(शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी अपघातात जखमी झाल्याने उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!)
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या अकाली निधनामुळे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा समकाळातील एक अत्यंत महत्त्वाचा असा इंटेलेक्चुअल मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
डॉ. महाजन यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विविध मंचांवरून आपल्या मुख्य विषयाबरोबरच चळवळीच्या संशोधन संदर्भानेही फार महत्त्वपूर्ण काम केले. डॉ. महाजन आंबेडकरी विचारांचे सच्चे पाईक होते. त्यांनी केंद्राच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम विषयांवर प्रख्यात तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा , परिषदा आयोजित करण्यासह विविध विषयांवरील महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि संविधानाविषयी जनजागृतीपर अनेक उपक्रम राबविले. विद्यापीठासह महाविद्यालयांत 'संविधान दूत' उपक्रम ही त्यांचीच संकल्पना. संविधानविषयक अभ्यासक्रम, संविधान प्रश्नमंजुषा, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले. या सर्व उपक्रमांत मलाही अतिशय हक्काने सामावून घेतले, हे त्यांचे प्रेम!
महाजन सरांसमवेत कोणत्याही विषयावर चर्चा करणे हा इंटेलेक्चुअल एनरिचमेंटचा भाग असे. अनेक नवे मुद्दे त्यांच्याकडून माहिती होत असत. अनेक शंकांचे निरसन होत असे. अतिशय शांत, संयत आणि नेमकेपणाने ते आपले म्हणणे मांडत असत. चेहऱ्यावर सदैव एक हलकेसे स्मित असे त्यांच्या. कामाचा कितीही व्याप असो, कधीही त्यांना संत्रस्त झालेले पाहण्यात आले नाही. अनेक क्लिष्ट विषयांच्या अनुषंगानेही त्यांच्याकडे स्पष्टता असे. म्हणजे आकलन आणि विश्लेषण या बाबतीत ते खूपच पुढे असायचे. बरे, केवळ शैक्षणिक, संशोधकीय अगर प्रशासकीय बाबींतच नव्हे, तर विविध सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही त्यांचा लक्षवेधी वावर असे. ते स्वतः एक कवी होते. त्यामुळे भोवतालाकडे अत्यंत तरल आणि संवेदनशीलपणे पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. वेगवेगळे मुखवटे चढवून जगाला प्रत्यक्षाहूनी वेगळाच चेहरा दाखविणाऱ्यांची मांदियाळी आसपास वाढत असतानाच्या काळात प्रामाणिक चेहऱ्याने वावरणारा चळवळीचा आणि माझाही एक सच्चा मार्गदर्शक गेल्याचे हे दुःख फार फार मोठे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा