शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

डॉ. ज.रा. दाभोळे स्मृतीलेख-२ :

'स्मोकिंग झोन'चे मानसशास्त्रीय विश्लेषण (लेखक डॉ. ज.रा. दाभोळे)

 (माझे बंधू अनुप जत्राटकर यांच्या 'स्मोकिंग झोन' या लघुपटाचा प्रिमिअर शो कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात दि. ९ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला. हा लघुपट पाहून ज्येष्ठ विचारवंत व तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे खूप प्रभावित झाले. त्यांनी स्वतःहून या लघुपटाविषयी अतिशय सविस्तर लिहीले. हा लेख येथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देत आहोत.- डॉ. आलोक जत्राटकर)

'स्मोकिंग झोन' लघुपटाच्या प्रिमिअर शो प्रसंगी अनुप जत्राटकर यांचे अभिनंदन करताना डॉ. ज.रा. दाभोळे. शेजारी डॉ. आलोक जत्राटकर

 

प्रास्ताविक - 'स्मोकिंग झोन' हा लघुपट मी दोनदा पाहिला. दोन्ही वेळेला माझ्यातील विचारशक्तीला चालना मिळाली. हा लघुपट, त्याची कथा, त्यातील एकूण पात्रे माझ्या परिचयाची आहेत, त्यांना मी माझ्या अवतीभोवती पाहात आहे, अशी जाणीव मला झाली. सर्वसामान्य प्रेक्षकाला हा लघुपट समजेलच असा दावा करात येणार नाही.  कारण, तो जसा मूर्त पातळीवर घडताना दिसतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने अमूर्त पातळीवर तो समजून घेण्यासाठी एक वैचारिक प्रगल्भता प्रेक्षकाच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आजचे एकूण जीवन, तरुणाईचे भरकटलेपण दाखवून देण्याचे काम हया लघुपटाने अतिशय सूक्ष्मरीतीने केले आहे.

पार्श्वभूमी - 'स्मोकिंग झोन' समजण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतरचा कालखंड ही एकूणच मानवी जीवनाला लाभलेली एक मनोवैज्ञानिक पार्श्वभूमी आहे. दुसरे महायुध्द १९३९ ते १९४५ या कालावधीत घडले. त्यानंतर संपूर्ण जगात अनिश्चिततेची भावना पसरली होती.  माणसाच्या आयुष्याची खात्री कुणालाही देता येत नव्हती. मानव जातीचे भवितव्य, मनुष्याचे अस्तित्व संपुष्टात येणार की काय, अशी भीती तरुणांच्या मनात डोकावत होती.  बेकारी, दारिद्रय, नैराश्य, भ्रष्टाचार, युद्ध, रक्तपात इत्यादींमुळे तरुण-तरुणी 'प्रॅक्टिकल' दृष्टीने जीवनाकडे पाहू लागली.  त्यातून तरुणाईच्या मनात निरर्थकता निर्माण झाली. या निरर्थकतेला आल्बेर कामूने Absurdity  असा शब्द वापरला आहे. Absurd या शब्दाचा कोशातील अर्थ Foolish अथवा Ridiculous असा आहे.  मूर्खपणा किंवा नसमंजस असा या शब्दाचा मराठीत अर्थ होईल. तथापि, कामू वगैरे लेखकांना अभिप्रेत असणारा अर्थ म्हणजे The perfect harmony of disharmony अथवा Out of Harmony असा घेतला पाहिजे.

कामूचे मानवी जीवनासंबंधीचे म्हणणे थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल. स्त्री आणि पुरुष संभोगासाठी एकत्र येतात. त्याक्षणी ते दोघेही कामवासनेने प्रेरित झालेले असतात. आपापली कामवासना शमविणे हीच त्यांची गरज असते. 'आपल्याला मूल जन्माला घालायचे आहे', असा विचार त्यांच्या मनात येत नसतो.  परंतु, या वासनापूर्तीतून पुढे मूल जन्माला येते.  कामवासना पूर्ती अपत्याचा जन्म हया दोन्ही गोष्टी नैसर्गिकच म्हटल्या पाहिजेत. त्यानंतर ते मूल हळूहळू मोठे होऊ लागते. जसजसे ते मोठे होऊ लागते तसतसे त्याच्या ध्यानात येते की, आपल्या जन्मामागे कोणताच उद्देश नाही. आता जर माझ्या जन्मामागे कोणताही उद्देश नाही आणि जो जन्मला आहे, तो केव्हा तरी मरतोच; त्या अर्थी माझ्या जगण्यालाही काही अर्थ नाही.  माझे जीवन निरर्थक आहे.  हे निरर्थक जगणे माझ्यावर लादलेले आहे. मी स्वत: अशा जीवनाची निवड केलेली नाही. त्यामुळे मी स्वतंत्र नाही. माझे स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे.

आजच्या तरुणाईची मानसिकता अशीच बनलेली आहे. तथापि, थोडासा दृष्टिकोन बदललेला आहे.  'आताचा क्षण मी मला पाहिजे तसा जगणार. इतरांचा विचार करता मी तो जगणार आहे.  कारण कोणाला माहित आहे की, उद्या काय होणार आहे' हा विचार आजच्या तरुणांमध्ये वाढीस लागला आहे. परिणामी, आजच्या तरुणांमध्ये चंगळवादी वृत्ती वाढली आहे.  अशा तरुणांना कसलीच जबाबदारी नको. लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत झाला आहे. स्त्री ही एक भोगवस्तू आहे.  पैसा हेच सर्वस्व. त्यामुळे आता जो क्षण आपल्या हातात आहे, तो आपल्या मनाला आवडेल त्याप्रमाणे जगायचे आणि मोकळे व्हायचे. फार दूरचा विचार करायचाच कशाला? ही मानसिकता कमी अधिक प्रमाणात सर्वच तरुणांमध्ये पाहावयास मिळते. 

डॉ. फ्राईडचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत: माणसाच्या व्यक्तित्वाचा अभ्यास अनेक मानसशास्त्रज्ञांनी केला आहे.  त्यामध्ये डॉ.सिग्मंड फ्राईडचे प्रतिपादन विचारात घेण्यासारखे आहे.  'स्मोकिंग झोन' हा लघुपट समजून घेण्यासाठीही फ्राईडचे म्हणणे उपयुक्त ठरणारे आहे.  मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून फ्राईडने व्यक्तित्वाचे तीन भाग केलेले आहेत.

. इदम् (Id)

. अहम् (Ego)

. श्रेष्ठअहम् (Super Ego)

या तिन्ही घटकांच्या परस्पर क्रियेतून व्यक्तीचे वर्तन प्रकट होत असते. 'इदम्' हा व्यक्तित्वाचा अबोध (Unconscious Mind) भाग आहे.  निसर्गसिद्ध अशा सहजप्रवृत्ती किंवा उपजत प्रेरणांच्या समुच्चयाला फ्राईडने 'इदम्' म्हटले आहे. हा अत्यंत मूलभूत घटक होय. तहान, भूक, लैंगिक प्रेरणा, विनाशन प्रवृत्ती (Death Instinct) यांचा समावेश इदम् मध्ये होतो. सुख समाधान प्राप्त करण्यासाठी इदम् सर्व ते प्रयत्न करीत असतो.  कोणत्याही प्रकारे सुख मिळविणे एवढेच इदम् ला ठाऊक असते.

'अहम्' हा व्यक्तित्वाचा जाणीव असलेला (Conscious) भाग आहे. व्यक्तित्वाचा हा दुसरा घटक बोधरुप विवेकी असून तो अबोधावस्थेवर नियंत्रण ठेवणारा आहे. सामाजिक मान्यता आत्मप्रतिष्ठा प्राप्त करणे हे अहम् चे कार्य होय. इदम् मुळे जे निसर्गसिद्ध सहज वर्तन केले जाते; त्यावर अंकुश ठेवणे, तारतम्य बुद्धीने समाजमान्य रीतीने त्याचे व्यवस्थापन करणे हे अहम् चे कार्य होय. व्यक्ती, तिच्याभोवतीची परिस्थिती यांच्यातील समतोल कायम ठेवण्याचे कार्य अहम् करीत असतो. त्याचप्रमाणे वास्तव परिस्थितीकडे लक्ष देऊन श्रेष्ठ अहम् च्या आदेशांना अनुसरुन अहम् सदैव 'इदम्'वर अंकुश ठेवतो. 'इदम्'चे कार्य सुखतत्त्वानुसार चालत असते, तर 'अहम्'चे कार्य वास्तव तत्वानुसार चालत असते.

व्यक्तित्वातील तिसरा घटक म्हणजे 'श्रेष्ठ अहम्' किंवा सद्सद्विवेकबुद्धी हा होय. अगदी लहानपणापासून मातापित्यांचा आदर्श, त्यांच्याकडून मिळालेली नैतिक शिकवण या सर्वांमुळे 'श्रेष्ठ अहम्' अस्तित्वात येत असतो. सदाचार, नैतिकता, समाजमान्यता, आदर्शात्मक वर्तन यासाठी श्रेष्ठअहम् कार्य करीत असतो.  नीतिविषयक मूल्यांची जपणूक तो करीत असतो.  त्याची 'अहम्'वर सत्ता असते. अहम् ची आदर्शाकडे वाटचाल होण्यासाठी व्यक्तीला प्रयत्न करावयास लावतो, तो 'श्रेष्ठ अहम्' हा घटक होय.

सुरुवातीला इदम् प्रवृत्तींना मुक्त समाधान मिळते. पुढे मूल मोठे होऊ लागते, तसतसे, अहम् चा एक चिकित्सक निरीक्षक म्हणून विकास होऊ लागतो.  अहम् हा नैतिक नियंत्रक आहे.  तो म्हणजेच 'श्रेष्ठअहम्' होय. या तीनही घटकांतील संघर्ष हे फ्राईडच्या मनोविश्लेषण सिद्धांताचे सार होय. श्रेष्ठअहम् च्या कार्यात इदम् कडून बऱ्याच अडचणी आणल्या जातात. इदम् नेहमीच श्रेष्ठ अहम् शी संघर्ष करीत असतो.  अशावेळी अहम् कडून मध्यस्थ म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली जाते.  मूलभूत शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी इदम् धडपडत असतो, तर श्रेष्ठअहम् व्यक्तीची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.  यातून व्यक्तीच्या ठिकाणी विविध संघर्ष निर्माण होतात. अशा परिस्थितीत अहम् ला धोका निर्माण होतो.  म्हणून अहम् चे रक्षण करण्यासाठी व्यक्ति संरक्षण यंत्रणांचा वापर करु लागते. सध्याची तरुण पिढी इदम् च्या प्रभावाखाली वावरत असल्यानेच सैरभैर झाली आहे.  'स्मोकिंग झोन' या लघुपटातील पात्रे इदम् च्या प्रभावाखाली कसे वागत आहेत, ही गोष्ट दिग्दर्शकाने अतिशय कौशल्याने दाखवून दिली आहे. 

भारतीय नीतिशास्त्रातील पुरुषार्थ विचार -

भारतीय नीतिशास्त्रात एकूण चार पुरुषार्थ सांगितले आहेत.  धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.  मोक्ष हे प्राप्तव्य होय.  परंतु त्यासाठी आधीचे तीनही पुरुषार्थ व्यक्तीने साध्य करावयाचे असतात.  पैकी अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ साध्य करताना धर्माचे (नीतिचे) नियंत्रण मान्य करावेच लागते. कोणताही एकच एक पुरुषार्थ व्यक्तीने साध्य करायचा नसतो. याचा अर्थच असा की पहिल्या तीन पुरुषार्थांमध्ये संतुलन प्रस्थापित केले असता मोक्ष हा शेवटचा पुरुषार्थ व्यक्तीला साध्य करणे व्यक्तीला शक्य होते. यावरुनच 'पुरुषार्थ' विचार असे म्हटले आहे. हे चारही पुरुषार्थ व्यक्तीच्या अंतिम हितासाठी सांगितले आहेत. परंतु, आज परिस्थिती खूपच बदलली आहे.  भारतीय माणूस कोणत्या तरी एकाच पुरुषार्थ प्राप्तीसाठी धडपडत आहे.

'स्मोकिंग झोन' लघुपटात चार पात्रे आहेत. ती चार पुरुषार्थांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.  मोक्षाव्यतिरिक्त ही चार पात्रे आपापली बाजू मांडत आहेत. त्या सर्वांचे म्हणणे हे आहे की, त्यांच्यावर खूप अन्याय झाला आहे.  त्यांना कुणीच समजून घेत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.  ही भावना प्रबळ झाली असल्याने प्रत्येकजण एक टोक गाठताना दिसतो आहे.  ह्याला 'एक्स्ट्रीमिटी' म्हणू या.  परंतु, मनुष्य 'एक्स्ट्रीमिटी'कडे का धावतो?  कंटाळवाणेपण किंवा 'बोअरडम्' हे त्याचे मूळ कारण असते.  बोअरडमचे रुपांतर 'स्प्लिन'मध्ये होते, असे बॉदलेअरने म्हटले आहे.  'स्प्लिन' म्हणजे एक्स्ट्रीम बोअरडम्. या अवस्थेत व्यक्ती नेहमी टोकाचे निर्णय घेत असते. या पुढची अवस्था म्हणजे डॅन्डीझम. डॅन्डीझम म्हणजे 'To arrange ugly things in a beautiful manner' असा अर्थ आहे. या अवस्थेत मनुष्य आपल्या चुकांचे समर्थन करु लागतो. आपली कृती योग्य कशी होती, हे तो पटवून देऊ लागतो.  या लघुपटातील मोक्ष बाजूला ठेवल्यास इतर तीन पात्रे आपल्या चुकांचे समर्थन देत आहेत आणि त्यांच्या मते तेच योग्य असून जग त्यांना समजून घेण्यात चुकत आहे.

पुरुषार्थ विचारानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी व्यक्ती जीवनभर कार्यरत असते. अर्थ काम या दोन्हीवर धर्म म्हणजे नीतिचे नियंत्रण असले तरच मोक्ष म्हणजे मोकळीक अर्थात सुटका हे अंतिम साध्य गाठता येते.  याचा अर्थ- अर्थ आणि काम यांची प्राप्ती नीतिने मर्यादित राहिली पाहिजे.  अर्थ काम यांच्यावर नीतिचा अंकुश असला पाहिजे.  आज असा अंकुश राहिलेला नाही. अर्थप्राप्ती कामवासनेची तृप्ती या दोन गोष्टीच महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. तरुणांना हा भारतीय पुरुषार्थ नीटपणे उलगडून सांगणारे शिक्षणच दिले जात नसल्याने आजचा तरुण बहकलेला दिसतो.

'स्मोकिंग झोन' या लघुपटात मोक्षाचे पात्र साकारणारी एक मुलगी दाखविली आहे. ती काहीच बोलत नाही. कारण मोक्ष म्हणजे काय, हे कोणालाच माहित नाही.  आपण म्हणतो तोच मार्ग मोक्षाचा, अशी माणसांची धारणा झाली आहे.  सर्व प्राणीमात्रांबद्‌दलची करुणा म्हणजे मोक्ष नव्हे.  निसर्गावर प्रेम, परोपकार यांना मोक्षमार्गात काहीच किंमत राहिलेली नाही. चारधाम यात्रा करणे म्हणजे मोक्ष, गंगेत स्नान करणे म्हणजेच पापमुक्ती, मक्का, गया, रोम, जेरुसलेमला जाऊन येणे म्हणजे मोक्ष. अशा सर्व बाजारु संकल्पना माणसात रुजविल्यामुळे एका बाजूला भक्तीचा बाजार दुसरीकडे मोक्षप्राप्तीची दुकानदारी उदयाला आली आहे.  मोक्ष या संकल्पनेचा खरा अर्थ समजून घेण्याची कुणालाच इच्छा नाही. लघुपटाच्या दिग्दर्शकाने ही गोष्ट फार मार्मिकपणे दाखविली आहे.  मोक्षाच्या पात्रासाठी लहान मुलगी निवडली आहे. मुलगीच का निवडली आहे? कारण स्त्रीकडे नवनिर्मितीची क्षमता असते. निसर्गातील शुद्ध आकाराची (Purest Form) निर्मिती स्त्रीच करू शकते.

या लघुपटात एक रखवालदार आहे. वर वर पाहता तो शांत आहे.  परंतु त्याच्या मनात खूप खळबळ माजली आहे. माणसाच्या अस्तित्वाबदलच त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.  कोण आहे हा रखवालदार? डॉ.फ्राइड यांच्या मनोविश्लेषणानुसार हा रखवालदार म्हणजे मनुष्याचे जागृत मन होय. या विरुध्द असते ते निद्रिस्त मन.  जागृत मन आपल्या वर्तन व्यवहाराचा वीस टक्के भाग व्यापत असते.  उरलेल्या ८० टक्के गोष्टी निद्रिस्त मनात जात असतात. जागृत मनाचे तीन भाग आपण या आधी सांगितले आहेत.  इदम्, अहम् आणि श्रेष्ठअहम हे ते तीन भाग होत.  समाजाने चुकीच्या अनैतिक ठरविलेल्या भावना आणि वासनांचे दमन करण्याचे काम श्रेष्ठअहम् करीत असतो.  मात्र त्यांचे संपूर्ण दमन कधीच होत नसते. स्वप्नावस्थेत त्या दमित इच्छा आणि वासनांची आपण पूर्ती करुन घेत असतो. अर्थात, हे सर्व स्वप्नातील मनोव्यापारामुळे घडून येत असते. अहम् हा आपला जागृत मनाचा घटक समाजमान्य पद्धतीने वागत असतो.  एका अर्थाने तो एक मुखवटाच असतो. प्रत्येकाचा मुखवटा हा नाटकी असतो. समाजाचा रोष ओढवून घेण्यासाठी मुखवटा उपयोगी पडतो. एवढे सर्व असूनही व्यक्तीकडून कधी तरी चुकीचे वर्तन घडते.  मग त्या चुकीच्या वर्तनाबदल आपल्या मनात बोचणी लागते.  'आपण तसे वागायला नको होते,' असे व्यक्तीला वाटते. हे बोचणी लागण्याचे कार्य व्यक्तीच्या श्रेष्ठ अहमकडून इदम् च्या आदेशाने होत असते.

'स्मोकिंग झोन' मधला रखवालदार नेमके हेच काम करीत आहे. तो रखवालदार प्रत्येकातील सुप्त मनाला डिवचत आहे. तिथे असलेला प्रत्येकजण बांधून घातलेला आहे. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. प्रत्येकाचे कान उघडे आहेत. येथे एक गोष्ट मान्य करावयास हवी. ती म्हणजे प्रत्येकाच्या मनात वेदना आहेत. काहीतरी चुकीचे घडल्याची बोचणी आहे. कुणी मान्य करो अथवा करो, कधी कधी आपण रानटीपणाने इदम् च्या प्रभावाखाली राहून वागत असतो. रखवालदार बोलतं करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुप्त मनाला टोचण्या देत आहे. प्रत्येकाचे जागृत मन मुखवटा धारण करुन 'झोन' मध्ये जाते. सुप्त मनात जळणारा श्रेष्ठअहम् कबुली देतो. परंतु ही कबुली सर्वांसमोर दिली जात नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. याचे कारण मुखवटा धारण करुन जीवन जगणाऱ्या आपल्यासारख्या माणसात तेवढे धाडस नसते.

या लघुपटात एक मुलगा काहीतरी लिहित आहे.  विचार करीत आहे. हा मुलगा कोण आहे?  या प्रश्नाचे उत्तर प्लेटो हया ग्रीक तत्त्वचिंतकाच्या एका संवादात आढळेल. अडीच हजार वर्षापूर्वी ग्रीसमधील अथेन्स नगरीत सॉक्रेटीस हा प्रख्यात विचारवंत कार्य करीत होता.  सॉक्रेटीस हा पाश्चात्य तत्त्वज्ञानातील श्रेष्ठ विचारवंत म्हणून ओळखला जातो. प्लेटो हा सॉक्रेटीसचा शिष्य होय.  सॉक्रेटीसने काही लिहून ठेवले नाही. प्लेटोने एकूण ३५ संवाद लिहिले आहेत. त्यातील  'रिपब्लिक' हा एक प्रसिद्ध संवाद होय.

या 'रिपब्लिक'मध्ये प्लेटोने आदर्श राज्याविषयीचे चित्र रंगविले आहे. त्याच्या मते, तत्ववेत्ते राज्याचे प्रमुख असतील तेव्हा ते राज्य आदर्श होईल. अशा या आदर्श राज्यात कवींना कोणतेही स्थान असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.  यामागे त्याची भूमिका अशी होती की, कवी हे नवीन काही सांगतच नाहीत. ते अंतिम सत्यापासून शेकडो मैल दूर असतात. या संदर्भात चंद्राचे उदाहरण त्याचे घेतले आहे. त्याच्यामते तळयातल्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पडते. हे प्रतिबिंब पाहून कवीच्या मनात काव्य स्फुरते. तो कविता लिहितो. आता एकूण तीन चंद्र झाले. पहिला म्हणजे आकाशातील खरा-खुरा चंद्र.  त्या चंद्राचे प्रतिबिंब तळयातल्या पाण्यात पडते. हा दुसरा चंद्र.  तिसरा म्हणजे तळयातले प्रतिबिंब पाहून कवितेत त्याचे जे प्रतिबिंब पडते तो कवितेतला चंद्र. असे हे रुपक सांगून झाल्यावर प्लेटो म्हणतो की, Idea is twice removed from reality. Poetry is nothing but the imitation of imitation. अशा प्रकारे कवी हे अंतिम सद्वस्तूपासून दूर गेलेले असल्याने आदर्श राज्यव्यवस्थेत त्यांना कोणतेही स्थान देता कामा नये. सारांश, काव्य हे नवनिर्मिती असू शकत नाही. अंतिमत: जे सत्य आहे ते जाणणे अत्यंत महत्वाचे आहे.

'स्मोकिंग झोन' या लघुपटात वरील सर्व तात्विक, मानसिक संकल्पनांचा यथायोग्य उपयोग केला आहे. दिग्दर्शकाने अतिशय सूक्ष्म पातळीवर जाऊन, खोलवर विचार करुन हया लघुपटाची निर्मिती केली आहे, ही गोष्ट पदोपदी जाणवते. या लघुपटाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यास विविध प्रकारची पारितोषिके जाहीर झाली आहेत. हे वाचून मला खूप आनंद झाला. त्याबद्दल दिग्दर्शक अनुप जत्राटकर त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि या क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीस घवघवीत यश लाभो, अशी शुभेच्छा व्यक्त करतो.


शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

डॉ. ज.रा. दाभोळे स्मृतीलेख-१:

तत्त्वज्ञानाचं चालतं-बोलतं विद्यापीठ हरपलं..!

 (दि. १ मे २०१९ रोजी ज्येष्ठ विचारवंत व तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त 'दै. महाराष्ट्र टाइम्स'मध्ये त्यांच्याविषयी छोटा लेख लिहीला होता. दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी दीर्घ आजाराने त्यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मृतीजागरासाठी हा लेख येथे संपादित स्वरुपात सादर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

डॉ. ज.रा. दाभोळे यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर (दि. १ मे २०१९)


मी गेली वीसहून अधिक वर्षे कोल्हापुरात असलो, तरी डॉ. ज.रा. दाभोळे यांच्याशी कधी संपर्क येण्याचा योग आला नव्हता, याची खंत असली; तरी सरांशी परिचय झाला, याचा आनंद त्याहून कितीतरी मोठा अन् अवर्णनीय आहे. 

साधारण दशकभरापूर्वी सन २०१४ साली बंधू अनुप यांच्या इपिफनी ऑफ गॅलिलिओ या लघुपटाचा सिक्वल असलेल्या स्मोकिंग झोन या लघुपटाच्या प्रिमिअर प्रसंगी या थोर व्यक्तीमत्त्वाशी माझा परिचय झाला. उपरोक्त दोन्ही लघुपटांमध्ये अनुप यांनी तत्त्वज्ञानाच्या अंगाने जी मांडणी केली, त्या मांडणीने दाभोळे सर भलतेच प्रभावित झाले होते आणि त्याच्या प्रेमातच पडलेले. त्यानंतर सर विद्यापीठात आले की, मात्र भेटल्याखेरीज जात नसत. या दरम्यानच ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. एन.ए. निकम यांच्या एनक्वायरी अँड डायलॉग या बृहत्-व्याख्यानाचा अनुवाद दाभोळे सरांनी केला आणि त्याचे प्रकाशन विद्यापीठात झाले. हे पुस्तक वाचल्यानंतर मी अक्षरशः भारावून गेलो. बुद्धाशी जोडणारं, मानवतेच्या जाणीवा निर्माण करणारं असं काही गवसल्यासारखं झालं आणि मी त्याबाबत चर्चेसाठी सरांच्या घरीच पोहोचलो. पुढचे दोनेक तास सर तत्त्वज्ञानाविषयी चिंतनपर मांडणी करीत राहिले आणि मी अक्षरशः भारावून ऐकत होतो. मध्येच प्रश्न विचारीत होतो. सर माझं समाधान करीत आपली मांडणी अधिक तपशीलवार करीत होते. खरं तर तत्त्वज्ञानासारखा अतिगहन विषय किती सोपा करून सांगावा, याची प्रचिती सरांच्या मांडणीतून येत होती. मात्र, त्यावरुन हा विषय सोपा आहे, असं मात्र समजण्याचं कारण नाही. सरांचं या विषयातलं चिंतनच इतकं सखोल आहे, त्यांनी तत्त्वज्ञानाच्या सागरात इतक्या खोलवर बुड्या मारलेल्या आहेत; की त्यामधून त्यांचे या विषयामधील विचारमोती निर्माण झालेले आहे. त्या मोत्यांचे कण ते असे माझ्यासारख्या कैक विद्यार्थ्यांवर असे मुक्तहस्ते उधळत असतात आणि तरीही त्यांची ओजळ कधीही रिती होत नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य. सर्व भेदांच्या पलिकडल्या शुद्ध आणि सात्त्विक मानवतावादाचे जे आकलन सरांना झाले आहे, त्याची तुलना बुद्ध तत्त्वज्ञानाशीच करावी लागेल. त्यामुळे त्यांना भेटणारा प्रत्येक जण त्यांच्या निष्कलंक व निष्कपट प्रेमाचा लाभार्थीच बनून जातो.

सरांना निवृत्त होऊन आता वीसहून अधिक वर्षे उलटली, पण शिक्षणाशी आणि ज्ञानदानाशी असलेली त्यांची बांधिलकी आजतागायत कायम आहे. आजही त्यांच्याकडे त्यांचे नवे-जुने विद्यार्थी वेळ मिळेल तसे येत असतात, भेटत असतात आणि त्या भेटीतून नवे ज्ञानमौक्तिक घेऊन पुनश्च मार्गस्थ होतात. वयोमानानुसार सरांना काही आजारांनी वेढलं आहे, पण सरांना नामोहरम करणं त्यांना जमलेलं नाही, जमणार नाही. आलेल्या विद्यार्थ्याला पाहून सरांच्या चेहऱ्यावर विलसणारं स्मित रोखणं त्या आजारांनाही अशक्य आहे. तसं पाहता, खऱ्या अर्थानं तत्त्वज्ञान जगणारा, अंगिकृत तत्त्वज्ञान सांगणारा असा हा शिक्षक आहे; नव्हे, तत्त्वज्ञानाचं चालतं बोलतं विद्यापीठच आहे. या विद्यापीठाला कार्यरत ठेवणाऱ्या सौ. दाभोळे मॅडम यांचेही आभार मानायला हवेत.

आजच्या अस्वस्थ वर्तमानाच्या आवर्तात अशा प्रकारची निष्ठा, संयम आणि तत्त्वांप्रती अनिश्चलत्व ही अतीव दुर्मिळ बाब आहे. मात्र, त्यांचे दर्शन दाभोळे सरांच्या दर्शनामध्ये होत असते. दाभोळे सरांसारख्या वंदनीय व्यक्तीमत्त्वामुळे चांगुलपणावरचा विश्वास आणि योग्य दिशेने काम करीत राहण्याची प्रेरणा या दोन्ही बाबी सदोदित सोबत राहण्याची खात्री मिळते. त्यांचा आशीर्वादाचा हात डोक्यावर असणे, ही माझ्यासारख्या अनेक जणांसाठी आयुष्यभराची पुंजी आहे. त्याचं मोल आणि कृतज्ञता शब्दांतून व्यक्त करणे केवळ अशक्य!


गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

संस्कृत भाषा आणि संस्कृत पत्रकारिता

भारतातील एकमेव संस्कृत दैनिक 'सुधर्मा'

(देशभरात आज संस्कृत भाषा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने या भाषेविषयी आणि संस्कृत पत्रकारितेविषयी संक्षिप्त माहिती देणारा लेख माझ्या वाचकांसाठी सादर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर) 

संस्कृत भाषा, तिचे वैभव आणि संवर्धन या दृष्टीने सदर लेखामध्ये काही चिंतन करण्याचा प्रयत्न आहे. संस्कृत भाषेच्या अनुषंगाने या भाषेशी मला जोडणाऱ्या माझ्या तमाम गुरूंना कृतज्ञतापूर्वक नमन करण्याची संधी घेणे उचित आहे. त्या निमित्ताने संस्कृत भाषेसाठी माझ्या गुरूंनी घेतलेल्या कष्टांची जाणीवही आपल्याला होईल.

माझा संस्कृत शिक्षणाचा पहिला श्लोक-

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः

निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा

हा शिकविला तो कागलच्या मुजुमदार मॅडमनी!

आयु. पुष्पा मुजुमदार मॅडम या निपाणीच्या देवचंद महाविद्यालयात प्राध्यापक होत्या आणि त्या कागलमध्ये राहायच्या. त्यांनी सायंकाळच्या सत्रात कागलमध्ये त्यांच्या घरी गावातील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांना मोफत संस्कृत सुभाषिते शिकविण्याचे ठरविले. तेव्हा मी पाचवीत होतो. आम्ही साधारण तीसेक मुलं-मुली रोज सायंकाळी मुजुमदार वाड्यात जमायचो. साधारण तासभर वर्ग चालायचा. दररोज पाच सुभाषिते त्यांच्या अर्थांसह पाठ करायची. तीनेक महिने त्यांनी हा वर्ग घेतला. त्या काळात संपूर्ण सुभाषितमाला मला पाठ झालेली.

यातूनच मग प्रेरणा जागृत झाली आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रि-एलिमेंटरी संस्कृत परीक्षेला बसलो. त्यावेळीही कागलच्याच सुधा कुलकर्णी यांच्याकडे अभ्यासाला जायचो. सुधाबाई अत्यंत प्रेमाने शिकवायच्या. ही परीक्षा देखील मी उत्तीर्ण झालो.

पुढं नववीला निपाणीच्या मोहनलाल दोशी विद्यालयात प्रवेश घेतला. तिथं संस्कृत विषय आठवीपासून होता. पण माझ्या पूर्वीच्या कागलच्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये संस्कृत विषय नसल्याने माझा हिंदी विषय होता. इथे संस्कृत आहे म्हटल्यावर पूर्ण शंभर गुणांचे संस्कृत शिकायची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. पण मागील वर्षी काहीच न शिकल्याने हिंदी-संस्कृत असा प्रत्येकी ५० गुणांचा जोडविषय घेतला.

माझी ही संस्कृतची ओढ लक्षात आल्याने तिथे संस्कृत शिकविणाऱ्या जेपीके तथा ज्योती प्रकाश कुलकर्णी मॅडमनी माझे आठवीचे संस्कृत करवून घेण्याचे ठरविले. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जायचो. स्वयंपाकपाणी करता करता त्यांनी मला मोफत संस्कृत शिकविले, व्याकरणाचा पाया पक्का करून घेतला. दोनेक महिन्यांत त्यांनी मला इतरांच्या बरोबरीने आणून ठेवले. पुढेही दहावीपर्यंत आम्ही किती तरी मुलं त्यांच्या घरी शिकायला जायचो. पण, मॅडमनी कधी आमच्याकडून एक पैसाही शुल्क घेतले नाही. इतक्या निरलसपणाने त्यांनी संस्कृत भाषेची सेवा केली.

पुढं देवचंद महाविद्यालयात मात्र मी बारावीपर्यंत पूर्ण संस्कृत (१०० गुण) विषय घेतला. आर.एन. कुलकर्णी नावाचा बापमाणूस आम्हाला शिकवायचा. अत्यंत प्रेमळ न् अत्यंत प्रांजळ अशा आरएनके सरांमुळे संस्कृतमधले विविध प्रकारचे चांगले साहित्य वाचायला मी प्रवृत्त झालो. संस्कृतमुळे माणसामध्ये किती पराकोटीची सुसंस्कृतता येऊ शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझे हे गुरू. या सर्व गुरूंना या निमित्ताने मनापासून अभिवादन करणे अगत्याचे आहे.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्।।

हा अनुष्ठुभ छंदातला श्लोक आहे आणि याचे संस्कृतमधील महत्त्व मी जाणकारांना सांगण्याचे खरे तर कारण नाही. प्रणयात मग्न झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीतील नराला पारधी मारतो आणि क्रौंच मादीची शोकविव्हलता पाहून महर्षी वाल्मिकींच्या तोंडून सर्वप्रथम उमटलेली ही सौंदर्यशाली शापवाणी- हे दुष्टा, तू प्रेमाराधनेत मग्न झालेल्या क्रौंचाला मारलं आहेस. जा, तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही आणि वियोगाचं दुःख तुलाही झेलावं लागेल.

या शापवाणीचे पुढे काय झाले असेल ते असो; पण, या भारताला एक महाकवी मात्र त्या काळी मिळाला होता. त्यानंतरच वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. त्यातील बहुतांश रचना या अनुष्ठुभ छंदातीलच आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

रामायणाबरोबरच महाभारत हे महाकाव्यही याच दृष्टीने महत्त्वाचे. व्यासोच्छिष्टम् जगत्सर्वम् असे त्याचे सार्थ वर्णन केले जाते. ही केवळ कौरव-पांडवांच्या जय-पराजयाची गाथा नाही; तर, एकूणच मानवी प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, प्रकृती याचे सर्वंकष सार महाभारतात आहे. इथे नाही, ते कुठेच नाही, ही महाभारताची महती आजच्या कलियुगालाही लागू पडेल अशीच.

व्यासांनी अवघ्या ८८०० श्लोकांचे जय नावाचे काव्य रचले. त्यात त्यांचा शिष्य वैशंपायनाने जनमेजयाच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल सांगितलेल्या कथा, वृत्तांतांची भर घातल्याने ते २४ हजार श्लोकांपर्यंत विस्तारले. भारतवंशाची गोष्ट म्हणून त्याला भारत नाव मिळाले. पुढे सौतीने नैमिषारण्यात चाललेल्या यज्ञसत्रादरम्यान ही कथा ऐकविताना त्यात कालानुरुप काही गोष्टींची भर घातली आणि कथा एक लक्ष श्लोकांची झाली. ही सविस्तर भारत कथा म्हणजेच महाभारत होय. कृष्णधवलबरोबरच करड्या रंगांतील विविध व्यक्तींचे, पात्रांचे यथार्थ चित्रण हे महाभारताचे वैशिष्ट्य. आजही भारतातील हिंदीसह अनेक चित्रपटांच्या कथा या रामायण, महाभारतापासून प्रेरित असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

संस्कृतचे प्राचीनत्व:

संस्कृत ही आर्यांबरोबर भारतात आली असे मानल्यास, तत्पूर्वी द्रविड भाषाकुलातील भाषा इथे अस्तित्वात होत्याच. अशा १६१ भाषा आहेत. या स्थानिक भाषिकांशी आदानप्रदान व्यवहार करण्यासाठी निवडक लोकांना आर्यांनी संस्कृत शिकविले. हे ज्ञानी लोक परस्परांशी भाषाव्यवहार करू लागले. म्हणजे व्यवहारात लोकांची भाषा बोलीभाषाच राहिली आणि संस्कृत ही त्या लोकसमूहांना जोडणारी ज्ञानभाषा म्हणून अखिल भारतीय भाषा बनली.

वेदांपासून पुराणांपर्यंतच्या सर्व वैदिक धर्मग्रंथांची भाषा संस्कृत होती. वैदिक धर्माविरुद्ध बंड करून उदयास आलेल्या बौद्ध व जैन धर्मांनी धर्मग्रंथ व धर्मप्रसार यांसाठी अनुक्रमे पाली व अर्धमागधी या लोकभाषांचा स्वीकार व अंगिकार केला. मात्र, पुढे पहिल्या शतकापासून बौद्ध धर्मातील महायान पंथाने संस्कृतचा स्वीकार केला. अश्वघोषाने बुद्धचरितम् हे पुस्तक संस्कृतमध्ये लिहीले. त्रिपिटकासह अनेक बौद्ध ग्रंथांचे संस्कृतमध्ये भाषांतर झाले. जैनांनीही धर्मग्रंथासाठी संस्कृत स्वीकारले. तत्त्वार्थसूत्र हा त्यांचा संस्कृत ग्रंथ सुप्रसिद्ध आहे.

भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी युरोपीय पंडितांनीही संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. जर्मन पंडितांनी अनेक संस्कृत ग्रंथांची जर्मन भाषांतरे केली. पाणिनीच्या व्याकरणाचेही इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंचमध्ये भाषांतर झाले. वॉरन हेस्टींग यांच्या काळापासून संस्कृत ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे सुरू झाली. यातला पहिला भाषांतरित ग्रंथ म्हणजे भगवद्गीता होय. (१७७५) ब्रिटीश सरकारने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतीय ग्रंथांची सूची तयार केली. त्यानुसार त्यांना सुमारे दहा हजार संस्कृत ग्रंथांची हस्तलिखिते आढळून आल्याची नोंद आहे.

जर्मन पंडित मॅक्समुल्लर याने संस्कृत भाषा जर्मनीशी जोडण्यात फार मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या मते, आज कदाचित संस्कृत मृत भाषा असली तरी भारतातील आजच्या सर्व आर्य व द्रविड भाषांचा जन्म व प्राण संस्कृत हाच आहे. मॅक्समुल्लरचे हे विधान महत्त्वाचे आहे. पंडित नेहरूसुद्धा म्हणाले होते की, भारताची सर्वात मोठी दौलत कोणती, सर्वात मोलाचा वारसा कोणता, असे जर कोणी मला विचारले तर मी ठामपणे उत्तर देईन की, ते आहे संस्कृत भाषा आणि वाङ्मय.

संस्कृत पत्रकारिता:

 इयम् आकाशवाणी। संप्रति वार्ताः श्रुयन्ताम्। प्रवाचकः बलदेवानन्दसागरः।

सन १९७४ पासून आकाशवाणीवरुन आपल्या सर्वांची सकाळ संस्कृतमय करीत असलेल्या डॉ. बलदेवानन्नद सागर यांनी संस्कृत पत्रकारितेच्या इतिहासाचा अतिशय उत्तम वेध घेतला आहे.

दि. १ जून १८६६ रोजी काशीहून प्रकाशित झालेले काशीविद्या सुधानिधीः अगर पण्डितपत्रिका हे पहिले संस्कृत वृत्तपत्र होय. सव्हर्नमेंट संस्कृत महाविद्यालयाच्या मार्फत ते प्रकाशित करण्यात येत असे. १८६७ मध्ये काशीहूनच क्रमनंदिनी वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाले. मात्र या दोन्ही वृत्तपत्रांतून प्काचीन संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन करीत असत. आजच्या वृत्तपत्रासारखे त्यांचे स्वरुप नव्हते. त्यामुळे सन १८७२मध्ये लाहोरहून प्रकाशित होऊ लागलेले हृषीकेश भट्टाचार्य यांचे विद्योदयः हे त्या अर्थाने पहिले संस्कृत वृत्तपत्र ठरते. त्यानंतर लगेचच पाटणा (बिहार) येथून विद्यार्थी हे वृत्तपत्र १८८० पासून निघू लागले.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत अनेक संस्कृत पत्रिका निघाल्या. राष्ट्रीय आंदोलनाच्या दृष्टीने त्यातील संस्कृत चंद्रिका आणि सहृदया या दोन पत्रिकांचे स्थान महत्त्वाचे आहे. ही दोन्ही पत्रे कलकत्त्याहून प्रकाशित होत.

याठिकाणी आपणा कोल्हापूरकरांच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची बाब अशी की, संस्कृत चंद्रिका ही पत्रिका कलकत्त्यानंतर थेट कोल्हापुरातून प्रकाशित होऊ लागली आणि त्याचे संपादक होते अप्पाशास्त्री सदाशिवशास्त्री राशिवडेकर.

हे नाव वाचल्यानंतर मी आनंदाने उडालोच. कोणी द्विवेदी, त्रिवेदी असते, तर मन साशंक झाले असते. पण थेट राशिवडेकर आडनावामुळे माणूस पक्का कोल्हापूरचाच, याची खात्री पटते. या अप्पाशास्त्रींच्या संपादकत्वाखाली संस्कृतचंद्रिकेने खूप मोठी लोकप्रियता मिळविली. अप्पाशास्त्री यातून प्रखर राजकीय लेख लिहीत असत. त्यामुळे ब्रिटीशांच्या जेलमध्ये त्यांचे सातत्याने जाणे-येणे सुरू असायचे.

या अप्पाशास्त्रींची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता २ नोव्हेंबर १८७३ ते २५ ऑक्टोबर १९१३ असा त्यांचा जीवनकाल असल्याचे समजले. संस्कृतचंद्रिकेच्या बरोबरीनेच त्यांनी सनृतवादिनी या वृत्तपत्राचेही प्रकाशन केल्याचा उल्लेख आढळतो. हिंदी पत्रकारितेत महावीर प्रसाद द्विवेदी यांनी जे काम केले, त्या तोडीचे काम संस्कृत पत्रकारितेत अप्पाशास्त्रींनी केल्याचे गौरवपूर्ण उल्लेख आढळतात. क्रांतदर्शी कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. ऋतुचित्रम् या त्यांच्या कवितेची तुलना ऋतुसंहाराशी केली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या पञ्जरबद्धाः शुकः,वल्लभविलापः, मल्लिकाकुसुमम् या कविताही चिरस्मरणीय असल्याचा उल्लेख आढळतो.

स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडात आनंदपत्रिका (१९२३), गीर्वाण (१९२४), शारदा (१९२४), श्रीः (१९३१), उषा (१९३४), संस्कृत-ग्रंथमाला (१९३६), भारतश्रीः (१९४०) आदी नियतकालिके प्रकाशित झाली. कानपूरहून श्री. केदारनाथ शर्मा यांचे मासिक संस्कृत-रत्नाकरः (१९३८) आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे त्रैमासिक गंगानाथ झा रिसर्च जर्नल (१९४१) इत्यादी प्रकाशित होऊ लागली.

स्वातंत्र्योत्तर कालखंडातही ब्राह्मणमहासंमेलनम् (१९४८), गुरूकुलपत्रिका (१९४८), भारती (१९५०), संस्कृत-भवितव्यम् (१९५२), दिव्यज्योतिः (१९५६), शारदा (१९५९), विश्व संस्कृतम् (१९६३), संविद् (१९६५), गाण्डीवम् (१९६६), सुप्रभातम् (१९७६), संस्कृतश्रीः (१९७६), प्रभातम् (१९८०), लोकसंस्कृतम् (१९८३), व्रजगन्धा (१९८८), श्यामला (१९८९) इत्यादी वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली.

१९७० साली संस्कृत पत्रकारितेच्या क्षेत्रात ऐतिहासिक घटना घडली. म्हैसूरचे संस्कृत विद्वान, गीर्वाणवाणीभूषण पंडित के.एन. वरदराजय्याचार्य यांनी सुधर्मा हे संस्कृत दैनिक सुरू केले. आज अनेक आव्हानांचा सामना करीत सुधर्मा सुवर्णमहोत्सवाच्या टप्प्यावर आहे. त्याची ऑनलाईन आवृत्तीही आज उपलब्ध आहे.

आजघडीला या एकमेव संस्कृत दैनिकाचा खप २००० ते ३००० प्रतींच्या घरात आहे. संस्कृत शिकविणाऱ्या संस्था आणि व्यक्तींपुरताच हा खप मर्यादित आहे. इतरही जर्नलसदृष प्रकाशने, नियतकालिकेही साधारण दीडशेच्या घरात आहेत. मात्र त्यांचा खपही मर्यादित आहे.

तुम्हाला हे ऐकून सुखद आश्चर्याचा धक्का बसेल की, पॉण्डिचेरीहून डॉ. सम्पदानन्द मिश्र हे www.divyavanee.in या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून संस्कृत कार्यक्रमांचे २४X७ ऑनलाईन प्रसारण करीत आहेत. तिरुअनंतरपुरम् येथील जनम् या मल्याळम् वाहिनीवर २ ऑक्टोबर २०१५ पासून १५ मिनिटांचा वेळ संस्कृत बातम्यांसाठी राखून ठेवण्यास सुरवात केली आहे. आमचे नाशिकचे मित्र आणि ऑनलाईन डिक्शनरीकार सुनील खांडबहाले त्यांच्या पोर्टलवरुन ऑनलाईन संस्कृत कम्युनिटी रेडिओ चालवितात.

या पार्श्वभूमीवर, आज सर्व संस्कृतप्रेमींसमोर आव्हान आहे ते या भाषेच्या प्रसाराचे व संवर्धनाचे! एके काळी ज्ञानभाषा असणारी संस्कृत ही तिच्या अभिजाततेसाठी ओळखली जात असे. भाषा वृद्धिंगत व्हायची असेल तर ती ज्ञानभाषा, प्रमाणभाषा आणि बोलीभाषा या त्रिस्तरापैकी किमान एका स्तरावर अविचल असली पाहिजे. आज संस्कृत पूर्ण सक्षम असूनही यापैकी कुठेही नाही, याचे कारण म्हणजे आपण शालेय अभ्यासक्रमात तिची केवळ गुणांशी घातलेली सांगड होय. दहावी, बारावीपर्यंत गुण मिळवून देणारा विषय म्हणून तो अभ्यासात घेणे आणि स्कोअरिंग झाले की सोडून देणे, यापायी गुणाढ्य संस्कृतचे नुकसान झाले आहे. आता तर मराठी विषयालाही तसे भारंभार गुण पडताहेत (नव्हे, दिले जाताहेत!)

त्याऐवजी संस्कृमधील प्रचंड ज्ञानभांडाराचे मार्केटिंग करण्याची आज खरी गरज आहे. संस्कृत ही केवळ मार्कांची भाषा नसून तीच खऱ्या अर्थाने गुणसंस्काराची भाषा आहे, हे आपण नव्या पिढीवर बिंबवायला हवे. ऋग्वेदातल्या ऋचा या द्विअर्थी अगर अनेकार्थी आहेत. असे अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. त्या ग्रंथांच्या संदर्भात सखोल अशा अभ्यासाची, चिंतनाची आणि संशोधनाची गरज आहे. त्यासाठी नव्या पिढीला संस्कृतमधल्या करिअर संधींची माहिती देऊन या संशोधनाकडे वळण्यास प्रवृत्त करायला हवे. मात्र, आपल्यापेक्षा जर्मनीमध्ये संस्कृतच्या अनुषंगाने प्रचंड असे संशोधन सुरू आहे.

आपल्याकडे असे व्हावयाचे असल्यास आपण संस्कृतची सर्वप्रथम रिच्युऍलिझममधून सोडवणूक केली पाहिजे. देववाणी, देवभाषा असे कानावर सारखे पडत असल्यामुळे ते तर देवाचे, त्यात आपला काय संबंध?’ असा सर्वसामान्यांचा सूर असतो. तो स्वाभाविकही आहे. पूर्वी या ज्ञानसंचितापासून आपणच हेतुपुरस्सर बहुजनांना या भाषेपासून दूर ठेवले. त्यामुळे त्यांना तिच्याविषयी आपलेपणा वाटत नाही. हा दुरावा कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. संस्कृतला देवभाषा म्हणणे याचा संबंध प्युरिटीशी अर्थात पावित्र्याशी, शुद्धतेशी आहे. ध्वनीची, वाणीची शुद्धता आणि त्यायोगे मनाची शुद्धता इथे अभिप्रेत आहे, हे आपल्याला नव्याने लोकांपर्यंत नेले पाहिजे.

बहुजनांनी, विशेषतः शूद्रातिशूद्रांनी संस्कृत ऐकणे, वाचणे, बोलणे महापाप समजले जायचे. आता तसे मानण्याचे काहीच प्रयोजन नाही. पण, संस्कृतला आता ब्राह्मणांची भाषा म्हणून सुडाचा सामना करावा लागतोय का, हेही पाहावे लागेल. या गुंत्यातून संस्कृतची सोडवणूक आपल्याला करावी लागेल.

संस्कृत उच्चारांमुळे ही भाषा अवघड आहे, असा समज पसरला आहे. पण, मूलभूत व्याकरण, शब्दसंपदा यांच्या बळावर ती समजून घेणे, अवगत करणे काहीच अवघड नाही. संस्कृत ही सोपी- अतिशय सोपी भाषा आहे, हे लोकांना नव्याने पटवून द्यावे लागेल. लोकांना ती आपली वाटली पाहिजे, या दृष्टीने व्यापक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे.

आजच्या पिढीशी त्यांच्या संवाद साधनांच्या माध्यमातून आपण संवाद साधायला हवा. त्यासाठी समाजमाध्यमांचा मुबलक वापर करायला हवा. एकीकडे संगणकासाठी सर्वाधिक सोपी, सरल भाषा म्हणून संस्कृतचा गौरव करीत असताना आजही गुगलने त्यांच्या ट्रान्सलेटर अॅपमध्ये संस्कृत भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. त्यासाठीही व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे.

एकूणातच संस्कृतला तिचे मूळ वैभव परत मिळवून द्यावयाचे असेल तर, आपल्याला तिची अभिजनवादी मानसिकतेमधून प्रयत्नपूर्वक सुटका करून बहुजनवादी बनविण्यासाठी पराकाष्ठा करण्याची आजघडीला नितांत गरज निर्माण झाली आहे.

अलिकडेच प्रख्यात विचारवंत व ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयी यांचे संस्कृतविषयी अत्यंत परखड मत प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणतात, संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात भाषा आहेत. त्यांचे ज्ञान असलेले खूप कमी लोक भारतात आहेत. या भाषांच्या बाबतीत विद्वत्तेच्या अभावाचे मोठे संकट आहे. या भाषांचे विश्वसनीय स्रोत हळूहळू कमी होत आहेत, पण विदेशात अधिक प्रमाणात आहेत.

संस्कृतला स्तुती, चापलुसी, अंधभक्तीची भाषा बनविले जात आहे. ते अज्ञानी आहेत किंवा संस्कृतमधील निर्भयतेचा स्वीकार करू इच्छित नाहीत. संस्कृतमध्ये जेवढी निर्भयता, जिज्ञासा, ज्ञानाच्या विविधतेचा स्वीकार आहे, तो अनेक भाषांमध्ये नाही. वेद वैदिक संस्कृतमध्ये लिहीण्यात आले. संस्कृतची बौद्धिक परंपरा शास्त्रार्थाची होती. नवा विचार मांडण्यासाठी तुम्हाला इतिहास सांगावा लागतो. त्यानंतरच नवी विचारसरणी आणावी लागते. तिला चरणस्पर्शी भाषा करणे हा अन्याय आहे.

मित्र हो, इतर ठिकाणी देव बसवून कोणत्याही कार्याची सुरवात होते. संस्कृतची सुरवात मात्र देव शब्द चालवण्यापासून होते. इतकी व्हायब्रन्सी ज्या भाषेत आहे, त्या भाषेवर प्रेम करणारे आपणासारखे जाणते आहेत, तोपर्यंत ही प्रातःस्मरणीय भाषा टिकणार आहेच. आपण सारे मिळून तिच्या संवर्धनासाठी कृतीशील प्रयत्न करण्यासाठी प्रतिबद्ध होऊ या!

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

माझे वैचारिक मार्गदर्शक प्रा. हरी नरके

 

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या 'निखळ: जागर संवेदनांचा' या ललितलेख संग्रहाच्या प्रकाशन समारंभास प्रा. हरी नरके प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संग्रहित छायाचित्र. 

प्रा. हरी नरके यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर

(ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे बुधवार, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी अकाली निधन झाले. हा आमच्यावर खूप मोठा दुःखाचा आघात आहे. या निमित्ताने नरके सरांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख सन्मित्र मोहसीन मुल्ला यांनी लिहवून घेऊन 'पुढारी ऑनलाईन'वर प्रकाशित केला. हा लेख दै. पुढारीच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

आयुष्यात असे काही प्रसंग येतात की जे तुम्हाला स्तब्ध, निःशब्द करून टाकतात. कालचा, ९ ऑगस्टचा दिवस माझ्या आयुष्यात असाच उगवलेला. ऑगस्ट क्रांतीदिनाच्या भरगच्च कार्यक्रमांचे वार्तांकन करण्याचे मनात नियोजन करीत घरातून बाहेर पडलो; तेवढ्यात दिनेश कुडचे याचा हरी नरके सर गेल्याचा तीन शब्दांचा संदेश प्राप्त झाला. सुन्न झालो. त्याच अवस्थेत ऑफिसमध्ये पोहोचलो. आमच्या कॉमन मित्रांपैकी एखाद्याला फोन करून वृत्ताची शहानिशा करावी, असंही वाटेना. तोवर सर्वच माध्यमांतून हे भयावह वृत्त खरे असल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे कार्यालयीन कामांचा यांत्रिकपणे निपटारा करीत असताना दुसरीकडे सरांच्या आठवांचा कल्लोळ मनात उसळलेला होता. सरांविषयी लिहावं, असे काही माध्यमकर्मी मित्रमंडळींचे फोनही आले, पण रात्री घरी परतल्यानंतरही सरांच्या आठवणींनी मनात इतकी प्रचंड गर्दी केली की काय लिहावं अन् काय नको, अशी अवस्था होऊन गेली. मनातला कोलाहल वाढलेलाच होता. अस्वस्थता मनभर पसरलेलीच होती. अशाच अवस्थेत रात्री उशीरा कधी तरी झोप लागली.

हरी नरके सरांचं माझ्या आयुष्यात वैचारिक मार्गदर्शकाचं स्थान होतं. माझ्याच काय, एकूणच महाराष्ट्राचेही ते वैचारिक दिग्दर्शक होते. आम्हा दोघांमधील संवाद हा अत्यंत कम्फर्टेबल असायचा. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला वैचारिक आणि संशोधकीय अधिष्ठानाच्या बळावर पुढे घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी अंगिकारलेलं होतं आणि अत्यंत निष्ठापूर्वक त्यांनी ही धुरा त्यांच्या खांद्यावर अखेरच्या क्षणापर्यंत वाहिली. ५६ पुस्तकांबरोबरच त्यांच्या अगणित दैनंदिन पोस्टमधून त्यांचा हा संशोधकीय विचारवंताचा पैलू अत्यंत झळाळून आपल्यासमोर सिद्ध झालेला आहे.

सरांची व्याख्यानं ऐकणं आणि त्यांना बोलताना पाहणं, हा एक समृद्ध करणारा आनंदानुभव असायचा. सुरवातीला श्रोता म्हणूनच मी त्यांच्याशी जोडला गेलेलो होतो. मुळातच सर एक पट्टीचे वक्ते असल्यानं समोरच्या श्रोत्यांना खिळवून कसं ठेवायचं, याची उत्तम हातोटी त्यांना साधलेली होती. सातत्यपूर्ण वाचनामुळं त्यांच्याकडं विविध विषयांच्या संदर्भांची खाण असायची. या संदर्भांची आपल्या भाषणामध्ये पखरण करताना श्रोत्यांना ते बोजड न वाटता सहजपणानं लक्षात राहतील, अशा पद्धतीनं त्यांची पेरणी ते करत. भाषणात आक्रमकता असायची, पण ती मुद्द्यांवाटे सामोरी यायची. कित्येकदा टोकदार उपरोधानं समोरच्याला ते आत्मपरीक्षणाला भाग पाडत. त्यावेळी मंद हसत, डोळे बारीक करून हळूच मिचकावण्याची त्यांची शैलीही लाजवाब असायची. अशा वेळी त्यांच्या गालावर पडणारी खळी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला लोभसपणा प्राप्त करून द्यायची. श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या मित्रपरिवाराचं नाव घेऊन संबोधण्याची त्यांची स्टाईलही युनिक होती.

प्रांजळपणा आणि परखडपणा या परस्परविरोधी गुणांचाही अत्यंत संतुलित संगम त्यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये होता. लोकांशी बोलताना कोणताही अभिनिवेश ते बोळगत नसत. साधेपणाने आणि आपुलकीने मिठ्ठास बोलत ते समोरच्याला आपलेसे करीत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाबतीत कोणी वस्तुनिष्ठता सोडू लागला की अत्यंत कठोरपणाने ते त्यांचे मुद्दे खोडून काढत. टेल्कोतील नोकरी सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवर आल्यानंतर पहिले वेतन २७ महिन्यांनी मिळाले आणि दुसरे आणखी वर्षभराने, हे त्यांनी त्यांच्या संपादकीय टिपणीत स्पष्टपणे नोंदविले. वसंत मून गेले, तेव्हा त्यांचेही दोन वर्षांचे वेतन थकलेले होते, हेही त्यांनी परखडपणे लिहीले. अशा परिस्थितीतही आपल्या कुटुंबियांनी आपल्याला सांभाळून घेतले, याची प्रांजळ नोंदही त्यांनी त्यात केली.

फुले-शाहू-आंबेडकरांचे अनेक संदर्भ त्यांना मुखोद्गत असत. त्यांची स्मरणशक्ती अचाट होती. मी वेळोवेळी काही शंका अगर संदर्भांच्या अनुषंगानं त्यांना फोन करीत असे. त्यावेळी ते संदर्भांची मालिका त्याच फोनवर सांगायला चालू करत. पाहून ठेवतो, थोड्या वेळानं फोन कर,’ वगैरे कधीच त्यांनी सांगितलं नाही. त्या अर्थानं फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा ते चालताबोलता कोश होते, हे मी माझ्या अनुभवातून ठामपणानं सांगू शकतो. मंत्रालयात असतानाच्या काळात कधी काही शेअरिंग करायचं असलं की त्यांचं बॅरेक्समधलं कार्यालय हे माझं आनंदनिधान असायचं. वेळ मिळाला की तिथं जाऊन नरके सरांशी गप्पा मारणं आणि त्या गप्पांतून आपसूक मिळणारे नवीन वाचनासाठीचे संदर्भ, फुले-आंबेडकरांच्या कार्याच्या त्यांच्या संशोधनातून सामोरी आलेली नवी माहिती, त्यांचं नवीन लिखाण अशा अनेक बाबींवर चर्चा होत. माझ्या पीएच.डी. संशोधनादरम्यान तर माझी सर्वाधिक चर्चा ही नरके सरांशीच होत होती. त्यातून आमच्या वयातलं अंतर पार होऊनही एक आगळं मैत्र आमच्यात जोडलं गेलं. त्यामध्ये माझ्यापेक्षा त्यांचं प्रेम, आपुलकी आणि सौजन्य यांचा वाटा अधिक होता. विशेष म्हणजे हे मैत्र मी कोल्हापुरात आल्यानंतर सुद्धा अबाधित राहिलं. त्यांचा कोल्हापूर दौरा असला की, संबंधित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि उतरण्याचं ठिकाण याची माहिती ते आवर्जून पाठवायचे. त्यांचं व्याख्यान शक्यतो मी कधी चुकवायचो नाही कारण दरवेळच्या भाषणातून काही नवे संदर्भ निश्चितपणानं मिळायचे. अगदीच शक्य नाही झालं तर सकाळच्या अगर संध्याकाळच्या सत्रात आम्ही भेटायचो. छान गप्पा व्हायच्या, शक्य असल्यास आम्ही एकत्र नाश्ता अथवा भोजन घ्यायचो. वेळ असेल तर घरी जायचो. त्यांचं आतिथ्य करायला माझ्या पत्नीलाही आवडायचं कारण ताटातला अन्नाचा कण अन् कण टिपून खाऊन तृप्त होणारा हा एक समाधानी माणूस होता. त्या एकेका दाण्यासाठी आपला समाज कसा आसुसलेला असायचा आणि आज तो मिळत असताना त्याप्रती कृतज्ञभाव बाळगणं आवश्यक आहे, ही आम्हा दोघांचीही धारणा असल्यानं हा कौटुंबिक जिव्हाळाही सरांनी खूप आत्मियतेनं जपला. या व्यक्तीगत जिव्हाळ्यातूनच माझ्या पहिल्या निखळ: जागर संवेदनांच्या या ललितसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिलेच, शिवाय, माझ्याविषयी आणि पुस्तकाविषयीही अगदी भरभरून बोलले. त्यांचे हे शब्दच आता सोबत राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी माझा आतेभाऊ नितीन याच्या हातचा तांबडा-पांढरा चाखलेला होता. त्याचे ते चाहतेच बनले होते. अगदी अलिकडेही एकदा त्यांनी त्याची आठवण काढली होती.

सरांच्या अखेरच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी माझ्या लेकीसह मी त्यांची भेट घेतली. स्विनीची अतिशय ममत्वानं चौकशी करीत त्यांनी तिला तोंडभरून आशीर्वाद दिले. गप्पांच्या दरम्यान त्यांच्या समग्र आजारपणाविषयी आणि उपचारांविषयी ते सांगत होते. चेहऱ्यावरील आणि अंगावरील सूज लपत नव्हती, पण ती किती तरी कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. जीभेवर मणामणाचं ओझं असल्याप्रमाणं ती उचलली जात नव्हती. हे ऐकताना तर अंगावर काटाच उभा राहिला. आताही बोलताना जीभेमुळं त्यांचा आवाज थोडा बदलला होता, पण लोकांचं प्रेम आणि आग्रह यामुळं आपलं सारं आजारपण बाजूला ठेवून ते व्याख्यानाला उभे राहात असत. आम्ही त्यावेळी पोहे खात होतो. सर म्हणाले, आलोक, तुला हे जितके तिखट किंवा खारट लागताहेत ना, त्याच्या किमान चौपटीने अधिक त्या चवी मला झोंबतात. म्हणजे त्यांच्या अगदी खाण्यावरही अशा प्रकारचे निर्बंध आले होते. उष्टे राखायचे नाही, म्हणून घेतानाच ते कमी अन्न घेत असत. यानंतर मात्र एकदा-दोनदा फोनवर बोलणं होऊन प्रकृतीची विचारपूस झाली, त्यापलिकडं भेट नाही. आणि सर असे अचानक निघून जातील आणि त्यांच्यावर स्मृतीलेख लिहीण्याची वेळ येईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण, तसं झालंय खरं.

सरांविषयी किती लिहावं... भेटल्यावर प्रेमानं हात हातात घेऊन चौकशी करणं, कधी आठवण आली की मिस्ड कॉल करणं (बैठकीत वगैरे असल्यास डिस्टर्ब नको म्हणून), फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा नॉनसेन्स खपवून न घेणं आणि त्याचा हिरीरीनं सप्रमाण प्रतिवाद करणं, ट्रोलधाडींना तोडीस तोड प्रत्युत्तर देणं, आरोग्य कितीही बिघडलेलं असलं तरी सातत्यानं लिहीत राहणं, लोकांना चांगल्या कार्यास प्रेरित करीत राहणं अशा एक ना अनेक गोष्टी आठवताहेत. त्यांच्या जाण्यानं एका ज्येष्ठ सहृदयी सन्मित्राला मुकल्याची भावना मनात दाटून राहिली आहे.

नरके सर कुटुंबवत्सल होते. आमच्या समानधर्मींच्या संमेलनामध्ये ते आदरणीय संगीता वहिनींना आणि प्रमितीला आवर्जून घेऊन यायचे. या दोघींविषयीही अपार प्रेम व वात्सल्यानं त्यांचं हृदय ओथंबलेलं असायचं. प्रमिती अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःच्या बळावर यशाचा एकेक टप्पा सर करीत चालली आहे, त्याचं आणि त्याहूनही अधिक तिच्या प्रयोगशीलतेचं कोण अप्रूप त्यांना असायचं. प्रमितीही आमच्या घरात पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही तिघं राहतो, असं सांगत वडिलांच्या पुस्तकप्रेमाचं अभिमानानं कौतुक करायची. या तिघांचं एक वेगळं विश्व होतं. त्या विश्वाचा एक कोन सरांच्या रुपानं लोपला आहे, ही त्यांची फार मोठी हानी आहे. आमच्याच आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही. त्यांच्या तरी कशी निघावी? त्यांना सावरण्याचं बळ लाभो, एवढीच भावना या क्षणी मनात आहे.

मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करवून देणं, फुले-आंबेडकरी चळवळींचं लोकशाही प्रस्थापनेसाठीचं महत्त्व सातत्यानं अधोरेखित करीत राहणं, ओबीसी समाजामध्ये जनजागृतीसह प्रबोधनाचं कार्य गतिमान करणं आणि भारतीय समाजाची जडणघडण संविधानाला अभिप्रेत अशी समताधिष्ठित करणं, ही आद्यकर्तव्यं घेऊन नरके सर मिशनरी भावनेतून अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. त्यांची ही अंगिकृत कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहणं, हीच हरी नरके यांच्या कार्याप्रती खरी आदरांजली ठरेल.


(पुढारी ऑनलाईनवर प्रकाशित लेखाची लिंक अशी- आंबेडकरी चळवळीला पुढे नेणारे लेखक हरपले | पुढारी (pudhari.news))

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

बाबासाहेबांच्या समग्र चळवळींचे नेटके दस्तावेजीकरण

 (डॉ. भगवान माने यांच्या नूतन पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख दै. लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये आज, रविवार दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आला. हा लेख दै. लोकमतच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)




शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे माजी प्राध्यापक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे माजी संचालक डॉ. भगवान माने लिखित व संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचा अन्वयार्थ: साऊथबरो कमिशन ते धम्मचक्र प्रवर्तन हे एक महत्त्वाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात सन १९१९पासून ते १९५६ पर्यंत सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी केलेल्या चळवळींचे समग्र दस्तावेजीकरण करण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.

बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या सर्व चळवळींच्या मुळाशी सामाजिक-आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापनेचे तत्त्व होते. अगदी धम्मक्रांतीच्या मुळाशीही सामाजिक-राजकीय परिवर्तन साध्यतेचा हेतू होता. विषमता हाच स्थायीभाव असलेल्या भारतीय समाजाला लोकशाही मूल्यांचा परिचय करून देऊन मूल्याधारित समता व सामाजिक न्यायासाठी आग्रही चळवळींचे बीजारोपण खऱ्या अर्थाने या भूमीमध्ये बाबासाहेबांनी केले. साऊथबरो फ्रॅंचाईज कमिशनसमोरील साक्षीपासूनच बाबासाहेबांचा हा मूल्याग्रह प्रकर्षाने सामोरा येत राहतो. तो पुढे टप्प्याटप्प्ने अधिकाधिक टोकदार होत गेलेला आहे. सायमन कमिशनसमोरील साक्षीपासून पुढे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, महाडचा सत्याग्रह, अंबादेवी मंदिर सत्याग्रह, मनुस्मृती दहन, पर्वती मंदिर सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, तीनही गोलमेज परिषदांतील कामगिरी, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना आणि धम्मचक्र प्रवर्तन या चळवळींचा सर्वंकष आढावा घेऊन त्यांचा अन्वयार्थ समजावून देण्याचा प्रयत्न येथे दिसतो. त्याच बरोबर त्यांच्या प्रस्तुततेच्या अनुषंगानेही चर्चा केली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भांडवली विकासाचे आधुनिकीकरणाचे नेहरू प्रारूप आपण स्वीकारले. त्यामध्ये समाजवादाचा विचार अभिप्रेत होता. सन १९९२पासून नवीन आर्थिक धोरणाचे पर्व सुरू झाले. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणामुळे बेरोजगारी, खाजगी उद्योगधंदे, राखीव जागांच्या विरोधी धोरण, गरीब, वंचित वर्गाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. दलित पँथरने नुकतीच पन्नाशी पूर्ण केली, परंतु त्या अगोदरच धगधगत्या चळवळीचा ऱ्हास झाला. मार्क्सवादी आणि गांधीवादी चळवळी आंबेडकरी चळवळीत दुही निर्माण करतात आणि मूळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धांच्या विचारात संभ्रम निर्माण करतात. याचा बोध आंबेडकरी चळवळींच्या अन्वयार्थातून घेतला पाहिजे. नव्या संरचनेत बाबासाहेबांच्या विचारधारेवरील चळवळी गतिमान केल्या पाहिजेत आणि आंबेडकरी चळवळी गटाचे ऐक्य ही काळाची गरज आहे.असे नेमके विश्लेषण डॉ. माने यांनी केले आहे.

बाबासाहेबांनी केलेल्या चळवळी या विद्यार्थ्यांसह चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभ्यासपूरक आहेत. त्यासाठी त्यांचे संकलन केले आहे. वेगळे काही केलेले नाही, असे डॉ. माने प्रांजळपणे सांगतात. तथापि, बाबासाहेबांचे जीवनकार्य, त्यांच्या चळवळी यांचा कालसुसंगत अन्वयार्थ लावत असतानाच त्यांच्या प्रस्तुतता सातत्याने अधोरेखित करीत राहणे, ही आजघडीची महत्त्वाची गरज आहे. हे अधोरेखन सदर पुस्तक पुन्हा नव्याने करते, म्हणूनच त्याची नोंद आवश्यक ठरते.

 

पुस्तकाचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचा अन्वयार्थ: साऊथबरो कमिशन ते धम्मचक्र प्रवर्तन

लेखन व संपादन     : प्रा. डॉ. भगवान माने

प्रकाशन             : रुपी पब्लिकेशन्स प्रा.लि., गडहिंग्लज

पृष्ठसंख्या         : २२४

किंमत               : रु. २५०/-

रविवार, ११ जून, २०२३

... शहर में शायद दंगा होने वाला है।



(मुंबईस्थित 'दै. नवशक्ति'च्या रविवार, दि. ११ जून २०२३ रोजीच्या अंकात 'दखल' या सदरांतर्गत प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रसारित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)

भारतीय संविधान या देशातील नागरिकांना आम्ही म्हणायला शिकविते. आम्ही, भारताचे लोक या शब्दांनी संविधानाची सुरवात होते. त्यात एकत्व, एकराष्ट्रीयत्वाची ठाम भावना आहे. ती जातधर्मादी अशी कोणत्याही प्रकारच्या भेदांहून निरपेक्ष आहे. त्यामध्ये कोठेही आम्ही आणि तुम्ही किंवा आम्ही आणि ते अशा सापत्न, भेदसूचक भावनांना थारा नाही. असे असले तरी व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रवृत्ती आणि विकृती असतातच. अशाच काही विकृतींची कीड या सांविधानिक भावनेला जाणीवपूर्वक ग्रासू लागल्याच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार सामोऱ्या येत आहेत. काही प्रवृत्तींचे हेतूच जणू कट्टरतावाद आणि सामाजिक, जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या बळावर पोसलेले असते. त्यांना त्यांच्या स्वार्थापुढे सलोख्याशी काही देणेघेणे नसते. समाज सातत्याने अशांत, अस्वस्थ कसा राहील, या दिशेनेच अशा प्रवृत्तींचे समग्र प्रयत्न एकवटलेले असतात. त्या अर्थाने ते एक्स्ट्रीमिस्टच (अतिरेकी) म्हणायला हवेत. अतिरेकी म्हणजे काही कोणी तुमच्या छातीवर एक-४७ रोखूनच उभारायला हवा, असे नसते. इथे एक अप्रत्यक्ष स्युडो-नॅशनॅलिझमचे अस्त्र संपूर्ण सामाजिक शांतता, सौहार्द आणि सलोख्यावर डागण्यात आलेले असते, ज्याद्वारे जनमानस भयभीत होऊन त्यांच्या दुर्हेतूंची पूर्तता करण्याकडे समाजाचा कल झुकू लागतो. जोपर्यंत हा सामाजिक फुटीरतेचा हेतू साध्य होत नाही, तोवर असे प्रयत्न वारंवार केले जात राहतात; समाजातली, समाजमानसातली दरी वाढवत नेली जाते आणि ज्या क्षणी ते साधले जाते, तेव्हा समाज पूर्णतः दोन टोकांवर दुभंगावस्थेत लोंबकळू लागल्याचे आपल्याला दिसते.

आजकाल अशा फुटीरतावादी प्रवृत्ती अनेकविध बाबींचे मॅग्नीफिकेशन करून समाजमानस परस्परांप्रती कलुषित करण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहेत. भारत-पाकिस्तान करता करता आता हा अजेंडा लव्ह जिहादपर्यंत येऊन ठेपला आहे. द केरला स्टोरी याचे उत्तम उदाहरण ठरावे. केरळमध्ये असे अवघे तीन प्रकार नोंद झाले. मात्र, चित्रपटात त्या तीनाचे तीस हजार करून दाखविण्यात आले. चित्रपटाच्या निर्मात्याने हायकोर्टामध्ये मान्य केलेले हे तथ्य आहे. म्हणजे या मॅग्निफिकेशनचे प्रमाण एक-दोन नव्हे, तर तब्बल तीस हजार पट अधिक आहे. हेतूपुरस्सर, फूस लावून होणारी प्रकरणे होत नसतील, असे अजिबातच नाही. पण, त्यांचे जे प्रमाण इथे वर्धित करून सांगितले जाते, ते घातक आहे. प्रेमात पडण्याच्या वयात माणूस जात, धर्म वगैरे थोडेच पाहातो? एखादी व्यक्ती आवडते आणि तिच्या साथीत एखाद्याला राहावेसे वाटते. मात्र, यातील एक परधर्मीय असेल, तर ती व्यक्ती लव्ह जिहादी ठरते, मग त्याला लव्ह जिहाद माहिती असो अगर नसो!

पूर्वी सामाजिक अशांतता बिघडवायची म्हटलं की, हिंदू-मुस्लीमांत तेढ पसरवायची आहे की, सवर्ण-दलितांत दंगल माजवायची आहे, त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापैकी एकाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे प्रकार घडवून आणल्याची उदाहरणे आहेत. अगदी आजही कुठे-कुठे या घटना जाणीवपूर्वक घडविल्या जाताना दिसतात. मात्र, आज या दंगली पसरविण्याचे काम आणखीच सोपे बनले आहे. फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटसवर कोण, काय लिहीतो, कोणाचा फोटो पोस्ट करतो, यावरुनच आता दंगली घडवून आणल्या जात आहेत. मुळात ते स्टेटस ठेवणाऱ्याचे स्टेटस काय, ते पाहणारा समुदाय किती, ते स्टेटस या विरुद्ध गोटापर्यंत पोहोचते कसे, या गोष्टींचा विचार येथे होत नाही. मात्र, त्याचा आधार घेऊन कोट्यवधींचे नुकसान येथे केले जातेच, पण विशिष्ट समाजघटकांना लक्ष्य करून ज्या गोष्टी केल्या जातात, त्यातून समाजस्वास्थ्याचे मात्र दूरगामी नुकसान होते. एखादा कोणी तरी अविवेकी व्यक्ती काही तरी स्टेटस लावतो म्हणून संपूर्ण समाजच त्याला जबाबदार कसा असू शकतो? मात्र, ती जबाबदारी या ध्रुवीकरणोत्सुक प्रवृत्तीच निश्चित करीत असून त्यासाठी पाठीराख्यांची मोठी फौज घेऊन रस्त्यावर उतरून सामाजिक-धार्मिक असंतोष, विखारी विद्वेष निर्माण करीत आहेत.

मध्यंतरी कोल्हापूरमध्ये एका बिर्याणी सेंटरमध्ये बादशहा बहादूरशाह जफर यांचे पोस्टर लावले होते. केवळ बिर्याणीशी देणेघेणे न राखता काही युवकांनी औरंगजेबाच्या वंशजाचे पोस्टर लावले म्हणून त्या सेंटरची मोठी तोडफोड केली. आता बहादूरशहा जफर यांचे १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात किती महत्त्वाचे योगदान होते, हे त्यांना कोणी सांगावे? बहादूरशहा आणि त्याच्या अपत्यांना याची किती मोठी किंमत चुकवावी लागली, हे तरी कोण लक्षात घेणार? बहादूरशहाला इंग्रजांनी रंगूनला नजरकैदेत ठेवले, तेथेच त्याचा मृत्यू झाला. शाही खानदानातल्या २९ युवकांची हत्या करण्यात आली. पळून जाण्यात यशस्वी झालेल्या त्याच्या दोन शहजाद्यांना उदयपूर आणि टोंक इथं भिकाऱ्याचं जीणं वाट्याला येऊन त्याच अवस्थेत मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं. हा बहादूरशहाचा भारतीय स्वातंत्र्यासाठीचा त्याग नव्हे काय? मात्र, तो औरंगजेबाच्या घराण्यातील औलाद म्हणून केवळ इथे तिरस्कारास पात्र ठरतो. मग, अकबराचं काय करणार आहोत आपण? दीन-ए-इलाहीसारखा सर्वधर्मसमभावाधिष्ठित धर्म जगाला सांगणारा हा बादशहा लवकरच औरंगजेबासारख्याचा बापजादा म्हणून या देशात आपण तिरस्करणीय ठरविणार काय?

कोलाहल, गोंगाट इतका वाढवित न्यायचा की कोणालाही काहीही समजेनासे झाले पाहिजे. गोंधळ निर्माण झाला पाहिजे. जनमानस संभ्रमित झाले पाहिजे. अशा संभ्रमितांचा गदारोळ निर्माण करून आपले हेतू त्या लाटेवर साध्य करून घ्यायचे, असा हा सारा माहौल आपल्या सभोवताली वावटळीसम गरगरविला जातो आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामित्वाला हरताळ फासण्याच्या प्रक्रियेची सुरवात शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे आणि ही आग शांत न होता, धुमसत, धुमसत तिचे राष्ट्रव्यापी असंतोषात रुपांतर करण्यासाठी या ध्रुवीकरणवादी प्रवृत्तींची जी धडपड सुरू आहे, ती योग्य नाही. एखाद्या समाजाला दैनंदिन पातळीवर त्याची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागणे, त्याला अतिरेकी, लव्ह जिहादी, देशद्रोही ठरविणे यातून एखाद्या क्षणी त्या समाजामध्ये तसेच वर्तन करून दाखविण्याची ऊर्मी उसळी मारुन वर आली, तर तो क्षण या फुटीरतावादी प्रवृत्तींच्या विजयाचा असेल. त्यामुळे भारताची सामाजिक-धार्मिक सौहार्दाची घडी विस्कटवण्याच्या प्रयत्नांना भीक न घालता एकी कायम ठेवण्याचा संदेश देशभरात पाठवणे, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत राहणे, हीच आजघडीची मोठी गरज आहे. शायर परविंदर शोख़ यांनी आपल्याला इशारा देऊन ठेवलाच आहे की-

नाम पे मज़हब के जमघट है लोगों का,

शहर में शायद दंगा होने वाला है