शनिवार, १५ जानेवारी, २०२२

पँथर बुढा हो जाए, तो क्या? रहेगा तो 'पँथर'ही।

 



पँथर नामदेव ढसाळ यांच्या क्रांतीकारी गोलपीठ्याच्या वाचनानं सुन्न झालेलो होतो... साऱ्या प्रचलित नियम-निकषांना फाट्यावर मारुन गोलपीठा स्वतःची अर्थात, अतिशोषित, वंचितांची भाषा घेऊन प्रस्थापित, प्रतिगामी आणि अभिजन वर्गावर फिदीफिदी हसत प्रविष्ट झाली होती. मेंदूला झिणझिण्या आणल्या तिनं. पण, तिला नाकारण्याचं धाडस या दांभिक समाजात होतंच कुठं? नामदेव ढसाळ या पँथर कवीचं हेच सर्वात मोठं यश होतं. पुढं तुही यत्ता कंची, गांडु बगिचा यांनीही आणखी आक्रमकतेनं ही भाषा आणि त्या भाषेचे प्रवाहक यांना मेनस्ट्रीमच्या बरोबरीनं मध्यवर्ती स्थान प्रदान केलं. ही प्रचंड मोठी कामगिरी ढसाळांच्या नावावर जमा आहे. ती कोणालाही नाकारता येणार नाही. ढसाळ हे दलित पँथरचे जसे महत्त्वाचे आधारस्तंभ होते, तसंच दलित साहित्याला अस्तित्वभान आणि स्थान प्रदान करून देणारे अग्रणी कवी-साहित्यिकही होते. त्यांच्या परिवर्तनवादी साहित्यानं समाजमानसाला सातत्यानं जाणीवांचं आव्हान दिलं, आवाहन केलं. आंबेडकरी, मानवतावादी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रही मांडणी केली. पहिल्या वाचनाइतक्यात झिणझिण्या आजही देत राहण्याची ताकद त्यांच्या या साहित्यात आहे.

ढसाळांचा उगवतीचा आणि तळपता काळ आम्ही पाहू शकलो नाही. त्याविषयी केवळ वाचू आणि ऐकू शकलो. अंतिम पर्वात तर त्यांनी सारं काही समष्टीसाठीचाच ध्यास घेतलेला होता. त्यांच्या या काळात मात्र काही गाठीभेठी झाल्या. कधी कधी कामानिमित्ताने ते मंत्रालयात यायचे- व्हीलचेअरवर. पँथरची ही दशा पाहवत नव्हती, मात्र बोलताना, विशेषतः चळवळीच्या दिवसांच्या आठवणी जागविताना त्यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक यायची. ती चमक आजही लख्ख आठवते. मनात म्हणायचो, पँथर म्हातारा झाला म्हणून काय झालं; तो पँथरच राहणार... ते पँथरपण जागविण्याची नितांत आवश्यकता आज ढसाळांच्या स्मृतिदिनी जाणवते आहे...

या महान पँथरला विनम्र अभिवादन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा