('दै. पुढारी'च्या बहार पुरवणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेकविध पैलू आहेत. आपल्या प्रचंड व्यासंगामुळे ते ज्ञानाच्या क्षेत्रातले 'ग्लोबल सिटीझन' बनले होते. बाबासाहेबांच्या विद्वतासंपन्न व्यक्तीमत्वामध्ये वैश्विक जाणीवा ओतप्रोत भरलेल्या होत्या; म्हणूनच समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, संवैधानिक नैतिकता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी ते हयातभर आग्रही राहिले.
कोलंबिया विद्यापीठातील ज्येष्ठ विचारवंत व मेंटॉर प्रा. जॉन डयुई यांच्या विचारांचा बाबासाहेबांवर मोठा प्रभाव राहिला. अमेरिकेतील शिक्षणादरम्यान त्यांचा तेथील समाजजीवनाशी जवळून परिचय झाला. तेथील कृष्णवर्णीयांच्या लढ्याशी, अमेरिकन विचारविश्वाशी आणि उदारमतवादी लोकशाही विचारांशीही त्यांचा परिचय झाला. हा प्रभाव बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर आणि राहणीमानावरही दिसतो. 'मला आयुष्यात चांगले पोशाख आणि पुस्तके या दोनच बाबी प्रिय आहेत', असे ते म्हणत. ‘पाश्चात्य शिक्षणामुळे आपल्यातले नवचैतन्य जागले आणि स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा जागविली’, असेही बाबासाहेब सांगतात. या स्वतंत्र विचार करण्याच्या प्रक्रियेतूनच अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादी विषयांतले अत्यंत मूलभूत स्वरूपाचे संशोधन बाबासाहेबांच्या हातून साकार झाले.
बाबासाहेबांचा 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशा शब्दांत सारे जग गौरव करते. त्यांनी ज्ञानसंपादनासाठी घेतलेले कष्ट तर याला कारणीभूत आहेच; पण ज्ञाननिर्मितीसाठीचे त्यांचे अहोरात्र परिश्रमही त्यापाठी आहेत. जुलै १९१३ मध्ये बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विद्यापीठात प्रविष्ट झाले, तेव्हा त्यांनी राज्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. त्यात अर्थशास्त्र या प्रमुख विषयासह समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आणि राजकारण हे दुय्यम विषय त्यांनी अभ्यासले. फ्रेंच आणि जर्मन भाषाही ते या दरम्यान शिकले. बाबासाहेबांच्या हातून या कालावधीत ‘कास्ट्स इन इंडिया: देअर मॅकॅनिझम,
जेनेसिस अँड डेव्हलपमेंट’, ‘इंडियन एन्शिएंट
कॉमर्स’, ‘दि नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी’, ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ अशा महत्त्वाच्या विषयांवरील संशोधन साकार झाले.
बाबासाहेबांना प्रा. जॉन ड्युई यांच्याखेरीज प्रा. ए.ए. गोल्डनवाईजर यांच्यासारखे
समाजशास्त्रज्ञ, प्रा. एडविन आर. ए. सेलिग्मन यांच्यासारखे जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ गुरू म्हणून लाभले. ‘मला लाभलेला अतिशय उत्तम, उच्च तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणजे भीमराव आंबेडकर’ असे उद्गार प्रा. सेलिग्मन यांनी त्यांच्याविषयी काढले, तेही महान स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्यासमोर! एक परदेशी शिक्षक आपल्या भारतीय विद्यार्थ्याची ओळख एका प्रतिष्ठित भारतीयाला अशा पद्धतीने करून देत होता, हे किती अभिमानास्पद!
कोलंबिया विद्यापीठाचे प्रा. सीगर यांनी, भीमरावांची अर्थशास्त्रातली प्रगती ही एखाद्या प्रोफेसरपेक्षाही अधिक आहे, असे म्हटल्याचे पाहून लंडन विद्यापीठातील प्रो. एडविन कॅनन आश्चर्यचकित झाले. भीमरावांच्या ज्ञानाची तपासणी केल्यानंतर प्रा. सीगर यांच्या या विधानाची त्यांना खात्री पटली. लंडन विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ प्रा. सिडने वेब यांनीही एक आदर्श विद्यार्थी आणि चांगला माणूस
म्हणून बाबासाहेबांचा गौरव केला. प्रा. एडविन कॅनन यांनीही एका शिफारसपत्रात, डॉ.
आंबेडकर हे अत्यंत ज्ञानपिपासू आणि गंभीर संशोधक वृत्तीचे विद्यार्थी असल्याचे
म्हटले. बाबासाहेबांच्या बुद्धीसामर्थ्यावर अनेक जागतिक ग्रंथकारही फिदा होते. पिअर्सन या ग्रंथकाराने त्यांच्या
तल्लख स्मरणशक्तीचे आणि ज्ञानसंपादन कौशल्याचे कौतुक केले आहे.
बाबासाहेबांच्या एकूण व्यक्तीमत्त्वातच एक प्रकारचे ग्लोबल अपील होते. त्यांनी १९२७ मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेचा अहवाल आणि एक पत्र त्यावेळच्या मुंबईचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांना पाठविले; तेव्हा संस्थेच्या बहिष्कृत उद्धाराच्या चळवळीसाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी त्यांनी २५० रूपयांचा मदत निधी स्वखुशीने पाठविला होता.
सायमन कमिशनच्या वेळीही बाबासाहेबांचा प्रभाव दिसून आला. २३ ऑक्टोबर १९२८ रोजी बाबासाहेबांची कमिशनसमोर साक्ष झाली. अस्पृश्यांना हिंदूंपेक्षा वेगळे मानून कायदेमंडळात २२ जागा द्याव्यात, अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश, जातवार मतदारसंघ, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र जागा, प्रांतिक स्वायत्तता, लॉ अँड ऑर्डर खाते सोपीव ठेवणे, वयात आलेल्या सर्व स्त्री पुरूषांस मताधिकार अशा मागण्या त्यांनी नोंदविल्या. बाबासाहेबांचा स्पष्टवक्तेपणा आणि इंग्रजीवरील प्रभुत्व यामुळे कमिशनमधील मेजर ॲटली हे खूप प्रभावित झाले. बाबासाहेबांशी हस्तांदोलन करून ॲटलींनी त्यांना शाबासकी दिली.
बाबासाहेबांनी आपल्या तर्कशुद्ध विवेचनाच्या बळावर गोलमेज परिषदेतही मोठी प्रशंसा प्राप्त केली. आपली भूमिका पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी मजूर, उदारमतवादी आणि हुजूर पक्ष यांच्या सभासदांसमोर अनेक भाषणे केली. हाऊस ऑफ कॉमन्समधील सर्व पक्षांच्या निवडक लोकांसमोर त्यांनी पार्लमेंटमध्ये एक भाषण केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक प्रश्नांची कशी गळचेपी होते, याचे शब्दचित्र रेखाटले. त्यात एक मुद्दा असा होता की, 'इंग्रज लोकांनी हिंदुस्थानात आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी अस्पृश्यांचा भरपूर उपयोग केला आणि त्यानंतर मात्र अस्पृश्यांना दूर ठेवले. हा इंग्रजांचा कृतघ्नपणा होय'. ही भाषणे इंग्रजांना खूपच झोंबली. तथापि, अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना पाठिंबा देण्याचे त्यांनी ठरविले आणि त्याप्रमाणे गोलमेज परिषदेत आपले वचन पाळले. हा बाबासाहेबांच्या अमोघ वाणीचा प्रभाव होता. पहिल्या गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांच्या कार्याचा लंडनमधील वृत्तपत्रांनी व कॉन्फरन्सच्या सभासदांनी वेळोवेळी गौरव केला.
इंग्लंडच्या बादशहाने गोलमेज परिषदेच्या प्रतिनिधींसाठी एक चहापार्टी आयोजित केली. तिथे महात्मा गांधी यांच्यासह सर्व हिंदी संस्थानिक व युरोपियन प्रतिनिधी होते. बादशहाशी शिष्टाचाराचे दोन-चार शब्द बोलण्यासाठी दहा सदस्यांची निवड केली होती. त्यात बाबासाहेब होते. बादशहा समोर आले, तेव्हा बाबासाहेबांची स्थिती थोडीशी संभ्रमित झाली. मात्र, स्वत: राजेसाहेबांनीच त्यांची ही अडचण दूर केली आणि प्रथम भारतातील अस्पृश्य बांधवांची एकूण परिस्थिती व आयुष्यक्रमाबद्दल विचारणा केली. बाबासाहेब त्यांना त्याविषयी सांगत असताना राजेसाहेबांचे ओठ व हातपाय थरथर कापत होते, इतका त्यांच्या मनोभावनेला धक्का बसला. बाबासाहेबांचे शिक्षण कसे, कोठे झाले, त्यांचे वडील काय करीत होते, अशी विचारपूसही राजेसाहेबांनी मोठ्या आस्थेने केली. त्यानंतर मुख्य प्रधानांशीही त्यांचे अस्पृश्यहिताच्या दृष्टीने काय करता येईल, यावर बोलणे झाले. थेट इंग्लंडचा बादशहा आणि त्यांचा मुख्य प्रधान यांच्या कानी अस्पृश्यांच्या व्यथावेदना घालणारा, असा हा थोर नेता. त्यानंतर तेथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेतही त्यांनी अस्पृश्यांच्या वतीने मांडलेल्या मागण्यांची आवश्यकता विषद केली.
दुसऱ्या गोलमेज परिषदेतही फेडरल स्ट्रक्चरल समितीच्या सर्व बैठकांना बाबासाहेब उपस्थित राहिले आणि आपले विचार भारताच्या राजकीय हिताच्या दृष्टीने व अस्पृश्यांच्या हिताला अग्रक्रम देऊन स्पष्टपणे, विद्वत्तापूर्ण पद्धतीने मांडले. मध्यवर्ती संयुक्त राज्यपद्धतीत कायदे, न्याय, फडणीशी, शिक्षण वगैरे खात्यासंबंधी दूरवरचे विचार त्यांनी इतक्या प्रभावी पद्धतीने मांडले की, बाबासाहेबांचा या सर्व प्रश्नांचा आधीच सखोल अभ्यास झाला असला पाहिजे, अशी सदस्यांची खात्री पटली. सभासदांचे शंकानिरसन करताना बाबासाहेबांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड वगैरे देशांच्या राज्यघटनेतील कलमांचा आधार घेऊन, त्या त्या देशांतील ऐतिहासिक घटनांचे दाखले दिले. त्यावेळी बैठकीचे अध्यक्ष व सभासद या सर्वांनीच त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. भारताच्या राजकीय स्वातंत्र्यासाठीची खटपट करायचीच, पण अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठीची आपली भूमिका सोडू नये, हे धोरण बाबासाहेबांनी गोलमेज परिषदांवेळी स्वीकारले होते. ते धोरण त्यांनी उच्च पातळीवरून हाताळले आणि जागतिक पातळीवर बऱ्याच अंशी यशस्वी केले, असे या घडामोडींवरून दिसते.
लेखक, पत्रकार बेव्हरली निकोल्स याने बाबासाहेबांचे बौद्धिक सामर्थ्य विशाल असल्याचे उद्गार काढले. तो
म्हणतो की, ‘आंबेडकर हे इटलीतील क्रांतीकारक काव्हूरच्या विचारसरणीचे राजकारणी व व्यवहारनिष्ठ पुढारी आहेत. ते सार्वजनिक सभेत बोलू लागले की, त्यांच्या वाक्ताडनांनी अनेक पुढारी घायाळ होतात आणि त्यांचे मुद्दे खोडून काढणे त्यांना अशक्य होऊन बसते.'
क्रिप्स व कॅबिनेट मिशन (१९४६) या दोहोंनी अस्पृश्यांच्या हिताची दखल घेतली नाही, याचा मोठा विषाद डॉ. बाबासाहेबांना वाटला. कमिशन परत गेल्यानंतर बाबासाहेबांनी पंतप्रधान ॲटली यांना (दि. १७ जून १९४६) तार पाठवून ‘काँग्रेस व इतर अल्पसंख्य जातींना खूष करण्यासाठी सरकार अस्पृश्यांवर अन्याय करीत आहे. हे अन्याय दूर व्हावेत, यासाठी तुम्ही स्वत: लक्ष घालणे जरूरी आहे’, अशी विनंती त्यांना केली.
याच बरोबरीने कॅबिनेट मिशनची योजना अस्पृश्यांसाठी किती घातक आहे, यासंबंधी सविस्तर पत्र तयार करून ते ॲटलींसह मजूर पक्षातील अन्य पुढारी आणि विन्स्टन चर्चिल यांनाही पाठविले. त्यात ते म्हणतात की, ‘कॅबिनेट योजनेमुळे अस्पृश्यांच्या राजकीय प्रगतीला पायबंद बसेल. हे पायबंद भारताला स्वातंत्र्य देण्याअगोदर तोडणे, हे ब्रिटीश सरकारचे कर्तव्य आहे.’
या प्रश्नाचे महत्त्व बाबासाहेबांना इतके वाटत होते की, केवळ पत्रव्यवहार करून ते थांबले नाहीत; तर, प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्याचे गांभीर्य पटवून देण्यासाठी त्यांनी थेट इंग्लंड गाठले. लंडनमधील सर्व पक्षांच्या प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेऊन बाबासाहेबांनी त्या कैफियतीच्या प्रती वाटल्या. अस्पृश्यांच्या एकंदर स्थितीची, विशेषतः राजकीय जीवनाची त्यांना स्पष्ट कल्पना दिली. भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, पंतप्रधान मेजर ॲटली आणि विन्स्टन चर्चिल यांच्याबरोबर बाबासाहेबांनी बराच वेळ अस्पृश्यांच्या भवितव्याबद्दल ऊहापोह केला. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ आणि राजकीय सत्ता मिळाली की, त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्याद्वारे शैक्षणिक वा सांस्कृतिक स्थितीही सुधारेल, हे त्यांनी त्यांच्यासमोर ठामपणे मांडले.
बाबासाहेब विन्स्टन चर्चिलना त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील निवासस्थानी भेटले, तेव्हा तेथेच त्यांनी दुपारचे भोजन घेतले. चर्चिल यांनी बाबासाहेबांसमवेत अर्धा दिवस घालविला. अस्पृश्यांच्या सर्व प्रश्नांकडे हुजूर पक्ष जागरूकपणे सहानुभूती दाखविल, असे चर्चिल यांनी बाबासाहेबांना वचन दिले. या दौऱ्यात बाबासाहेबांनी आर.ए. बटलर, लॉर्ड टेंपलवूड (माजी सर सॅम्युअल होअर) यांच्यासह पार्लमेंटच्या अनेक सभासदांच्याही गाठीभेटी घेतल्या.
भारतीय राज्यघटना निर्मितीच्या कामी बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये आपल्या या महान विद्यार्थ्याचा मानद डॉक्टर ऑफ लॉज् (एलएलडी) पदवी देवून गौरव केला. या पदवीमध्ये बाबासाहेबांचा 'भारताचे एक
सर्वश्रेष्ठ नागरिक, महान सामाजिक सुधारक आणि मानवी हक्कांचे शूर समर्थक’ या शब्दांत गौरव
केला आहे.
बाबासाहेबांनी आयुष्याच्या अंतिम पर्वात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तरी तत्पूर्वी त्यांनी धम्माच्या अभ्यासाच्या अनुषंगाने सिलोन, ब्रह्मदेश आदी देशांचे दौरे केले. धम्मदीक्षेनंतर मात्र ते नेपाळ या एकमेव देशाचा दौरा करू शकले आणि काठमांडू येथे त्यांनी त्यांचे सुप्रसिद्ध 'बुद्ध की कार्ल मार्क्स?' हे भाषण दिले. मार्क्सच्या २५०० वर्षे आधी बुद्धाने 'पिळवणूक' शब्द न वापरता 'दु:खा’ची मांडणी केली. दु:ख हा शब्द दारिद्र्य, गरीबी असा येथे अभिप्रेत आहे. यामुळे या दोन्ही तत्त्वज्ञानांच्या मूलभूत पायात फरक नाही. तेव्हा जीवनाचा मूलभूत पाया शोधण्याची कोणत्याही बौद्धास मार्क्सचे दार ठोठावण्याची गरज नाही. बुद्धाने तो उत्तम प्रकारे प्रस्थापित केला असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब या भाषणात करतात.
बाबासाहेबांनी वेळोवेळी आपली ज्ञानसाधना, प्रखर चिंतन आणि बुद्धिमत्ता यांच्या
बळावर आपल्या तेजस्वी वाणीने व व्यक्तीमत्त्वाने संपूर्ण जगाला प्रभावित करून
सोडले. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्त्वामधील हे ग्लोबल अपील फार महत्त्वाचे होते.
त्या कालखंडात त्या ग्लोबलतेची तुलना केवळ महात्मा गांधी यांच्या प्रभावाशीच होऊ
शकते. गांधींचा प्रभाव, त्याचे कंगोरे वेगळ्या स्वरुपाचे होते. बाबासाहेबांच्या
ग्लोबल वावराला संघर्षाची धार होती. संघर्षातून त्यांनी आपल्या मुद्द्यांशी जगाला
समन्वय करणे भाग पाडण्याची अचाट कामगिरी केलेली होती. समग्र भारतीय समाजामध्ये
समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या मांडणीने
अनेक जागतिक महत्त्वाचे नेते प्रभावित झाले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेला
आपले सहकार्य व पाठिंबा प्रदान केला. त्याचप्रमाणे आजही जागतिक मंचावरील समता आणि
सामाजिक न्याय प्रस्थापनेच्या लढ्याचे आयकॉन म्हणून बाबासाहेबांकडे पाहिले जाते,
हेच बाबासाहेबांच्या ग्लोबल राजनितीचे यश आहे.
(लेखक फुले,
शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याचे अभ्यासक)
--00--