मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे मित्र नवल भथेना

 (सन्मित्र प्रकाश लिंगनूरकर यांच्या 'दै. वार्ता सम्राट'मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध झालेला विशेष लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


नवल भथेना यांचे १९७० च्या दशकातील छायाचित्र (मूळ छायाचित्र कृष्णधवल होते, त्यावरुन रंगीत केले आहे.)


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान कार्यामुळे त्यांना जगभरात अक्षरशः कोट्यवधी अनुयायी लाभले. त्यांच्या हयातीमध्ये त्यांना अत्यंत प्रामाणिक अनुयायी लाभलेच, पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही आजतागायत त्यांच्या विचारकार्याने प्रभावित होऊन त्यांचे वैचारिक अनुयायित्व पत्करणाऱ्यांची संख्याही जगभरात वाढतेच आहे. कोट्यवधी अनुयायी लाभले तरी मित्र, सखा म्हणावा, अशी ओलाव्याची, स्नेहाची ठिकाणं त्यांच्या आयुष्यात फार कमी आली. मित्र म्हणावेत असे अगदी अत्यल्प स्नेही त्यांना लाभले. नवल भथेना हे त्यापैकी एक फार महत्त्वाचं नाव, जे खऱ्या अर्थानं मित्र या अतिव्याप्त संकल्पनेचे मूर्तीमंत स्वरुप बाबासाहेबांच्या आयुष्यात होते. अत्यंत निस्वार्थ, निर्मळ आणि आपल्या मित्राच्या मदतीसाठी सदैव तत्पर असं हे व्यक्तीमत्त्व होतं.

नवल भथेना यांच्याविषयी सर्वप्रथम वाचलं ते धनंजय कीर यांनी लिहीलेल्या बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये. त्यानंतर आदरणीय विजय सुरवाडे सरांनीही त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात भथेना यांच्याविषयी छोटं चरित्रात्मक टिपण लिहीलंय. या व्यतिरिक्त भथेना यांच्याविषयी फारसे काही हाती लागत नाही. अगदी अलिकडे मुंबईतील मिड-डे या टॅब्लॉईड दैनिकामध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्याविषयी एक छान लेख प्रसिद्ध करण्यात आला. सनोबर कीश्वर यांनी लिहिलेल्या त्या लेखामध्ये प्रथमच मला भथेना यांच्या कुटुंबाविषयी वाचावयास मिळाले. १९५६ मध्ये आंबेडकरांच्या निधनानंतर, या दोन्ही कुटुंबांमधील संपर्क तुटला. भथेना यांना रोशनी नावाची एक मुलगी होती. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांची पत्नी मोतीबाई यांचेही निधन झाले. या दोन्ही कुटुंबांमधील संपर्क सन २०२४मध्ये पुन्हा प्रस्थापित झाला. मुंबईत बाबासाहेबांची नात रमा आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली. पुण्याचे पत्रकार आणि दलित कार्यकर्ते केशव वाघमारे यांनी भथेना यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून कीश्वर यांचा संपर्क परवीन सोहेल जरीवाला यांच्याशी झाला; त्या रोशनी यांच्या एकुलत्या कन्या असून, सध्या सुरत येथे वास्तव्यास आहेत. त्या विधवा असून त्यांना एक मुलगी आहे. ही नवी माहिती कीश्वर यांनी या लेखात दिली आहेच; पण, महत्त्वाचे म्हणजे नवल भथेना यांचे १९७०च्या दशकातील एक दुर्मिळ छायाचित्रही या लेखामध्ये त्यांनी छापले आहे. भथेना यांच्याविषयी लिहीण्यापूर्वी ज्यांनी बाबासाहेबांशी असणारे त्यांचे मैत्र अधोरेखित करून नोंदविले, त्यांच्याविषयी कृतज्ञभाव सुरवातीलाच व्यक्त करणे मला अगत्याचे वाटते.

भीमराव रामजी आंबेडकर हे जेव्हा कोणीच नव्हते, म्हणजे डॉक्टर, बाबासाहेब, घटनाकार किंवा मंत्रीही नव्हते, तिथपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत अत्यंत निरलस मैत्रभावातून त्यांच्यासोबत सातत्याने राहणारे असे त्यांचे एकमेव मित्र म्हणजे नवल भथेना. ते बाबासाहेबांचे अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातील सहाध्यायी होते. बडोद्याच्या छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराजांच्या शिष्यवृत्तीमुळे भीमराव अमेरिकेला उच्चशिक्षणासाठी गेले. तेथे त्यांची भेट भथेना यांच्याशी झाली. २१ जुलै १९१३ रोजी न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर ते कोलंबिया विद्यापीठाच्या हार्टले हॉल डॉर्मेटरी या वसतिगृहात साधारणतः आठवडाभर राहिले होते. मात्र तेथील अर्धेकच्चे अन्न आणि बहुतांश पदार्थ गोमांसाचे असल्याने त्यांना ते काही मानवले नाही. प्रकृती बिघडल्याने त्यांनी भारतीय विद्यार्थी राहात असलेल्या कॉस्मोपॉलिटन क्लब येथे आपला मुक्काम हलवला. तेथूनही पुढे ते लिव्हिंगस्टन हॉल डॉर्मेटरीमध्ये राहायला गेले. या ठिकाणी त्यांची नवल भथेना यांच्याशी प्रथम भेट झाली. भथेना हे उपयोजित रसायनशास्त्र (इंडस्ट्रीयल केमिस्ट्री) या विषयाचे विद्यार्थी होते, तर भीमराव राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांच्यात चर्चेसाठी सामायिक असे विषय नसले तरी तेथील इतर महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत भथेना यांचे बाबासाहेबांशी चांगले मैत्र जमले होते. भथेना हे पारशी असल्यामुळे हिंदूंमधील जातिभेदाच्या भावनेपासून ते अलिप्त होते. त्यामुळेही कोणत्याही पूर्वग्रहाविना भीमरावांना त्यांनी आपलेसे मानले. भथेना सुखवस्तू पारशी कुटुंबातील असले तरी अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान अंशकालीन नोकरी करीत. भीमरावांना मात्र प्रचंड अभ्यास करावयाचा असल्याने ते शिष्यवृत्तीमधील ८० रुपये घरी पाठवल्यानंतर उरलेल्या रकमेत काटकसरीने आपला खर्च चालवत. त्यातही वाचन आणि पुस्तक खरेदीची भूक अधिक असल्याने प्रसंगी पोट मारून ते या दोन गोष्टी करीत. बहुतेकदा त्यांना मांसाचा तुकडा, पाव आणि एखादी कॉफी यावरच दिवसभराची भूक भागवावी लागे. भथेनाही त्यांच्यासोबत असत.

या मैत्रीचे आणखी एक कारण म्हणजे भथेना यांच्या राजकीय विचारांशी जुळलेले भीमरावांचे सूर. भथेना हे त्यांच्या समाजातील अशा एका लहान गटाचे प्रतिनिधित्व करत होते — ज्याचे नेतृत्व दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता आणि दिनशा वाच्छा आदी महत्त्वाचे नेते करत होते आणि ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या नेत्यांना याची तीव्र जाणीव होती की, पारशी लोकांनी आपली मूळ वांशिक ओळख कायम राखूनही भारतीय अस्मितेशी एकरूप होणे, हे केवळ तेव्हाच शक्य होईल, जोपर्यंत नव्याने आकार घेत असलेले भारतीय राष्ट्र हे हिंदूंच्या सामाजिक-धार्मिक प्रभावापासून अलिप्त राहील. भथेना हे त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस'कडे आकर्षित झाले होते आणि पुढे वाच्छा हेच त्यांचे मार्गदर्शक बनले.

एच.पी. मोदी यांचे एक पुस्तक आंबेडकरांच्या वाचनात आले. त्याने ते भारावून गेले. त्या पुस्तकाचे लेखक हिंदू आहेत की पारशी याविषयी त्यांना जाणून घ्यावयाचे होते, म्हणून त्यांच्या वतीने भथेना यांनी सर दिनशा वाच्छा यांना पत्र लिहीले. या काळात या उभय मित्रांचा वाच्छा यांच्याशी उत्तम पत्रव्यवहार प्रस्थापित झाला. भथेना जेव्हा मुंबईला परतले, तेव्हा वाच्छा यांनी त्यांना त्यांच्या औद्योगिक केमिस्टच्या व्यवसायात त्यांना मदत केली. आंबेडकरांविषयीही त्यांना कुतूहल होते. पुढे आंबेडकर जेव्हा सिडन२हॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या जागेसाठी खटपट करीत होते, तेव्हा वाच्छा यांनीही त्या कामी त्यांना मदत केली होती.

बडोदा सरकारने उच्च परदेशी शिक्षणासाठी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या कराराची मुदत संपल्याने लंडनमधील विद्याभ्यास अर्धवट सोडून बाबासाहेबांना भारतात परतावे लागले. आणि करारानुसार ते बडोदा सरकारच्या सचिवालयात महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नोकरीत रूजू झाले. पण, तेथे जातीभेदामुळे त्यांना पावलोपावली अवहेलना आणि अपमान सहन करावा लागला. बडोद्यात त्यांना राहावयासही कोणी जागा देई ना. अखेरीस जहांगीरजी धनजीभाई हॉटेलवाला या पारशी गृहस्थाच्या हॉटेलात त्यांना अडगळीच्या खोलीत रात्री पाठ टेकण्यापुरती जागा मिळाली, तेही एदलजी सोराबजी असे पारशी नाव धारण केल्यानंतर. मात्र, तेथेही बिंग फुटले आणि काही पारशी गृहस्थानी हातात काठ्या घेऊन त्या हॉटेलवर आंबेडकरांविरोधात हुल्लड माजविली. अखेरीस गिऱ्हाईक तुटण्याच्या भितीने त्या मालकाने त्यांना जागा सोडण्यास सांगितले. आंबेडकरांनी त्यांच्याकडून आठ तासांची मुदत मागितली. मात्र, त्या कालावधीत काहीच व्यवस्था होऊ न शकल्याने मोठ्या व्यथित अंतःकरणाने त्यांनी बडोदा सोडले आणि सप्टेंबर १९१७मध्ये मुंबईस परतले.

चार वर्षांत उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी आंबेडकरांना लंडनला परत जायचे होते. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे गरजेचे होते. यावेळीही भथेना त्यांच्या मदतीला धावून आले. तोवर भथेना यांनी मुंबईत सात रस्ता येथे एक रासायनिक कारखाना काढला होता. त्याचप्रमाणे ते शेअर बाजाराचा व्यवसायही करीत असत. डॉ. आंबेडकरांचा चरितार्थ चालावा म्हणून भथेना यांनी त्यांना काही पारशी विद्यार्थ्यांच्या शिकवण्या मिळवून दिल्या. तसेच त्यांची बाटलीबॉय इन्स्टिट्यूट ऑफ अकाऊंटन्सीमध्ये नेमणूक करण्याच्या कामीही मदत केली. श्री. बाटलीबॉय हे भथेना यांचे चुलतबंधू होते. त्याच वेळी बाबासाहेबांनी स्टॉक्स अँड शेअर्स धंड्यातील लोकांना सल्ला देणारी एक कंपनी काढली. मात्र, त्यांची जात समजताच कन्सल्टन्सी उत्तम असूनही ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर एका धनिक पारशी गृहस्थाचा पत्रव्यवहार आणि हिशेब यांवर देखरेख ठेवण्याचे आणखी एक काम त्यांनी पत्करले. ही सर्व कामे मिळवून देण्यात भथेना यांचा मोलाचा वाटा होता. त्याच वेळी सिडनहॅम कॉलेजात एका हंगामी प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. तेव्हा नोकरी करून पैसा उभा करावा व आपला राहिलेला अभ्यासक्रम लंडनला जाऊन पुरा करता यावा म्हणून डॉ. आंबेडकरांनी अर्ज केला. मुंबई राज्याचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी या नोकरीसाठी खटपट केली. त्यातही भथेना यांचे दिनशा वाच्छांमार्फत केलेले प्रयत्नही कारणीभूत होते आणि भीमराव १२ नोव्हेंबर १९१७ रोजी प्राध्यापक पदी रुजू झाले. या काळात भथेना यांच्याशी त्यांच्या वारंवार भेटीगाठी होत. दोघे एकत्र भोजन घेत, चर्चा करीत असत. बाबासाहेबांना सिडनेहॅम कॉलेजमध्ये ४५० रुपये इतके वेतन मिळत असे. त्यापैकी ३५० रुपये ते दरमहा बाजूला काढत आणि अवघ्या १०० रुपयांत घरखर्च व स्वतःचा खर्च भागवित असत. आपले वाचवलेले पैसे साठवण्यासाठी ते भथेना यांच्याकडेच देत असत. अशा काटकसरीतून पैशांची जमवाजमव करून डॉ. आंबेडकर लंडनला राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ५ जुलै १९२० रोजी निघाले, तेव्हाही वचनचिठ्ठीवर (Promisory Note) ५००० रुपयांचे कर्ज नवल भथेना यांनीच त्यांना दिले. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीही यावेळी आंबेडकरांना आर्थिक मदत केली होती.

१९२०मध्ये शाहू महाराजांच्या सहकार्यातून बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाच्या प्रकाशनाला प्रारंभ केला. त्यावेळी मूकनायकला गोदरेज कंपनीच्या तिजोरीच्या जाहिराती मिळवून देण्यासाठीही भथेना यांनी प्रयत्न केले होते. या जाहिरातींचे पैसे मिळवून देण्याबरोबरच बाबासाहेब लंडनमध्ये असताना त्यांच्या माघारी मूकनायकला आर्थिक आधार देण्याचे कामही त्यांनी केले. लंडनवरुन त्यांनी पाठवलेली पुस्तके मुंबईत स्वीकारण्याचे कामही बहुतेकदा भथेना यांनाच करावे लागत असे. हे मित्रकर्तव्य ते आनंदाने पार पाडत असत.

लंडनमधील अभ्यासक्रम पूर्ण करून उच्चविद्याविभूषित बॅरिस्टर डॉ. आंबेडकर १९२३ला भारतात परत आले. त्यावेळी निर्वाहाचे साधन म्हणून वकिली करायची आणि आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांना अस्पृश्यतेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी संघर्ष करायचा, असा निर्धार डॉ. आंबेडकरांनी केला. पण, वकिलीची सनद मिळविण्यासाठी लागणारी अनामत रक्कमही त्यांच्याकडे नव्हती. ती रक्कमही नवल भथेनांनी त्यांना दिली.

भथेना अमेरिकेतून आल्यापासून म्हणजे १९२१ पासूनच काँग्रेसमध्ये सक्रिय झाले होते. पुढील दशकभर मुंबईतील विदेशी मालाची होळी वगैरे काँग्रेसप्रणित आंदोलनांत सक्रिय सहभागी होत असत. भथेनांनी पुढे आयुष्यभर केवळ खादीचे कपडेच वापरले. एकीकडे भथेना हे असे गांधीवादी, तर दुसरीकडे डॉ. आंबेडकर गांधी विरोधक. या मैत्रीची परीक्षा पाहणारे पुणे करारासारखे काही मोठे प्रसंग सामोरे आले, तथापि, या हे मतभेद या दोघांच्या निखळ मैत्रीआड कधीही आले नाहीत, हे महत्त्वाचे!

पुणे कराराच्या वेळी गांधींचे उपोषण सुरू असतानाचा प्रसंग भथेना यांनी एके ठिकाणी सांगितला आहे. त्यात ते म्हणतात की, मी १९२१मध्ये गांधीजींच्या चळवळीत सामील झालो. त्यामुळे आंबेडकर आणि माझ्यात वारंवार खटके उडत. माझ्या राजकीय सहानुभूतीमुळे ते वारंवार माझ्यावर खेकसत. पण अशी स्थिती असूनही आमचे मैत्रीचे नाते कायम राहिले. आम्ही नेहमी एकत्र भेटत असू व एकत्र जेवण घेत असू. गांधीजींनी जेव्हा पुण्यात त्यांचे उपोषण सुरू केले, तेव्हा योगायोगाने माझी व डॉ. आंबेडकरांची मोटारबसमध्ये भेट झाली. तेव्हा आमच्यात भयानक वाग्युद्ध घडले. ते इतके की, मी बसमधून खाली उतरलो व त्यांना एकट्याने पुढे जाऊ दिले. त्या काळातील काँग्रेसच्या मोठ्या व्यक्तींपैकी एस.आर. तेरेसेस, डॉ. साठे, बी.एम. बोरुचा व इतरांनी त्या प्रकरणात डॉ. आंबेडकरांचे मन वळविण्यास मी त्यांना मदत करावी, अशी मला विनंती केली. परंतु, मला डॉ. आंबेडकरांचे मन पक्के माहीत असल्यामुळे व कोणत्याही बाबतीत मी पूर्ण असहाय्य होतो त्यामुळे, १९२५ नंतर मी राजकारणात कसलाच रस घेतला नाही.

पुढे डॉ. आंबेडकरांनी अनेक लढे लढवले, ते प्रथम श्रेणीचे राष्ट्रीय नेते झाले, त्यांनी अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, १९४२ साली गव्हर्नर-जनरलच्या कार्यकारी मंडळात ते मजूर मंत्री झाले. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होऊन स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. नेहरू मंत्रीमंडळात स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले, परंतु भथेना यांनी डॉ. आंबेडकरांवर केलेल्या अनंत उपकारांचे कधीही भांडवल केले नाही किंवा त्या उपकारापोटी कुठलेही पद, नेतेपद वा एखादे स्वार्थसाधू काम करून घेतले नाही, किंवा आपली कुठल्याही समितीवर वर्णी लावून घेतली नाही. उलट पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कामकाजात लक्ष घालून कार्यभार स्वीकारण्याची विनंती खुद्द डॉ. आंबेडकरांनी मृत्यूच्या काही महिने अगोदर त्यांना केली होती.

आपल्या मुलाला (यशवंत) व पुतण्याला (मुकुंद) सन्मानाने निर्वाह करण्याचे साधन प्राप्त व्हावे यासाठी डॉ. आंबेडकरांचा जीव तळमळत होता. त्या उद्देशाने त्यांनी भथेना यांना पत्र पाठवून या दोघांना काही धंदा काढून द्यावा आणि त्यासंबंधीची योजना आखून पाठवावी, असे कळविले. "हे घडले, तर मला शांतपणे मरण येईल. बाप आपल्या मुलांच्या हितासाठी जसा झटतो, तसा तू माझ्या मुलांसाठी झटून त्यांना सतत चालत राहिल, असा काहीतरी धंदा शिकव" अशी कळकळीची विनंती डॉ. आंबेडकरांनी भधेना यांना १९४८ साली पत्राद्वारे केल्यावर भथेना यांनी यशवंत व मुकुंद यांना लॉण्ड्रीच्या धंद्यात भागीदारी मिळवून दिली होती. या धंद्यात त्यांना अपयश आल्याने आंबेडकरांचे मन मात्र निराशेने पोळून निघाले.

भथेना यांनी आंबेडकरांना प्रत्येक संकटात दिलेली साथ, केलेली मदत अमूल्य आहे. सप्टेंबर १९२० मध्ये लंडनहून डॉ. आंबेडकरांनी भथेना यांना पाठविलेल्या पत्रात एक मित्र म्हणून त्यांच्याबद्दल अत्यंत भावनिकतेने ज्या कृतज्ञ भावना व्यक्त केल्या आहेत, त्या पाहता, त्यातून भथेना यांच्या मनाची विशालता पाहून मन गहिवरुन येते. भथेना यांना पाठविलेल्या त्या पत्रात डॉ. आंबेडकर म्हणतात की, "माझ्यामुळे तुला त्रास होतो, या विषयी मला अत्यंत खेद वाटतो. माझ्यावर विश्वास ठेव की, अत्यंत घनिष्ठ मित्रही सहन करू शकणार नाही, एवढा त्रास तुला माझ्यामुळे सहन करावा लागतो, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. या ना त्या कारणासाठी माझी सतत निकडीची मागणी असते, त्यामुळे तुझाही नाईलाज होऊन, माझा एकमेव आणि अत्यंत जवळचा प्रिय मित्र माझ्यापासून दुरावणार नाही, एवढीच मी आशा करतो." आपल्या या अत्यंत दिलदार मित्राकडे मदतीसाठी सातत्याने याचना करीत असताना आंबेडकरांच्या मनाची होणारी तगमग पाहून अस्वस्थ व्हायला होते. पण, मित्र म्हणून त्याने आपली साथ कधीही सोडू नये, याची रास्त अपेक्षाही ते इथे व्यक्त करतात.

डॉ. आंबेडकर मजूर व कायदा मंत्री असण्याच्या कालखंडात त्यांच्या सचिवांमार्फत भथेना यांना निरोप पाठवून बोलावून घेत. त्यावेळी त्यांच्या ७ ते ९ या न्याहरीच्या वेळेत किंवा रात्री १० नंतर भथेना त्यांना जाऊन भेटत असत. या गप्पांच्या वेळी या दोन मित्रांखेरीज तिथे कोणीही नसे.

माईसाहेब आंबेडकर यांनीही आपल्या आत्मचरित्रामध्ये या दोघांच्या मैत्रीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. १५ एप्रिल १९४८ रोजी शारदा कबीर (सविता आंबेडकर) यांचा बाबासाहेबांसोबत नवी दिल्ली येथे नोंदणी विवाह झाला. त्यावेळी समाजाच्या सर्व स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यावेळीही भथेना यांनी पत्र पाठवून बाबासाहेबांच्या या पुनर्विवाहाचे जोरदार समर्थन करीत त्यांना पाठिंबा दिला होता. बाबासाहेबांनी १९ एप्रिलला भथेना यांना प्रत्युत्तराचे पत्र पाठवले. त्यामध्ये, या विवाहाची आवश्यकता लक्षात घेऊन या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल भथेना यांना त्यांनी धन्यवाद दिले. या दोघांच्या मैत्रीचे वर्णन माईसाहेबांनी अतूट मैत्री असे केले असून डॉ. आंबेडकर आणि नवल भथेना यांची मैत्री ही आदर्श मैत्री होती, असे त्या म्हणतात.

या दोन परममित्रांची अखेरची भेट बाबासाहेबांच्या निर्वाणापूर्वी दोन महिने आधी (ऑक्टोबर १९५६) झाली होती. ही भेट दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रदीर्घ काळ चालली. त्यावेळी त्यांच्या खोलीत दुसऱ्या कोणालाही प्रवेश दिला नव्हता. त्या दिवशी डॉ. आंबेडकर त्यांच्याशी खूप अंतःकरणपूर्वक बोलले. त्यांनी त्यांचा मुलगा (यशवंत) व पुतण्या (मुकुंद) यांच्यावर देखील टीका केली. या भेटीविषयी भथेना लिहीतात की, त्यावेळी माझा मित्र आता अखेरच्या प्रवासाला लागला आहे, या दुःखद भावनेने मी त्या घराचा निरोप घेतला. ते आणखी दोन महिने जगले, यावर माझा आता देखील चटकन विश्वास बसू शकत नाही. आपल्या मुलाला व पुतण्याला उपासमारी होणार नाही, इतकाच पैसा मी त्यांच्यासाठी ठेवण्याचे ठरविले आहे, असे त्याप्रसंगी डॉ. आंबेडकरांनी मला सांगितले. बाकी पैसे ते त्यांनी स्थापलेल्या शैक्षणिक संस्थांना देणार होते. ज्यांनी त्यांना फसविले, असे त्यांना वाटत होते, त्यां व्यक्तींविषयी आणखी त्यांनी माझ्याशी चर्चा केली व या कारणास्तव त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेत (पीपल्स एज्युकेशन सोसायटी) त्याचप्रमाणे त्यांना सुरू करावयाच्या नियोजित तंत्र संस्थेत मी रस घ्यावा, अशी मला त्यांनी विनंती केली. मी या गोष्टीचा विचार करीन आणि नंतर कळवीन, असे मी त्यांना म्हणालो. हे आमच्यातील शेवटचे संभाषण ठरले.

बाबासाहेबांच्या आयुष्यात वेळोवेळी त्यांच्या मदतीसाठी तत्परतेने उभ्या ठाकणाऱ्या भथेना यांना बाबासाहेबांच्या माध्यमातून अनेक लाभाची पदे, मानसन्मान वगैरे सहज मिळविता आले असते, पण तसा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. बाबासाहेबांसाठी ते सदैव मैत्रीचा एक निर्मळ झुळझुळता प्रवाह राहिले, जिथे मित्र म्हणून बाबासाहेबांना त्यांचे मन खऱ्या अर्थाने उघड करता येत असे. विशेषतः वैयक्तिक समस्या, कौटुंबिक प्रश्न याविषयी ते केवळ भथेना यांच्याशीच चर्चा करत असत, असे उपलब्ध दस्तऐवजांवरुन लक्षात येते. अशी मैत्री त्या काळात तर दुर्मिळच होती, आणि आजच्या काळात तर अशक्यप्रायच. म्हणूनच या मैत्रीची स्मरणनोंद महत्त्वाची!

संदर्भ:

१.      आंबेडकर, सविता: डॉ. आंबेडकरांच्या सहवासात,तथागत प्रकाशन, कल्याण (२०१३)

२.      कीर, धनंजय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (२००६)

३.      खैरमोडे, चां.भ.: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड-१, सुगावा प्रकाशन, पुणे (२००२)

४.      सुरवाडे, विजय (संपा.): समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई (२००७)

५.      Keeshwar, Sanober: An Unlikely friendship that stood taste of time (Article in Mid-Day, Mumbai), 6 December 2025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा