शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

नाव... तिचं, माझं, तुमचं..!

 


मुलगी माझी लहान होती. तिच्या गॅदरिंगला गेलो होतो. मुलीचा परफॉर्मन्स खूपच देखणा झाला, तेव्हा सूत्रसंचालकानं तिला शेवटी पुन्हा स्टेजवर बोलावलं आणि नाव विचारलं. आधीच तिचा कलाविष्कार पाहून माझा ऊर अभिमानानं भरून आला होताच. पण, आता मुलीला पुन्हा बोलावून तिचं नाव विचारणं ही तर मोठीच गोष्ट होती. त्यातही माझा सुप्त स्वार्थ असा की, आता मुलगी तिचं संपूर्ण नाव सांगेल. मग, त्या खचाखच भरलेल्या सभागृहाला माझं नावही समजेल. पण लेकीनं या विचाराच्या ठिकऱ्या उडवल्या. सूत्रसंचालकानं दोन वेळा विचारुनही तिनं निरागसपणानं केवळ तिचं फर्स्टनेमच सांगितलं. मन खट्टू झालं. या पोरीला कोणीही नाव विचारलं की, पूर्ण नाव सांगायचं, असं आपण आपल्या संस्कारातनं शिकवलं होतं. मात्र, तिनं त्यावर पूर्ण बोळा फिरवल्यानं मन उदास झालं. पण काही क्षणच...

पुढचा परफॉर्मन्स सुरू झाला होता, पण बसल्या जागी माझं मन मात्र माझ्या त्या अपेक्षेची कारणमीमांसा करण्यात गुंतलं. खरं तर, मी मुलीला जन्म दिला. जन्म कसला? केवळ बीज तर दिलं. जन्माची सारी प्रक्रिया, कळा साऱ्या तर तिच्या आईनंच सोसलेल्या! पण, पुरूषसत्ताक समाजात मुलांच्या नावापुढं नाव लागतं ते मात्र केवळ बापाचं. आता काही मुलं आपल्या आईलाही बापाच्या बरोबरीचं स्थान आपल्या नावात देऊ लागलीत, हे खरं! पण, समाजाच्या दृष्टीनं बंड पुरोगामीच ती. मला मात्र लेकीनं एकदम ताळ्यावर आणलं. माझं नाव न घेऊन तिनं माझ्यावर थोर उपकारच केले, असं वाटायला लागलं. तिनं घेतलं असतं तर क्षणिक माझा स्वाभिमान कुरवाळला, गोंजारला, जपला गेला असता. पण, पाहा ना! तिला वाढविण्यात, पोसण्यात तिच्या आईचं माझ्यापेक्षाही किती तरी अधिक योगदान असतं. तिनं मात्र, माझं नाव पुकारलं जाण्यातच आनंद मानायचा, हे किती अन्यायकारक? आणखी एक म्हणजे, माझी मुलगी छान नाचते. आमची अवस्था मात्र अंगण वाकडे अशी. आता तिच्या नाचाचं श्रेय अगदी नावानं सुद्धा मी घेता कामा नये, अशी वस्तुस्थिती. ते श्रेय तिच्या गुरूंचं अन् तिचंच खरं तर! यात, मी मात्र मिरवून घ्यायचं, हे किती बरोबर?

त्यामुळं मुलीनं तिच्या लहानपणीच अजाणतेपणी का असे ना, तिचं नावानिशी स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित केलं, ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटली. आपण नेमकं चुकतो ते तिथंच. आपल्या आशाआकांक्षा, अपेक्षा जन्मापासून आपण नुसतं त्यांच्यावर लादायला सुरू करतो- गाढवावर ओझं लादावं तसं! असं करताना आपण त्या छोट्या जीवांचा विचारही करत नाही की, त्यांना काय हवंय? त्यांना काय वाटतंय? जन्म दिला म्हणजे जणू काही मालकच झालो आपण त्यांचे! आणि या गुलामांनी आपण म्हणू तसंच वागलं आणि केलं पाहिजे, हा शिरस्ता- शिस्त आणि संस्कार म्हणून आपण त्यांच्यावर बिंबवतो, लादतो. त्यांचं माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तीमत्त्व आहे, हे मान्यच करीत नाही आपण. त्यातून मग सारे प्रॉब्लेम सुरू होतात. पालक आणि मुलांच्यात दरी पडण्याचे, कुटुंबात विसंवाद वाढण्याचे एक कारण हे सुद्धा आहे. दहावी-बारावीला असणाऱ्या मुलांची घरं पाहिल्यावर समजतच नाही की परीक्षा त्यांची आहे की त्यांच्या आईबापांची? थ्री ईडियट्ससारख्या चित्रपटानं यावर खूप उत्तम भाष्य केलं आहे. कामयाब नहीं, काबिल बनो। कामियाबी झक मारके पिछे भागेगी। असं यशाचं सूत्र सांगतानाच समाजाच्या दबावापोटी पालकांच्या अपेक्षांचं ओझं मुलांच्या कोवळ्या मनावर लादल जातं आणि ते ओझं वागविण्याची क्षमता असो वा नसो, इच्छा असो वा नसो, त्यांना ते ओझं पेलण्यात आपण यशस्वी झाल्याचं सिद्ध करण्यासाठी जीवाच्या आकांतानं दमछाक करून घ्यावी लागते. हे सगळं काही नावासाठी- आईबापाच्या; नव्हे बापाच्याच! आईच्या आकांक्षा तर बापाच्या आकांक्षात लग्न झाल्यापासूनच समर्पयामि झालेल्या. या पुरूषी व्यवस्थेला तिच्या आकांक्षांशी काही देणंघेणं नव्हतंच कधी.

खूप वर्षांपूर्वी जेव्हा केवळ दूरदर्शन नामक एकच चॅनल संपूर्ण भारतभरात होतं, त्यावेळी मुलीचा गर्भ वाचविण्यासाठी प्रबोधन म्हणून एक जाहिरात केली जायची. त्यात आपल्या गर्भवती सुनेला वंशाला दिवा म्हणून मुलगाच व्हायला हवा, असं सांगणाऱ्या घरातल्या ज्येष्ठ सदस्याला त्या जाहिरातीतील पुरोगामी नायिका धाडसानं एक प्रश्न विचारते. बापू, आपके पिताजी का नाम क्या था?’ तो सांगतो. ती पुन्हा विचारते, उनके पिताजी का?’ तो तेही नाव पटकन सांगतो. ती पुन्हा उनके पिता का?’ तो सांगतो. ती उनके पिता का?’ तो थोडा डोक्याला ताण देतो, पण सांगतो. आता ती पुन्हा विचारते, और उनके पिता का?’ त्यावर बापू अधिकच विचारात पडतो. डोक्याला ताण देऊनही त्याला ते नाव काही आठवत नाही. यावर मग नायिका घाव घालते, जब आपको खुदको ही नहीं पता की आप किसका वंश चला रहे हो, तो फिर लडका हो या लडकी, क्या फर्क पडता है?” आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची टॅगलाईन पडद्यावर यायची, लडका हो या लडकी, दोनों एक समान।

पण, आजकाल हे सारं प्रबोधन मागं पडून पुन्हा काळाची चक्र उलटी फिरविण्याचं काम याच माध्यमांच्या आधारानं पद्धतशीरपणानं सुरू झालं आहे. मग, आत्मसन्मान बाजूला ठेवून नवऱ्याची प्रेयसी स्वीकारण्यापासून ते नवऱ्यासोबतच राहून आई कुठं काय करते!’ हा प्रश्न की उद्गार हे कळू न देण्याची तजवीजही त्यात केली जाते. मालिकेतला बापही मुलांना माझं नाव तुमच्या नावापुढं आहे, म्हणून तुम्ही आहात. माझ्याशिवाय तुम्ही सारे शून्य आहात, असं बेमुर्वतखोरपणानं सांगतो. आणि हे सारं आपण बिनडोकपणानं खपवून घेत चाललो आहोत. जणू या साऱ्याला आपली मूकसंमतीच असल्यासारखं चाललंय सारं.

अलिकडं आणखी एक ट्रेन्ड आलाय, तो चांगला की वाईट, यावर भाष्य करणार नाही- तो म्हणजे आई आणि बापाच्या नावातली काही आद्याक्षरं यांची भेसळ, सरमिसळ करून मुलामुलींची नावं ठेवण्याचा! आयांनी या काही अक्षरांसाठी आग्रही न राहता आता बापासोबत आपलं नावही मुलाच्या नावासमोर लावण्यासाठी खरं तर आग्रही व्हायला हवंय. पण, अशी आईबापाच्या नावातल्या अक्षरांची तोडजोड करून मुलांची अगम्य, निरर्थक नावं आता ऐकिवात येऊ लागली आहेत. वेगळ्या नावाचा आग्रह ठीकाय, पण अगदी काहीच्या काहीच नावं ठेवली जाऊ लागली आहेत. मध्यंतरी कोणी आपल्या मुलाचं नाव निर्वाण ठेवल्याचं वाचनात आलं. काय म्हणावं याला? जन्मल्या जन्मल्याच आपल्या लेकाला आयुष्यभरासाठी निर्वाणाला धाडणाऱ्या आईबापाला काय म्हणावं?

मुद्दा काय, तर लादणं नकोच आहे मुलांवर कुठल्याही प्रकारचं! माझ्या लेकीनं या नावाच्या ओझ्यातून तिची सुटका तर केलीच, पण माझीही सोडवणूक केली, हे जास्त महत्त्वाचंय. त्यामुळं ती स्वतंत्र अन् मुक्त तर आहेच, पण, मी सुद्धा तितकाच हलका झालोय. तुम्हीही व्हा ना... फार अवघड नाही... पाहा प्रयत्न करून... नक्की जमेल!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा