मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

पिटके गुरूजी...

 

वसंत पिटके गुरूजी चांगले काम करण्यास प्रोत्साहन देत, असे सदैव माझ्या पाठीशी अन् सोबत राहिले. 


Vasant Pitke
सन २००६ साली माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक (माहिती) पदावर रुजू झालो. तेव्हा जिथं जिथं महासंचालनालयाचे अधिकारी मंत्रालयात कार्यरत आहेत, तिथं जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेऊन आपला परिचय करून देणं, त्यांच्या कामाविषयी माहिती जाणून घेणं, असं मी चालवलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य निवडणूक आयोग अशा तीन ठिकाणी आमचे अधिकारी प्रतिनियुक्तीनं काम करत होते. त्यात मुख्यमंत्री कार्यालयात सुरेश वांदिले सर, अनिरुद्ध अष्टपुत्रे सर, उपमुख्यमंत्री कार्यालयात जयंत करंजवकर सर, वसंत पिटके सर कार्यरत होते. मुख्यमंत्री कार्यालयाचं काम खूपच गंभीरपणानं चालत असे. कदाचित वांदिले सरांचा धीरगंभीर स्वभाव त्याला कारणीभूत असावा. अष्टपुत्रे सर तर खूपच सहकार्यशील मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायचे. उपमुख्यमंत्री कार्यालयात करंजवकर आणि पिटके यांचं काम तर सुरू असायचंच, पण दोघांचाही स्वभाव अत्यंत जॉली असल्यानं हसतखेळत, एकमेकांची खेचत, किस्से सांगत काम करत असत. दोघांचा कामाचा उरकही परस्परपूरक व वेगवान असे. आमच्या त्या काळात एखाद्या बैठकीखेरीज अगर कामाशिवाय भेटी होत नसत. पण, आमच्या नव्या बॅचवर मात्र या साऱ्यांचंच बारकाईनं लक्ष असे.

त्यावेळी मी उद्योग, ऊर्जा, वस्त्रोद्योग, रोजगार व स्वयंरोजगार अशा विभागांचं काम पाहात असे. पुढं म्हैसकर मॅडमनी लोकराज्य व महान्यूज टीममध्येही समावेश केला. याच टप्प्यावर करंजवकर सर निवृत्त झाले. त्यांच्या जागी एक अधिकारी द्यावा लागणार होता. माझा तर कोणी गॉडफादर नव्हताच तिथं. आणि इतक्या लवकर प्रतिनियुक्तीवर जाण्याचा विचारही मनाला शिवलेला नव्हता. मात्र, उपमुख्यमंत्री कार्यालयात आपली वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांची मांदियाळीच निर्माण झालेली होती. कोणी नाशिककडचा म्हणून, कोणी कोणाच्या तरी जवळचा म्हणून, असं सारं चाललेलं होतं. पिटके सरांना मात्र एक चांगला, काम करणारा सहकारी हवा होता. त्यांनी बरीच चौकशी करून काही नावं काढली होती. त्यात एक माझंही होतं. करंजवकरांच्या जागी वर्णी लागली ती माझे ज्येष्ठ सहकारी रंगनाथ चोरमुले यांची. काही दिवसांतच पिटके सरही निवृत्त झाले. मात्र, भुजबळांनी त्यांना आपल्यासमवेत ओएसडी म्हणून काम करीत राहण्याबद्दल बजावलं होतं. त्यामुळं ते कार्यरत राहिले. आता त्यांच्या जागी मात्र मला घ्यावं, असा आग्रह त्यांनी भुजबळांकडं आणि महासंचालनालयाकडं धरला. मी थोडा साशंक असल्याचं समजल्यानंतर मला भेटून कन्विन्सही केलं. तोवर भुजबळांना मी कोण, कुठला हे माहिती सुद्धा नव्हतं. केवळ पिटके गुरूजींचा शब्द म्हणून त्यांनीही दोन ते तीन वेळा महासंचालकांकडे मला रिलिव्ह करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार जुलै २००९मध्ये मला उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. हे सारं इतक्या तपशीलात लिहीण्याचं कारण म्हणजे ज्या पिटके सरांशी अगर मंत्र्यांशी माझा काहीच संबंध नव्हता, त्यांनी केवळ एक चांगलं काम करणारा सिन्सिअर अधिकारी एवढ्या बळावर माझी या पदासाठी निवड केली. यामध्ये पिटके गुरूजींनी खूपच महत्त्वाची भूमिका बजावली. तिथून पुढं त्यांची आणि माझी जोडी मंत्रालयात असेपर्यंत कायम राहिली. मंत्रालयात सर्वाधिक काळ (साधारण सव्वातीन वर्षे) सलग कोणा अधिकाऱ्यासमवेत मी काम केलं असेल तर ते म्हणजे पिटके गुरूजी!

सोबत काम करताना, त्यांच्या अनेक चांगल्या गुणांचा परिचय झाला. एक उमदा, दिलदार, वयानं माझ्यापेक्षा कितीतरी मोठा असूनही समजून घेणारा असा एक सज्जन माणूस होता. धिप्पाड शरीरयष्टीच्या गुरूजींना त्या प्रकृतीचा सरकारी नोकरीत कितीही फायदा करून घेता आला असता. उपमुख्यमंत्री कार्यालयात त्यांच्या दिमतीला पोलीस व्हॅन असे. पण, त्यांनी या गोष्टीचाही कधीही अनाठायी लाभ उठविला नाही. चांगल्या सेवेसाठी आपल्याला ही सेवा शासनाने दिलेली आहे, तिचा कामासाठीच वापर केला पाहिजे, याची जाणीव त्यांनी सदैव राखली. त्यांच्या संगतीत असलेल्या जगदीश (मोरे) आणि माझ्यावरही ते संस्कार बिंबले. गुरूजींची मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती या भाषांवरही चांगली पकड होती. त्यांच्यामुळं माझं हिंदी आणि मराठी व्याकरण अधिक चांगलं झालं. मंत्री कार्यालयातील जनसंपर्क आणि अन्य प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने सांभाळावे, कसे हाताळावे, नियोजनबद्धरित्या काम कसे करावे, या साऱ्या बाबी पिटके गुरूजींकडूनच शिकता आल्या. कामाच्या बाबतीत आमचं ट्युनिंग अत्यंत जबरदस्त जमलं. विसंवादाचा एकही प्रसंग आला नाही. कधी कधी रात्रीचे बारा-बारापर्यंत काम केलं, पण बाहेर पडताना प्रसन्नचित्तानं हसतखेळतच निघालो. आम्हाला कामकाजात एकमेकांची इतकी सवय झाली होती की, अगदी नागपूरच्या हिंवाळी अधिवेशनात सुद्धा आम्ही एकाच कक्षात राहात असू. दिवसाचं कामकाज समाप्त झालं की, इतर कोणाच्या नादात राहण्यापेक्षा आम्ही जोडीनं फिरत असू. त्यांच्यासोबत नागपुरात संध्याकाळचा गरमागरम मसाले दुधाचा प्रण कधी चुकला नाही.

काही वर्षांपूर्वी गुरूजी कोल्हापूरला देवीदर्शनासाठी जोडीनं आले होते. इथले तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे हे नात्याने त्यांचे जावई. त्यांच्याकडेच ते उतरले होते. त्यावेळी गुरूजी अगत्याने घरी आले. कोल्हापुरी मिसळीचा आस्वाद घेतला, घामेघूम झाले. मनमुराद बोलले. विशेष म्हणजे माझ्या स्विनीचा त्यांना लहानपणापासूनच लळा लागलेला होता. ती एकदा माझ्यासोबत मंत्रालयात आली होती, तेव्हा ती जे काही या आजोबांच्या प्रेमात पडली होती की तिला कधीही त्यांची आठवण येई. आणि त्यावेळी तिला त्यांच्याशी बोलायचंच असे. त्यामुळं या लाडक्या नातीशीही गुरूजींनी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर अधूनमधून फोनवर त्यांच्याशी बोलणं होत असे. नुकतेच त्यांचे परममित्र करंजवकर सर कोविडनंच गेले. त्यावेळी गुरूजींशी बोलावं म्हणून फोन लावला. दोन-तीन वेळा लावल्यानंतर मॅडमनी उचलला आणि त्यांना आयसीयूमध्ये ठेवल्याचं सांगितलं. तेव्हाच काळजाचा ठोका चुकला होता. कोरोनाच्या काळात चालणं फिरणं बंद झाल्यामुळं थोडंही चालताना धाप लागत होती. गुरूजींना बरं वाटलं की ते निश्चित फोन करतील, अशी एक भाबडी आशा होती. मला गंमती-गंमतीत बोलताना किंवा पाठविलेल्या ई-मेलमध्येहीकधी कधी ते आलोक ही मेरा मार्ग प्रकाशित करेगा, इसी विश्वास के साथ... असं म्हणून पुढचं वाक्य फेकत अन् खळखळून हसत असत. ही त्यांची हसण्याची स्टाईलही भारी होती. डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसत असत. त्यामुळं त्यांनी सांगितलेलं काम जबाबदारीनं करावंच लागे.

गुरूजींच्या अशा एक ना अनेक आठवणी दाटून येताहेत, त्याबरोबर कंठही दाटून येतोय. या कोरोनानं जे अनेक सुहृद आपल्यापासून हिरावून नेलेत, त्यामध्ये गुरूजींच्या रुपानं आणखी एक भर पडली आहे. पण, आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाल्याचं जाणवतंय. एक ज्येष्ठ मार्गदर्शक, एक सच्चा मित्र, एक उमदा सखा त्यांच्या रुपानं दुरावला आहे.

त्यांचं माझं एक कॉमन आवडतं गाणं होतं, आनंदमधलं. नागपुरात आमच्या खोलीवर गेलो की ते म्हणायला सांगत. त्या ओळी म्हणजे-

कभी देखो मन नहीं लागे

पिछे पिढे सपनों के भागे

इक दिन सपनों का राही

चला जाए सपनों से आगे कहाँ...

गुरूजी हे असेच एक मस्तमौला राही होते. त्यांच्यामुळे शासकीय नोकरीतला ताणतणाव किती तरी सुसह्य होत असे. हा राही आमच्या पुढे कधी तरी जाणारच होता. पण, असा अचानक, इतक्या तडकाफडकी जाण्यासारखा मात्र नव्हता. जयंता आणि वसंता दोघे जिवश्चकंठश्च दोस्त पाठोपाठ गेले. आता तिथे एकमेकांना टाळी देत कोणाची खेचत असतील, कोण जाणे!

 

६ टिप्पण्या:

  1. हृदयस्पर्शी...
    आलोक तू आहेसच तसा मित्रा...जीव लावणारा, हाक मारली तर हाक नी साथ देणारा. ््व््वि््व््व््व््व््व्््््व््वि््व््व््व््व््व््

    उत्तर द्याहटवा