे 'आलोकशाही'हे युट्युब चॅनेल देखील आहे.या अगोदर त्यांचा ' निखळ: जागर संवेदनांचा' हा ललित लेखसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथाच्या दोन आवृत्ती संपलेल्या असून त्याला विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
'ब्लॅक व्हाईट अन ग्रे ' हा ग्रंथ म्हणजे, दै. नवशक्ती मध्ये 'नितळ' या सदरामध्ये लिहिलेले प्रस्तुतचे लेख आहेत. या ग्रंथाचे मुखपृष्ठ गौरीश सोनार यांनी अत्यंत सुबक असे केलेले आहे. भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. स्मृतीशेष ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके सर यांना पुस्तक अर्पण केलेले आहे.मराठीतील आघाडीचे समीक्षक डॉ. रणधीर शिंदे सर यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचताना डॉ. जत्राटकर यांचे आणि त्यांचे ऋणानुबंध लक्षात तर येतातच पण ललित लेखसंग्रहाबद्दलची शिंदे सरांची प्रस्तावना वाचताना या संग्रहाकडे कसे पहावे ही एक दृष्टी देखील तयार होते.म्हणजे, "डॉ. जत्राटकर यांच्या लेखनाचा विशेष म्हणजे,या सर्व लेखनामागे संविधानाची चौकट आहे.तो त्यांचा दर्शनबिंदू आहे. न्याय, स्वातंत्र्य,समता,बंधुभावाची मागणी करणारे हे लेखन आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारदृष्टीची छाया त्यांच्या लेखनावर आहे. माणूसपण अबाधित राहावे,अशी दृष्टी त्यामागे आहे ".( प्रस्तावनेमधून)
१२६ पानांच्या या ग्रंथामध्ये तीस लेख आहेत. प्रत्येक लेखाचे शीर्षक इतके अप्रतिम दिलेले आहे की, त्यामुळे प्रत्येक लेख वाचण्याचा मोह आवरत नाही. म्हणजे मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है, एक चेहरे पे कई चेहरे, कुछ तो लोग कहेंगे, अजीब दास्ता है ये, शहर मे शायद दंगा होनेवाला है! अशा शीर्षकांमधून गाणी आणि शायरी यांचा वापर केल्यामुळे तितकीच नितळता या लेखांमध्ये आहे.
सीमाप्रदेशातील मराठी भाषा जपणाऱ्या निपाणी या गावाबद्दलची त्यांची ओढ, गावातील लोकांची आत्मीयता, गाव सोडताना मनाची झालेली भावावस्था याबरोबरच हा लेख वाचल्यावर बऱ्यापैकी निपाणी या गावचा परिचय होतो. आई माझा गुरु या लेखामध्ये आईंनी लहानपणापासून दिलेली शिकवण, वक्तृत्व स्पर्धेत आणि एकूणच जगण्यामध्ये मिळालेली प्रेरणा याबद्दल आई बद्दलची आत्मीयता या लेखात आलेली आहे. विवेकानंदाच्या सानिध्यात, शिवरायांचे शिल्प, ब्लॅक व्हाईट अन ग्रे, अजीर्ण :खाण आणि जगण्याचं, तू तू तुम आणि आप, डि-कास्ट व्हावं कसं, दुःखनिवृती, नामांतर सत्याग्रहातील सात भारतीय, पणती तेवत आहे, सेल्फ अप्रायझल या सर्व लेखांमधून एक स्वतंत्र भूमिका डॉ. जत्राटकर यांची दिसून येते.
आंबेडकरी विचार आत्मसात केल्यामुळे स्वतःला आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला उत्स्फूर्तपणे बदलवण्याची प्रतिक्रिया या संग्रहातील लेखांमध्ये असल्याचे जाणवते. त्यामुळे सगळीकडे काळाकुट्ट अंधार(ब्लॅक) दाटून आलेला असताना, माणुसकीचा उजेड ( व्हाईट ) देत 'ग्रे'म्हणजे समतोल, स्थिरता आणि परिपक्वता असणारा हा ग्रंथ आहे.
डॉ. जत्राटकर यांचा ' समाज आणि माध्यमं ' हा दुसरा ग्रंथ अक्षरदालन प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केला असून याला ख्यातनाम साहित्यिक डॉ. राजन गवस सर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या ग्रंथामध्ये एकूण २५ लेख आहेत. माध्यमं आणि समाज याविषयीचे विचार या ग्रंथातून प्रस्तुत झाले आहेत. विविध आशय सूत्रांची मांडणी असलेल्या सोशल मीडियावरील फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर माध्यमांनी नातेसंबंधांमध्ये अनेक प्रश्न कसे निर्माण केलेले आहेत. याचा परिणाम नात्यांवरती कसा झालेला आहे. आज घडत असलेल्या गुन्ह्यामध्ये सोशल माध्यमांचा वापर कसा होत आहे.या माध्यमांचा चांगला वापर होण्याऐवजी गैरवापर कसा केला जातोय याचे नेमके चित्रण इथे येते. कोरोना काळानंतर सुरू झालेले ऑनलाइन एज्युकेशन याचे बेगडी वातावरण आपल्या जीवनावर काय परिणाम करते त्यातून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचा वेध यामध्ये घेतलेला आहे. डिजिटल क्रांतीने जग कसे बदलते आहे याची मांडणी त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनी आपल्या जीवनात काय काय बदल घडवले आहेत याचा शोध प्रस्तुतच्या ग्रंथामध्ये घेण्यात आलेला आहे.
एकूणच वरील दोन्ही ग्रंथांमधून डॉ. जत्राटकर यांची वैचारिक आणि सामाजिक भूमिका, विचारांची संवेदनशीलता, आंबेडकरी विचारांचा अविष्कार, एक माध्यमकर्मी म्हणून असलेली त्यांची जाण यांचे मनोवेधक चित्रण या ग्रंथामधून दिसून येते. आपल्याला व्यक्त होण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध असताना सोशल माध्यम हे आजच्या माणसांना खूप जवळच वाटू लागलं आहे. पण याचा वापर करताना कोणती जबाबदारी आणि काळजी घ्यावी याचा विचारदेखील या ग्रंथातून दिसून येतो. त्यामुळे हे दोन्ही ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवेत.
आज या ग्रंथ प्रकाशन समारंभाला येत असताना आपण हार, बुके याऐवजी ग्रंथ खरेदी करावीत असे पत्रिकेत नमूद केले आहे. साहित्यिक,सांस्कृतिक,सामाजिक भान असणारी माणसे निश्चितच या गोष्टीचे स्वागत करतील आणि ग्रंथ खरेदी करतील.
-डॉ. विनोद कांबळे, कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा