बुधवार, १५ एप्रिल, २०२६

सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी जातिनिर्मूलन आवश्यक: डॉ. आलोक जत्राटकर

कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रमात बोलताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर डॉ. शरद गायकवाड आणि प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी.





कोल्हापूर, दि. १५ एप्रिल: भारतात खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी संपूर्ण जातिनिर्मूलन आणि एकमेकांकडे केवळ माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन अंगिकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी आज येथे केले.

येथील महावीर महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “फुले–आंबेडकर यांच्या विचारकार्याची प्रस्तुतता” या विषयावर विशेष व्याख्यान देताना ते बोलत होते.

फुले–शाहू-आंबेडकर ही केवळ नावे नसून या देशाच्या प्रबोधनपर्वाची ती एक व्यापक मूल्यव्यवस्था असल्याचे सांगून डॉ. जत्राटकर म्हणाले, आजच्या समाजात जातीयवाद, राजकीय स्वार्थ आणि सामाजिक विसंगती यांचे प्रमाण अतिरेकी वाढले आहे. फुले–शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार करूनच समाज अधिक समताधिष्ठित आणि प्रगत होऊ शकतो. या त्रयीचे कार्य केवळ एका घटकापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची मूल्ये देणारे आहे. आपण या महामानवांना पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित ठेवतो; मात्र त्यापलिकडे त्यांच्या विचारांचा अभ्यास आणि आचरण ही काळाची गरज आहे.

ते म्हणाले, महात्मा फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले, तसेच त्यांनी विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक सुधारणांचे व्यापक आंदोलन उभे केले. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले संघर्ष हे केवळ एका समाजघटकासाठी नव्हते, तर संपूर्ण भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी होते. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला त्यांनी समान हक्क, प्रतिष्ठा आणि न्याय दिल्याचे नमूद केले. 

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी म्हणाले, समोरच्या प्रत्येक व्यक्तीकडे केवळ जातीच्या दृष्टीने पाहणे आता सोडून दिले पाहिजे. प्रत्येकाने माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांच्या चरित्रांचे, विचारकार्याचे सतत वाचन, चिंतन आणि अनुसरण करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी डॉ. शरद गायकवाड यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि परिचय करून दिला. डॉ. संध्या जाधव आणि डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. हेमंत पाटील यांनी आभार मानले. यावेळी नामदेवराव कांबळे, डॉ. शिरीष शितोळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा