रविवार, २८ जानेवारी, २००७

वंशवादाचा बळी?

(आज, रविवार, दि. २८ जानेवारी २००७ रोजी दै. सकाळच्या साप्ताहिक सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.)





जानेवारीच्या मध्यात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा 'सेलिब्रिटी बिग ब्रदर' या इंग्लंडमधील एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील रिअॅलिटी शोमध्ये ब्लडी पाकी (युरोपात आशियाई नागरिकांसाठी वापरले जाणारे अवमानकारक संबोधन), डॉग आदी अवमानास्पद विशेषणे वापरून सहभागी सहकलाकारांनी तेजोभंग केला. वर्णभेदाच्या या वर्तणुकीचा भारतीयांबरोबरच ब्रिटनमधील प्रेक्षकांनी तीव्र निषेध केलाच; पण त्याचे पडसाद ब्रिटनच्या संसदेतही उमटले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही त्याचा निषेध केला.

तब्बल साडेतीन कोटी रुपये घेऊन या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या शिल्पाला हा प्रकार अगदीच अनपेक्षित असावा, अशातला भाग नाही. किंबहुना या सेलिब्रिटीजनी एकमेकांशी गुडीगुडी बोलणे किंवा वागणे यात प्रेक्षकाला काय रस असणार? त्यापेक्षा त्यांच्यातील भांडणे, तणावाचे संबंध आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य हाच या कार्यक्रमाच्या टीआरपीचा आत्मा आहे. त्यात आपली शिल्पाही कसलेली (की कसली का असेना!) अभिनेत्री आहे. तिनं छान रडून वगैरे या कार्यक्रमातील अन्य कलाकारांच्या तुलनेत आपली लोकप्रियता बळकट केली आहे. त्याबद्दल तिला मानायलाच हवं. आता झाल्या प्रकाराबद्दल घूमजाव करीत शिल्पाने व्यावसायिकतेची प्रचिती दिली आहे. असे असले तरी आम्ही तिच्याशी सहमत आहोत, असे मात्र नाही. कोणत्याही भारतीयाची किंवा कोणत्याही नागरिकाच्या राष्ट्रीयत्वाची खिल्ली, कुचेष्टा ही बाब निषेधार्हच आहे. या ठिकाणी केवळ या एकूण प्रकरणामागची व्यावसायिकता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुळात शिल्पा शेट्टी प्रकरणातून, त्यापूर्वी काही दिवसच अगोदर घडलेल्या एका गंभीर घटनेकडे वाचकांचे लक्ष वेधायचे आहे. रायगड जिल्ह्यातील रोह्यानजीक माळसाई या खेड्यात गेल्या अकरा डिसेंबरला स्टीफन बेनेट या ब्रिटन पर्यटकाचा मृतदेह झाडाला फाशी दिलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर या घटनेविषयी अनेक तर्कवितर्क लढविले गेले. परस्पर विसंगत माहिती सामोरी येत गेली. गावातील एका महिलेची छेड काढल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्याला बदडून अखेर झाडावर फाशी दिले, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सहा ग्रामस्थांना अटकही झाली आहे. पोलिस तपासात स्टीफनविषयी काही संशयास्पद बाबी उजेडात आल्या आहेत. तो अमली पदार्थ घ्यायचा, गोव्यात सारखी हॉटेल बदत बदलायचा. अशा माहितीमुळे स्टीफनच्या मृत्यूभोवतीचे गूढ वाढलेय.

मुळात तो मुंबईहून गोव्याला जाताना मध्ये रोझातच का उतरला आणि चालत माळसाई गावाकंडे का गेला. या प्रश्नाचे उत्तर सांपडलेले नाही. त्याच्या आई-वडिलांच्या आणि बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे मात्र स्टीफन अत्यंत सुस्वभावी होता. मादक पदार्थांच्या सेवनाच्या सवयीचाही त्यांनी इन्कार केलाय. त्याच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार तो एक चांगला पर्यटक होता. पोलिसांना आढळलेल्या काही संशयास्पद बाबी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्याच्या नातेवाईक, मित्रांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू. त्या दिशेने आपण विचार केला तर या परदेशी पर्यटकाच्या खून प्रकरणाचे गांभीर्य आणखीचं वाढते, जरा स्टीफनच्या जागी स्वतःला ठेवून पाहू. पर्यटनाची हौस असलेला स्टीफन रोह्यात मध्येच गाडी थांबलेली पाहून उतरला. कोकण रेल्वे मार्गाच्या निसर्गसौंदयनि भारावलेला स्टीफन त्याचा आस्वाद घेत चालू लागला, असाच चालत तो एका गावात पोहोचला. हे गाव कोणते, पुढे काय लागते, परिसरात आणखी काय काय पाहण्यासारखे आहे, या विषयी किंवा आपण चुकून स्टेशनपासून फारच दूर आलो आहोत, आता परत कसे जायचे, या विषयी त्याला माहिती हवी असेल, त्यासाठी एखाद्या ग्रामस्थाला विचारणे क्रमप्राप्त होते; पंण विचारणार कसे? भाषेचा मोठा अडसर त्याच्या आणि ग्रामस्थांच्या दरम्यान होता. त्यातच त्याला एक महिला दिसली. आपले प्रश्न त्याला हातवारे करून विचारण्याखेरीज दुसरे गत्यंतरच नव्हते. आता त्याच्या हातवाऱ्यांचा त्या महिलेने आणि ग्रामस्थांनी काय अर्थ घेतला. याला स्टीफन जबाबदार कसा? आपल्या परिसरातल्याच जंगलातला एखादा दुर्मिळ प्राणी (किंवा बिबट्या जरी) गावात आला तर त्याला लाठ्या-काठ्या आणि दगडांनी ठेचून मारणाऱ्या आपल्या अडाणी जनतेसाठी स्टीफन हा एखाद्या एलियनसारखाच (परग्रहावरचा मानव) होता. त्याच्याही वाट्याला तेच आले. पोलिस तपासात जर स्टीफन हा वंशवादाचा बळी उरल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आल्यास त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण असेल? आज शिल्पा शेट्टीसाठी आपली अस्मिता जागृत झाली आहे. उद्या स्टीफनच्या मृत्यूबद्दल आपण तितक्याच पोटतिडकीने ब्रिटनवासीयांची क्षमायाचना करू शकू का? जागतिक वंशवादाबद्दल ओरड करण्यापूर्वी एकदा आपल्या देशातील अठरापगड जातीधर्माच्या भिंतीत बंदिस्त सामाजिक परिस्थितीकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे, असे नाही वाटत? शेवटी परमपूज्य राजकुमार यांच्या शब्दांत या साऱ्या गोष्टीचे सार सांगायचे म्हणजे 'जिनके खुदके घर शिशे के होते हैं, वो दुसरोंके घरोंपर पत्थर नही फेंका करते!'

बुधवार, २४ जानेवारी, २००७

एमपीएससीचे विद्यार्थीभिमुख पाऊल

लोकसत्ता (२४-१-२००७)


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षा अर्जाच्या स्वरूपात तसेच ते भरून घेण्याच्या पद्धतीत बदल केले आहेत. आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची सर्वंकष माहिती देणारी तसेच त्यातच सर्व परीक्षांसाठी सामायिक अर्ज असणारी माहितीपुस्तिका दि. २२ जानेवारी २००७ पासून राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयात कायमस्वरूपी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याविषयी दै. लोकसत्तामध्ये आज, दि. २४ जानेवारी २००७ रोजी प्रकाशित झालेला लेख...



सध्या देशात सुशिक्षित तरुणांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध रोजगार आणि नोकरीच्या संधी यांचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वयंरोजगार सुरू करण्याची ऐपत किंवा क्षमता असेल, असेही नाही. या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरीच्या संधीही कमी असल्या तरी हमखास आणि विश्वासाची म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. स्पर्धा परीक्षा हा त्याचा मार्ग. त्यामुळेच शहरांतील विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या ग्रामीण भागातील गरिबाघरची मुलेही मग शासकीय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा मार्ग चोखाळतात. महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. लाखो विद्यार्थी आयोगाच्या भरवशावर आपले उमेदीचे आयुष्य स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात घालवतात. प्रिलीम पास होईपर्यंत प्रिलीम, ती झाली की मेन्स, मेन्स उडाली तर पुन्हा प्रिलीम, मग पुन्हा मेन्स आणि ती सुटली तर मग इंटरव्ह्यु, असा या परीक्षांचा प्रवास म्हणजे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एकेक आंदोलनच असते. जो पुढे गेला तो गेला, मागे राहिलेल्यांच्या धडका पुन्हा नव्या जोमाने सुरूच.


या तमाम परीक्षार्थीच्या अभ्यासातील एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे योग्य मार्गदर्शकाचा अभाव. प्रत्येक विद्यार्थ्यालाच भरमसाट फी भरून शहरांतील क्लासेसमध्ये प्रवेश घेणे परवडते, असेही नसते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्टिमेट मार्गदर्शक हा त्याच्या आधी एक दोन वर्षे अभ्यास करणारा विद्यार्थीच असतो. आता त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ट्रॅक कितपत योग्य, हे ज्या त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे पाहण्याच्या गांभीर्यावर अवलंबून असते.


नेमकी हीच बाब हेरून आयोगाने आता या विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण माहितीपुस्तिका तयार केली आहे. आयोगाच्या वेबसाइटवर यातील बहुतेक माहिती वेळोवेळी प्रदर्शित होत असली तरी फारच कमी विद्याथ्यर्थ्यांना इंटरनेट सेवेचा लाभघेता येत असतो. त्यामुळे एकत्रित स्वरूपात असलेल्या या माहितीपुस्तिकेला महत्त्व आहे. या पुस्तिकेतच आयोगाने आता परीक्षा अर्ज उपलब्ध केला आहे. आता प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळा अर्ज असे स्वरूप न ठेवता सर्व परीक्षांसाठी एकच सामायिक अर्ज असे नवे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. साधारण आठ भागांत विभागलेल्या या पुस्तिकेच्या पहिल्या भागात आयोगाविषयी, आयोगाच्या कार्यभाराविषयी, आयोगामार्फत नाही. घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, त्यांची केंद्रे यांची माहिती आहे. दुसऱ्या भागात विविध स्पर्धा परीक्षांची योजना, अर्हता, अभ्यासक्रम, निवडीचे स्वरूप यांची माहिती आहे. तिसऱ्या भागात हा अर्ज मिळण्याची व भरण्याची ठिकाणे, अर्ज करण्याची पद्धत, शुल्क, अर्हता, सर्वसाधारण पात्रता, वयोमर्यादा यांची माहिती आहे. चौथ्या भागात मागासवर्ग, महिला, अपंग, माजी सैनिक, अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू आदींसाठी आरक्षणाविषयी विस्तृत माहिती आहे. तर पाचव्या भागात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, परीक्षेतील गैरप्रकार, उमेदवारीसंदर्भातील बदल, पदग्रहण, परीविक्षा कालावधी वेतन, सेवा प्रवेशोत्तर शर्ती तसेच गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई आदी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी सर्वसाधारण माहिती देण्यात आली आहे. सहाव्या भागात विविध आवेदनपत्रांसोबत सादर करावयाच्या कागदपत्रांसंदर्भात सांगण्यात आले आहे. यामध्ये वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्गीय असल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान, अपंगत्व, माजी सैनिक, पूर्व पाकिस्तानातील खरा स्थलांतरित असल्याचा दाखला, विवाहितांच्या नावात बदल, छायाचित्र, अनुभव आदीविषयी पुराव्यादाखल सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती दिली आहे. पुस्तिकेच्या सातव्या भागात अर्जाची छाननी, अर्ज नाकारण्याची कारणे, विविध परीक्षांच्या गुणांची सीमारेषा, त्यांच्या पडताळणीची पद्धत, समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची प्राधान्यक्रमवारी या विद्यार्थ्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आठव्या भागात प्रवेश अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन केले आहे तसेच वय, राष्ट्रीयत्व, मागासवर्गीय, अनुभवाचा दाखला आदी विविध अर्जाचे नमुनेही देण्यात आले आहेत.


आयोगाने अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेली ही पुस्तिका राज्यातील सर्व प्रधान डाकघर तसेच जिल्हा व तालुका मुख्यालयांच्या पोस्ट कार्यालयामध्ये पोस्टाच्या कार्यालयीन वेळेत २२ जानेवारी, २००७ पासून कायमस्वरूपी विक्रीसाठी शंभर रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहे. आयोगाने एखाद्या परीक्षेसाठी जाहिरात दिल्यानंतर त्या परीक्षेसाठी लागू असलेली माहिती तसेच आवेदनपत्रामध्ये सर्व उमेदवारांसाठी लागू असलेली परिपूर्ण माहिती भरून प्रवेश फी व आवश्यक कागदपत्रांसह माहितीपुस्तिकेत नमूद केलेल्या पोस्ट कार्यालयांत विहित कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज मिळविणे तसेच अर्ज भरणे यासाठी अधिक यातायात करावी लागणार नाही.


या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरूपात परीक्षा शुल्क भरून घेण्याची पद्धत आयोगाने बंद केली आहे. आवश्यक किमतीचा कोर्ट फी स्टॅम्पची उपलब्धता असणे, तो मिळविण्यासाठी रांगा लावणे या। गोष्टी आता बंद होतीलच. त्याशिवाय हे स्टॅम्प चुकून लावायचे राहून गेले किंवा मध्येच गहाळ झाल्यास संबंधित परीक्षार्थीला परीक्षेच्या आदल्या दिवशी अर्ज नाकारले गेल्याचे समजायचे आणि त्याच्या संपूर्ण तयारीवर पाणी फिरायचे. यापुढे असा प्रकार होणार नाही. आता संबंधित पोस्ट खात्यात विद्यार्थ्याने रोखीने प्रवेश शुल्क भरावयाचे आहेत. त्याला त्याची पोचही तात्काळ मिळेल. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी जो निर्धारित अंतिम दिनांक असेल, त्या दिवसापर्यंत पोस्टात अर्ज भरून घेण्यात येतील. त्यामुळे अर्ज मुदतीत भरला नाही म्हणून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान यापुढे होणार नाही.


गेल्या डिसेंबरमध्ये कार्बनलेस कार्बन पेपरचा आपल्या परीक्षांसाठी वापर करण्यास सुरुवात करून अधिक पारदर्शी धोरण स्वीकारलेल्या एमपीएससीने नव्या वर्षात अधिकाधिक विद्यार्थीभिमुख धोरण स्वीकारल्याची प्रचीती या माहितीपुस्तिका छापण्याच्या निर्णयातून आली आहे.


ठळक वैशिष्ट्ये


आयोगाच्या सर्व परीक्षा, अभ्यासक्रम, नियम, अर्हता, पात्रता यांची माहिती एकत्रित


सर्व परीक्षांसाठी एकच सामायिक परीक्षा अर्ज


राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयांत कायमस्वरूपी उपलब्ध


कोर्ट फी स्टॅम्पऐवजी रोखीने परीक्षा शुल्क स्वीकारणार


विद्यार्थ्यांना तात्काळ पोच मिळणार





- आलोक जत्राटकर

सहायक संचालक (माहिती)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय, मुंबई

शुक्रवार, १४ एप्रिल, २००६

घटना 'शब्दबद्ध' करणारे विल्सन पेन भारतात राहणार की इंग्लंडला जाणार?

(दि. १४ एप्रिल २००६ रोजी दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले विशेष वृत्त...)





कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिखाणासाठी ज्या पेनचा वापर केला, ते पेन भारतात राहणार की इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियममध्ये जाणार, याचा निर्णय पेनधारकांनी राज्य सरकारवर सोडला आहे.

डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी वापरलेला 'विल्सन पेन' सध्या अखिल भारतीय दलित पँथर चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण कांबळे यांच्याकडे आहे. 'राज्य सरकारला हा पेन हवा असेल तर डॉ. आंबेडकर यांचा पूर्ण आदर राखून मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव दयावे,' अशी त्यांची अपेक्षा आहे. या अपेक्षेमागील कारण स्पष्ट करताना डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर येथील लॉ कॉलेजचे प्राचार्य होते. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्यही होते. आधी आपण त्यांचा आदर राखला पाहिजे. सरकारला जर हा पेन हवा असेल तर त्यांनी तत्पूर्वी मुंबई विद्यापीठास त्यांचे नाव दयावे. ही मागणी मान्य झाली नाही तर ब्रिटिश म्युझियमकडे हा पेन सुपूर्द करण्याचा त्यांचा विचार आहे. त्या दिशेने त्यांची चर्चाही सुरू आहे. 'ब्रिटीश म्युझियममध्ये हा पेन शंभर टक्के सुरक्षित राहील, याची मला खात्री आहे.' असेही ते म्हणाले.

या पेनखेरीज त्यांच्याकडे गोलमेज परिषदेसाठी डॉ. आंबेडकरांनी नेलेली पर्स तसेच अन्य चीजवस्तूही आहेत; मात्र हा पेन सर्वाधिक मौल्यवान असल्याचे त्यांचे मत आहे.


बुधवार, ६ एप्रिल, २००५

हवा करवीरची आणि बेळगावची सुद्धा...


दै. सकाळमध्ये 'हवा करवीरची' आणि 'हवा बेळगावची' या अत्यंत लोकप्रिय साप्ताहिक सदरांमध्ये वेळोवेळी विविध व्यंगात्मक विषयांवर टिप्पणी करण्याची संधी मिळाली. त्यातीलच काही लेखन किस्से माझ्य़ा ब्लॉगवाचकांसाठी येथे शेअर करीत आहे.

(हवा करवीरची, दि. ६ एप्रिल २००५)

गांधीनगरला जाताना...

एका कोल्हापूरवासी मित्राकडे बाहेरगावचा मित्र आला. त्याला नवे कपडे खरेदी करायचे होते. स्थानिक मित्रानं त्याला गांधीनगरचं नाव सुचविलं आणि त्याला घेऊन तो निघालाही. तावडे हॉटेलच्या नव्या पुलाखालून गांधीनगरच्या रस्त्याला मोटरसायकल लागली आणि त्या रस्त्यावरून जाता-जाता बाहेरगावच्या मित्राची चुळबूळ वाढलीय, हे स्थानिक मित्राच्या लक्षात आलं. त्यानं मित्राला अस्वस्थतेचं कारण विचारलं. त्यांवर काहीसं ओशाळतच मित्र उत्तरला, 'गड्या, आपल्याला शर्ट-पँट घ्यायचीय; आणि तुझ्या या गांधीनगरच्या रस्त्याला असलेल्या वीस जाहिरात बोडपैिकी पंधरा बोर्डावर नुसत्या चड्डी-बनियनच्या जाहिराती आणि उरलेल्या पाचवर साड्यांच्या. त्यामुळं गांधीनगर म्हणजे केवळ चड्डी-बनियन आणि साड्या मिळण्याचं ठिकाण असावं, अशी शंका आली, एवढंच!' हे ऐकल्यावर स्थानिक मित्राला हसू फुटलं आणि गांधीनगरमध्ये पोहोचल्यावर त्याच्या. मित्रालाही. कारण हवे तसेच कपडे त्याला मिळाले होते ना!
***


(हवा बेळगावची, दि. ३१ ऑगस्ट २००१)


आणि पांढरे कावळे टपकले...

प्रत्येक महिन्याचे शेवटचे पाच दिवस आणि सुरवातीचे पाच दिवस हे निपाणीमधील पोलिसांचे रस्त्यावर वाहने अडवून चेकिंग करण्याचे दिवस आहेत. कारण हे दिवस म्हणजे तसे 'कडकीचेच' असतात. निपाणीतील लोक म्हणूनच त्यांना टपून बसलेले कावळे असे म्हणतात. कालही एका मार्गावर असे बरेच 'कावळे' थांबलेले होते. रस्ताही मोक्याचाच म्हणजे महाराष्ट्रात जाणारा. त्यामुळे तिथे महाराष्ट्रात 'पासिंग' झालेल्या गाड्याही बऱ्याच सापडत होत्या. या चौकात मोठ्या गाड्यांच्या वाहनाचालकांसह दुचाकी वाहनचालकांनाही अडवण्यात येत होते. प्रत्येकाकडून दंड घेतलाच पाहिजे असेच त्यांचे धोरण दिसत होते. ज्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती, त्यांना दंड भरण्याशिवाय पर्यायच नव्हता. ज्यांच्याकडे परवाना होता पण रजिस्ट्रेशन बुक नव्हते, त्यांनाही दंड. ज्यांच्याकडे परवाना व रजिस्ट्रेशनच्या झेरॉक्स कॉपी होत्या त्यांच्याकडून ओरिजनल नसल्यामुळे दंड. ज्यांना पावसाची तमा न बाळगता खिशात परवाना आणि रजिस्ट्रेशन बुक ठेवले त्याची जीर्णावस्था होणे साहजिकच. अशा लोकांना कागदपत्रे व्यवस्थित ठेवली नाहीत म्हणून दंड म्हणजे एकूण काय त्या मार्गावरून दंड न देता जाणारा माणूस फारच नशीबवान. त्यातच उलट जाब विचारणाऱ्यांचीही वेगळी सोय जवळच्याच एका हॉटलेच्या मागे केली होती. काही छोटे कावळे तेथे होते, ते अशा व्यक्तींना 'प्रसाद' कमी करीत नव्हते. ही सर्व मोहीम एक 'उप' पदावरच्या डोमकावळ्याच्या देखरेखीखाली सुरू होती. काही लोकांनी धाडस करून त्यांना विचारले की ही मोहीम कशासंदर्भात आहे? त्यावर त्यांनी पटकन उत्तर दिले. आज आम्ही "दंडवसुली"ची मोहीम उघडली आहे. असे उत्तर देऊन ते गडबडले; पण बाण सुटलेला होता. उत्तर ऐकणाऱ्यावर मात्र आश्चर्य करण्याची वेळ आली.

***




उपदेशांचा परिणाम असाही...
एखादी अफवा किंवा पालकांचे अतिउपदेश लहान मुलांच्या मनावर आपला किती खोल ठसा उमटवतात, हे आपल्याला अनेक उदाहारणांनी सांगता येते. लहानपणी हटवादीपणा आणि रडारड टाळण्यासाठी मोठ्या व्यक्तींनी भूत, बागुलबुवा, राक्षस या संकल्पना तयार केल्या. त्यांच्या सावल्या आयुष्यभर आपल्या मानगुटीवर बसलेल्या असतातच. शिवाय आपणही हा वारसा पुढे चालूच ठेवत असतो. अशाच अफवेमुळे लहान मुले कशी भयभीत होतात, त्याचा हा तसा मजेशीर पण विचार केला तर गंभीरही, असा किस्सा !
काही दिवसांपूर्वी निपाणीत लहान मुले पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा पसरली. संपूर्ण शहरवासियांत तसेच शाळांना ज्यांची मुले जातात, अशा पालकवर्गांत तर भीतीचे वातावरण पसरले. साहजिकच मुलांवर विविध उपदेशांचे भडिमार होऊ लागले. उपदेश काय ? हे सविस्तर सांगण्याची गरजच नाही. कारण 'घरोघरी मातीच्या चुली (किंवा एल.पी.जी. सिलेंडर !)'
तर असे उपदेश सतत ऐकून मुलेही काहीशी भयभीत होणे साहजिकच. अशीच काही मुले शेजारच्या एका गावातून निपाणीला शाळेसाठी येत होती. तेवढ्यात एका मुलाच्या दफ्तरातून पट्टी रस्त्यावर पडली. चालण्याच्या नादात ते मुलांच्या लक्षात आले नाही. पण बाजार करून गावाकडे परत जाणाऱ्या एका खेडूताच्या ते लक्षात आले. तेव्हा त्याने वळून त्या पोरांना हाक मारली. 'अरे, पोरांनो हिकडे या. ह्ये बगा काय पडलं?' त्या पोरांनी मागे वळून पाहिले. आपल्याला एक अनोळखी माणूस बोलावतोय. त्याच्या खांद्यावर घोंगडी, एका हातात पिशवी आणि दुसऱ्या हातात काठी आहे. हे दृश्य त्या पोरांनी पाहिले आणि घरच्यांचे सारे उपदेश त्यांच्या बालमनात झरझर तरळले आणि एकाएकी त्यांनी शाळेच्या दिशेने जोरात पळायला सुरवात केली. खेडूत बिचारा हाक मारत राहिला आणि पोरं कधी नव्हे ती शाळेत लवकर पोचली. खेडूतानंही काही न समजून परत गावचा रस्ता धरला.
***

(हवा बेळगावची, दि. १४ सप्टेंबर २००१)


एकाला दोघांची येवस्था...


एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही त्याच्या नातेवाईकांच्या तसेच इतर संबंधितांच्या दृष्टीने करुण आणि दुःखी घटनाच. बेळगावमध्ये बऱ्याच तालुक्यात यावर्षी दुष्काळाचे सावट पडले आहे. अशा वेळी एखाद्याच्या मृत्यूच्या दुःखद प्रसंगीही विनोद कसा घडतो ते दर्शविणारी ही घटना.

एका ठिकाणी नुकतेच एका व्यक्तीचे निधन झाले. सर्व घरगुती सोपस्कार उरकल्यानंतर अंत्ययात्रेच्या तयारीला सुरवात झाली. काही नेहमीचे सराईत लोक त्यासाठी तयारच होते. अंत्यविधीचे सर्व साहित्य मिळाले; पण तिरडीसाठी गवताची एकच पेंढी मिळाली. त्यामुळे तिरडी बांधणाऱ्याला 'टेन्शन' आलं. त्यानं दोन-तीन जणांना वेगवेगळ्या ठिकाणी गवताच्या पेंढ्या आणण्यासाठी पिटाळलं. परिसरात दुष्काळ पडल्यामुळे गवताच्या पेंढ्या मिळणंही मुश्किल बनलं होतं. पेंढ्या आणण्यासाठी गेलेले दोघे हात हलवत परतले. त्यामुळे 'सराईताचं' टेन्शन आणखी वाढलं. आता तिसरा कधी येतोय याची वाट पाहणं सुरू होतं. एवढ्यात 'तिसरा' दिसला. त्याच्या सायकलीवर थोड्या का असेना पेंढ्या दुरुनच दिसल्यावर सराईताच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. तिसरा गडबडीत पुढे झाला. म्हणाला, "अण्णा, पाच-सहाच पेंढ्या मिळाल्या." अण्णाला जग जिंकल्याचा आनंद झाला आणि तो म्हणाला, "गड्या लई मोठं काम केलंस. तेवढ्या पेंढ्यांत एकाला दोघांची येवस्था करतो बघ." आता त्याचे हे उद्गार ऐकून उपस्थितांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच करा...
***

(हवा बेळगावची, दि. १९ ऑक्टोबर २००१)


आता पुरे...

काही लोक एखाद्या गोष्टीचा इतका अतिरेक करतात की, इतरांना त्यांना 'आता पुरे' असे सांगण्याची वेळ येते. असेच काहीसे निपाणीत घडले.
काही दिवसांपूर्वी येथे काही हौशी लोकांनी मराठी गायन स्पर्धांचे आयोजन केले. अशा गायन स्पर्धा निपाणीत वरचेवर आयोजित केल्या जातात. कधी त्या स्थानिक पातळीवर होतात तर कधी खुल्या स्वरूपात होतात. सांगायचा मुद्दा असा की, निपाणीत काही प्रस्थापित कलाकारही तयार झाले आहेत की, ज्यांनी व्यावसायिक पातळीवरही आपली गायनकला सिद्ध केलेली आहे. निपाणी परिसरातीलच नव्हे, तर सांगली, कोल्हापूर, बेळगावचे लोकही त्यांना व्यावसायिक कार्यक्रमांचे निमंत्रण देत असतात. असे हे (बुजुर्ग) कलाकार वर्षानुवर्षे अशा गायन स्पर्धांतून भाग घेतात आणि साहजिकच आपला अनुभव आणि संगीताचे ज्ञान या जोरावर पारितोषिकेही मिळवतात. सुरवातीला त्यांच्या संघर्षाच्या काळात जरी हे ठीक असले तरी आता इतके नाव मिळविल्यानंतर अजूनही हे कलाकार अशा स्पर्धांतून भाग घेतच आहेत आणि बक्षिसेही मिळवत आहेत.
परवाच्या गायन स्पर्धेतही असेच झाले. अगदी पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसापासून ते अपवाद वगळता उत्तेजनार्थपर्यंत सर्व बक्षिसे याच कलाकारांना मिळाली. त्यामुळे नाही म्हटले तरी नवीन स्पर्धकांवर अन्यायच झाला. स्पर्धा या नवीन 'टॅलेंट'चा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केल्या जातात; पण या प्रस्थापितांनी स्पर्धेच्या मूळ कल्पनेलाच धक्का दिला. त्यामुळे निपाणीत या कलाकारांबद्दल नाराजीच पसरली आहे. 'तुम्ही श्रेष्ठ आहातच. ते सिद्ध करण्याची आता गरज उरलेली नाही. मात्र नवीन लोकांना संधी आणि प्रोत्साहन देऊन, मार्गदर्शन करून तुम्ही आपले श्रेष्ठत्व सिद्ध करा. त्यांच्याशी स्पर्धा करून तुम्ही तुमचे मोठेपण गमावत चालला आहात. तेव्हा आता पुरे...' अशीच चर्चा या स्पर्धेसंदर्भात शहरात सुरू आहे.
***

'स्त्री हट्टा' तुझी कहाणी....
निपाणीत अशाच एका गायन स्पर्धेच्या संयोजकांना 'स्त्री हट्टा'चा महिमा किती अगाध आहे, याचे प्रत्यंतर आणून देणारा घडलेला हा किस्सा !
या स्पर्धेच्या संयोजकांत विविध वाद्य'वृंदा'त काम केलेल्या एक महिला सदस्य होत्या. जवळजवळ सर्व निपाणीकरांना परिचित असं त्यांचं व्यक्तिमत्त्व! त्यांचे पतीराजही त्यांच्या क्षेत्रात कधीही पराभूत न झालेले. तेही या संयोजन मंडळाशी संबंधित. 

तर सगळं संयोजन अगदी व्यवस्थित सुरू असताना अगदी शेवटच्या क्षणी मोठा पेचप्रसंग उभा राहिला. या संयोजक महिला ज्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा गाजवत होत्या, तेव्हापासूनची त्यांची एक कट्टर प्रतिस्पर्धी कलाकार आहे, तिनेही या स्पर्धेसाठी आपले नाव नोंदविले. इतर संयोजकांनी तिचे नाव नोंदवून घेतले. इथे पहिली ठिणगी पडली. त्यानंतर जेव्हा स्पर्धेसाठी लॉटरी पद्धतीने स्पर्धकांचे क्रम ठरविण्यात आले, त्यातही योगायोगाने या 'प्रतिस्पर्धी' कलाकाराला सुरवातीच्या काही क्रमांतच गायनाची संधी मिळाली, त्यामुळे या संयोजक महिलेचा मात्र मोठा जळफळाट झाला. तिला वाटले की इतर संयोजकांनी तिचा अपमान करण्यासाठीच तिच्या प्रतिस्पर्धकाला प्राधान्य दिले. ती तडक कार्यक्रमस्थळ सोडून निघून गेली. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपल्यानंतर इतर संयोजकांना याबाबत समजले. त्यानंतर मात्र या संयोजकांना त्या उभयतांची समजूत घालता घालता पुरेवाट झाली. पाय तेवढेच धरायचे बाकी राहिले. या 'स्त्रीहट्टा'मुळे संयोजकांना कार्यक्रम यशस्वी केल्याचा आनंद मात्र उपभोगता आला नाही.

***

हवा बेळगावची, दि. ९ नोव्हेंबर २००१)


प्राध्यापकांची वाटचाल

'प्राध्यापक' म्हटलं की सर्वसामान्यपणे पापभिरू, कुणाच्याही वाटेला स्वतःहून न जाणारा, मुद्दाम कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करणारा, समाजात 'बुद्धिजीवी' म्हणून मान असणारा किंवा तो तसा असावा, अशी समाजाची अपेक्षा असणारा डोळ्यासमोर उभा राहतो. आपल्या आचार-विचारांनी विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून भावी पिढी आदर्श व चारित्र्यसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न व परिश्रम करणारा तो प्राध्यापक. या प्राध्यापकाने सर्व समाज बंधने व्यवस्थित पाळली पाहिजेत आणि तसेच संस्कार विद्यार्थ्यांवर करावेत, अशीही त्यांच्याकडून अपेक्षा असते; परंतु निपाणीत एका 'विद्वान' प्राध्यापकांनी 'भौतिक' सुखाच्या मागे लागून बेकायदेशीर प्रकारांचा अवलंब करण्याचा प्रकार घडला.
झाले असे की, काही दिवसांपूर्वी निपाणीत अनधिकृत बांधकामांविरुद्ध नगरपालिकेने मोहीम हाती घेतली. ही बांधकामे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे ठरवून पालिकेच्या पथकाने शोध सुरू केला. पथकाला पहिल्या टप्प्यात येथील एका महाविद्यालयीन प्राध्यापकाच्या बांधकामासह एकूण सहा अनधिकृत बांधकामे आढळली. यावर हा तरुण रक्ताचा प्राध्यापक आपली चूक मान्य करून शांत बसला नाही तर बांधकाम हटवले जाऊ नये म्हणून त्याने जोरदार प्रयत्न चालवले. वैयक्तिक पातळीवरील प्रयत्नांबरोबरच राजकीय दबावतंत्रांचाही ते वापर करू लागले आहेत.
त्यांच्या या प्रयत्नाला यश येईल किंवा अपयश, हा भाग अलाहिदा; परंतु यानिमित्ताने शहरात मात्र चर्चेला उधाण आले आहे. एका प्राध्यापकाने अशाप्रकारे खालच्या पातळीवर उतरणे अत्यंत चुकीचे आहे. स्वतः अनधिकृतपणे वागणारे प्राध्यापक विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार? या चर्चेबरोबरच वाईट गोष्ट म्हणजे या प्राध्यापकाच्या एकूणच नोकरी, शिक्षण याबाबतीतही लोकांतून शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. त्यामुळे आता या प्राध्यापकांनी आपल्या एकूण वाटचालीवरच नजर टाकून आपली 'अनधिकृत' वाटचाल बंद करून 'अवघाचि' सुपंथ धरावा, एवढीच अपेक्षा!

सोमवार, ३ फेब्रुवारी, २००३

एका यशोगाथेचा शोकान्त!

(भारतीय अंतराळवीर कल्पना चावला हिचा गेल्या १ फेब्रुवारी २००३ रोजी अंतराळ स्थानकाहून परत येत असताना अवकाशातच दुर्दैवी अंत झाला. या प्रसंगी तिच्या संदर्भात लिहीलेला लिहीलेला एक लेख सोमवार, दि. ३ फेब्रुवारी २००३ रोजी 'युवा सकाळ'च्या पहिल्या पानावर महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाला. तो माझ्या वाचकांसाठी येथे देत आहे.)

कल्पना चावला


कल्पना चावला ! एकदा अवकाशात जाऊन आली, तेव्हाच ती तिच्या कुटुंबीयांबरोबरच अखिल भारतवासीयांच्या कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय बनली. त्यामुळे तिची दुसऱ्या अवकाश संशोधन मोहिमेसाठी निवड होणं हा तर तिच्या आई-वडिलांना, चुलत भावंडांसाठी अत्युच्य आनंदाचा क्षण असणे स्वाभाविक होते. मात्र शनिवारी तिच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या कुटुंबीयांना डोळ्यांदेखत जळणारे कोलंबिया अवकाशयान हतबलपणे पाहव्याखेरीज काहीच करता आले नाही. एका साहसी यशोगाथेचा कल्पनाच्या रूपाने शोकांत झाला, मात्र तरीही कित्येक भारतीय तरुणींना साहसाची प्रेरणा देणाऱ्या कल्पनाने या घटनेतूनही जाता जाता तिच्या ठायी असलेल्या प्रचंड साहसी वृत्तीची प्रचितीच जणू दिली.

गेल्या वर्षीच्या मध्यापासूनच ही अवकाश मोहीम तांत्रिक कारणांनी पुढे ढकलत ढकलत अखेर जानेवारीत पूर्णत्वाला गेली..
कल्पनाच्या कुटुंबीयांनाही याची कल्पना होती. कल्पनाला या मोहिमेसाठी शुभेच्छा देण्यासाठी तिचे आई-वडील, दोन थोरल्या बहिणी, तिची चुलत भावंडे अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेत गेले होते. गेल्या शनिवारी सकाळी केनेडी अवकाश केंद्रात कल्पनाचे स्वागत करण्यासाठी हे सर्व जण उपस्थित होते. यान उतरण्याला जास्तीत जास्त एक ते दीड तास अवधी उरला असतानाच परतीच्या मार्गावरच त्याचा स्फोट आणि अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय कन्येच्या मृतदेहाची राखही अवकाशात विखुरली.
कल्पनाच्या कुटुंबीयांना तिच्या कामगिरीचा अभिमान असण्याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे अवकाशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आर्थिक बळ तिच्या कुटुंबात नव्हते. १९४७ च्या फाळणीवेळी पाकिस्तानातून तिचे वडील दंगलीत कसाबसा जीव बचावत कर्नालला आले होते. कर्नालच्या रेल्वेस्थानकावर भुईमुगाच्या शेंगा विकून त्यांनी आपले कुटुंब स्थिरस्थावर केले. या पार्श्वभूमीवर न डगमगता आपले स्वप्न हे दिवास्वप्न न ठरू देता तिने जिद्दीने त्याच्या पूर्तीचा ध्यास घेतला आणि परिस्थितीला नमवीत आपले उद्दिष्ट साध्य केले.
आपल्या धाकट्या बहिणीबद्दल बोलताना कल्पनाची मोठी बहीण सुनीता चौधरी यांना शब्द पुरत नाहीत. 'भेटींदरम्यान तसेच फोनवरून आपल्या प्रकल्पांविषयी आणि मोहिमांबद्दल सांगताना कल्पना अगदी भारावून जायची. आपल्या कामगिरीचा सार्थ अभिमान तिला होता,' असे त्या सांगतात. सुनीता यांचे पतीही पायलट होते आणि त्यांचा मुंबईत एका विमान अपघातात मृत्यू झाला, हे उदाहरण देऊन सुनीता कल्पनाला नेहमी सावधगिरीचा सल्ला द्यायची.
'नासा'त अंतराळवीर म्हणून निवड होण्यापूर्वी ती पती ज्याँ पेरी, जे ब्रिटिश फ्लाइट इन्स्ट्रक्टर आहेत, यांच्यासोबत भारतात दोन वेळा येऊन गेली, पेरी यांच्याही कुटुंबाचा इतिहास कल्पनाच्या कुटुंबाशी मिळताजुळता आहे. त्यांचे वडील ज्यू असल्यामुळे हिटलरच्या छळाची झळ त्यांना बसली होती. यामुळेच परकीय असूनही पेरी यांच्याबाबत कल्पनाच्या सर्वच कुटुंबीयांना आत्मियता आहे.
अमेरिकेला आता जाण्यामागे तिच्या घरच्यांचा तिला भारतात घेऊन येण्याचा हेतू होता. भारतातील ज्या हजारो तरुण-तरुणींचे ती प्रेरणास्थान बनली आहे; त्या सर्वांना तिच्या कामगिरीची वर्णने तिच्याच तोंडून त्यांना ऐकवायची होती. आपले ध्येय साध्य करण्यात आलेल्या अडचणींशी तिने कसा मुकाबला केला, तसेच जगभरातल्या अगणित नागरिकांसाठी अजून विमानप्रवासही स्वप्नवत असताना, एकदा नव्हे तर दोनदा अवकाश फेरीनंतर तिच्या भावना त्या सर्वापर्यंत पोहोचवायच्या होत्या. मात्र, आता ते सारेच तिच्यासोबत इतिहासगर्भात लोपले आहे. मागे उरल्या आहेत, त्या तिच्या पराक्रमी मोहिमेच्या आठवणी. त्या आपण जपून ठेवू या. पुढील पिढ्यांना सांगू या. त्यातूनच अवकाशाची स्वप्ने पाहणाऱ्या नव्या 'कल्पना' घडविण्याला प्रोत्साहन देऊ या. हेच तर कल्पनाच्या हौतात्म्याचे आणि यशोगाथेचे सांगणे...

शुक्रवार, २६ एप्रिल, २००२

'टायटॅनिक'चे भविष्य वर्तविणारी गूढ कादंबरी...

( दि. २६ एप्रिल २००२ रोजी दै. सकाळच्या लक्षवेधी पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला विशेष लेख.)




टायटॅनिक लायनर... जगात आजपर्यंत बांधण्यात आलेले सर्वांत मोठे जहाज... आठशे फूट लांब, तीन हजार लोकांना वाहून नेण्याची क्षमता असणारे हे जहाज हिमनगावर आपटले आणि बुडाले. पुरेशा जीवरक्षक बोटींअभावी त्यातील हजारो प्रवासीही बुडाले. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. १९१२ मध्ये घडलेल्या या दुर्दैवी अपघातास या आठवड्यात ९० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु ही दुर्घटना घडेपर्यंत किंवा त्यानंतरही आजतागायत बऱ्याच लोकांना एक गोष्ट माहीत नाही की, ही दुर्घटना घडण्याच्या १४ वर्षे आधीच या घटनेचे भाकित विस्मयजनकरीत्या वर्तविण्यात आले होते... तेही एका पुस्तकाच्या माध्यमातून...
मॉर्गन रॉबर्ट्सन हा कोणी एखादा भविष्यवेत्ता नव्हता किंवा धर्मोपदेशकही नव्हता. बऱ्यापैकी पार्श्वभूमी असणारा तो एक अमेरिकन खलाशी होता, ज्याने आपल्या तुटपुंज्या शिक्षणाच्या आधारावर मोठ्या लेखकाचा आव आणला होता. आयुष्यभरात एखादेही ध्येय साध्य करणे त्याला शक्य झाले नाही. त्याने लिहिलेले अवघे ९६ पानी पुस्तक, ज्याला कादंबरी म्हणणेही धाडसाचे ठरावे, ते साहित्यिकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. सरधोपट मागनि त्याने हिमनगाशी टक्कर झाल्यानंतर एका बोटीवरील प्रवाशांचा मृत्यूशी मुकाबला मांडला आहे. तरीही याच कारणांमुळे त्याने योगायोगाने मांडलेले कथानक मात्र विस्मयकारक आणि लक्षवेधी ठरले आहे.

खऱ्याखुऱ्या मोठ्या बोटीचे नाव टायटॅनिक होते, तर १८९८ मध्ये रॉबर्ट्सनने त्याच्या कथेतील जहाजाचे नाव 'टायटन' ठेवले होते. ८८२ फूट लांबीची टायटॅनिक मानवी हातांनी तयार केलेली आजपर्यंतची सर्वात मोठी बोट होती, तर रॉबर्ट्सनची टायटन ८०० फूट लांब होती. टायटॅनिक ६६ हजार टनांचे वजन वाहू शकत होती, तर टायटनची क्षमता ७० हजार टनांची होती. दोन्ही जहाजांची क्षमता तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची होती. खऱ्या टायटॅनिकमधून दोन हजार लोक प्रवास करत होते, तर, रॉबर्ट्सनच्या काल्पनिक टायटनवरही दोन हजारच प्रवासी होते. दोन्ही जहाजांना प्रत्येकी तीन प्रोपेलर्स होती आणि दोन्ही जहाजे कमाल २४ नॉटस् म्हणजे ताशी तीस मैल वेगाने अंतर काटू शकत. रॉबर्ट्सनचे टायटन सुद्धा कधीही बुडणार नाही, असेच बनविले होते. 'मानवाने आपल्या अवगत ज्ञानाचा, व्यावसायिकतेचा पुरेपूर वापर करून ही बुडू न शकणारी, नष्ट न होऊ शकणारी बोट बनविली होती, केवळ कायद्यांचे पालन म्हणून ती सोबत काही जीवरक्षक बोटी न्यायची,' असे रॉबर्ट्सनने आपल्या टायटनचे वर्णन केले आहे, जे टायटॅनिकच्या निर्मात्यांच्या मताशी तंतोतंत साधर्म्य दाखविते.

टायटॅनिकच्या हिमनगाशी धडकेपेक्षा रॉबर्ट्सनने त्याच्या कथेत ही धडक अधिक नाट्यमयरित्या घडविली आहे. धडकेनंतर टायटनची मागील बाजू हवेत उचलली जाते, मग ती एका बाजूला कलंडून बुडते. योगायोगाने टायटॅनिकची मागची बाजू अखेरच्या क्षणी प्रोपेलर्ससह हवेत उचलली गेली होती आगि त्यानंतर तिचा समुद्राच्या तळाकडे वेगाने प्रवास झाला. रॉबर्ट्सनच्या कथेतील इतरही काही प्रसंग प्रत्यक्ष घटनेशी अविश्वसनीयरीत्या साधर्म्य दाखवितात. त्याच्या टायटनची हिमनगाशी धडक मध्यरात्री बाराच्या सुमारास होते. टायटॅनिकची त्यापूर्वी केवळ वीस मिनिटे आधी म्हणजे ११ वाजून ४० मिनिटांनी झाली होती.

रॉबर्ट्सनच्या जहाजात पाणी शिरण्यास अटकाव करण्यासाठी १९ मजबूत भिंती होत्या, टायटॅनिकमध्ये त्यांची संख्या १५ होती. रॉबर्ट्सनचे टायटनही टायटॅनिकप्रमाणेच एप्रिलमध्ये बुडाले. प्रत्यक्ष घटनेच्या सुमारे चौदा वर्षे आधीच ही कादंबरी लिहीणाऱ्या रॉबर्ट्सनने, दुर्घटनेतून बचावलेल्या आपल्या कथेतील पात्रांना न्यूयॉर्कच्या धक्क्यावर सुखरूप पोचविले. टायटॅनिक दुर्घटनेतून वाचलेले ७०५ प्रवासी सुद्धा न्यूयॉर्कच्या बंदरावरच सोडण्यात आले होते. रॉबर्ट्सनच्या टायटन दुर्घटनेची बातमी देण्यासाठी न्यूयॉर्कमधील वृत्तपत्रांनी जादा आवृत्त्या छापल्या होत्या. हे टायटॅनिक दुर्घटनेच्या बाबतीत खरोखरच घडले. त्यात न्यूयॉर्क टाइम्सने मोठी बाजी मारली होती. कारण त्याचे संपादक कार व्हॅन अँडा यांनी एकूण रचनेचा अभ्यास करून टायटॅनिक प्रवासाला निघण्यापूर्वीच ते अधिक काळ पाण्यावर तरंगू शकणार नाही, असे भाकित वर्तविले होते.
या साधर्म्याखेरीज रॉबर्ट्सनच्या कथेत काही विरोधाभासही होता. कथेतील हिमनग दाट धुक्यामुळे दिसू शकला नव्हता. तर, टायटॅनिकच्या धडकेवेळी समुद्र शांत होता, तसेच वातावरणही स्वच्छ होते. त्याच्या कथेतील मुख्य पात्र एक 'मेयर' होता. हा मेयर मोडकेतोडके इंग्रजी बोलत आणि विचित्र वागत असे. प्रत्यक्ष टायटॅनिकवर इसा डॉर स्ट्राऊस यांच्यासारखे दिलदार लोक होते. स्ट्राऊस दांपत्याने जीवरक्षक बोटीवर लहान मुले व महिलांना चढवण्यास प्राधान्य दिले. ते दोघे मात्र जहाजाबरोबरच बुडाले,
रॉबर्ट्सनने अत्यंत ओबडधोबडपणे ही कथा लिहिलेली आहे. १८९८ मध्ये एम. एफ. मॅन्सफिल्ड यांच्या न्यूयॉर्क हाऊसने 'फ्युटीलिटी' नावाचे हे पुस्तक प्रकाशित केले. १९१२ ला टायटॅनिक दुर्घटनेनंतर न्यूयॉर्कच्या मॅक्युलर आणि मेट्रोपॉलिटन या मासिकांनी त्याचे पुनर्मुद्रण केले. त्यावेळी रॉबर्ट्सन जिवंत होता. या घटनेनंतर त्याची बऱ्यापैकी मिळकतही झाली. त्यानंतर तीन वर्षांनी मार्च १९१५ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी तो मरण पावला. मात्र त्याने अखेरपर्यंत 'फ्युटीलिटी'चे कथानक कसे सुचले किंवा त्यामागील प्रेरणा याबद्दल अवाक्षरानेही माहिती दिली नाही. 'द टायटॅनिक कॉन्स्पिरसी' या पुस्तकात लेखक रॉबिन गार्डिनर आणि कॅन व्हॅन डरवॅट यांनी रॉबर्ट्सनचा 'एक हौशी गूढवादी' असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे.

बुधवार, ६ मार्च, २००२

मागणी रास्त, पण....

('दै. सकाळ'च्या बेळगाव आवृत्तीमध्ये 'चर्चा' या साप्ताहिक सदरामध्ये बुधवार, दि. ६ मार्च २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे फेरसादर करीत आहे.)




निपाणीतील दिवेकर कॉलनीतील वेश्यांचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांनी गेले काही दिवस चर्चेत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे वेश्यांमध्ये एडस्बाबत जागृतीसाठी कार्यरत असलेल्या संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेच्या श्रीमती मीना शेषू येथे वेश्यांच्या बैठका घेऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत, अशी चर्चा एका वर्तुळात सुरू आहे. यातील गंभीर बाब अशी की, पोलिस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनीही श्रीमती शेषूंना सहकार्य करणे तर दूरच; उलट त्या आणि त्यांचे सहकारी पत्रकार नील पाटे यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधले. याशिवाय वेश्या या 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असेही उद्‌गार एका पोलिस अधिकाऱ्याने काढले. हीच सर्वात आक्षेपार्ह बाब आहे. हा विषय गुंतागुंतीचा अनेक पदरी असल्याचे झालेल्या घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे श्रीमती शेषू यांनी सुरवातीच्या काळात स्वतःच्या घरी वेश्यांच्या बैठका घेतल्या, हे विसरता येणार नाही. एका महिलेने अशा पद्धतीने काम करणे हीच आजही अत्यंत वेगळी वाटणारी तरीही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधणे म्हणजे त्यांच्या कामाचा आणि त्यातील मानसिक, भावनिक गुंतवणुकीचा तो अपमानच म्हटला पाहिजे.
दुसरी बाब म्हणजे पोलिस अधिकाऱ्याने वेश्यांना 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असे म्हणणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. या महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या उद्‌गारांतून स्पष्ट होतो. पोलिस ठाण्याच्या पाठीमागच्या भिंतीला लागून असलेल्या दिवेकर वस्तीत वेश्या व्यवसाय वर्षानुवर्षे का सुरू राहिला, याचे उत्तर त्यांच्या उद्‌गारांमागील प्रवृत्तीत आहे.
सुरवातीपासूनच पोलिसांनी येथील वेश्यांविरुद्ध कारवाई करून दबाव आणला असता तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे दिवेकर वस्तीतील नागरिकांनीच दबाव आणून आतापर्यंत येथे वेश्यावस्ती वाढू दिलेली नाही. श्रीमती शेषू यांनी येथे येऊन आपल्या संस्थेची शाखा उघडल्यानंतर त्या नागरिकांना परत येथे वेश्यावस्ती वाढण्याचे भय वाटते आहे, हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल किंवा त्यांना श्रीमती शेषू यांच्या कार्याची पुरेशी माहिती नसावी. या नागरिकांच्या भावनांचा काही नगरसेवकांनी फायदा उठवून त्यांना चिथावले आणि येथील वेश्या व्यवसाय बंद करावा म्हणून मोर्चा काढला. त्यांची मागणी अगदी रास्त आहे; पण, त्यांनी श्रीमती शेषू वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप करणे पूर्णतः चुकीचे आहे.
मुळात एखाद्याच्या प्रोत्साहनामुळे वेश्या व्यवसाय वाढतो, असे म्हणणेच चुकीचे आहे. किंबहुना वेश्या व्यवसाय संबंधितांनी स्वेच्छेने स्वीकारला असे कधीही होत नाही. वेश्या निर्माण होण्यास समाजच कारणीभूत असतो. निपाणी जर इतकी स्वच्छ होती, येथील सगळेच नागरिक इतके चारित्र्यसंपन्न होते, तर येथे वेश्यावस्ती निर्माण झालीच कशी, हा प्रश्न या पार्श्वभूमीवर ठळकपणे सामोरा येतो. त्याला उत्तर आहे ?
त्या महिलांच्या समस्या जाणून घ्यायला एक महिला पुढे सरसावते, त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविते, त्यांना आपलेपणाने वागविते. यामुळे या वेश्यांनाही त्यांच्याबाबत आत्मीयता वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच त्या त्यांच्याकडे येतात. इतर समाजाने त्यांना ओरबाडण्याखेरीज दुसरे काय केले आहे?
साधारण एक वर्षांपूर्वी वेश्यांची राष्ट्रीय परिषदही झाली. त्यावेळी देशभरातून हजारो वेश्या राजधानीत एकत्र आल्या होत्या, याचीही आठवण येथे द्यायलाच हवी.
पूर्वापार दुर्लक्षित असलेल्या या समाजघटकाच्या समस्यांकडे गांभीयनि कोणीही पाहत नाही. यासाठीच त्यांना संघटित करून एडस् तसेच इतर समस्यांबाबत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी काम करणाऱ्या श्रीमती शेखूंसारख्या सेवाभावी व्यक्तींना किमान उपद्रव देऊ नये, ही जबाबदारी ओळखण्याचे भान आपल्याला कधी येणार हा प्रश्न आहे.
याबाबत येथील स्थानिक सेवाभावी सामाजिक संस्थांनीही मौन का बाळगले आहे, हे समजायलाही मार्ग नाही. वेश्याव्यवसाय बंद करण्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांनी व नागरिकांनी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, केवळ या वेश्यांना येथून हाकलून देऊन चालणार नाही. कारण त्या इतरत्र जाऊन पुन्हा तोच व्यवसाय करणार! यावर उपाय म्हणजे त्यांना पर्यायी व्यवसाय उपलब्ध करून निर्वाहाचा दुसरा मार्ग निवडण्यासाठी प्रोत्साहन व सहाय्य देणे, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःची मानसिकता आधी बदलायला हवी.
केवळ कर्नाटकातील वेश्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर देवदासी प्रथेचा याला प्रचंड मोठा हातभार आहे. पुण्या-मुंबईमध्येसुद्धा या देवदासीच अधिकांशरित्या भोगदासी झालेल्या आहेत. याबरोबरच गरिबी, अज्ञान आणि सामाजिक परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायाकडे महिला-मुली वळताना दिसतात.
वेश्या व्यवसायाच्या निर्मूलनासाठी आपण प्रत्यक्ष जरी काही करत नसलो तरी कार्यकर्त्यांना सहकार्य करू शकतो. तेही शक्य नसेल तर त्यांना त्रास देऊन खच्चीकरण करणे तरी थांबवावे. त्यांना शांतचित्ताने आपले काम करू द्यावे. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरेल. तेवढा विवेक आता आपण दाखवायलाच हवा !