आयुष्यात काही माणसांचं असणं, हे आपल्या आयुष्यालाही परीसाच्या स्पर्शाप्रमाणं
सोनेरी बनवून टाकतं. त्यांचं अस्तित्व महत्त्वाचं असतंच, पण आपल्या अस्तित्वालाही
ते काही अर्थ प्राप्त करून देतं, आयुष्याचं प्रयोजन देतं. डॉ. राजन गवस यांचं
माझ्या आयुष्यातलं हे स्थान. तसं मी माझं कामाचं ठिकाण सोडून कामाव्यतिरिक्त अन्यत्र
कुठं जाऊन बसण्याचे प्रसंग फारच कमी! पण,
मराठी अधिविभागात गवस सर असतानाचा काळ त्याला अपवाद होता. भाषा भवनमध्ये एखाद्या
कार्यक्रमाच्या कव्हरेजच्या निमित्तानं गेलो की त्यांना भेटण्याची ओढ लागलेली
असायची. कार्यक्रम संपला की, सरांच्या केबीनमध्ये घुसायचं. बसायचं. सरही प्रेमानं
चहा पाजल्याखेरीज सोडायचे नाहीत. पण, हा फॉर्मेलिटीचा भाग सोडला, तर त्यांच्याकडून
कान ओढून घेण्यासाठी म्हणूनच खरं तर मी त्यांच्या पुढ्यात बसलेलो असायचो. एक
बापपणाचा अधिकार त्यांच्याकडं मी राखलाय म्हणा किंवा स्वभावतःच त्यांनी तो
स्वतःकडं घेतलाय. पण, त्यांच्याकडून कान टोचून घेण्यात एक वेगळीच मजाय. उगीचंच मधाचं
बोट लावणं वगैरे प्रकार इथं नाहीत. जे काही सांगायचं, ते सरळसोट, थेटपणानं. चुकलं
तर चुकलं म्हणूनच सांगणार. बरोबर असेल तर फार कौतुक न करता, ‘हे एक बरं केलंस’ असं सांगणार. आता हे म्हणजे तर
प्रशस्तीपत्रकच असतं माझ्यासारख्यांसाठी.
प्रत्यक्ष समोर बसून असो वा सभेमध्ये, सरांना ऐकणं हा एक फार भारी अनुभव असतो.
सर अत्यंत शांत चित्तानं, मध्येच एखादा प्रदीर्घ पॉझ घेऊन दाढीवर हलकासा हात
फिरवून आपला मुद्दा तपशीलवार पटवून देतात. केवळ आवाजाच्या चढउतारावर सभेला खिळवून
ठेवतात सर. त्यांना सभेत ऐकताना मला नेहमी एखाद्या खळाळत्या झऱ्याच्या काठी
बसल्याचा फील येत राहतो. तो जसा शांत, निर्मळ आणि मनाला नादावून टाकणाऱ्या
खळाळतेपणानं प्रवाहित राहतो, तसं सरांचं बोलणं! समाजाकडं, समाजातल्या शोषित, वंचित वर्गाकडं,
त्यांच्या वेदनांकडं अत्यंत संवेदनशील नजरेनं पाहणारे, तितक्याच संवेदनशीलपणानं
त्या वेदनांपासून कोसो दूर असणाऱ्या समाजापर्यंत त्या आपल्या लेखणीनं पोहोचवणारे
सर हे आपल्या समाजाचे सच्चे संवेदनादूत आहेत. आपल्यातल्या जाणीवांना आवाहन करीत त्यांना
जागं ठेवण्याचं काम सर करत असतात. माझ्यासारख्या हजारो जणांचे गवस सर हे एक हक्काचं
प्रेरणास्रोत आहे. या स्रोताचा प्रेमवर्षाव आम्हावर पुढील अनेकानेक वर्षे होत
राहो, हेच मागणं सरांकडे आजच्या वाढदिवसानिमित्ताने!
सर, आपलं हार्दिक अभिष्टचिंतन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा