बुधवार, ८ एप्रिल, २०२६
‘डॉक्टर’ किशोर गांगुर्डे!
गुरुवार, २६ मार्च, २०२६
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने प्रेमळ पित्याला आंचवलो...
सुखाच्या लहरींना मात देण्यासाठी दुःखाची एक लाट पुरेशी ठरते. काल पुरस्काराचा आनंद सर्वांसोबत शेअर करीत असतानाच आज आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या निधनाची बातमी यावी, यापरते मोठं दुःख ते काय?
डॉ. जयसिंगराव पवार यांचं जाणं ही सामाजिक आणि इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी आहेच, पण व्यक्तिगत पातळीवर ही माझी सुद्धा खूप मोठी हानी आहे. माझ्यावर अगदी पुत्रवत प्रेम करणारा एक प्रेमळ पिता आज मी गमावला आहे, अशी माझी भावना आहे. काही व्यक्तिगत कारणानं बाहेरगावी असल्यानं या पित्याचं अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. याची खंत वाटते आहेच; पण त्याही पलीकडे त्यांच्या अनेक आठवणी या प्रसंगी मनामध्ये उचंबळून येत आहेत. अनेक आठवणी आहेत त्यांच्या. विद्यापीठात आले की प्रेमाने हातात हात घेऊन चालणारे, अगदी विश्वासाने खांद्यावरती हात टाकणारे, अत्यंत सस्मित वदनाने स्वागत करणारे, बोलणारे, आपुलकीने संशोधनाची, लेखनाची चौकशी करणारे असे पवार सर मला सतत भेटत राहिले. त्यांचा हसतमुख चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतो आहे आणि तितक्या वेळा डोळे पाण्यानं डबडबताहेत.
मी जेव्हा पीएचडी झालो, तेव्हा माझा एकमेव जाहीर सत्कार हा आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांनी आणि माझे गुरु डॉ. अशोक चौसाळकर यांनी शाहू स्मारक भवनमध्ये केला. नुसता सत्कार केला नाही तर 'शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर पत्रकारिता' या विषयावर सविस्तर व्याख्यान देण्याची संधी त्यांनी मला दिलेली होती. पवार सर स्वतः अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी माझ्या मांडणीचं कौतुक तर केलं होतंच, पण आता आपले संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी असे तरूण संशोधक पुढे येताहेत, ही समाधानाची बाब असल्याचे उद्गारही काढले होते.
गेल्या वर्षी माझ्या दोन पुस्तकांचा प्रकाशन झालं. ती पुस्तकं द्यायला मी सरांच्या घरी गेलो. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर आदरणीय माईंनी आणि सरांनी अतिशय आपलेपणानं माझं अभिनंदन तर केलंच; त्याशिवाय अगदी अनपेक्षितपणे माझा या दोघांनी सत्कारही केला. साक्षात डॉ. जयसिंगराव पवार सरांनी सत्कार करावा, यापेक्षा आयुष्यामध्ये अन्य कुठलीही गोष्ट मोठी असू शकेल, असं मला वाटत नाही. महत्त्वाचं म्हणजे सरांचं पंचखंडात्मक चरित्र लेखनाचं कार्य सुरू असतानाही त्यांनी ही दोन्ही पुस्तकं वाचली आणि मला आवर्जून फोन केला. 'ब्लॅक व्हाईट अन् ग्रे' मधल्या 'डिकास्ट व्हावं कसं?' या लेखानं ते अस्वस्थ झाले होते. त्या विषयावर आम्ही सुमारे पाऊण तास बोललो. 'माझ्या ८५ वर्षांच्या आयुष्यात तुमच्यासारखा खऱ्या अर्थानं डिकास्ट झालेला माणूस प्रथमच मला भेटला,' हे सरांचे कौतुकोद्गार आजही जसेच्या तसे कानात गुंजताहेत आणि जबाबदारीची जाणीवही करून देताहेत.
त्यानंतर माझ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकाचा मसुदा पाहून सरांनी त्यातील काही संदर्भ नवीन आहेत, असे निरीक्षण नोंदवले आणि अनेक मौलिक सूचना या संदर्भाने मला केल्या. त्या अंमलात आणायच्या की नाही, याचा निर्णय तुम्ही घ्या, असं इतक्या निर्व्याजपणाने सरांनी मला सांगितलं होतं. सरांच्या सूचनांबरहुकूम आता पुस्तकाची रचना झालेली आहे. अशा किती आठवणी सांगाव्यात सरांच्या.
या क्षणी पूर्ण ब्लँक व्हायला होतंय ते यासाठी की सरांनी शाहू महाराजांचा वारसा ज्या पद्धतीने पुनरुज्जीवित केला, शाहूंच्या बदनामीची सगळी प्रकरणं, सगळ्या गोष्टी अगदी प्रचंड अभ्यासांती पुरावे गोळा करून सरांनी शाहूंची प्रतिमा ज्या पद्धतीने उजळवली. केवळ देशातच नव्हे, राज्यातच नव्हे तर जगाच्या पातळीवर सरांनी शाहूंचं नाव पोहोचवलं. पवार सरांचं सगळ्यात मोठं काम हे शाहूंच्या संदर्भातलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं, त्याला अजिबात तोड नाही. त्यांच्यामुळे शाहू महाराजांशी आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने, आत्मीय भावाने जोडले गेलो. शाहू महाराज यांचं दैवतीकरण न करता त्यांना आत्मसात करणं ही आवश्यक बाब आहे, हे सातत्याने ते प्रत्येक तरुणाच्या मनावर बिंबवत राहिले. मला वाटतं ही गोष्ट फार फार मोलाची आणि महत्त्वाची आहे. मात्र आता होतंय असं की, ज्या कोल्हापूरमध्ये महाराजांनी काम केलं आणि जयसिंगराव पवार सरांनी महाराजांचा वारसा पुनरुज्जीवित करण्याचं आणि जिवंत ठेवण्याचं काम केलं; त्या कोल्हापूरमध्ये शाहू विचार संपवण्यासाठीची एक वेगळी चळवळ मूळ धरू पाहते आहे. तशा स्वरूपाच्या बाबी, घटना होऊ लागलेल्या आहेत. त्यांच्या पुरोगामित्वाला हरताळ फासणाऱ्या गोष्टी घडवल्या जात आहेत. 'आता कोल्हापूर पुरोगामी राहिलं नाही,' असं शाहूंच्या पुतळ्याच्या साक्षीनं अभिमानानं सांगणारे तथाकथित नेते उभे राहताहेत. त्यामुळं मला असं वाटतं की शाहूंना जपणं, शाहूंचा वारसा खऱ्या अर्थानं जपणं आणि वृद्धिंगत करणं हीच आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या जीवनकार्याला खरी आदरांजली ठरेल!
बुधवार, २५ मार्च, २०२६
डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार जाहीर
कोल्हापूर, दि. २५ मार्च: येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ या वैचारिक लेखसंग्रहाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे यांनी ही घोषणा केली आहे.
डॉ. जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक व्हाईट अन् ग्रे’ या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र साहित्य
परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने उत्कृष्ट ललित संग्रहासाठीचा राज्यस्तरीय
पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर आता ‘समाज
आणि माध्यमं’ या
पुस्तकाला महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी सुप्रसिद्ध
असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वैचारिक साहित्यासाठीचा
पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये ६,०००
रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे
स्वरूप आहे.
मारोतराव नारायणे यांच्या
स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३०
वाजता वर्धा येथील स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात सुप्रसिद्ध
साहित्यिक व 'उपरा'कार
लक्ष्मण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ करण्यात येईल, असे
मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, सचिव
हेमलता नारायणे, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य
प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज
नारायणे, राहूल भस्मे, जिगिषा
नारायणे यांनी कळविले आहे.
बुधवार, १८ मार्च, २०२६
सर्जनशीलतेची कमाल: यंग शेरलॉक
मंगळवार, १० मार्च, २०२६
कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीतील तारकादळ विद्यापीठात अवतरते तेव्हा...
सोमवार, ९ मार्च, २०२६
समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती या विषयावर बोलताना...
| परिसंवादादरम्यान डॉ. आलोक जत्राटकर यांच्या विविध भावमुद्रा |
रविवार, ८ मार्च, २०२६
बाबा भारती यांच्या स्मृतींना पुरस्कार अर्पण!
मंगळवार, ३ मार्च, २०२६
माझ्या संस्कृतमाता ‘जेपीके’ मॅडम!
![]() |
| ज्योती प्रकाश कुलकर्णी |
मित्र-मैत्रिणींनो, आजचा
दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक अस्वस्थ दिवसांपैकी एक. याचे कारण म्हणजे ज्यांनी
माझ्यावर निरतिशय प्रेम केले, त्या माझ्या संस्कृतच्या शिक्षिका, नव्हे, माझ्या ‘संस्कृतमाता’ आदरणीय ज्योती प्रकाश कुलकर्णी अर्थात
आम्हा विद्यार्थ्यांच्या लाडक्या ‘जेपीके’ मॅडम यांचे अचानकपणे निधन झाल्याची वार्ता आज माझे काळीज चिरुन गेली.
वयाच्या ७० व्या वर्षी तशी कोणतीही हिस्टरी नसताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने
त्या गेल्या. आज दिवसभरात मॅडमच्या सान्निध्यातील अनेक स्मृती मनात गर्दी करून
उभ्या आहेत. त्या कागदावर उतरल्याखेरीज या दुःखाचा भार हलका होणे नाही. म्हणून हा
लेखनप्रपंच.
मॅडमचा मुलगा, माझा
वर्गबंधू किरण याला गेल्या वर्षी मी माझे ‘निखळ: जागर संवेदनांचा’ हे पुस्तक भेट दिले. ते घरी
गेल्यावर त्याने मॅडमना दाखवले, तर मॅडमनी ते रात्रीत वाचून काढले आणि दुसऱ्याच
दिवशी मला व्हिडिओ कॉल केला. खूप वेळ गप्पा मारल्या. नेहमीसारख्या प्रसन्नचित्त
होत्या, जणू काही कालच निवृत्त झाल्या असाव्यात. माझं त्यांनी खूप कौतुक केलं,
अभिमान व्यक्त केला आणि भेटायला ये निवांत एकदा, असं म्हणाल्या. मी खरंच खूप
गांभीर्यानं ‘हो’ म्हणालो, पण ते जमवू
शकलो नाही. अवघं पाऊण तासाचं अंतर मी वर्षभरात कापू शकलो नाही. आज मॅडम गेल्यानंतर
मात्र तितक्याच वेळात किरणला भेटायला पोहोचलो. मित्रांनो, माझं एकच सांगणं की, आपण
या अनिश्चिततेच्या जगात आपल्या आपुलकीच्या माणसांना भेटत राहिलं पाहिजे. अन्यथा,
आयुष्यभराची बोच सोबत घेऊन जगावं लागतं- जी मला आज सलते आहे.
जेपीके मॅडम यांच्याशी
माझं खूप वेगळं नातं होतं. मोहनलाल दोशी विद्यालयात त्या माझ्या संस्कृतच्या गुरू
खऱ्याच; पण, त्याही आधी त्या माझ्या लतामावशी होत्या. याचं कारण असं की, कागल
विद्यालयाच्या (सध्याचं यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल) तत्कालीन मुख्याध्यापिका डिंगणकर बाई यांच्या त्या कन्या. आई त्या शाळेत
शिक्षिका. बाईंमुळं जेपीके मॅडमची आणि आईची मैत्री. घरी येणं-जाणं. त्यामुळं त्या
लहान वयात त्या माझ्या लतामावशी. पुढं अनेक वर्षांनी निपाणीत माझ्या शिक्षिका झाल्या.
पण, त्यांचं माझ्यावरचं प्रेम मात्र तसंच.
नववीला मी निपाणीच्या
मोहनलाल दोशी विद्यालयात प्रवेश घेतला. तिथं संस्कृत विषय आठवीपासून होता. पण
माझ्या पूर्वीच्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये संस्कृत विषय नसल्याने माझा हिंदी
विषय होता. इथे संस्कृत आहे म्हटल्यावर पूर्ण शंभर गुणांचे संस्कृत शिकायची तीव्र
इच्छा मनात निर्माण झाली. पण मागील वर्षी काहीच न शिकल्याने ‘हिंदी-संस्कृत’ असा प्रत्येकी ५० गुणांचा जोडविषय
घेतला. माझी ही संस्कृतची ओढ लक्षात आल्यानं ‘जेपीके’ मॅडमनी माझे आठवीचे संस्कृत तीन महिन्यांत करवून घेण्याचे ठरविले. रोज
सायंकाळी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जायचो. स्वयंपाकपाणी करता करता त्यांनी
मला मोफत संस्कृत शिकविले, व्याकरणाचा पाया पक्का करून घेतला. दोनेक महिन्यांतच
त्यांनी मला इतरांच्या बरोबरीने आणून ठेवले. पुढेही दहावीपर्यंत आम्ही किती तरी
मुलं त्यांच्या घरी शिकायला जायचो. पण, मॅडमनी कधी आमच्याकडून एक पैही शुल्क घेतले
नाही. इतक्या निरलसपणाने त्यांनी संस्कृत भाषेची सेवा केली. आजच्या शिक्षकांच्या
दृष्टीनं मोफत शिकविणाऱ्या जेपीके मॅडम वेड्याच ठराव्यात. पण मॅडमनी तसं वेडं असणं
स्वीकारलं होतं. मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं
पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. त्यापोटी त्यांची सारी धडपड होती. शाळेच्या चार
भिंतींच्या पलिकडलं शिक्षण देण्यासाठी आसुसलेलं मन त्यांच्याकडं होतं. त्यांच्या
या शिकवण्यामुळंच पुढं बारावीपर्यंत शंभर मार्कांचं संस्कृत घेण्याचं धाडस मनी
निर्माण झालं. त्या अर्थानं त्या माझ्या ‘संस्कृतमाता’च होत्या.
त्यांनी केवळ मला
संस्कृत शिकवलं, असं नाही. तर, शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून सहभागी
होण्याबरोबरच त्यांचं संचालन करण्याची संधीही त्यांनी त्या दोन वर्षांत मला दिली.
अगदी गॅदरिंगच्या सूत्रसंचालनाचीही. त्या काळात त्यांनी नाटक, काव्यवाचन, गीतगायन
यांसह मला तर कथाकथन करण्यासाठीही प्रोत्साहन दिलं. शंकर पाटील यांच्या दोन कथा
त्यांनी माझ्याकडून बसवून घेतल्या आणि शाळेत त्या कथाकथनाचा एक स्वतंत्र
कार्यक्रमही घडवून आणला होता. या साऱ्या प्रेरणा आजही माझ्या आत कुठंतरी सातत्यानं
जिवंत आहेत. कारणीभूत केवळ जेपीके मॅडम.
सदैव हसतमुख, कधी कोणावर
चिडणं नाही, रागावणं नाही की ओरडणं नाही. अगदी त्यांना एखाद्याला रागे भरावंसं
वाटलं तरी तो राग लटकाच ठरे. फार काळ न टिकणारा. हसणं अगदी दिलखुलास आणि मनमुराद.
निर्मळ आणि वात्सल्यानं ओतप्रोत. हे प्रेम पुढंही आम्हाला लाभत राहिलंच. माझ्या
लग्नानंतर आम्हा नवदांपत्याला आवर्जून घरी बोलावून त्यांनी स्नेहभोजनाचा बेत रंगवला.
प्रकाशकाका सुद्धा अत्यंत हसतमुख आणि दिलखुलास माणूस. थट्टामस्करी, क्वचित थोडे
उपरोधिक चिमटे घेत पण बोचणार नाही असं बोलणं. या दोघांसोबत बसलं की, बोलणं कमी आणि
पोटभर हसणंच होत असे. ते पुढच्या भेटीपर्यंत निश्चित पुरत असे.
इथून पुढं मात्र त्यांचं
हसणं, असणं हे सारं आता स्मृतींच्या स्वरुपातच जपायचं. अशी माणसं आपल्याला
दीर्घकाळ हवी असतात. काळाकडे मात्र त्या दीर्घाची लांबी कमीअधिक करण्याची ताकद असते.
म्हणून माणसं असतानाच त्यांचं अस्तित्व साजरं करणं महत्त्वाचं असतं. अन्यथा,
दुःखाखेरीज पदरी काही पडत नाही. काळच त्यावर औषध, पण अशा जखमांच्या खुणा मनावर
कायम राहतात. त्याला कोणी काही करू शकत नाही. अशी माणसं, असे शिक्षक आता पुन्हा
होणे नाहीत.
जेपीके मॅडमना भावपूर्ण
श्रद्धांजली!
शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६
डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार
![]() |
| डॉ. आलोक जत्राटकर |
| ब्लॅक व्हाईट अन् ग्रे पुस्तकाचे मुखपृष्ठ |
कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: येथील शिवाजी
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन्
ग्रे’ या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या
ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट
वाङ्मय-२०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष
प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी यांनी नुकतीच पुरस्कारांची
घोषणा केली.
डॉ. जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन्
ग्रे’ हा ललित लेखसंग्रह कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित
करण्यात आला असून यामध्ये मानवतावादाच्या सूत्रामध्ये गुंफलेल्या निवडक ३० लेखांचा समावेश आहे. व्यापक जागतिक समुदायामध्ये मानवी
मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा आग्रह या लेखनामागे आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर
शिंदे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.
डॉ. जत्राटकर यांची ‘निखळ: जागर संवेदनांचा’, ‘समाज आणि माध्यमं’ ही पुस्तकेही
प्रकाशित झाली आहेत. त्यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, शब्दांगण
साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि ध्यास फाऊंडेशन, पलूस आदी संस्थांचे
प्रतिष्ठेचे पुरस्कारही लाभले आहेत.
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६
कंघा बुढा हो गईल बा..!
![]() |
| माझ्या लाडक्या राऊंडरला 'एआय'नं अशी छान बॅकग्राऊंड दिलीय. |
गेल्या
३५ वर्षांची त्याची माझी साथ... मी जिथे जाईन, तिथे या सर्व काळात तो माझ्यासोबत
आहेच. त्याचा मला आणि माझा त्याला स्पर्श झाला नाही, आम्ही एकमेकांकडे पाहिले
नाही, असा एकही दिवस गेला नाही. माझ्या बऱ्यापैकी दिसण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा
वाटा. मात्र, आता त्याच्या आयुष्याची उतरण सुरू झालीय. त्याचे केस आता पिकू लागलेत, गळू लागलेत, विरळ होऊ लागलेत.
त्याच्या म्हातारपणाच्या चाहुलीने जीव अस्वस्थ झालाय. त्याची जागा घेईल, असा दुसरा
जोडीदार मला यापुढील काळात लाभेल की नाही, अशी शंका अस्वस्थता वाढवतेय.
त्याच्यापेक्षा भारी मिळतील कदाचित, पण त्याच्यासम भेटण्याची शक्यता फारच कमी
वाटते आहे. त्यामुळेच त्याच्या वृद्धापकाळाने मी अधिक अस्वस्थ झालो आहे. त्याची
साथसंगत जितकी लांबविता येईल, तितकी त्याचा प्रेमभराने सांभाळ करून वाढविण्याचा
माझा प्रयत्न आहेच, पण विरहाचा तो दिवस कधी तरी येणारच, हा विचार क्लेषकारक आहे.
मित्र-मैत्रिणींनो,
१९९२ साली माझ्या आयुष्यात आलेल्या राऊंडर-कम्-कंगव्याच्या दुराव्याच्या असहनीय कल्पनेपोटी
वरील वाक्ये मनात येताहेत. आताच्या जेन-झी किंवा त्या आधीच्या एक-दोन पिढ्यांमध्ये
मूव्ह-ऑनचा ट्रेंड असल्यानं त्यांना आम्हा ‘एक्स’वाल्यांची ही तगमग लक्षात येणार नाही. एका नजरेमध्ये
प्रेम आणि एखाद्या वॉट्सअप मेसेजवर ब्रेकअप आणि पुन्हा भेटून ते ब्रेकअप सेलिब्रेट
करण्याच्या काळामध्ये आम्हा गयागुजऱ्या पिढीची भावनिक गुंतवणूक पराकोटीची असते,
याची कदाचित कल्पना तुम्हाला येणार नाही. अगदी प्रियकर-प्रेयसी ही खूपच मोठी गोष्ट
झाली, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये (कदाचित विनाकारणही) जीव गुंतवून
बसण्याची, जीव लावण्याची सवय (किंवा खोड) हा आमच्या पिढीचा अंगभूत गुण असावा, असं
वाटतं. त्या काळात प्रेमात यशापेक्षा प्रेमभंगाचंच शल्य वाट्याला अधिक येत असे,
त्यावेळी तू नहीं तो और सही, म्हणत बसण्यापेक्षा त्या प्रेमभंगाचं दुःख कुरवाळत
बसण्यात, तिच्या अगर त्याच्या आठवणींत रमण्यात आम्हाला अधिक आनंद (?) वाटे. त्या जखमेवरची खपली सतत काढून त्या
बोचऱ्या वेदना पुनःपुन्हा अनुभवण्यामध्ये अधिक सुख वाटे. तसंच आयुष्यात आलेल्या
प्रत्येक छोट्या मोठ्या भौतिक-अभौतिक गोष्टींमध्येही जीव गुंतवण्यात आम्हाला कोण
आनंद असे. म्हणजे सायकलच्या कीचेनपासून ते अखंड सायकलपर्यंत, एखाद्या शर्टापासून
ते अगदी कंगव्यापर्यंत!
तर,
अशाच माझ्या आयुष्यात एका अवचित क्षणी दाखल झालेल्या कंगव्याची ही गोष्ट. आजकाल
मुलांचे केस लहानपणापासूनच लांब ठेवण्याकडे बहुतांश आईवडिलांचा कल दिसून येतो. पण,
हमारे जमाने में... बाबा दर पंधरा दिवसांनी केस कापायला घेऊन जायचेच. कागलमध्ये
असताना शिवाजी आणि शहाजी या बंधूंकडे तर नंतर निपाणीत नामांकित ‘नामा’
यांच्याकडे... म्हणजे अगदी कसाबसा भांग पडेल, इतकेच, केस डोईवर असत. त्यामुळं केस
लांब वाढवण्याचं एक प्रकारचं ऑब्सेशन मनात होतं. पण, धाडस होत नव्हतं. अखेरीस
नववी-दहावीच्या टप्प्यावर अभ्यासाचं कारण पुढं करून पंधरा दिवसांचं कटिंग
महिनाभरापर्यंत लांबवण्यात यश मिळवलं. आता या वाढत्या केसांची निगा राखायची तर
एखादा राऊंडर हाताशी असावा, अशी भावना मनात मूळ धरून होती. त्यावेळी निपाणीत
नव्यानं सुरू झालेल्या ‘जनता बझार’मध्ये एका ट्रेमध्ये मला हवा तसा राऊंडर दिसलाही.
पण, इतर कंगवे एक-दोन रुपयांना मिळत असताना सतरा रुपये ही त्याची किंमत खूपच जास्त
होती. त्यामुळं बाबांना विचारायचं धाडस होत नव्हतं. असेच अनेक दिवस गेले.
त्यानंतर
झालं असं की, बाबांना जोधपूर-राजस्थानला २१ दिवसांच्या रिफ्रेशर कोर्सला जायचं
होतं. त्यामुळं त्या कालावधीत घरी लागणारं वाणसामान तसंच इतर घरखर्चासाठी बाबांनी
काही रक्कम माझ्याकडं देऊन ठेवली. आईची शाळा कागलला असल्यामुळं तिला अप-डाऊन करावं
लागत असे. त्यामुळं तिला घरी यायला उशीर होईल. तशात अनुपही लहान होता. त्याचं
आजारपण, दवाखाना कधीही उद्भवत असे. असा सारा विचार करून बाबांनी ही खर्चाची
जबाबदारी माझ्याकडं सोपवलेली. मी सुद्धा अगदी इमानदारीत खर्च केलेल्या प्रत्येक पै
न पैचा हिशोब एका डायरीत अगदी दिवसनिहाय मांडून ठेवत असे. बाबांचा परत येण्याचा
दिवस जवळ आला, तसा त्या पैशातून थोडा स्वार्थ साधण्याचा विचार माझ्या मनात आला.
आणि १९९२ मधल्या फेब्रुवारीमध्ये जनता बझारमधला १७ रुपयांचा पॉलिश्ड लाकडी चौकोनी
मुठीचा तो राऊंडर माझ्या वाणसामानासोबत घरी आला. आणि हो, आपण इमानदारीत त्याची
नोंद हिशोबात केली सुद्धा बरं! बाबा
परतल्यानंतर त्यांच्यासमोर हिशोबाची वही सादर केली, शिल्लक रक्कम त्यांच्या हाती
परत दिली आणि या राऊंडरच्या खरेदीची बाबही त्यांना सांगितली. त्यावर त्यांनी ’१७ रुप्पयाचा कंगवा!’ एवढीच प्रतिक्रिया दिल्याचं आठवतंय. बाकी काही
बोलले नाहीत. ते समाजशास्त्राचे असल्यामुळं असावं, पण पोर आता वयात येतंय, अशा
गोष्टी होणार, हे त्यांनी गृहित धरलं असावं.
तर, अशा
तऱ्हेनं हे राऊंडर महोदय, माझ्या आयुष्यात दाखल झाले. तेव्हापासून आजतागायत माझ्या
केशभूषेची समग्र जबाबदारी त्यांनी एकहाती लीलया पेललेली आहे. आजवर आयुष्यात खोबरेल
तेलाखेरीज इतर कुठलंही प्रसाधन मी वापरलेलं नाही. मात्र, आंघोळीनंतर पहिली केशभूषा
या राऊंडरनं केल्याशिवाय मला केस विंचरल्यासारखं वाटतच नाही. गेली पस्तीसेक वर्षे
हा राऊंडर माझा साथीदार म्हणून माझ्यासोबत सर्वत्र संचारकर्ता आहे. पुण्याला
आयआयटीच्या क्लासला गेलो, तिथं सोबत होताच, कोल्हापूरला हॉस्टेलवर माझ्यासह अनेक
मित्रमंडळींच्या डोक्यावर याचा मायेचा हात फिरलेला आहे. मुंबईला गेलो, तिथेही हा
सोबत होताच, पुन्हा आता करवीरनगरीतही सोबत आहेच. माझ्या अगदी एखाद्या दिवसाच्या
दौऱ्यामध्येही हा मला सोबत लागतोच. त्याशिवाय, अस्वस्थ व्हायला होतं.
मध्ये
एकदा सम्यकच्या हातून पडून त्याच्या मुठीचे दोन तुकडे झाले. पण तोवर फेव्हीक्विक
नावाचं जालीम अडेजिव्ह बाजारात आलेलं होतं. त्यामुळं लगोलग त्याची मलमपट्टी केली
आणि पुन्हा तंदुरुस्त केलं याला. आणि हा माझा सेवेकरी पुन्हा सेवेसाठी सज्ज झाला.
आता
मात्र, त्याचे डार्क ब्राऊन केस हळूहळू रंग सोडू लागले आहेत, ग्रे होऊ लागलेत.
काही मोडून पडू लागलेत, तर काही मुळातून निसटू लागले आहेत. प्रत्येक गोष्टीला
अंतःकाळ हा असतोच, या कंगव्यालाही तो नियम लागू आहेच. केवळ किंमतीवरुनच मोल
करायचं, तर त्याच्यावर खर्च केलेले १७ रुपये कधीच फिटलेत. पण, मोहाचं काय करायचं? बाजारात अलिकडच्या काळात मी आता त्याला
त्याच्यासारखा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक ब्रँडेड कंपन्यांचे भारीभारी
राऊंडर बाजारात आहेत. त्यातला माझ्या बायको-मुलीकडंही आहे. पण, याच्यासारखा राऊंडर
मात्र मला कुठं मिळत नाहीय, हे मात्र खरं! आताच्या
राऊंडरचे ब्रिस्टल्स एकदम खरखरीत, डोक्याच्या त्वचेला घासून काढणारे आणि मग
केसांना वळण लावणारे असतात. हा मात्र पहिल्यापासूनच अगदी हळुवार. कधीही खरखर नाही
की रखरख. एकदम छानपैकी इमानेइतबारे आपलं काम करणारा! आता
त्याच्या वयोमानाप्रमाणं तो निरोप घेण्याच्या अवस्थेकडं वाटचाल करतो आहे, पण त्याच्या
आयुष्याचं हे अंतिमपर्व जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न मी करतोय- कदाचित आणखी
काही वर्षे तरी!
रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६
कोळशाच्या जीवाला आगीचा ‘आधार’...
![]() |
| 'सुधागड ०७' चित्रपटाचे पोस्टर |
![]() |
| दिलीप रायण्णावर |






.jpeg)





