सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

द लास्ट बो! (कथा)

 (ज्येष्ठ पत्रकार व परमस्नेही श्री. सुभाष धुमे यांनी कोविड-१९च्या कालखंडातही त्यांच्या 'व्हिजन' या दिवाळी अंकाचे आव्हान पेलले आणि प्रथेनुसार दसऱ्याला प्रकाशितही केला. या अंकात प्रकाशित झालेली माझी कथा माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'व्हिजन'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

तीस पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. एक गाव होतं. तालुक्याचं ठिकाण असलं तरी गावच ते. शहरापेक्षा छोटं अन् खेड्यापेक्षा मोठं, असं काही तरी. माझे वडिल प्राथमिक शिक्षक. बदली नित्यनेमानं ठरलेलीच. अशीच त्यांची त्या गावातही बदली झाली. माझी चौथी अन् बाबांची बदली असं झालं. जुने मित्र जुन्या गावात राहिले. नवे मित्र जोडण्याचा मला फारसा सोस नव्हताच. गोष्टीच्या पुस्तकांशीच त्यामुळं माझी जास्त गट्टी जमलेली. बाबांच्या शाळेतल्या ग्रंथालयातली पुस्तकंही माझे साथीदार असत. बाबांना त्याचं कौतुक असलं तरी आईला मात्र माझं ते एकलकोंडं राहणं काही आवडायचं नाही. पोर मुलांच्यात मिसळायला शिकलं नाही, तर घुमं हून बसंल. असं तिला वाटायचं. अगं, पण शाळेत तो त्याच्या वर्गमित्रांत मिळून मिसळून राहतोय ना. वर्गाबाहेर त्याच्या या पुस्तकांशी असलेल्या मैत्रीचा मला तर उलट अभिमानच वाटतो. असं म्हणून बाबा तिची समजूत काढायचे. आईलाही कौतुक असायचं त्याचं, पण माझ्या भविष्याबद्दल उगीचच चिंता वाटायची तिला. मातृहृदयच ते! कळवळणारच की लेकरासाठी. त्यामुळं माझं वाचन मात्र अबाधितरित्या सुरू राहायचं.

ते चौथीचं वर्ष असल्यामुळं स्कॉलरशीपची परीक्षा त्या वर्षी होती. त्यामुळं नियमित अभ्यासाबरोबर शाळेत स्कॉलरशीपसाठी गुरूजी जादा वेळ थांबवून मोफत शिकवणी घेत. भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता अशा तीनही विषयांची शिकवणी घेत. स्कॉलरशीपची परीक्षा आणि वार्षिक परीक्षा अशा दोन्ही परीक्षा देता देता वर्ष संपलं.

त्यानंतरच्या सुटीत गेल्या वर्षभरात राहिलेला सारा वाचनाचा बॅकलॉगच जणू मी भरून काढायचा चंग बांधला आणि सुटीभर अधाशासारखा मिळेल ती पुस्तकं वाचत सुटलो. ते पाहून आई अधिकच चिंतेत पडली. बाकीची मुलं उन्हातान्हात खेळत सुटीचा मनमुराद आनंद घेत असताना आपलं पोर मात्र घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही. सदान् कदा चटई अंथरून पुस्तक वाचत लोळत पडलेला मी जणू खुपायचोच तिला. सुटी संपली. पाचवीचं वर्ष सुरू झालं अन् आईच्या मनानं मला पुन्हा माणसाळवण्यासाठी उचल खाल्ली. त्याला एक निमित्तही घडलं.

एका संध्याकाळी बाबा, मी शाळेतून घरी आलो होतो. आमच्या दोघांचं दूध घेऊन झालं की तासभर बाबा माझा गृहपाठ घ्यायचे. तसे आम्ही बसलो असताना शाळेतले पाटील गुरूजी एका पिळदार शरीरयष्टीच्या तरुण मुलासह घरी आले. बाबांनी पुढे होऊन त्यांचे स्वागत केले. दोघांना बसायला खुर्च्या दिल्या. गुरूजींनी त्या तरुणाची ओळख करून दिली. हा माझा मुलगा उदय. शहरात होता काही वर्षे. बीए करता करता त्याने ज्युदो-कराटेचे शिक्षण घेतले आहे. त्याने स्वतः मेहनतीने आता ब्राऊन बेल्टपर्यंत मजल मारली आहे. शिक्षण पूर्ण करून परत आलाय. आमचं किराणा दुकान चालवता चालवता ब्लॅक बेल्टची तयारी करायची म्हणतोय. तो स्वतः तर प्रॅक्टीस करीत राहणारच आहे. पण, गावातल्या इच्छुक मुलांनाही ज्युदोचं प्रशिक्षण द्यायचं म्हणतोय. त्यामुळं त्याचा सरावही नियमितपणानं होत राहील आणि गावातल्या मुलामुलींनाही स्वसंरक्षणाच्या कलेचे धडे मिळतील. अगदी कमी शुल्कात तो हे प्रशिक्षण देणार आहे. कारण शुल्कापेक्षा त्याला त्याची प्रॅक्टीस आणि गावातल्या मुलांमध्ये या क्रीडाप्रकाराची रुजवात करणं अधिक महत्त्वाचं वाटतंय.

गुरूजींनी ही प्रस्तावना केल्यानंतर स्वतः उदयदादानं बोलायला सुरवात केली. तो म्हणाला, येत्या रविवारपासून मी या ज्युदो प्रशिक्षण वर्गाची सुरवात करणार आहे. त्या दिवशी आमच्या घराशेजारीच हनुमान मंदिराशेजारच्या तालीम मंडळाच्या हॉलमध्ये छोटासा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे. गावातल्या प्रतिष्ठित मंडळींसमोर मी ज्युदो क्रीडा प्रकाराची माहिती आणि प्रात्यक्षिक सादरीकरण करणार आहे. सध्या परिसरातल्या काही मुलांना घेऊन प्रशिक्षणाची सुरवात करतो आहे. रविवारपासून रितसर नोंदणी खुली करणार आहे. प्रवेश मर्यादितच असतील. पण, या कार्यक्रमासाठी तुम्ही आमच्या घरची माणसं म्हणून उपस्थित राहिलंच पाहिजे, याचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही आलो आहोत.

बाबा हसत उत्तरले, अहो, घरच्या माणसांना कुणी निमंत्रण देतं का? आम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित राहू.

यावर गुरूजी आणि दादा दोघेही हसत हसत उठून उभे राहिले. त्यावर बाबा म्हणाले, अहो, गुरूजी, चहा वगैरे काही तरी घेऊ यात. त्यावर विनम्रतेनं नकार देत गुरूजी म्हणाले, नको. सुरवात आपल्यापासूनच केली आहे. गावातल्या इतर मंडळींना अजून निमंत्रणं द्यायचीत. त्यामुळं परवानगी द्या. रविवारी सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाला मात्र आवर्जून या.

मला ज्युदो हे नाव नवीनच होतं. असला काही खेळ असतो वगैरे काही माहिती नव्हतं. तसंही क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, रिंगटेनिस या पलिकडं खो-खो, कबड्डी, हुतूतू आणि आम्ही मैदानावर खेळायचो ते पकडापकडी, पाठशिवणी, आबाधुबी आणि कॅच-कॅच एवढ्यापुरतंच आमचं खेळाचं ज्ञान सिमीत होतं. मी बाबांना तसं विचारलं, तर म्हणाले, मीही ज्युदो-कराटेबद्दल फक्त ऐकूनच आहे. कधी पाह्यचा योग आला नाही. जपानी मार्शल आर्टचे ते वेगवेगळे प्रकार आहेत, एवढंच आज तुला सांगू शकतो. बाकी आता रविवारी उदयदादा सांगेलच आपल्याला सारं.

­­­रविवारची संध्याकाळ. पाटील गुरूजींच्या निमंत्रणाप्रमाणं आम्ही सारे तयार होऊन हनुमान तालीम मंडळाच्या हॉलमध्ये पोहोचलो. पाटील गुरूजी हॉलच्या दारात उभारून सर्वांचं स्वागत करीत होते. बाबांच्याही हातात हात देऊन त्यांनी प्रेमानं स्वागत केलं आणि बसा गुरूजी पुढल्या रांगेत. थोड्या वेळातच कार्यक्रम सुरू करू या. म्हणाले. आम्ही आत गेलो. हॉलमध्ये खुर्च्या मांडल्या असल्या तरी स्टेज मात्र इतर कार्यक्रमांप्रमाणं नव्हतं. स्टेजवर माईक आणि स्टेजच्या दोन बाजूला दोन कर्णे लावलेले होते. मात्र इतर कार्यक्रमाप्रमाणं टेबल-खुर्च्या वगैरे असा जामानिमा काही नव्हता. त्याऐवजी कसल्या तरी चौकोनी गाद्या अंथरल्या होत्या तिथं. हे दृश्य पाहून मला त्याविषयी बरंच कुतूहल वाटू लागलं. इतर कार्यक्रमापेक्षा काही तरी भन्नाट, वेगळं पाहायला, ऐकायला मिळणार, असं वाटलं. हळू हळू गावातली एकेक मंडळी येत होती. शाळेतले बरेचसे गुरूजी आणि बाई आल्या होत्याच, पण पंचायत समितीचे सदस्य, राजकारणी नेते-कार्यकर्ते, दुकानदार मंडळी, शेटजी वगैरे नेहमी त्यांच्या त्यांच्या दुकानात किंवा ठराविक ठिकाणी दिसणारी मंडळी प्रथमच त्या हॉलमध्ये आमच्या आजूबाजूला बसली होती. काहींनी कुटुंब आणि मुलं सोबत आणली होती, तर काही एकेकटेच आलेले. वेगवेगळ्या तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि हौशी मंडळी उपस्थित होती, तर हनुमान तालीम मंडळाची पोरं मात्र येणाऱ्यांची बैठक व्यवस्था करण्यात गुंतली होती. हॉलमध्ये बऱ्यापैकी गर्दी जमलेली.

काहीच वेळात पाटील गुरूजी स्टेजकडं येताना दिसले. त्यांच्यामागून उदयदादा आणि त्याचे चार साथीदार मित्र वेगळ्याच, बहुधा ज्युदो खेळायच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये येताना दिसले. ही मंडळी स्टेजवर आली. गुरूजी माईककडं सरकले. त्याचवेळी स्टेजवरच्या गाद्यांवर उदयदादा आणि त्याचे साथीदार उभे राहिले. दादा सर्वांच्या समोर मध्यभागी उभा होता. त्याच्या मागे ठराविक अंतरावर दोघे दोघे जण असे ओळीत उभे राहिले. पाचच जण होते, पण एकदम शिस्तबद्ध वाटत होते. त्यांनी आपल्या जागा घेताच सर्व उपस्थितांना कमरेत झुकून अदबीने सलामी दिली. त्याला बो म्हणतात, हे नंतर आम्हाला समजलं.

पाटील गुरूजींनी बोलायला सुरवात केली, आजच्या या छोटेखानी कार्यक्रमास आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्व मान्यवर उपस्थित झालात, याबद्दल आपणा सर्वांचं मी सुरवातीला मनापासून स्वागतही करतो आणि आभारही मानतो. खरं तर, आमच्या उदयला शाळेत असल्यापासून खेळांची आवड. आता गुरूजींचा मुलगा म्हटल्यावर त्यानं बाकी सारं बाजूला ठेवून अभ्यासात नंबर काढला पाहिजे, अशी गुरूजींपेक्षाही बाकीच्यांचीच अधिक अपेक्षा असते. या त्यांच्या म्हणण्यावर उपस्थितांत हास्याची एक लहर पसरली. स्वतःही थोडं हसून गुरूजी पुढं बोलू लागले, माझीही तशी अपेक्षा होती. नाही, असे नाही. मात्र, उदयची आवड पाहून मी त्याला वेगवेगळे खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिलं. अभ्यासातही तो मागे होता, अशातला काही भाग नव्हता. त्यानं पदवी शिक्षण होईपर्यंत आपल्या फर्स्ट क्लास कधी सोडला नाही किंवा खेळण्याच्या नादात एकही विषय कधी मागे ठेवला नाही. हीच गोष्ट माझ्यासाठी पुरेशी होती. त्याला अधिक चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी त्याला आठवीपासूनच जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवलं. मात्र, याचा त्यानंही कधी गैरफायदा घेतला नाही. उलट, एखाद्या जबाबदार माणसासारखा तो वागू लागला. तिथंच त्याला ज्युदो या क्रीडा प्रकाराबद्दल माहिती झाली. मी ते शिकू का?’ असं त्यानं मला विचारलं. मी शहरात जाऊन एकदा त्याच्या शिक्षकांची भेट घेतली. त्यांच्याकडून जमेल तितकी माहिती घेतली आणि उदयला हिरवा झेंडा दाखविला. यात त्यानं खूप प्रगती केली. शिक्षणाच्या आणि स्पर्धेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रंगांचे बेल्ट देऊन अशा स्पर्धकांना सन्मानित केलं जातं. उदयनं पांढऱ्या बेल्टपासून ते करड्या बेल्टपर्यंत प्रगती केली आहे. आता इथून पुढं तो काळ्या म्हणजे ब्लॅक बेल्टसाठी लढणार आहे. त्याच्या गुरूंनी त्याला त्यांच्याकडेच राहून प्रॅक्टीस करण्याचा सल्ला दिला होता. पण, आपल्या गावातील मुलामुलींना ही नवीन कला शिकविण्याचा मानस घेऊन उदय इथं आला आहे. इथं त्याची प्रॅक्टीस तो करेलच, शिवाय, गावातल्या मुलामुलींना शिकवून तयार करेल. असा दुहेरी फायदा आपल्याला होणार आहे. सुरवात असल्यानं आम्ही फी सुद्धा अगदी नाममात्र आकारायचं ठरवलंय. आणि आमचा हेतू लक्षात घेऊन तालीम मंडळानं दररोज संध्याकाळी ज्युदोचे वर्ग घेण्यास हा हॉल मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्या मोबदल्यात मंडळाच्या ज्या सदस्यांना ज्युदो शिकावेसे वाटेल, त्यांना आम्ही मोफत शिकविणार आहोत. या क्रीडाप्रकाराची मला थेट फारशी माहिती नाही. आज उदयचे गुरू उपस्थित राहणार होते, पण, काही कारणाने ते येऊ न शकल्याने उदयनेच आपणा सर्वांशी संवाद साधून आपणाला व्यवस्थित माहिती द्यावी, असे त्यांनी कळविले आहे. खरे तर, भाषणबाजीऐवजी उदयचा प्रात्यक्षिक दाखविण्याकडेच अधिक ओढा होता. पण, हा प्रकार अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावा, यासाठी तोंडी माहिती द्यायला हवी, असा त्याच्या गुरूंचाच संदेश असल्याने तो तयार झाला आहे. मी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आणि उदयला त्याच्या या उपक्रमाविषयी अधिक माहिती देण्याची विनंती करतो.

गुरूजींनी आपले बोलणे संपवताच उदयदादा पुढे झाला. त्याने त्यांना पुन्हा तसेच कमरेत झुकून अभिवादन केले आणि उपस्थित श्रोत्यांनाही. आणि बोलण्यास सुरवात केली, सर्वांना सप्रेम नमस्कार आणि मनःपूर्वक स्वागत. माझ्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेतच. त्या पुन्हा रिपिट करणार नाही. पण, एखादा उपक्रम सुरू करत असताना आपल्या सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन केले, तर त्याचे फलित चांगले मिळेल आणि तो विश्वास जपण्याची जबाबदारीही आपल्यावर असेल, या भूमिकेतून माझ्या वडिलांनी पुढे होऊन हा कार्यक्रम आयोजित केला. नाही तर आज माझ्यासोबत चार विद्यार्थी आहेत. आणखी काही जणांना तयार करायचे, प्रॅक्टीस करायची आणि पुढे निघायचे, असा माझा विचार होता. पण, वडिलांनी त्याला व्यापक रुप दिले. याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. आपणही आमच्या प्रेमापोटी आलात, हे ठाऊक आहे. आपल्या या प्रेमाला आणि विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, याची ग्वाही सुरवातीलाच देतो. या प्रसंगी मी आपणाला ज्युदो या कलाप्रकाराविषयी सांगणार आहे, ते तुम्ही समजून घ्यावे, अशी माझी अपेक्षा आहे. आणि पटले तर आपल्या मुलांना आणि मुलींनाही माझ्याकडे शिकण्यासाठी पाठवा, असे आवाहन करेन.

आपण बोलताना सर्रास ज्युदो-कराटे असा या क्रीडाप्रकारांचा जोडून उल्लेख करतो. पण, एखाद्या रेषेच्या दोन टोकांमध्ये जितके अंतर असते, तितकेच या दोन्ही प्रकारांत आहे. मात्र, ते एका रेषेवरील आहेत, हे खरेच. ही रेषा म्हणजे हे दोन्ही मार्शल आर्ट्सचेच प्रकार आहेत. मार्शल आर्ट म्हणजे शस्त्रविरहित युद्धकला. या प्रकारांत अॅकिदो हा आणखी एक प्रकार आहे. त्याविषयी सुद्धा मी आपणाला सांगेन. तर, ज्युदो हा मूळचा जपानी प्रकार. ज्युदो याचा अर्थ अगदी सहजपणेकरण्यात येणारा प्रतिकार. मार्शल आर्टचे हे सारे प्रकार स्वसंरक्षणाचे आहेत. ज्युदो हा त्यातला सर्वात नजाकतदार प्रकार आहे. हल्लेखोराचा प्रतिकार करीत त्याला निःशस्त्र करणे, तसेच त्याला चपळ शारीरिक हालचालींच्या बळावर जागीच जेरबंद करणे, असा हेतू यामध्ये असतो. जिगारो कानो यांनी जुजित्सू या प्राचीन जापनीज प्रकारामध्ये आधुनिक बदल करीत सन १८८० मध्ये ज्युदो हा प्रकार निर्माण केला. लष्कराने या प्रकाराचा स्वीकार केलाच, पण जपानी शाळांनी सुद्धा आपल्या मुलांसाठी आवश्यक म्हणून ज्युदोचा शालेय शिक्षणात समावेश केला. ज्युदो क्रीडाप्रकार हा तुमची शारीरिक तसेच मानसिक चपळता वृद्धिंगत करण्याचे काम करतो. कराटे हा प्रकार ज्युदोच्या तुलनेत जगभर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला, याचे कारण त्याच्या आक्रमकतेमध्ये आहे. मूळचा चायनीज असलेला हा प्रकार सुमारे १५०० वर्षे इतका जुना आहे. चीनमधून कोरिया, ओकिनावामार्गे तो जपानमध्ये आला. अत्यंत आक्रमक आणि कठोर असा हा प्रकार आहे. यातही देशनिहाय वेगवेगळे प्रकार आहेत. कोरियात, ओकिनावात शोतोकान गोज्यु ऱ्यू, योचि ऱ्यू किंवा क्योक्यूशिंकाई असे प्रकार आहेत. पुढे जपानने त्यामध्ये अनेक बदल करीत हे प्रकार थोडे मृदू करण्याचा प्रयत्न केला, तेच पुढे वाडोऱ्यू, शोक्यूकाई आदी नावांनी प्रसिद्ध झाले. विविध क्रीडा स्पर्धांसाठी हे प्रकार अधिक योग्य म्हणून पुढे आले आणि लोकप्रिय झाले. या दोन्ही प्रकारांच्या पलिकडे अॅकिदो हा आणखी एक प्रकार आहे. मोरिहाई योशिबा हे त्याचे जनक. हा मार्शल आर्टमधला एकदम सोफिस्टिकेटेड प्रकार आहे. यामध्ये तुमच्या शारीरिक व मानसिक चपळतेला सर्वाधिक महत्त्व आहेच, पण, तुमच्या नैतिकतेला आवाहन करणारा हा प्रकार आहे. याचे कारण म्हणजे हल्लेखोराला ईजा न पोहोचविता किंवा कमीत कमी इजा पोहोचवून त्याला निष्प्रभ करण्याची ही कला आहे. खरे तर अॅकिदोमध्ये हल्ला हा प्रकारच नाही. पूर्णतः नैतिक प्रतिकार यात अभिप्रेत असतो. ज्युदो ही या साऱ्या क्रीडाप्रकारांची पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. आपल्या मुलांना विशेषतः मुलींना स्वसंरक्षणाची कला अवगत असणे ही आजची फार मोठी गरज आहे. त्या दृष्टीने माझ्या गावातल्या मुलींनी तयार व्हायला हवे, अशी माझी इच्छा आहे. मुलांमध्येही मुलींना संरक्षण देण्याची भावना रुजविणे, नैतिक मूल्यांची, परस्परांप्रती आदरभावना वाढविणे अशा बाबी याद्वारे साध्य करणे, हा आमचा हे प्रशिक्षण देण्यामागचा हेतू आहे. आपल्या मुलांना आमच्याकडे पाठविल्यानंतर कोणत्याही क्षणी येथील प्रशिक्षणाची पाहणी पालक मंडळी, शिक्षक करू शकतील, इतकी पारदर्शकता त्यामध्ये राहील, याची ग्वाही मी आपणा सर्वांना देतो. आणि आपण आपली मुले ज्युदो शिकण्यासाठी आवर्जून पाठवावीत, असे आवाहन करतो. सुरवात असल्यामुळे प्रथम मर्यादित मुलांना प्रवेश दिला जाईल. पुढे वेटिंग लिस्ट वगैरे पाहून मग बॅचेस वाढविण्याबाबत विचार करण्यात येईल. आता, आपला फार वेळ न घेता मी माझ्या चार सहकाऱ्यांसह आपल्यासमोर काही प्रात्यक्षिके सादर करू. त्यातून आपल्याला सर्वसाधारणपणे ज्युदो म्हणजे काय, याची कल्पना येईल. धन्यवाद. असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा सर्वांना बो केला आणि आपल्या सहकाऱ्यांसमवेत प्रात्यक्षिकांना प्रारंभ केला. पुढचा साधारण तासभर त्यांनी ज्युदोची मूलभूत प्रात्यक्षिके सादर करून साऱ्या उपस्थितांना खिळवून ठेवले. विशेषतः मुलींना स्वसंरक्षणासाठी ज्युदो किती उपयुक्त ठरू शकतो, या संदर्भातली प्रात्यक्षिके तर नितांतसुंदर झाली. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या प्रात्यक्षिकांना दाद दिली. कार्यक्रम संपला. पाटील गुरूजींनी साऱ्यांचे आभार मानले. आम्ही तेथून बाहेर पडलो.

मला तो कार्यक्रम मनापासून भारी वाटला होता. पण, आपण ते शिकावं, असा काही विचार मनात आलेला नव्हता. मात्र, आईच्या डोक्यात काही तरी शिजू लागलेलं होतं. रात्री घरी पोहोचून आईनं पटकन स्वयंपाक केला आणि आम्ही जेवायला बसलो. जेवता जेवता आईनं बाबांकडं विषय काढला. आपला राजू अभ्यासात हुशार आहे. वाचनही दांडगं आहे. पण, लोकांच्यात मिसळण्याच्या बाबतीत मात्र बुजरा आहे. इतर मुलं मैदानात खेळत असताना हा मात्र पुस्तकांच्याच गराड्यात. आपण त्याला ज्युदोच्या क्लासला घातला तर काही काळ का होई ना, पण माणसात जाईल. लोकांशी सहज वागणं, बोलणं होईल. आणि कला शिकेल, ती वेगळीच. बाबांनी त्यावेळी फक्त हं, विचार करू या. इतकंच म्हटलं. मला मात्र जाम टेन्शन आलं. तोपर्यंत फारसा कुठल्या खेळात न रमलेला मी एकदम ज्युदोसारखा खेळ शिकायचा, या विचारानंच टरकलो. पण, आईच्या मनात आलंय म्हटल्यावर आता त्यातून माझी सुटका होणार नव्हती, हे खरं. पण, वडिलांनी तिच्या म्हणण्याला तेवढा जोरकस प्रतिसाद दिला नव्हता, ही माझ्या दृष्टीनं जमेची बाजू होती. पण, बाबा कधीही त्यांचा निर्णय तडकाफडकी घेत नाहीत; काय करायचं, ते विचार करूनच करतात, ही त्यांची सवय मला ठाऊक होती. मात्र, मी आपण होऊन या विषयावर कोणाशी काही बोलायचं नाही, हे ठरवलं.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो, तर वर्गातले शंतनू, युवराज, पंकज, सचिन आणि संतोष असे पाच जण ज्युदोच्या क्लासला जॉईन होणार होते. त्या रात्रीच त्यांनी आपापल्या आईवडिलांच्या मागं लागून परवानगी द्यायला भाग पाडलं होतं. शंतनू माझा जवळचा मित्र असल्यानं त्यानं मी सुद्धा क्लासला यावं, म्हणून जोर लावला होता. मला ती प्रात्यक्षिकं आवडली होती, पण का कोण जाणे, मनातून अजूनही ते शिकावं, असं काही वाटत नव्हतं. याचं कारण मलाही ठाऊक नव्हतं. संध्याकाळी घरी आलो. दूध घेऊन अभ्यासाला बसलो. अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी बाबांनी विषय काढला. म्हणाले, आज मी पाटील गुरूजींशी आणि उदयदादाशी बोललो आहे. पुढच्या सोमवारपासून तो त्याची पहिली बॅच सुरू करतो आहे. मी तुझं नाव नोंदवायला सांगितलंय. उदयला मदत म्हणून दोन महिन्यांची फी आगाऊ दिली आहे. ज्युदोचा तुझ्या मापाचा ड्रेस आपल्याला शिवायला टाकायचाय. उद्या संध्याकाळी आपण गावात जाऊ यात. वडिलांनी या बाबतीत आपल्याला विचारलेलं नाही, तर ते सांगताहेत, हे माझ्या लक्षात आलं. मी खाली मान घातली होती. पण, त्या क्षणी माझ्या पोटात मोठा गोळा उठलेला होता. त्यांचं बोलणं ऐकून आईलाही आनंद झालेला. मी फारशी काही प्रतिक्रिया व्यक्त न करता निमूट अभ्यास करीत राहिलो.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबांच्या बरोबर गावातल्या बऱ्यापैकी मोठ्या असलेल्या सोसायटी कापड दुकानात गेलो. मध्यमवयीन शेटजींनी बाबांना पाहताच नमस्कार केला. म्हणाले, या, या गुरूजी. काय पाहणार?” यावर बाबांनी त्यांना ज्युदोच्या ड्रेससाठी जाड कापड हवे असल्याचे सांगितले. त्यावर हसून शेटजी म्हणाले, तुमी बी, तुमच्या छोकऱ्याला घालणार हाय काय तिथे? मी पण आलोवतो ते बघायला. माझा छोकरा पण वरच्या हायस्कुलात आठवीत हाय. त्येला पण मी तिथं घालणार हाय. आता मागणी येणार म्हणून दुसऱ्याच दिवशी मी शहरातनं कापड मागवलंय. असं म्हणून त्यांनी आपल्या एका नोकराला हाक मारली, शरद, अरे, गुरूजींना ते ज्युदोचं कापड दाखव जरा. आता इथं चॉईस वगैरे काही नव्हतीच. त्यामुळं मला लागेल तितक्या अंदाजे मापानं कापड घेऊन आम्ही लगेच शिवाजी चौकातल्या शिंप्याच्या दुकानात गेलो. बाबांना बघून त्या शिंप्यानंही हातातली बाकीची कामं बाजूला ठेवून पटकन माझी मापं घेतली आणि चार दिवसांनी कपडे शिवून देण्याचा वायदा केला.

सोमवारी सायंकाळी मी ज्युदो क्लासला जाण्यासाठी तयार झालो. पहिला दिवस असल्याने बाबा सोडायला आले. उदयदादाशी थोडं फार बोलून निघाले. वेगवेगळ्या वयोगटातली साधारण १७-१८ मुलं होतो आम्ही. त्यात पाच-सात मुलीही होत्या.

उदय दादानं ज्युदोमध्ये शिक्षकाला सेन्सीम्हणतात, असं सांगितलं. त्यानुसार, तो आमचा सेन्सी होता. शिस्तीचा भाग म्हणून आल्यानंतर व निघताना प्रत्येकाने गुरुंना बो केला पाहिजे, असा बेसिक नियम सांगितला. इतर नियम वेळोवेळी सांगितले जातील, असंही सांगितलं. आम्हाला त्यानं एका रांगेत ठराविक अंतरावर उभं राहण्यास सांगितलं आणि आमच्या प्रशिक्षणाची सुरवात झाली. वॉर्मिंग अपनं सुरवात करताना कोणत्याही क्रीडा प्रकारात वॉर्मिंग अपचं महत्त्व त्यानं सांगितलं. त्यानंतर विविध प्रकारच्या डीप्स, ज्युदोच्या मूलभूत स्टेप्स अशा अनेक बाबी सांगितल्या.

हा दिवस माझ्या आयुष्यातला एक प्रकारे टर्निंग पॉईंट म्हणावा लागेल. माझ्या वर्गमित्रांखेरीज कमी अधिक वयोगटातील नव्या मित्र-मैत्रिणींच्या सान्निध्यात येण्याचा हा प्रसंग होता. माझे बाकीचे मित्र मोकळीक मिळाल्याने एकदम उत्साहात होते. मी त्यांच्यासोबत असलो तरी, माझं बुजरेपण चेहऱ्यावर दिसून येत असावं. त्यामुळं मी स्वतः पुढं होऊन कोणाची ओळख करून घेत नव्हतो. पण, एक अत्यंत प्रसन्न, हसऱ्या चेहऱ्याचा मुलगा मात्र स्वतः सर्व मुलामुलींना भेटून त्यांचा परिचय करून घेत होता. तो माझ्याकडंही आला. म्हणाला, तू गुरूजींचा मुलगा ना? नाव काय तुझं?” मी उत्तरलो,  यशराज. त्यावर तो म्हणाला, व्वा. केवढं छान नाव आहे. मला मौज वाटली. मी त्याला विचारलं, दादा, तुझं नाव काय?” तो उत्तरला, राहुल. एवढ्यात संतोष म्हणाला, अरे, लै मोठा माणूस हाय हा. सगळ्या गावाला कपडे पुरवतो. मला काही न समजून मी गोंधळून त्याच्याकडं पाहात राहिलो. ते लक्षात येऊन राहुलदादाच म्हणाला, तू लक्ष देऊ नको त्याच्याकडं. सोसायटी कापड दुकान आहे ना, ते माझ्या वडिलांचं आहे. म्हणून तसं म्हणतोय तो. मी तर अजून शिकतोय. शिकून झाल्यावर मग मी दुकान चालवायचं की आणखी काही करायचं, ते ठरेल ना. उगीच वडलांच्या जीवावर कशाला गमजा मारायच्या. मला त्याचं ते समंजसपणाचं बोलणं खूप आवडलं. त्यानं बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं, असं काही तरी निश्चितपणानं होतं त्याच्यात. मी त्याला म्हणालो, हो, आम्ही ड्रेसचं कापड घ्यायला गेलो होतो, तेव्हा तुमच्या बाबांनी सांगितलं होतं की, तुलाही इथं यायचंय म्हणून. दादा, तू कितवीला आहेस रे?”

आठवीत. माळावरच्या हायस्कूलमध्ये आहे.आम्ही बोलत उभे होतो, तेवढ्यात बाबा घ्यायला आले. त्यांना पाहून राहुलदादा पुढे झाला. त्यानं बाबांना वाकून नमस्कार केला. म्हणाला, गुरूजी, मी राहुल. आठवीत आहे. तुमचा यशराज खूपच गोड मुलगा आहे. तुमचं घर आमच्या वाटेवरच आहे. उद्यापासून मी त्याला माझ्यासोबत घेऊन येत जाईन आणि सोडतही जाईन. तुम्ही रोज येण्याची गरज नाही. त्यावर बाबांनी त्याचा एक छोटासा गालगुच्चा घेतला आणि म्हणाले, हे तर खूपच छान होईल. आणि आमच्या राजूला सायकलही शिकता येईल. हो की नाही?” “हो, हो. अगदी नक्की. असं म्हणून तो मला बाय म्हणून निघाला. ज्युदो क्लास मला आवडला आणि पहिल्याच दिवशी राहुलदादाची भेट झाल्यानं तो मला अधिकच आवडू लागला.

आता दररोज संध्याकाळी राहुलदादासोबत क्लासला जाणं येणं सुरू झालं. आमच्या वेगवेगळ्या विषयांवर खूप साऱ्या गप्पा होत. सातवीला केंद्राच्या परीक्षेत तो केंद्रात दुसरा आला होता, इतका हुशार होता. फावल्या वेळात, विशेषतः लग्नसराईच्या आणि सणासुदीच्या दिवसांत तो वडिलांना दुकानात पडेल ती मदत करत असे. त्यातून अभ्यास वगैरे सांभाळत असे. हे ऐकून मला त्याच्याबद्दल आदर वाटू लागला. मी तर घरात फारसं काही काम न करता अभ्यास करून नंबर काढतो. पण, दादा गरज नसताना, नोकरचाकर असताना सुद्धा वडिलांना मदत करतो, हे ऐकून आपणही त्याचा आदर्श घ्यावा, असं मला वाटू लागलं. मी बाबांना तसं सांगितलं. म्हटलं, घरातली छोटी छोटी- दूध, किराणा आणणं वगैरे कामं मी करू शकतो. ती मला सांगा. बाबांनी मग मला हळूहळू काही काही कामं सांगायला सुरवात केली. त्यामध्ये दररोज सकाळी दूध कट्ट्यावर जाऊन ताजं अर्धा लीटर दूध तांब्यातून घेऊन येणं, हे काम नित्याचं झालं. राहुलदादानं हाफ पायडल सायकल शिकवली होती. सायकल ढकलीत चालवण्यात मी तरबेज झालो होते. कधी मधी मग बाबांची मोठी सायकल ढकलत नेऊन पिशवीभर किराणा हँडलला अडकवून घेऊन येऊ लागलो. ही काम आधी सांगितली मी कुरकूर करायचो. पण, राहुलदादाचा आदर्श घेऊन मी ही कामं करायला शिकलो.

ज्युदो क्लासमध्येही राहुलदादा त्याच्या सिन्सिरिटीमुळं उदय सेन्सींचा लाडका बनला. आमच्या छोट्यांच्या बॅचची प्रॅक्टीस घेण्याची जबाबदारी कधीकधी ते त्याच्याकडे सोपवायचे. एकदा गंमतीच्या लहरीत मी राहुलदादाला राहुल सेन्सी बोअसं म्हणालो. त्यावर न चिडता त्यानं मला जवळ बोलावलं आणि सांगितलं, हे बघ यशराज, मी तुमची प्रॅक्टीस घेत असताना तुम्ही मला आदरानं बो करणं, हा नियमाचा भाग आहे. पण, सेन्सी होण्यासाठी आपल्याला अद्याप खूप पल्ला गाठायचा आहे. तो गाठला की मग आपण त्याचं क्रेडिट घ्यावं. तुझ्या सेन्सी म्हणण्यानं माझ्या डोक्यात हवा जाऊन मी उदय सेन्सींच्या बरोबर माझी तुलना करू लागलो, तर ते किती चुकीचं होईल. त्यामुळं आपल्या वागण्या-बोलण्यात तारतम्य असायला हवं. मला त्या क्षणी वाईट वाटलं. मी त्याला सॉरी म्हणालो. त्या दिवशी परतताना मी गप्पगप्पच होतो. हे दादाच्या लक्षात आलं. एरव्हीप्रमाणं डबलसीट न येता आपण आज चालतच जाऊ, असे दादा म्हणाला. यशराज, तो बोलू लागला. माझी मान खालीच होती. तुला वाईट वाटावं, म्हणून बोललो नाही मी मघाशी. एखादी गोष्ट चुकीची घडतेय, असं वाटलं तर ती संबंधिताला लगेच सांगितली तर काही क्षण त्याला वाईट वाटू शकेल; जसं तुला आता वाटतं आहे. पण, विचार केलास तर तुझ्या लक्षात येईल की, मी तुझ्या भल्यासाठीच ते सांगितलं. मी आज बोललो नसतो आणि पुन्हा कधी तरी तू त्याच पद्धतीने उदय सेन्सींसमोर तशा प्रकारे वागला असतास, तर त्यांच्या मनात माझ्याबद्दलही गैरसमज झाला असता. कोणत्याही विद्यार्थ्यानं कधीही स्वतःच्या गुरूशी स्पर्धा करू नये, त्याने गुरूचे आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानं आपली कारकीर्द घडविण्याचं काम करावं. शिष्य आपल्याहूनही मोठा झाला की गुरूला अवर्णनीय आनंद होतो. आता हे बघ, तुझे वडिल प्राथमिक शाळेत गुरूजी आहेत. ते सातवीपर्यंत शिकवितात. स्वतः त्यांनी बी.एड. वगैरे केलेलं असेल. त्यांचे कितीतरी विद्यार्थी भविष्यात त्यांच्यापेक्षाही अधिक उच्चशिक्षण घेऊन मोठे होतील, मोठमोठे अधिकारी वगैरे होतील. पण, म्हणून गुरूजींनी स्वतःला कमी लेखण्याचं किंवा त्या शिष्यांनीही त्यांच्यापेक्षा स्वतःला मोठं समजण्याची गरज नसते. या गुरूजींनी आपला पाया घातल्यामुळं आपण ही भरारी मारू शकलो, ही जाणीव शिष्याच्या मनात असायला हवी. तरच, त्याला खरा शिष्य म्हणावा. त्यामुळं आपण आपल्या सेन्सींचा किंवा कोणत्याही गुरूंचा कुठल्याही प्रकारे जाणते-अजाणतेपणी अवमान होऊ नये, याची दक्षता घ्यायला हवी. ती जाणीव करून देणं एक मोठा भाऊ म्हणून मला माझं कर्तव्य वाटलं, म्हणून मी तुला बोललो. तुला वाईट वाटलं असेल तर मी मनापासून तुझी क्षमा मागतो. राहुलदादा सांगत होता, तसतसे माझे डोळे उघडत होते. त्यानं क्षमा मागता क्षणी मात्र माझ्या डोळ्यात पाणी आलं. मीच त्याची पुन्हा एकदा मनापासून माफी मागितली. माझ्या डोळ्यातलं पाणी पुसून मग हसत हसत तो म्हणाला, यशराजे, असं डोळ्यांत पाणी आणून कसं चालेल? चला, टाका पायडलवर पाय आणि हाणा सायकल. आणि आम्ही हसत हसत निघालो.

राहुलदादाचं आणखी एक रुप मला पाह्यला मिळालं. उदयदादा, त्याच्या गुरूंना भेटायला शहरात गेला होता, त्या दिवशी राहुलदादाच आमची प्रॅक्टीस घेत होता. प्रॅक्टीसच्या अखेरीस काही फाईट खेळून त्यातल्या त्रुटी पाहून दुरुस्त्या करायच्या, असा आमचा शिरस्ता असे. सेन्सी नसल्यानं त्या दिवशी फाईट खेळवण्यात येणार नव्हत्या. पण, आम्ही सगळ्यांनी कल्ला करून राहुलदादाला फाईट घेण्यास सांगितलं. तो अजिबातच तयार नव्हता, पण, आम्ही सगळेच इरेला पेटल्यामुळे अखेरीस त्याने मोजक्या फाईट खेळू, असं सांगितलं. आमच्या जोड्या त्यानं ठरवून दिल्या आणि एकेक फाईट सुरू झाली. शेवटची फाईट प्रशांत आणि सचिन यांच्यात सुरू झाली. एक थ्रो टाकण्याच्या प्रयत्नात काही तरी गडबड झाली आणि प्रशांतची टाच अतिशय जोराने सचिनच्या पायावर बसली. काही समजायच्या आत सचिन मोठ्यानं ओरडला आणि फाईट सोडून खालीच बसला आणि विव्हळू लागला. सुरवातीला आम्हाला गंमत वाटली, पण तो पाय धरूनच बसला होता. त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहू लागलं. राहुलदादानं त्याचा पाय हलवायचा प्रयत्न केला, मात्र सचिनला खूपच वेदना होत होती. प्रसंगाचं गांभीर्य राहुलदादाच्या लक्षात आलं. त्यानं संतोषला मला माझ्या घरी सोडायला सांगितलं. सर्वांना आपापल्या घरी जा, असं सांगून त्यानं सचिनला अक्षरशः उचलून आपल्या सायकलच्या स्टँडवर बसवलं आणि गावातल्या जोशी डॉक्टरांच्या दवाखान्यात घेऊन गेला. सचिनला डॉक्टरांच्या ताब्यात सोपवून तो सचिनच्या घरी गेला. त्याच्या बाबांना परिस्थिती सांगून दवाखान्यात घेऊन आला. सचिनच्या करंगळीचं हाड हेअरलाईन फ्रॅक्चर झालं होतं. त्याच्या पायाला डॉक्टरांनी प्लास्टर केलं. तो त्याच्या वडिलांबरोबर घरी गेल्यानंतरच राहुलदादा घरी गेला.

दुसऱ्या दिवशी उदय सेन्सींना हा प्रसंग समजला. त्यांनी राहुलदादाला विचारलं. त्यानं सारं काही सांगितलं, पण आम्ही फाईटसाठी केलेला दंगा वगळून. त्यामुळं कधीही आपला ताबा न गमावणारे उदय सेन्सी सुद्धा थोडे भडकले. राहुल, मी नसताना फाईट खेळायच्या नाहीत, हे माहिती आहे ना? तसं असूनही तू त्या का खेळवल्यास? तुझ्या या वागण्यामुळं त्या लेकराला आता विनाकारण चाळीस दिवस प्लास्टरमध्ये पाय घालून फिरावं लागेल. याला जबाबदार कोण?” राहुलदादा काही प्रत्युत्तर न देता आमच्या साऱ्यांची चूक स्वतःवर घेऊन निमूट उभा होता. आम्ही सारेही अपराधी भावनेनं खाली माना घालून उभे होतो. पण, बोलण्याचं धाडस कोणीच करीत नव्हतं. मात्र, राहुलदादाची चूक नसताना त्याला आमच्यासाठी ऐकून घ्यावं लागतंय, हे मला सहन होईना. मी हात वर केला. सेन्सींनी ते पाहून विचारलं, येस्स?” “सेन्सी, मी थोडा घाबरत बोलू लागलो, सेन्सी, यात खरं तर राहुलदादाची काही चूक नाही. चूक आमच्या सर्वांची आहे. राहुलदादा नाही म्हणत असताना आम्ही त्याला फाईट घ्यायला भाग पाडलं. त्यातून हे सारं घडलं. सचिनच्या अपघाताला राहुलदादा नाही, तर आम्ही सर्व जबाबदार आहोत. यावर सेन्सी कसे रिअॅक्ट होतील, माहिती नव्हतं. त्यांच्या डोळ्यात डोळा घालून बोलण्याचं धाडस नव्हतं. बोलून झाल्यावर मी मान खाली घालून उभा राहिलो. उदय सेन्सी माझ्या अगदी जवळ आले. माझ्या छातीतली धडधड वाढली. आता ते काय करतात, इकडं साऱ्यांचेच डोळे लागलेले. सेन्सींनी पुढं होऊन माझ्या केसांत हात घालून हळुवार कुरवाळलं. मी आश्चर्यानं वर पाहिलं. सेन्सींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. ग्रेट. एव्हरीबडी क्लॅप फॉर यशराज. असं त्यांनी सांगितलं. मला काही समजेना. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या खऱ्या, पण त्यांनाही काही समजलं नव्हतं. सेन्सी पुढं बोलू लागले. माझ्या मित्रांनो, तुम्ही इथे केवळ ज्युदो शिकायला येताहात, असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. ज्युदो हा केवळ एक क्रीडा प्रकार नाही, तर आयुष्यात शिस्त, संयम आणि सच्चेपणा या गोष्टी सुद्धा ज्युदो तुमच्यात विकसित करत असते. यशराजनं दिलेली कबुली तुमच्यापैकी इतर कोणीही देऊ शकलं असतं. पण, आपल्या चुकीपायी राहुलला सेन्सी रागावताहेत, असं लक्षात आल्यानं कोणत्याही परिणामाची पर्वा न करता पुढं होऊन ती चूक कबूल करण्याचं धाडस दाखवलं, ते केवळ यशराजनं. म्हणून मी त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. मित्रांनो, तुम्ही शारीरिक ज्युदो शिकलात, पण, राहुल आणि यशराज यांनी त्यातलं खरं मर्म ओळखलं. राहुल सुद्धा मला आल्या आल्या सारं खरं सांगू शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही. एक सेन्सी म्हणून आपल्यावर सोपविलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे, ही जाणीव त्याच्यात विकसित झाली आहे. त्यामुळं राहुलचंही टाळ्या वाजवून आपण सारे अभिनंदन करू या. मला आनंद आहे की माझे दोन विद्यार्थी ज्युदोचं खरं मर्म ओळखू शकले आहेत. इतरांनीही त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. असं म्हणून सेन्सींनी टाळ्या वाजवण्यास सुरवात केली. आणि टाळ्यांचा मोठा गजरच मग पुढची पाच मिनिटे होत राहिला. राहुलदादानं त्या क्षणी माझ्याकडं अत्यंत प्रेमानं पाहिलं आणि माझ्याकडे पाहातच तो टाळ्या वाजवू लागला. मी सुद्धा त्याच्यासाठी टाळ्या वाजविल्या.

राहुलदादाचे आणि माझे मैत्रीचे बंध असे दिवसेंदिवस दृढ होत गेले. अभ्यासातल्या शंका सुद्धा मी त्याला विचारू लागलो. जणू काही तो माझा एक चांगला मार्गदर्शकच बनला होता. त्या वर्षीच्या बेल्ट फेडरेशन स्पर्धेत राहुलदादासह संतोष आणि युवराज हे दोघेही यलो बेल्टधारक झाले. सेन्सींनी त्या वर्षी मला स्पर्धेत उतरविले नाही. पाहता पाहता आमच्या ज्युदो हॉलला एक वर्ष पूर्ण झालं. ही वर्षपूर्ती वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी करायची असं सेन्सींनी ठरवलं. त्यात वृक्षारोपण, गावातल्या विविध शाळांत डेमॉन्स्ट्रेशन्स, ज्युदो कलेशी निगडित चित्रपटांचा महोत्सव, उदयदादांच्या गुरूंचे विशेष व्याख्यान व अॅकिदोचा डेमो आणि सर्वात शेवटी माळावरील निसर्गरम्य पाझर तलाव परिसरात पिकनिक असा भरगच्च कार्यक्रम ठरविला. घरी बाबांची इतर साऱ्या उपक्रमांना मान्यता मिळालेली होती. पण, पिकनिकसाठी मात्र ते राजी झालेले नव्हते. मी कधी नव्हे, इतका हट्टाला पेटलेलो होतो. ज्युदो हॉलमधले सगळे जण जाणार आहेत. मला पण जायचंय. जाऊ द्या ना!’ अशा प्रकारे रडून-ओरडून, अनेकानेक प्रकार करून पाहिले, पण का कोण जाणे, बाबा काही परवानगी द्यायला तयार नव्हते. आईच्या मार्फतही त्यांना सांगून पाहिलं, पण तिलाही नकारच मिळाला.

संध्याकाळी राहुलदादाला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, यशराज, अरे मलाही पिकनिकला जायला मिळणार नाहीये. मी विचारलं, का?” त्यावर तो सांगू लागला, अरे, माझे आईवडिल, बहीण असे सारेच उत्तर भारतात देवदर्शनासाठी गेले आहेत. शिखरजींचं दर्शन वगैरे करून ते येणार आहेत. मलाही चल म्हणत होते, पण जवळजवळ महिनाभर शाळा बुडवणं, मला काही पटलं नाही. म्हणून मी नाही म्हणून सांगितलं. घरी आजी-आजोबा आहेत. आजोबा दुकान सांभाळताहेत आणि आजी मला. मी त्यांना विचारलं, तर त्यांनी मला आईवडिल घरात नसताना आणि त्यांना न विचारता तुला त्यांच्या माघारी असं पिकनिकला पाठवणं, योग्य वाटत नाही, म्हणून सांगितलंय. दोन चार दिवसांतून कधी तरी पापांचा फोन येतो, तेव्हा मी आजीला त्यांना विचारायला सांगेन. त्यांची परवानगी मिळाली, तर जाईन. मला तेवढंच बरं वाटलं. म्हटलं, चला, पिकनिकला न जाणाऱ्यांत आपल्यासोबत राहुलदादा तरी आहे.

पिकनिकचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी शंतनू आणि युवराज मला बोलवायला आले. बाबा बाजारात गेले होते. अखेरचा पर्याय म्हणून पुन्हा एकदा स्वयंपाकघरात जाऊन आईला विचारले. त्यावर ती उत्तरली, बाळा, बाबांनी तुला नको म्हणून सांगितलंय ना. एकदा सांगितलेलं ऐकावं. उगीच मलाही आणि स्वतःलाही त्रास करून घेऊ नकोस. जा, सांग जा दोस्तांना तुझ्या. मी रडवेल्या चेहऱ्यानं त्यांना नाही म्हणून सांगितलं. ते जसे आमच्या दारातून गेले, तसा दिवसभर मी घुश्श्यातच होतो. आई-बाबांच्या ते लक्षात आलं, पण मला फार काही न छेडता त्यांनी मला माझ्या त्या अवस्थेत राहू दिलं. कदाचित छेडलं तर माझ्या रागाचा विस्फोट होईल, हे त्यांनी ताडलं असावं.

संध्याकाळी शेजारच्या बोडके काकांनी बाबांना हाक मारून बाहेर बोलावले. ते नुकतेच कामावरुन घरी आले होते. दोघांचे हळू आवाजात काही बोलणे झाले. बाबा घरात आले. कपडे चढवून गडबडीने बाहेर पडले. आईने विचारल्यानंतर परत येऊन सांगतो, म्हणाले.

तासाभराने बाबा घरी आले आणि तोंडावर पाणी मारुन खुर्चीत डोळे मिटून तसेच बसून राहिले. काही तरी झालंय, हे आईच्या लक्षात आलं. तिनं चहाला आधण ठेवलं आणि चहा झाल्यानंतरच बाबांना हाक मारली. चहाचा कप तिनं बाबांच्या हातात ठेवला. बाबांनी मलाही बोलावलं. दूध घ्यायला सांगितलं. दुपारपर्यंत मला पिकनिकला जाण्याची आशा होती. आता एव्हाना सगळे मजा करून परत आलेही असतील. आता राग काढून काही उपयोग नाही, असा विचार करून मी त्यांच्याशेजारी बसलो. बाबांनी चहाचा कप आईच्या हाती दिला. मी दूध घेत असताना माझ्या डोक्यावरुन त्यांनी हात फिरवला. आईनं विषयाला तोंड फोडलं, काय झालं?” बाबांनी तिच्याकडं पाहात सांगतो असं जणू नजरेनंच खुणावलं. जणू मनातल्या मनात ते शब्दांची जुळवाजुळव करीत असावेत. माझं दूध पिऊन संपलं. आणि बाबांनी ते वाक्य उच्चारलं, राजू, तुझा राहुलदादा गेला रे. मला क्षणभर काही समजेनाच. गेला म्हणजे काय? कुठे गेला? कसा गेला? अन् असा कसा गेला? मी पूर्णतः गोंधळून गेलो. आईनं तर धक्क्यानं हुंदका बाहेर येऊ नये म्हणून तोंडात साडीचा बोळाच कोंबलेला. बाबा काही क्षण स्तब्ध राहिले आणि सांगू लागले, आता मी सरकारी दवाखान्याकडूनच येतोय. तिथं पाटील गुरूजी, उदयदादा आणि तुझे सारे मित्र भेटले, जे आजच्या पिकनिकला गेले होते.

मी त्यांना तोडत मध्येच बोललो, पण, राहुलदादा तर जाणारच नव्हता पिकनिकला. त्यानंच मला सांगितलेलं.

बाबा पुढं बोलू लागले, हो, खरंय ते. पण, काल रात्री त्याच्या वडलांचा फोन आला असताना त्यानं हट्टानं परवानगी मिळवली. तो येणार नाही, हे माहीत असल्यानं त्याला बोलवायलाही कुणी गेलं नव्हतं. आज त्याला उठायलाही थोडा उशीर झाला. आजीच्या मागं लागून त्यानं पिकनिकसाठी डबा करून घेतला आणि पळत जाऊन वेशीपाशी तुमच्या ग्रुपला गाठलं आणि त्यांच्यासोबत गेला. तिथं जाऊन दुपारपर्यंत त्यांची गप्पा-गाणी झाली. जेवणं झाली. आणि त्यानंतर कोणाच्या तरी मनात पाझर तलावात पोहायचा विचार आला. ज्यांना पोहायला येतंय, अशाच मुलांना उदयनं पोहायची परवानगी दिली. तो स्वतः काठावर उभा राहून सर्वांवर लक्ष ठेवून होता. राहुल खरं तर पट्टीचा पोहणारा मुलगा. पण, ज्युदोची गोणपाटासारखी जाड पँट घालूनच तो पोहायला उतरला. एक तर जेवणं झालेली, त्यात या पँटमुळं त्याला पाय मारणं जड जात होतं. तशात तलावातल्या एका भोवऱ्यात तो सापडला. काही कळायच्या आत गटांगळ्या खात तो बुडू लागला. सर्वांना हाका मारुन मदतीला बोलावण्याचा प्रयत्न करू लागला. इतर काठाकाठानं पोहणाऱ्या मुलांना तो गंमत करतोय, असं वाटून तेही त्याला हाका मारु लागले. पण, दोन-तीन गटांगळ्यात तो दिसेनासा झाल्यानं उदयला संशय आला. त्यानं अजिबात वेळ न दवडता पाण्यात उडी घेतली. पण, राहुल काही केल्या सापडेना. आणखी दोघा तिघांनीही त्याचा पाण्यात शोध घेतला. अखेरीस उदयलाच तो दिसला. त्याला त्यानं एका हातानं खेचत काठावर आणलं. त्याच्या पाठीवर, छातीवर दाब देऊन शक्य होईल, तितकं पाणी बाहेर काढलं. तोपर्यंत एकानं स्कूटरची व्यवस्था केली आणि त्याला घेऊन लगोलग सरकारी इस्पितळात आले. डॉक्टरांनी राहुलला तपासलं, पण तो तिथं आणण्यापूर्वीच सारं काही संपल्याचं त्यांनी सांगितलं. उदय आणि गुरूजी खूप चिंतेत आहेत. बाकीची मुलं खूप घाबरलीयत. एकमेकांच्या गळ्यात पडून रडताहेत. पोलीसांनी सगळ्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. माझ्या गळ्यात आवंढा दाटून आलेला. राहुलदादाचा हसरा चेहरा नजरेसमोर तरळत होता. त्यातूनही मी बाबांना विचारलं, बाबा, पण त्याचे घरचे सगळेच आता देवदर्शनाला खूप लांब गेलेत. त्यांना कसं कळणार हे?” त्यावर बाबा म्हणाले, पोलीसांनी काल जिथून त्यांचा फोन आला होता, तिथे आणि आज जिथे असतील, तिथे संपर्क साधायचा प्रयत्न चालवला आहे. ते येईपर्यंत शवागार नसल्यानं बर्फाच्या लादीवर राहुलचा मृतदेह ठेवण्यात येणार आहे.

कालपर्यंत जो राहुलदादा माझा सखा, सवंगडी, मोठा भाऊ म्हणून सोबत वावरत होता, मला चांगल्या गोष्टी सांगत होता, तो आता इथून पुढे मला कधीही दिसणार नाही, भेटणार नाही, बोलणार नाही, ही कल्पनाच मला असह्य होत होती. वयानं काही वर्षांनी मोठा असला तरी त्याच्याशी माझं जे मैत्र जुळलेलं होतं, ते वयातीत होतं. साऱ्या गोष्टी माझ्यासाठी अकल्पनीय होत्या. खरं तर, माझी पिकनिक चुकल्याचं दुःख थोडं सुसह्य झालं होतं, ते यामुळंच की, राहुलदादा सुद्धा घरातच आहे आपल्यासारखा. जणू मला त्यानं रोखून ठेवलं होतं आणि आपण मात्र पुढं निघून गेला होता. काय गरज होती त्याला सगळ्यांच्या मागून पळत जाण्याची? मी त्याच्या सांगण्यानुसार आज्ञाधारकासारखा घरी बसलो होतो आणि त्यानं कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच एखादी कक्षा तोडून पुढं जाण्याचं धाडस केलं होतं, जे त्याच्यासाठी अखेरचंही ठरलं.

डोक्यात नुसतं विचारांचं काहूर माजलं होतं. मी बाबांना घट्ट मिठी मारली. त्यांना म्हणालो, मला राहुलदादाला बघायचंय. बाबांनी मला थोपटलं, म्हणाले, आज खूप गर्दी आहे हॉस्पिटलात. उद्या घेऊन जाईन तुला.

दुसऱ्या दिवशी बाबांसोबत मी हॉस्पिटलच्या आवारातील राहुलदादाला ठेवलेल्या खोलीबाहेर पोहोचलो. त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. गावातल्या प्रसिद्ध शेटजींचा तो मुलगा तर होताच, पण त्याच्या सुस्वभावानंही अनेक लोक त्यानं या वयातच जोडलेले होते. प्रत्येक जण हळहळत होता. बायका डोळे पुसत होत्या. त्याच्या शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थीही होते, त्या गर्दीत! आणि त्याच गर्दीत मला तीही दिसली. तिच्या वडिलांचा हात धरून अंत्यदर्शनाच्या रांगेत उभी होती. रडत होती, डोळे पुसत होती. एका संध्याकाळी राहुलदादा आणि मी क्लासवरुन चालत बोलत घरी येत होतो. त्यावेळी रस्त्यात अचानकच राहुलदादा बोलायचा थांबला. मला त्यानं नजरेनंच बाजूला व्हायला सांगितलं आणि स्टँड लावून सायकलची चेन तपासायला सुरवात केली. मी काय झालं म्हणून तिकडं पाहात असतानाच, राहुलदादाची नजर मात्र रस्त्याच्या पलिकडून चाललेल्या तिच्यावर खिळलेली होती. चेन तर तशीच असल्याचं पाहून मी दादाकडं पाहिलं, तर याचं लक्ष तिच्याकडं! ‘ती नजरेच्या टप्प्याआड गेल्यावर हात झाडत हा उभा राहिला, म्हणाला, चलो. मी विचारलं, राहुलदादा, काय रे हे?” त्यावर तो उत्तरला, मोठी माणसं ज्याला प्रेम वगैरे म्हणतात, ते असावं कदाचित. ती माझ्या वर्गातच आहे. मला तिच्याकडं पाहावंसं वाटतं; पाहातच राहावंसं वाटतं. बोलावंसंही वाटतं, पण ती परिसरात कुठेही दिसली की छातीतली धडधड वाढते, घशाला कोरड पडते. बोलण्याची बात तर दूरच! पण, हे बघ, हे आपल्या दोघांतलंच सिक्रेट हं! कोणाला बोलू नको. अजून आपल्याला खूप शिकायचंय. मोठं व्हायचंय. त्यानंतर मग प्रपोज वगैरेही करता येईल. पण, तोपर्यंत हे कोणालाही सांगायचं नाही. प्रॉमिस?” मी त्याच्या हातावर हात ठेवीत गॉड प्रॉमिस!’ असं उत्तरलो होतो.

तिला पाहून तो प्रसंग मला आठवला आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. राहुलदादाचं सिक्रेट आता कायमचं सिक्रेट म्हणूनच माझ्याबरोबर राहणार होतं. आता कोणाला सांगून तरी काय उपयोग होणार होता? खूप लांबवरचं प्रॉमिस त्यानं माझ्याकडून घेतलेलं होतं. मला हुंदका आवरेना. बाबांनी मला उचलून वर घेतलं, ते मला पाठीवर थोपटत राहिले. त्या खोलीचं दार जसजसं जवळ येईल, तसतसं माझ्या छातीतली धडधड वाढू लागली. अखेर आमचा नंबर आला. बाबा आणि मी त्या खोलीत गेलो. बर्फाच्या लादीवर पहुडलेला राहुलदादा जणू काही आताच झोपल्यासारखा वाटत होता. कधीही उठेल आणि म्हणेल, चल, जाऊ या हॉलवर. असं वाटावं. राहुलदादासोबतचा प्रत्येक क्षण मला आठवू लागला. मी बाबांच्या कडेवरुन उतरलो. माझ्या भावनांना आवर घातला. राहुलदादा पुन्हा कधीही दिसणार नाही, या विचारानं त्याला डोळे भरून पाहून घेतलं. माझ्या त्या वयामध्ये शाळेतल्या शिक्षकांच्या पलिकडे ज्यानं मला मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं, असा राहुलदादा माझ्या आयुष्यातला पहिला गुरूच होता. मी पहिल्यांदा त्याला राहुल सेन्सी म्हणून हाक मारली होती, तेव्हा त्यानं उच्चारलेली वाक्यं मला आठवू लागली, गुरूजींनी आपल्या आयुष्याचा पाया घातल्यामुळं आपण ही भरारी मारू शकलो, ही जाणीव शिष्याच्या मनात असायला हवी. तरच, त्याला खरा शिष्य म्हणावा. माझ्या आयुष्यात सद्गुणांवर विश्वास ठेवून त्यानुसार वाटचाल करायला शिकविणारा राहुलदादा पहिला होता. माझ्या आयुष्याला दिशा देणारा तो एक सच्चा सेन्सी होता. मी बर्फाच्या लादीवर पहुडलेल्या माझ्या राहुल सेन्सीकडे एकवार पाहिलं आणि राहुल सेन्सी बो, असे म्हणून कमरेत झुकून त्या मार्गदात्याला अखेरचा सलाम केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा