शनिवार, २५ एप्रिल, २०२६

'समाज आणि माध्यमं': नवमाध्यमनिर्मित प्रश्नांना वाचा फोडणारा वैचारिक आवाजग्रंथ


वर्धा इथे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन चळवळीत अग्रेसर असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानने 'समाज आणि माध्यमं' या ग्रंथाला वैचारिक साहित्यासाठीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार - २०२६ प्रदान करीत असताना ज्या शब्दांत या साहित्यकृतीचा गौरव केला आहे, तो निश्चितच प्रेरणादायी आहे.


या सन्मानपत्रात म्हटले आहे की,
"मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान, वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा मारोतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार-२०२६ आपल्या अक्षर दालन प्रकाशन, कोल्हापूर द्वारा प्रकाशित 'समाज आणि माध्यमं' या वैचारिक लेखसंग्रहाला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.
चिकित्सक आणि संशोधक वृत्तीचे पत्रकार, परखड वक्ते, माणसे जोडणारे उत्तम संघटक, बुद्धिवादाचा पुरस्कार करणारे लेखक, सातत्यपूर्ण लेखन करणारे ब्लॉगलेखक आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आपली ओळख आहे. 'समाज आणि माध्यमं' हा आपला वैचारिक लेखसंग्रह बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सिद्ध झालेला समाजऐवज आहे.
'समाज आणि माध्यमं' हा वैचारिक ग्रंथ नव्या माध्यमांच्या प्रवेशानंतर समाजामध्ये झालेल्या उलथापालथींचा नेमकेपणाने वेध घेतो. या पुस्तकात डिजिटल युगातील स्मार्ट एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण, सोशल मिडियातील उलाढाली, समाजमाध्यमे आणि ट्रोलिंग, भारतातील टेलि-कम्प्युटर क्रांती, विश्वव्यापी माध्यमांतर, लिव्ह इन, पोर्नग्रस्त पौगंड, निवडणुका आणि प्रसारमाध्यमे, आयुष्याचा गेम करणाऱ्या गेम्स, अनसोशल षडयंत्राचा पर्दाफाश, या आजच्या समाजातील अत्यंत संवेदनशील मुद्द्‌द्याचा आपण परिणामकरीत्या वेध घेतलेला आहे. नवमाध्यमांनी निर्माण केलेल्या नवनवीन प्रश्नांना वाचा फोडणारा एक वैचारिक आवाजग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करता येईल. महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. यात सुधारणावादी आणि परिवर्तनवादी विचारवंतांनी वैज्ञानिक दृष्टीने लेखन करून सातत्याने समाजामध्ये जागृतीचे कार्य केले आहे. आपल्या या पुस्तकामुळेसुद्धा जागृतीचे मोठे कार्य होणार आहे यात दुमत नाही. हा समाज विचारशील व्हावा आणि लोकांच्या मनांमध्ये विवेकनिष्ठ जाणिवांची बिजे रोवली जावी हा प्रामाणिक प्रयत्न आपण अशा पुस्तकांच्या माध्यमातून सातत्याने करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
या पुस्तकाची भाषा अत्यंत सुगम आहे. सोपी उदाहरणे देऊन आपण हा विषय अत्यंत सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितला आहे. वाढत्या नवमाध्यमांनी समाजासमोर काही आव्हाने उभी केलेली आहेत. अशा काळात आपले समाज आणि माध्यम हे आपले वैचारिक पुस्तक निश्चितच समाज जागृतीचे कार्य करेल, अशी आम्हाला खात्री आहे.
आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी समाज आणि माध्यम या पुस्तकासाठी मारोतराव नारायणे स्मृति राज्यस्तरीय वैचारिक साहित्य पुरस्कार 2026 आपणास आम्ही सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत.
पुढील उज्वल वाङमयीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!"
... जबाबदारी वाढली आहे, या जाणीवेसह नारायणे प्रतिष्ठानचे आभार मानायला हवेत!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा