रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

‘पीआरसीआय’च्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे राष्ट्रीय वेबिनार

माहिती तंत्रज्ञानाच्या रेट्यात जनसंपर्काची साधने बदलली, तरी मूल्ये कायम: डॉ. जगन्नाथ पाटील

 

 

पीआरसीआय-कोल्हापूर चॅप्टरच्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये बीजभाषण करताना डॉ. जगन्नाथ पाटील

कोल्हापूर, दि. ८ नोव्हेंबर: बदलत्या व गतिमान माहिती तंत्रज्ञानाच्या रेट्यात जनसंपर्काची साधने व कार्यपद्धती बदलली असली तरी मूल्ये मात्र कायमच राहतील, अशी ग्वाही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माध्यम व शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी आज दिली.

पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीआरसीआय) कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने समाजमाध्यमांच्या प्रस्फोटात जनसंपर्काच्या न्यू नॉर्मल्सची निश्चिती या विषयावर आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये बीजभाषक म्हणून ते बोलत होते. यावेळी पीआरसीआयचे संस्थापक अध्यक्ष एम.बी. जयराम, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी. विनय कुमार प्रमुख उपस्थित होते.

डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, माहिती तंत्रज्ञान मोठ्या गतीने बदलत आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. केवळ कोविडमुळेच नव्हे, तर या गतिमान बदलांमुळे आधीपासूनच सारी क्षेत्रे प्रभावित झाली. कोविडच्या काळात ही गती वाढली इतकेच. माध्यमे व जनसंपर्काच्या क्षेत्रावर तर याचा सर्वाधिक प्रभाव पडला. डिजीटल तंत्रज्ञान, वाढलेली डाटा मागणी यामुळे माहितीचा प्रस्फोट झाला. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. समाजमाध्यमांवर दहापेक्षा अधिक अकाऊंट असणाऱ्यांतही भारतीय अग्रेसर आहेत. त्यातच एकविसाव्या शतकात जन्माला आलेली जनरेशन-झेड ही पूर्णतः या नव्या माध्यमांवरच अवलंबून आहे. त्याचा परिणाम पारंपरिक माध्यमांवर निश्चितपणे झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आवश्यक बदल जनसंपर्क क्षेत्राने स्वीकारणे आवश्यक आहे. त्यामुळे आता जनसंपर्क हा पब्लिक रिलेशन्सऐवजी पब्लिक एंगेजमेंटचा विषय झालेला आहे. तथापि, तंत्रज्ञान व शैली बदलली तरी जनसंपर्काची विश्वासार्हता, सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि दर्जा ही मूलभूत मूल्ये मात्र कायमच राहतील.


कृत्रिम बुद्धिमत्तेचा नितीमान वापर आवश्यक: डॉ. आर.के. कामत

पीआरसीआय-कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना प्रा. (डॉ.) आर.के. कामत


यावेळी वेबिनारमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता: जनसंपर्क क्षेत्रासाठी वरदान की धोका?’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत यांनी विवेचन केले. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे आजचे वास्तव आहे. माध्यम व जनसंपर्काचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अमेरिकेत न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यांसारख्या प्रख्यात वृत्तपत्रांमध्ये आता ऑटोमेटेड वार्तांचे युग सुरू झाले आहे. भूकंप, हवामान आदींच्या बातम्या बॉट्स मशीन करू लागले आहेत. त्यामध्ये मानवाचा कमीत कमी हस्तक्षेप आहे. वार्तांचे भावनिक विश्लेषण करून त्यानुसार वार्ता प्रसारणाचा प्राधान्यक्रम ठरतो आहे. स्पीच टू टेक्स्ट ट्रान्स्क्रीप्शन, टॉक टू ट्रान्सफॉर्मर, अलेक्झा, सिरी ही सर्व या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक संशोधनाचीच फलिते आहेत. जनसंपर्काचा हा चौथा टप्पा स्टार्ट-अपद्वारे नवनिर्मित संशोधनाचा परिपाक आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नजीकच्या काळात १.८ दशलक्ष लोकांचे रोजगार जाणार आहेत, तर नवे २.३ दशलक्ष रोजगार निर्माणही होणार आहेत. तथापि, या कृत्रिम बुद्धिमत्ताधारित तंत्रज्ञानाचा आपण किती नितीमानतेने व सजगपणे वापर करतो, यावर ते मानवी समुदायासाठी वरदान की अस्तित्वाला धोकादायक, ते आगामी काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.  

सुरवातीला वेबिनारचे उद्घाटन पीआरसीआयचे संस्थापक अध्यक्ष एम.बी. जयराम यांनी केले. पश्चिम विभागीय अध्यक्ष अविनाश गवई यांनी स्वागत केले. चंदीगड येथील पंजाब विद्यापीठाच्या जनसंपर्क संचालक व पीआरसीआय-उत्तर विभागाच्या अध्यक्ष रेणुका सलवान यांनी पीआरसीआयच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सहसचिव डॉ. आलोक जत्राटकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. पूर्वा गोडसे यांनी सूत्रसंचालन केले, तर कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी आभार मानले. वेबिनारला शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे कुलपतीनियुक्त सदस्य अमित कुलकर्णी, पीआरसीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष के. रविंद्रन, सरचिटणीस यु.एस. कुट्टी, पीआरसीआय-यंग कम्युनिकेटर्स क्लबच्या अध्यक्ष श्रीमती गीता शंकर यांच्यासह पीआरसीआयच्या देशभरातील विविध चॅप्टरचे प्रमुख व सदस्य, जनसंपर्क व्यावसायिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा