शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

मसाले पान (कथा)

 (ज्येष्ठ सन्मित्र श्री. सुभाष सूर्यवंशी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही 'अक्षरभेट'चा दीपावली विशेषांक वाचकांना अत्यंत मेहनतीने सादर केला आणि दरवर्षीप्रमाणेच आम्हालाही त्यात स्थान दिले. या अंकासाठी यंदा एक कथा लिहीली. ती कथा माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'अक्षरभेट'च्या सौजन्याने येथे देत आहे. वाचकांना आवडेल, अशी आशा आहे.- आलोक जत्राटकर)




आयुष्य एखाद्या मसाले पानासारखं वाटतं मला. मसाले पानात कसं चुना, कात, सुपारी यांच्याबरोबर गुलकंद, केसर, सौंफ, टूटी फ्रुटी, नारळाचा कीस, वेलची, चेरी, गुंजीचा पाला आणि हे सारे मटेरियल पानात बांधून ठेवण्यासाठी वरुन दाबून घुसवलेली लवंग हे सारे पदार्थ मापात असले की मसाले पानाचा स्वाद वृद्धिंगत होतो. यातला एक जरी पदार्थ कमी अगर अधिक झाला की सारा मामला बिघडून जातो. म्हणजे समजा, चुना वाढला तर तिखटपणा वाढणार आणि गुलकंद प्रमाणापेक्षा जास्त झाला, तर उगीचच गुळमाट लागत राहणार. आयुष्यातही आपल्या साऱ्या भावभावना, विकार यांचं संतुलन हे फार महत्त्वाचंच. कोणत्याही एका भावनेचा वा विकाराचा अतिरेक झाला की, सारं काही बिघडलंच म्हणून समजा. एखाद्यानं उगीचच फार चांगलं असू नये की त्याच्या चांगुलपणाचाही त्रास व्हावा. टोकाचं वाईटही असू नये कारण त्याचा त्रास तर साऱ्यांनाच सोसावा लागावा.

माझ्या आयुष्याच्या सुरवातीच्या कालखंडातच मसाले पानानं हे तत्त्वज्ञान शिकवलं. आपसुक म्हणता येणार नाही कारण घडलेल्या त्या प्रसंगांत आपसुकता नव्हती तर माझा दोषच अधिक होता. दोषही हाच की मसाले पानाची ती गोड चव आवडायला लागली होती, नको त्या वयात. आणि त्या चवीचा आस्वाद घेण्याच्या नादात काही गैर गोष्टी घडून गेल्या हातून. आजही तो प्रसंग आठवला की गहिवरुन यायला होतं.

***

दुसरीत होतो. आईवडिलांनी शिक्षणासाठी आजोबांकडं- आण्णांकडं सांगलीत शिकायला ठेवलेलं होतं. सांगलीची राम मंदिराजवळची के.सी.सी. प्राथमिक शाळा ही माझी शाळा. सकाळी साडेसात ते दुपारी बारा अशी शाळेची वेळ असायची. दुपारनंतरचा वेळ आजी-आण्णा, मावशी, माझा लाडका कुत्रा जॉन यांच्या सान्निध्यात जायचा. दुपारी आणि संध्याकाळी आण्णांच्या वाचनाच्या वेळी त्यांच्या टेबलाच्या पायाशी बसून मी अभ्यास करायचो. आण्णांना पान खायची सवय होती. जेवल्यानंतर थोडी वामकुक्षी घेऊन ते उठून त्यांच्या या छोटेखानी अभ्यासिकेच्या टेबलावर येऊन बसायचे. तिच्या एका कोपऱ्यात पितळेचा चकचकीत पानाचा डबा असायचा. हा पानाचा डबा, त्याची छोटीशी कडी, त्याच्या आतले नजाकतदार कप्प्यांचे खण, त्या कप्यांमध्ये आपापल्या जागी विसावलेले कात, सुपारी, तंबाखू न् चुन्याची डबी, एका कप्प्यात लवंग अन् धारदार अडकित्ता आणि ते अलगद उचलल्यानंतर त्याखालचा पानाचा स्वतंत्र खण असा हा सारा देखणा पानाचा संसार. त्याचं आकर्षण वाटलं नसतं तरच नवल. आण्णा येऊन बसले की अलगद हा डबा उचलायचे. खालच्या खणातलं एक पान घ्यायचे. मग तितक्याच हळुवारपणे पानाच्या शिरा काढून त्याला अंगठ्याच्या नखानं हवा तितका चुना घेऊन लावायचे. दुसऱ्या बोटानं तो चुना, कात अन् तंबाखू मिसळून सगळ्या पानावर पसरायचे. मग सुपारी बारीक कातरून त्यावर टाकायचे. कधी वाटलं तर चवीसाठी एखादी लवंग टाकायचे. हे सारं मनासारखं जमलं की पान छान गुंडाळून तोंडात टाकायचे. खुर्चीच्या हातावर एक खादीचा गमछा-टाइप नॅपकीन असायचा. त्याला हात पुसला की आण्णा वाचनाची समाधी लावायला तयार. त्यांची बसण्याची जागा त्यांनी खिडकीशेजारीच मुद्दाम केलेली होती. वाचता वाचता त्या खिडकीतून पानाची पिंक वाचनसमाधी भंग न होऊ देता त्यांना टाकता यायची. पुढं एक-दीड तासानंतर आणखी एखादं पान तयार केलं की, साधारण तीन-एक तासांचं वाचनाचं त्यांचं वर्तुळ बरोब्बर पूर्ण व्हायचं. कधी कधी या डब्यातल्या लवंगेचा अन् क्वचित कतरी सुपारीचा लाभ मला मिळायचा. पण, मला हे दोन्ही दोन टोकाचे - एक तिखट अन् दुसरा एकदम सप्पक असे- हे स्वाद कधी आवडले नाहीत. पण, या सगळ्याचं मिश्रण असलेलं पान मात्र आण्णांच्या तोंडात कसं भारी रंगतं, याची मौज वाटायची. आण्णा दुसरं पान कधी लावायला घेतात, इकडं माझं लक्ष असायचं. कारण त्या पानाबरोबर माझ्या पहिल्या टप्प्यातल्या अभ्यासाची सुट्टी व्हायची. पुढचा काळ मी आमच्या अंगणात जॉनसोबत खेळायला किंवा झोपायला, असं काहीही करायला रिकामा असायचो. पुढचा अभ्यास मग आण्णा संध्याकाळी बाजारातून आल्यानंतर बाजाराचा हिशोब लिहीता लिहीता चालायचा, साधारण एक तासभर- साडेआठच्या भोंग्यापर्यंत. मग ती जेवणाची वेळ असे.

सांगलीचा बाजार शनिवारी भरतो. त्या दिवशी आण्णांची पानखरेदी, दोनेक महिन्यांतून एकदा चुना खरेदी वगैरे असायची. चुनकळी उकळून त्यापासून चुना तयार करून तो एका चिनीमातीच्या सुबक बरणीत भरून ठेवायची जबाबदारी आजीची असायची. आण्णांनी सुपारीसाठी एक मोठी मिलीट्री वॉटरबॅग ठेवली होती. या मेटॅलिक वॉटरबॅगला लष्करी हिरव्या रंगाचं कातडी कव्हर होतं. म्हणून ती मिलीट्री वॉटरबॅग. दोन लीटर पाणी बसेल इतकी मोठी होती. आण्णांच्या कॉटशेजारी टांगलेली असायची. बाजारातून आणलेल्या सुपाऱ्या एकेक करून त्या दिमाखदार वॉटरबॅगच्या तोंडातून एकेक टाकत त्यांचा तो मेटॅलिक टप टप बद्द असा आवाज ऐकायला मजा यायची. त्यामुळं आण्णा मलाच ते काम सांगायचे. दुसरं एक काम करण्याचा मी प्रयत्न करायचो, पण माझ्यानंतर मावशी किंवा आजी ते करायच्या. हे काम म्हणजे आणलेली ओली पानं पुसून रात्रभर ओळीनं वाळवत ठेवणं. शनिवारी रात्री जेवण झालं की आजी, आण्णा मांडीवर एकेक टॉवेल घेऊन बसत. पानांचा बिंडा सोडायचा, ती ओली खाऊची पानं एका ताटात पसरायची आणि दोघांनी दोन्ही बाजूंनी एकेक पान घ्यायचं, ते मांडीवरल्या टॉवेलला दोन्ही बाजूनं पुसायचं, कम्प्लीट कोरडं करायचं आणि खोलीच्या एका कोपऱ्यात ओळीनं आडवी उभी अशी एकेक लावायची, एकदम शिस्तशीर. ही पानं लावायचं कामही मी आनंदानं करायचो. शाळेत प्रार्थनेच्या वेळी शिक्षक जसं आम्हा मुलांना एका रांगेत शिस्तीनं उभं करायचे, तशा शिक्षकाच्या भूमिकेत मी तेव्हा असायचो. एकाही पानाला इकडं तिकडं होऊ द्यायचो नाही. एकदम डिसीप्लीन पाळायला लावायचो. सारी पानं अशी आडवी-उभी ओळीनं लावून झाली की लांबून त्यांच्याकडे पाहताना भारी वाटायचं. कस्लं भारी लावलंय आपण, असं वाटायचं. पण, मला ते पानं पुसण्याचंही काम हवं असायचं. खूपच हट्ट करायला लागलो की, द्यायचे आण्णा त्यांचा टॉवेल माझ्या मांडीवर अन् म्हणायचे पूस. त्यावर आजी भडकायची. म्हणायची, गुरूजी, नातवाला दिलंयसा खरं, पण नंतर पानं ओली राहिली न् खराब झाली तर परत आम्ही नाही हं ओरडा ऐकून घेणार तुमचा. आण्णा गालातल्या गालात हसायचे, म्हणायचे, हो, ते तर तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल खरं. आणि थोडा वेळानं मला त्या टॉवेलसकट त्यांच्या मांडीवर घ्यायचे आणि माझ्या मांडीवरच्या त्या टॉवेलला स्वतःच्या हातानं पानं पुसून ठेवायला सुरवात करायचे. ही वेळ आजीनं गालातल्या गालात हसण्याची असे. मग मी तसाच कधी तरी त्यांच्या मांडीवर जांभया देत आडवा होत असे.

आण्णांच्या पान खाण्याचं एक सुप्त आकर्षण मला होतं. वाटायचं, आण्णा पान खातात म्हणून तासंतास त्यांना वाचायचा, अभ्यासाचा मूड राहतो आणि आपण खात नाही म्हणून आपल्याला लगेच कंटाळा येतो. असंच काहीबाही वाटत राहायचं. त्यांना मी एकदा तसं विचारलंही. त्यावर हसून म्हणाले, वाचनाची मला आवड आहे, म्हणून मी तासंतास वाचू शकतो. पान हे निव्वळ एक जडलेलं व्यसन आहे. सोडता येत नाही, म्हणून जपलंय, इतकंच. कधी सुटेलही पुढे-मागे. मला त्यांचं बोलणं काही झेपायचं नाही. मग मी नुसतंच हं म्हणून खेळायला पळत असे.

या पान पुराणाचा पुढला अंक तेव्हा सुरू झाला, जेव्हा एका रविवारी दुपारच्या सामिष भोजनानंतर आण्णांनी मसाले पानं आणली. असायचं काय की, शनिवारी संध्याकाळी माझे आई-वडिल मला भेटायला यायचे. त्याचबरोबर रविवार हा गावोगावचे पाहुणे येण्याचाही दिवस असायचा. घरात इतकी मंडळी आली की, साहजिकच सामिष भोजनाचा बेत ठरायचा. त्यानंतर आण्णा ज्याला हवं त्याला साधं पान लावून द्यायचे किंवा पानाचा डबा फिरवायचे. मात्र, त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी आमच्या एका पाहुण्याला पाठवून घरातल्या महिला वर्गासाठी मसाले पानं आणवली. आईनं तिच्या वाट्याच्या पानातलं अर्धं मला भरवलं. सुरवातीला मी ते खायला नाखूष होतो. पण, जसं चावलं, आणि त्याचा तो मिठ्ठास गोडवा घशातून खाली उतरला की काय सांगावं! हे प्रकरण आण्णांच्या त्या डब्यातल्या पानापेक्षा वेगळं आणि जबरदस्त आकर्षक होतं. त्यातल्या गुलकंद, चेरी वगैरे प्रकारांची मोहिनीच पडली मला. तिथून पुढं जेव्हा कधी अशा जेवणावळी होत घरी, त्यानंतर हळूच मी आण्णांकडे मसाले पानाची मागणी करीत असे. पण, दरवेळीच ती फलद्रूप होत असे, असं मात्र नाही. कारण त्यावेळी साधं पान पानपट्टीत दहा-वीस पैशाला वगैरे तर मसाले पान आठ आण्याला पडत असे. त्यामुळं दरखेपी त्यापोटी इतका खर्च करणं परवडतही नसे. पण, असलं हिशोब लक्षात घेण्याचं माझं वय थोडंच होतं. कधी कधी मी हट्टाला पेटत असे अन् पाठीत आईचा अगर आजीचा रट्टा खाऊनच गप्प बसत असे.

एकदा आण्णांच्या समोरुन अभ्यासातून सुटका झाल्यानंतर मी जॉनसोबत अंगणात हुंदडत होतो, त्यावेळी समोरच्या वस्तीत राहणारा आमच्या वर्गातला विजय नावाचा मुलगा त्याच्या आईसोबत जाताना दिसला. मी त्याला हाक मारली. मला पाहताच तो आईला सोडून पळत आला. आमचं काही बोलणं होणार इतक्यात त्याची आईही मागून आली. मला पाहून माझ्या गालावरुन हात फिरवित स्वतःच्या कानशीलावर कडाकडा बोटं मोडत म्हणाली, गुरूजींचा नातू न्हवं का तू? विजू सांगतोय, वर्गात पैला लंबर हाय तुजा म्हनून. आता असल्या कौतुकावर कसं व्यक्त व्हावं, हेच ठाऊक नसल्यानं मी नुसता त्यांच्या कष्टानं रापलेल्या अन् ममतेनं ओसंडणाऱ्या चेहऱ्याकडं पाहात राहिलो. त्याच पुढं म्हणाल्या, आमचा विजू जरा कच्चा हाय अब्यासात. तुझ्याबरुबर पाठवू का अभ्यास करायला?’ मी म्हटलं, मी आण्णांना विचारुन उद्या सांगतो. असं बोलणं झालं अन् ती मायलेकरं निघालीत.

मी संध्याकाळी आण्णांना विचारलं. त्यांची काही हरकत नव्हती, पण आजीची थोडी कुरकूर चाललेली. गुरूजी, तिथलं पोरगं कशाला येऊ देतासा? उगीच संगतीनं ह्योच बिघडून जायचा. मला आजीच्या म्हणण्याचा रोख काही कळला नाही. पण, आण्णांनी दुपारी त्यांच्या वामकुक्षीच्या वेळेत एक तास त्याच्यासोबत अंगणात अभ्यास करायची परवानगी दिली. पण, फक्त अभ्यास करण्याचीच!

त्यावेळी माझे दोस्त असे नव्हते. वर्गात सचिन, जमीर असे काही एक-दोघे जण होते जवळचे, पण ते शाळेपुरतेच मर्यादित. शाळेबाहेर अगर घरात पुस्तकांच्या सान्निध्यातच माझा जास्त वेळ जायचा. कंटाळा आला की जॉन असेच उड्या मारायला, खेळायला. विजय हा माझ्या घरी येणारा तसा शाळेतला पहिलाच मित्र. त्याच्या घरचं, वस्तीतलं वातावरण काही अभ्यासाला फारसं पूरक किंवा पोषक नव्हतंच. त्याचे वडिल कुठं तरी वॉचमन आणि आई कुठल्याशा कारखान्यात का गिरणीत कामाला जायची. विजय दिवसभर एकटाच असायचा घरी. आमची शाळा सकाळची असल्यानं बारा वाजता घरी येऊन काही खाऊन जे हा घरातनं बाहेर पडायचा ते संध्याकाळी आई घरी येईपर्यंत गल्लीतल्या पोरांसोबत समोरच्या मैदानात खेळत राहायचा. घरी गेल्यावर पण आईला दाखवायला म्हणून पाटी-पुस्तक नुस्तं घेऊन बसायचा. केला तर केला, नाही तर नाही, असा त्याचा अभ्यास!

विजय माझ्याबरोबर जेव्हा अभ्यासाला येऊन बसू लागला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, याचा अभ्यास बराच नव्हे, तर खूप म्हणजे खूपच कच्चा आहे. कारण मी पाटीवर अक्षरं लिहू शकायचो, पाढे लिहू-म्हणू शकायचो. त्याला मात्र अद्याप अक्षरं किंवा अंकही लक्षात येत नव्हते. त्यामुळं त्या तासाभरात मी अभ्यास करण्यापेक्षा त्याच्याकडून याच गोष्टी गिरवून घ्यायचं ठरवलं. त्यालाही तो कंटाळायचा. मग आम्ही काहीबाही खेळून तास काढत असू. आण्णा उठले की, दप्तर घेऊन तो लगेच पळून जायचा आणि मी आण्णांच्या पायाशी बसून मग माझा अभ्यास सुरू करायचो.

एके दिवशी झालं असं की, शाळेतून येताना रस्त्यात मला आठ आणे सापडले. माझ्यासाठी खूपच मोठी रक्कम होती ती. मागं-पुढं असं कोणीच नव्हतं. उचलावे की न उचलावे, या द्वंद्वात अखेर मी ते उचलून खिशात टाकलं. घरी गेलो की आण्णांना देऊ, असा विचार केला होता. पण, आवरण्याच्या नादात विसरून गेलो आणि नाणं तसंच खिशात राहिलं. दुपारी विजय आला. खेळता खेळता माझ्या खिशातून ते नाणं पडलं. मी चमकलो. माझं लक्ष पटकन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या पानपट्टीकडं गेलं. दुपार असल्यानं पट्टीच्या मालकाखेरीज दुसरं कोणी नव्हतंही तिथं. मित्राला ट्रीट देणं, वगैरे विचार त्या क्षणी माझ्या मनी येणं शक्य नव्हतं. पण, विजयला मी विचारलं, विजय, पान खातो का रे?’ त्यावर तो पटकन उत्तरला, नाय ब्बा. मी त्याची समजूत काढत म्हटलं, अरे, गोड असतंय मस्त. खाऊ या. मी देतो की माझ्या पैशानं. असं म्हणून मी त्याला आठ आण्याची हकीकत सांगितली. यावर तो कसाबसा तयार झाला. मग मी त्याचं धाडस वाढवत म्हणालो, हे घे. जा, आण जा तिथनं. मसाले पान माग. तो माझ्याकडं टकामका बघतच राह्यला. त्यावर मी म्हटलं, अरे, मी गेलो आणि तेवढ्यात आण्णांनी हाक मारली तर काय करायचं? म्हणून तू जा. खरं तर, मला रस्ता क्रॉस करायची आणि पानपट्टीवाल्यापुढं जायची भीती वाटलेली कारण आण्णांना सारेच ओळखत असत. विजय मात्र सदा न कदा रस्त्यावरून इकडं तिकडं करत असायचा, त्यामुळं त्याला वाहतुकीची भीती वाटत नव्हती.

विजय हळूच गेला. मी मेंदीच्या कुंपणावरुन टाचा उंचावून पाहात होतो. विजयनं सांगितल्यानंतर पानपट्टीवाल्यानं त्याच्याकडं निरखून पाहिलं आणि पान लावून दिलं. विजयनं पैसे दिले. तो परत येत असताना मात्र पानपट्टीवाला पाठमोऱ्या विजयकडं पाहात होता. आणि त्याच्या खांद्यावरुन जणू काही माझ्याकडंच त्यानं नजर रोखली होती. माझ्या पोटात गोळा उठला. मी पटकन खाली झालो. विजय अंगणात आला. आम्ही दोघं एखादं युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात आमची अभ्यास करायची जागा असलेल्या पिंपळाखाली बसलो. पानपट्टीवाल्यानं कागदात बांधून दिलेल्या त्या पानावरील गुंडाळी हळूच सोडली. पानाचे दोन भाग करून आम्ही दोन मित्रांनी वाटून खाल्ले. विजयलाही ती चव आवडल्याचं त्यानं सांगितलं. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं पान खाल्लं होतं.

आमचं दोघांचं दुपारचं हे अभ्यासाचं, खेळाचं सत्र असंच सुरू होतं. एक दिवस आम्हाला परत एकदा मसाले पानाची आठवण झाली. खूप दिवस झाले होते खाऊन. पण, प्रश्न पैशांचा होता? विजयकडं असण्याचा प्रश्न नव्हता अन् माझ्याकडंही नव्हते. पण, आता माझ्या मनभर मोह दाटला होता. जसं काही कधीच मसाले पान खाल्लं नव्हतं की पुढं मिळणारही नव्हतं, इतकी तीव्र इच्छा मनी दाटली. पण, त्या क्षणी तरी मी काही करू शकत नव्हतो.

विजय गेला, पण माझ्या डोक्यातून पानाचा विषय काही जात नव्हता. मी घरात गेलो. आण्णा उठून आवरत होते. माझ्यासमोर आण्णांचा खुंटीवर टांगलेला नेहरू शर्ट होता. यापूर्वी कधीही आला नाही, असा विचार प्रथमच माझ्या डोक्यात आला. आण्णा नेहरू शर्टाच्या बाजूच्या खिशात पैसे ठेवायचे. त्यात हात घालूनच भाजीवाल्यांना वगैरे ते पैसे द्यायचे. डोक्यात इतकं पान-पान झालं होतं की, मी त्या क्षणी पुढं होऊन त्या शर्टाच्या खिशात हात घातलाच. टाचा उंच करून कोपरापर्यंत हात त्या खिशात घातला. खाली काही सुट्टे पैसे हाताला लागले, पण त्याच्यावर असलेल्या कागदी नोटेवर माझा हात अडखळला. मी ती नोट बाहेर काढली. कोरी करकरीत पाच रुपयांची हिरवीगार, ट्रॅक्टरवाली नोट होती. आण्णा दररोजच्या बाजारातून आले की त्यांच्या डायरीत सारा हिशोब लिहायचे. शेजारी बसवून मलाही पाटीवर हिशोब करायला लावायचे. कुठून सुरवात केली त्यापासून ते काय काय घेतलं ते क्रमानं आठवून, सांगून त्याचा हिशोब करायला लावायचे. त्यामुळे रुपया आणि पैशाच्या हिशोबात मी बऱ्यापैकी तयार झालो होतो. पाच रुपयांत बक्कळ दहा मसाले पानं येऊ शकणार होती, हे त्यामुळं माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. केवढी चंगळ होणार होती माझी!

मागला-पुढला कोणताही विचार न करता मी ती नोट पटकन खिशात घातली. पण, नोट खिशात ठेवण्यात धोका होता. उद्या दुपारपर्यंत ती सांभाळण्याचं मोठं आव्हान होतं. मी पळत अंगणात गेलो. माझ्या पिंपळाच्या खोडात एक छोटीशी ढोली होती. तिच्यात मी ती नोट ठेवली. तिच्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून फरशीचा एक तुकडा ठेवला आणि घरात आलो.

घरात आलो खरा, पण एका विचित्र अस्वस्थतेनं माझ्या मनाचा ताबा घेतला. ते नेमकं काय होतं, हे सांगता येणार नाही, पण तसं त्यापूर्वी कधीच वाटलं नव्हतं.

आण्णा नेहमीप्रमाणे धोतर-नेहरू शर्ट चढवून पिशव्या घेऊन बाजारात गेले. दीडेक तासात ते बाजारातून आले तेच मुळी तणतणत! लक्षात घ्या, त्या काळी दीड दोन रुपयांत आठवड्याचा भाजीपाला सहजी येत असे. तेव्हा पाच रुपयांची किंमत किती असेल, करा अंदाज. आण्णा आले आणि त्यांनी सरळ आजी अन् मावशीला फैलावर घ्यायला सुरवात केली. आजच्या बाजारासाठी ठेवलेले माझ्या खिशातले पाच रुपये कोठे गेले, कुणी घेतले, अशी बरीच चौकशी केली. पण, कोणीच कबूल होई ना! उलट, आजीचंच टेन्शन वाढलं. घरात भर दिवसा चोरी झाली होती. आजीनं मला विचारलं, दुपारी तुम्ही अभ्यास करताना कोणी बाहेरचं आलं होतं का घरात?’ मी नाही, म्हणून सांगितलं. पुन्हा मावशी, आजी, आण्णांची चर्चा सुरू झाली. घरातलं वातावरणच बदलून गेलेलं. अखेरीस आजीनं एक खडा माझ्याकडं टाकलाच. विचारलं, अरे, तुझा तो दोस्त आला होता का घरात?’ यावर मी घाबरतच सांगितलं, नाही, आम्ही बाहेरच बसून अभ्यास केला आणि तो तिकडूनच गेला.

बाहेरचं वातावरण असं अस्वस्थ झालेलं असताना मी सुद्धा आतून अत्यवस्थ झालो. म्हटलं, काय करून बसलो हे आपण? आण्णा-आजीला किती त्रास होतोय आपल्यामुळं. पण, या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं, हे काही समजत नव्हतं. आण्णा तर आधी इतके भडकलेले आणि अस्वस्थ होते की त्या क्षणी त्यांच्यासमोर काही बोलण्याचं कुणाचंही धाडस होत नव्हतं, तिथं माझी काय कथा?

रात्रीची जेवणं कशीबशी झाली. मी आण्णांजवळ झोपायचो. त्यांच्या कुशीत शिरलो की रोज मला लगेच झोप लागायची. मात्र, ती रात्र फार वेगळी होती. आण्णांनी मला नेहमीप्रमाणं कुशीत घेतलं, मात्र त्या दिवशी मला काही केल्या झोप येईना. आपण चोरी केली आहे; आपण चोर आहोत. आपल्याला शिक्षा झाली पाहिजे, असा विचार एकीकडे मनात येत असतानाच दुसरीकडे यातून आता सहीसलामत बाहेर कसे पडावयाचे, आण्णांना त्यांचे पाच रुपये परत कसे द्यावयाचे, याचं विचारचक्रही डोक्यात सुरू होतं. आपल्यामुळं काही चूक नसताना आजीनं गरीब विजयवर पण संशय घेतला, ही गोष्टही मला खूप खटकली. विचार करकरून माझा मेंदू अखेर शिणला आणि तशीच कधी तरी झोप लागली.

दुसऱ्या दिवशी दुपारी मी शाळेतून घरी आलो. शिक्षक असलेली आजी तिच्या शाळेत गेलेली होती. आण्णांची देवपूजा झाली. त्यांना जेवायला वाढून मावशीही कॉलेजला गेली. आण्णा जेवून त्यांच्या जागेवर नेहमीप्रमाणे पेपर वाचायला बसले. त्यावेळी मला काय वाटलं, सांगता नाही येणार! मी पळत अंगणात गेलो, पिंपळाच्या ढोलीत ठेवलेली पाच रुपयांची नोट बाहेर काढली आणि ती घेऊन येऊन आण्णांसमोर उभा राहिलो. आण्णांना हाक मारली. आण्णा...

आण्णांनी माझ्याकडं प्रश्नार्थक पाहिलं. मी हातातली नोट पुढं करून म्हटलं, आण्णा, मला ही नोट खेळताना सापडली. कोणीतरी आपल्या पिंपळाच्या ढोलीत ठेवली होती.

आण्णांनी काही क्षण माझ्याकडं टक लावून पाहिलं. माझ्या हातातल्या नोटेकडं एक कटाक्ष टाकून म्हणाले, जा बाळा, माझ्या शर्टाच्या खिशात ठेवून दे ती.

मला आण्णांनी त्याविषयी आणखी काही विचारावं; काल आजीला, मावशीला जसे भडकून बोलले, तसं बोलावं; माझा अभ्यास घेताना जी लाल छडी घेऊन बसतात, त्या छडीनं त्यांनी मला मारावं. काहीही करून माझ्या चुकीची शिक्षा मला द्यावी. चोरी करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी, असं माझ्या मनानं घेतलं होतं. त्याची मानसिक तयारीही मी केली होती. पण, तसं काहीही न होता आण्णा मला ती नोट त्यांच्या खिशात ठेवायला सांगत होते. मी अवाक् होऊन तसाच उभा राहिलो. त्यावर आण्णांनी कातर स्वरात पुन्हा सांगितलं, बाळा, जा, ठेव जा. आणि ही गोष्ट तुझ्या आजीला, मावशीला तू सांगू नको बरं. मी सांगीन त्यांना कधी तरी सवडीनं. असं सांगत असतानाच त्यांच्या डोळ्यांतून त्यांच्याही नकळत अश्रूंचे दोन थेंब गालावर ओघळले. ते पाहून कालपासून रोखून धरलेली माझ्या हृदयातील कालवाकालवही बाहेर पडली आणि माझ्याही डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. पाचाची ती नोट तशीच हातात धरून मी त्यांच्याकडे धावलो. मला आपल्या मिठीत कवटाळून आण्णांनी माझ्या कपाळाचे प्रदीर्घ चुंबन घेत आपल्या अश्रूंनाही मोकळी वाट करून दिली.

***

आयुष्यात अभिनव अशा क्षमाशीलतेचा सर्वात मोठा पहिला धडा हा असा माझ्या आण्णांनी दिला मला. त्यांनी मला त्या क्षणी बदडून काढलं असतं तरी गैर ठरलं नसतं. त्यासाठी माझी तयारीही होती. पण, त्यानंतरच्या आयुष्यात मी तसा पुन्हा वागलोच नसतो, याची शाश्वती मात्र देता आली नसती. तथापि, या क्षणीचं त्यांचं वर्तन मी कुठल्याही अंगानं अपेक्षिलं नव्हतं. त्यांच्या या क्षमाशीलतेचा माझ्या आयुष्यावर दूरगामी परिणाम व संस्कार झाला. आयुष्याच्या सुरवातीच्या टप्प्यावर घडून आलेल्या या मसाले पान प्रकरणानं माझ्या मनावर बुद्धाच्या पंचशीलाचे संस्कार थेट कोरले. मसाले पानाचं आकर्षण तर त्याच क्षणी ओसरून गेलं. पण, आजही एखादे नवीन पुस्तक सोडले तर अन्य कोणत्याही गोष्टीचा मोह अगर लोभ मला सुटत नाही. काही वेळा निर्माण झालाच, तर त्यावर संयमाने मात करण्याची प्रेरणा मला हा प्रसंग देत राहतो. आजही जेव्हा आठवतो, तेव्हा पुढील ध्वनीतरंगच मनात उमटत राहतात -

आदिन्नादाणा वेरमणी। सिख्खापदम् समाधियामि।।

कामेसुमिच्छाचारा वेरमणी। सिख्खापदम् समाधियामि।।

मुस्सावादा वेरमणी। सिख्खापदम् समाधियामि।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा