(शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉ. विश्वास सुतार, कोल्हापूर यांनी 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या माझ्या पुस्तकाचा करून दिलेला परिचय...)
डॉ. आलोक जत्राटकर यांचा 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' हा ललित लेखसंग्रह भाग्यश्री प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केलेला आहे. डॉ. आलोक हे पत्रकार, लेखक, संवादक आणि वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. शिवाजी विद्यापीठाचे पहिले 'जनसंपर्क अधिकारी' म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पत्रकारिता आणि नोकरी करत करत त्यांनी ललित लेखनात सातत्य ठेवलेले आहे. वेळोवेळचे अनुभव आणि प्रसंगपरत्वे केलेले चिंतन त्यांनी मुक्तपणे या लेखसंग्रहात मांडलेले आहे.
एकूण ३० लेखांचा हा संग्रह ग्रंथरूपात सिद्ध झालेला आहे. 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' हे एका लेखाचे शीर्षक ग्रंथाला देऊन लेखकाने आपल्या लेखनाचा सूचक हेतू साध्य केला आहे. रंगांवरून समाजातील वाढत जाणारी विषमता, राजकारण, पुरुषप्रधान मानसिकता, व्यक्ती आणि समुहाचे विसंगत सामाजिक वर्तन ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखक करत आहे. शीर्षकांची रचनाही मिश्रभाषी आहे. यातील १६ लेखशीर्षके मराठीत, १० शीर्षके हिंदीत; तर ४ इंग्रजीत आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांना हा ग्रंथ अर्पण करून डॉ. आलोक यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
पहिले दोन लेख म्हणजे डॉ. आलोक जत्राटकर यांचे आत्मकथन आहे. स्वतःची घडण कशाप्रकारे झाली याचे क्रमशः चित्रण आणि आईने केलेले मूलभूत संस्कार अत्यंत संक्षिप्तपणे डॉ. आलोक यांनी लेखांद्वारे लिहिले आहेत.
स्वतःला आलेले अनुभव विविध विषयांच्याद्वारे व्यामिश्रतेने लेखक मांडत आहे. शीर्षक लेखासह 'डि कास्ट व्हावं कसं?', 'सर फॅमिली हय क्या?', 'नाव... तिचं, माझं, तुमचं!', 'श्यामच्या आईचा अस्वीकार आणि आपण', 'शब्दप्रीती!', 'माकडाचं घर', 'सवलतींच्या देशा' हे लेख नवा विचार देऊन जातात. 'फॅमिली' या संकल्पनेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करताना लेखक लिहितो, 'भारतीय समाजात स्त्रीशिवाय कोणतेही कुटुंब पूर्ण होत नाही, किंबहुना त्याला कुटुंब- फॅमिली म्हणताच येणार नाही, हा मोठा संदेश हॉटेल-रेस्टॉरंट्सनी त्यांच्या कृतींमधून दिला आहे.'
'प. फो. आ. अन् बुडबुडा' हा लेख संवादात्मक आहे. वेगवेगळ्या चॅनेल्सवरील कार्यक्रमांचे अंतर्वास्तव लेखकाने चपखलपणे रेखाटलेले आहे. ब्रिटिश नंदी हे लेखक दैनिक 'सकाळ' मध्ये 'ढिंग- टांग' हे सदर लिहितात. या सदराची आठवण या निमित्ताने होते. लेखकाचे वडील प्राध्यापक होते. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. त्यांच्यासह सात भारतीयांनी नामांतर सत्याग्रहातील दिलेले योगदान दीर्घ लेखाद्वारे लेखकाने विवेचित केले आहे. हा लेख म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणता येईल.
'वाचन व्यासंग' हा डॉ. आलोक जत्राटकर यांचा स्थायीभाव आहे. त्यांच्या समग्र लेखनात त्यांच्या वाचन व्यासंगाचे प्रतिबिंब पडताना दिसते. समाजातील विसंगतीचे अचूक निरीक्षण ते करतात. स्वतःचे विचार आणि चिंतन प्रवाही आणि ओघवत्या भाषेत विविध रूपबंधातून लिहिणे, हे डॉ. जत्राटकर यांच्या लेखनाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यासाठी ते समर्पक उदाहरणे आणि दृष्टांतांचा वापर करतात. त्यामुळेच प्रस्तुत संग्रहातील सर्वच लेख वाचनीय झाले आहेत. ते केवळ मनोरंजनपर नाहीत. ते अधिकतर प्रबोधनात्मक आहेत. वाचकाला मूलभूत संदेश देणे, हे डॉ. आलोक यांच्या लेखनाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
प्रा. रणधीर शिंदे यांची साक्षेपी प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली आहे. प्रा. शिंदे यांनी 'डॉ. आलोक जत्राटकर यांच्या लेखनामागे संविधानाची चौकट आहे' अशा शब्दांत काढलेले साररूप अत्यंत समर्पक आहे. भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि लेखनाचा डॉ. जत्राटकर यांच्या लेखनावर प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच संविधानातील मूल्यांचा जागर करणारा हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे अशा संभ्रमित वर्तमानात डॉ. जत्राटकरांची लेखणी नवी उमेद देते, हे मात्र निश्चित !

(डॉ. विश्वास सुतार, कोल्हापूर (लेखक, गायक आणि शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय अधिकारी) ९४२०३५३४५२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा