![]() |
| शौकत शेख |
![]() |
| महान संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्यासमवेत शौकत शेख |
शौकत मामांच्या स्मृतींना अर्पण गीत...
'प्यासा सावन' या चित्रपटातलं 'मेघा रे मेघा' हे गीत माझ्या हृदयाच्या खूप जवळचं आहे. याला यामधल्या उदात्त प्रेमभावना ह्या खूप नंतर कारणीभूत ठरल्या; मात्र त्याही पूर्वी कारणीभूत ठरले ते म्हणजे मी लहान असताना माझे गायनातले पहिले गुरु शौकत अली शेख! त्यांना सगळे शौकत भैया म्हणायचे. मी शौकतमामा म्हणायचो. तर हे शौकत मामा हे 'मेघा रे मेघा' गाणं इतकं जबरदस्त म्हणायचे की क्या बात! संगीत साथ असेल तर त्यांचं हे गाणं प्रचंड उंचीवर जायचं आणि संगीतसाथीविनाही!
जेव्हाही कधी शौकत मामा आमच्या कागलेवाड्यात येत आणि वाड्यातील सगळी मंडळी एकत्र गप्पा मारत बसलेली असत, तेव्हा शौकतमामांच्या या गाण्याशिवाय त्या मैफलीला रंगच चढत नसे. अत्यंत तन्मयतेनं ते हे गीत अशा नजाकतीनं सादर करीत की नुसतं ऐकतच राहावंसं वाटत असे. गमतीची गोष्ट यामध्ये अशी की, शौकतमामा बोलताना अडखळायचे म्हणजे थोडंसं हकलायचे. मात्र गाणं म्हणायला लागले की त्यांचं हे अडखळणं कुठल्या कुठं गायब व्हायचं. मला या गोष्टीची खूप मौज वाटायची की हे कसं काय शक्य आहे? मात्र त्यांना ते साधलेलं होतं खरं. बोलताना अडखळणं आणि गाणं म्हणताना मात्र कुठंही एकही स्वर न चुकू देता, कुठंही बेसूर न होता अशा पद्धतीने ते सादर करायचे.
त्यांच्या अनेक आठवणी आहेत, त्यातली जवळची एक म्हणजे शाळेच्या गॅदरिंगसाठी मी जेव्हा बालगीतांतून बाहेर पडून चित्रपट गीत म्हणण्याचा प्रसंग माझ्यावर आला, तेव्हा आईने माझी तयारी करून घेण्याची जबाबदारी शौकत मामांच्याकडे दिलेली होती आणि त्यांनी त्यांची दररोजची संध्याकाळ माझ्यासाठी राखून ठेवलेली असायची. माझ्याकडून ते रियाज करून घेत असत. ते म्हणायचे की, गाणं कुठलंही असो, त्याच्याकडे तितक्याच गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि त्याचा सराव तितक्याच गंभीरपणाने केला पाहिजे, तरच आपल्याला हवा तो रिझल्ट मिळवता येतो. कुठल्याही सुराचं मोल कमी-अधिक असत नाही. शास्त्रीय गीताच्या सुराचं, शब्दाचं जे मोल, तितकंच भावगीताचंही आणि तितकंच चित्रपटाच्या गीताचंही! हे तत्वज्ञान मला पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर ते शौकत मामांनी.
पुढच्या काळात त्यांच्यासोबत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही गाण्याचे कार्यक्रम करण्याचाही योग आला. मात्र त्यांना ऐकणं ही खूपच नादावून टाकणारी गोष्ट होती. प्रेम तर माझ्यावर इतकं अपरंपार केलं की आठवण आली तरी डोळ्यामध्ये पाणी दाटतं. शौकत मामा आज जरी नसले तरी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी हे गाणं म्हणण्याचा प्रयत्न केलेलाय.. त्यांच्याएवढं भारी ते नक्कीच झालेलं नाही; पण एक प्रयत्न आहे शौकतमामांना आदरांजली वाहण्याचा...!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा