बुधवार, ५ जानेवारी, २०२२

पत्रकारितेच्या पलिकडले बाळशास्त्री जांभेकर

 

बाळशास्त्री जांभेकर



मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी द मुंबई दर्पण’ (इंग्रजी नाव) किंवा दर्पण’ (मराठी नाव) या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. या गोष्टीला ६ जानेवारी २०२२ रोजी९० वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस दर्पण दिन म्हणून तसेच महाराष्ट्रात या दिवसाची आठवण म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो.

आज बाळशास्त्रींचे स्मरण करीत असताना केवळ त्यांनी पहिले मराठी पाक्षिक वृत्तपत्र काढले इतकेच सांगितले जाते. पण, त्यापलिकडेही बाळशास्त्रींचे जे कर्तृत्व आहे, त्याची मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. किंबहुना, त्याची माहितीही फारशी असत नाही. आजच्या माध्यमकर्मींवरील जबाबदारीची जाणीव करून देत असताना बाळशास्त्रींनी केवळ एक पत्रकार म्हणूनच नव्हे, तर एक व्यासंगी, सव्यसाची विचारवंत, अभ्यासक, गणितज्ज्ञ म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या चौफेर वावरातूनच पत्रकार-संपादक म्हणून त्यांचे एक सर्वंकष व्यक्तीमत्त्व निर्माण झाले. या त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा परिचय करून घेणे आजघडीला अत्यंत गरजेचे बनले आहे.

बाळशास्त्रींच्या बाबतीत एक गल्लत सर्वसाधारणपणे सातत्याने केली जाते, ती म्हणजे दर्पण दिन हाच त्यांचा जन्मदिवस मानला जातो. किंबहुना, बाळशास्त्रींचा हा जन्मदिवस असल्यानेच त्या दिवशी पत्रकार दिन साजरा केला जातो, असा एक सार्वत्रिक अपसमज समाजात आहे. प्रत्यक्षात ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले, म्हणूनच दर्पण दिन साजरा केला जातो. मग, बाळशास्त्रींचा जन्मदिन काय? असा प्रश्न वाचकांना पडू शकतो.

बाळशास्त्रींचे चरित्रलेखक श्री. यशवंत पाध्ये यांनी महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर या चरित्रग्रंथात त्याविषयी तपशीलात लिहीले आहे. पाध्ये म्हणतात, बाळशास्त्री जांभेकर यांनी इतके लेखन केले; परंतु स्वतःच्या जन्मतिथीबद्दल कोठेही लिहीलेले आढळत नाही. त्यामुळे बाळशास्त्रींचे जन्मस्थान व जन्मतिथी याची नेमकीमाहिती आजही उपलब्ध नाही. इतकेच नव्हे, तर जन्मकालाबाबत अनेक अनुमाने काढली जात आहेत. त्यावरुन अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे बाळशास्त्री यांचा जन्म १८१२च्या उत्तरार्धात झाला असला पाहिजे, तर १७ मे १८४६ रोजी बाळशास्त्रींचे निधन झाल्यावर बॉम्बे टाईम्सने त्यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांचा जन्म १८१० मध्ये झाला असल्याचे म्हटले आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांना २० फेब्रुवारी १८३० रोजी केलेल्या अर्जात बाळशास्त्रींनी आपल्या वयाला सतरा वर्षे पूर्ण झाल्याचे नमूद केले आहे. त्यावरुन त्यांचा जन्म १८१२मध्ये झाला असणार, असे मानण्यास भरपूर जागा आहे. बाळशास्त्रींच्या जन्माविषयी उपलब्ध माहितीची छाननी केली असता त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १८१२ या दिवशी झाला असावा, असे गृहित धरले जाते. त्यांच्या जन्माप्रमाणेच बाळशास्त्री यांचे मूळ नाव नेमके कोणते असावे, हेदेखील समजत नाही. बाळकृष्ण या नावावरुन त्यांना बाळशास्त्री हे नाव पडले असावे, असाही एक तर्क आहे. किंवा सर्वात लहान असल्याने बाळ हे नाव रूढ झाले आणि परंपरेने शास्त्रीपण आल्याने बाळशास्त्री हे नाव रूढ झाले असावे.[1] असे म्हटले आहे.

बाळशास्त्रींनी वृत्तपत्र सुरू केले, त्यामागे त्यांची विशिष्ट अशी विचारधारा होती. केवळ काहीतरी करावे म्हणून त्यांनी निश्चितच हा खटाटोप मांडलेला नव्हता. मोठ्या व्यासंगाची, तपश्चर्येची त्याला पार्श्वभूमी होती. तुम्ही म्हणाल, एकोणीसाव्या वर्षी कसला आलाय व्यासंग? हो, आजच्या परिस्थितीत आपला प्रश्न कदाचित लागू ठरेल, मात्र बाळशास्त्रींच्या बाबतीत आपला प्रश्न पूर्णतः गैरलागू आहे. याचे कारण म्हणजे आई सगुणाबाई आणि वैदिकशास्त्र पारंगत वडील गंगाधरशास्त्री यांच्या सान्निध्यात त्यांचे सुरवातीचे शिक्षण झाले. प्राचीन वाङ्मयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाल्याने तेराव्या वर्षी त्यांनी संस्कृत व मराठी भाषांवर प्रभुत्व मिळविले. मोडी लेखन-वाचन, व्यावहारिक अंकगणित, तोंडी हिशोब, रामदास-तुकारामांची चरित्रे, वामन-मोरोपंतांच्या कविता, रामायण-महाभारतातील पौराणिक कथा, मराठ्यांच्या इतिहासाच्या उपलब्ध असणाऱ्या बखरी आदींत तर ते आठव्या वर्षीच पारंगत झाले. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर वेदपठण, प्रसिद्ध संस्कृत स्तोत्रपाठ, गीतापाठ याचबरोबर अमरकोष, लघु कौमुदी, पंच महाकाव्ये, इत्यादी संस्कृत अध्ययन बाराव्या-तेराव्या वर्षीच मुखोद्गत झाले होते. बालपणापासून अत्यंत हुशार व जात्याच बुद्धिमान. त्यात वंशपरंपरेने पुराणिकत्व आल्याने सर्वजण त्यांना कौतुकाने बाल-बृहस्पती असेही म्हणत असत.[2] पुढे इंग्रजीच्या अध्ययनासाठी त्यांनी मुंबईच्या दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, बुक अँड स्कूल सोसायटीमध्ये प्रवेश घेतला. त्यातही त्यांनी नैपुण्य मिळविले. अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीपदासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांना संस्कृत, इंग्रजी, मराठी, उच्च गणित, भूगोल, गुजराथी, बंगाली, फारसी या विषयांत गती असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यावेळी त्यांना डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती मिळाली, पुढे त्यांना सेक्रेटरीपदी बढतीही मिळाली.

बाळशास्त्रींची विद्वत्ता पाहून ब्रिटीशांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांची इंग्रजीच्या प्राध्यापक पदी नियुक्ती केली. सतरा इंग्रज प्राध्यापकांमधले एकमेव भारतीय आणि मराठी प्राध्यापक बाळशास्त्री होते. ज्येष्ठ नेते दादाभाई नौरोजी आणि गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे बाळशास्त्रींचे विद्यार्थी. पुढे सरकारने त्यांची दक्षिण विभागातील मराठी व कन्नड शाळा तपासणीसाठी मुख्य शाळा तपासनीस म्हणूनही नियुक्त केले. त्या अर्थाने ते पहिले मराठी शिक्षण अधिकारी ठरले. बोर्ड ऑफ एज्युकेशनस्थापन करून त्याद्वारे चांगले प्रशिक्षित अध्यापक तयार करावेत, ही बाळशास्त्रींनी मांडलेली कल्पना होती. पुढे त्यातूनच १८४५मध्ये अध्यापक वर्ग अर्थात डी.एड. व बी.एड. महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्याचे पहिले संचालक म्हणूनही बाळशास्त्रींनी काम पाहिले. गावाकडून मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहही सुरू केले.

बाळशास्त्रींनी दर्पणच्या रुपाने मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. सुरवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे त्यामागे त्यांची निश्चित अशी भूमिका होती. आपल्या ६ जानेवारीच्या पहिल्याच अग्रलेखात ती त्यांनी सविस्तर स्पष्टही केली. त्यात ते म्हणतात, ...जा (ज्या) देशातून आपले सांप्रतचे शतकर्ते एथे आले, त्या देशात ते एथे आल्याचे पूर्वी फार दिवसांपासून या आश्चर्यकारक छापयंत्राची कृत्ये चालू होती, त्यापासून मनुष्याचे मनातील अज्ञानरुप अंधःकार जावून त्यावर ज्ञानरुप प्रकाश पडला. या सज्ञान दशेस येण्याचे साधनांमध्ये इतर सर्व देशांपेक्षा युरोप देश वरचढ आहे. नियतकालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात, ते आम्हास सांप्रतचे राजांचे द्वारे माहित झाले. जा जा देशांमध्ये अशे लेखांचा प्रचार झाला आहे, तेथे तेथे लोकांचे आंतर व्यवहारामध्ये तसेच बाह्य व्यवहारामध्ये शाश्वत हित झाले आहे. यापासून बहुतवेळ विद्यांची वृद्धी झाली झाली आहे, लोकांमध्ये निती रुपास आली आहे, केव्हा केव्हा प्रजेने राजांचे आज्ञेत वर्तावे आणि राजांनीही त्यावर जुलूम करू नये, अशा गोष्टी यापासून घडल्या आहेत. अलिकडे कित्येक देशांत धर्मरिती यात जे चांगले आणि उपयोगी फेरफार झाले आहेत, त्यासही थोडेबहुत हे लेख उपयोगी पडले आहेत. वर्तमानपत्राचे सर्वसामान्य लोकांना होणारे लाभ सांगताना बाळशास्त्री पुढे म्हणतात, त्यापासून अतिशय दूरच्या देशांतील वर्तमाने कळतात. बुद्धिमानांची बुद्धिमत्ता त्यांचे द्वारे सर्व लोकांत प्रसिद्ध होते, उपयोगी बातमी समजण्यात येत्ये आणि श्रमसाध्य विद्यादिकांचे विचारांकडे जे चित्त देत नाही, त्यांचे मनोरंजनही होते. हे सांगताना अंतिमतः आपल्या दर्पणचे उद्दिष्ट सांगताना बाळशास्त्री म्हणतात, आतां विद्याव्यवहाराचे द्वार असे एक वर्तमानपत्र पाहिजे की, जांत (ज्यात) मुख्यत्वे करून एतद्देशीय लोकांचा स्वार्थ (हित) होईल. जापासून त्यांचा (त्यांच्या) इच्छा आणि मनोगते कळतील, जवळचे प्रदेशातील आणि परकीय मुलुखात जी वर्तमाने होतात ती समजतील आणि जे विचार विद्यांपासून उत्पन्न होतात आणि जे लोकांचे नीति, बुद्धी आणि राज्यरीती यांचे सुरूपतेस कारण होत, ते विचार करण्यास उद्योगी आणि जिज्ञासू मनांस जापासून मदत होईल. आम्ही आशा करीत आहो की, या गोष्टी काही थोड्याबहुत दर्पनापासून घडतील. हे सर्व वर सांगितलेले आमचाच (आमच्याच) उद्योगापासून घडेल, असा आम्हास अभिमान नाही, परंतु भरवसा आहे की, आमचे इष्ट इंग्रेज लोक व सूज्ञ स्वदेशीय लोक या उद्योगास सहाय होऊन तो सफल होईल.[3]

त्यावेळी ब्रिटीशांकडून वृत्तपत्रांवर कडक निर्बंध असले तरी बाळशास्त्री दर्पणमधून त्यांच्या धोरणांवर सभ्य व प्रतिष्ठित भाषेत टीका करीत असत. विविध सामाजिक विषयांवर अत्यंत विचार प्रवर्तक व द्रष्टे संपादकीय विचार ते मांडत. अंध गुरूभक्ती, कर्मकांडे, उच्चनीचता, जातिभेद, धर्मातिरेक, स्त्रियांवरील अत्याचार व बंधने, विधवा विवाह, केशवपन अशा अनेक विषयांवर त्यांनी सडेतोड विचार मांडले. २६ जून १८४० रोजी द लास्ट फेअरवेलया अग्रलेखानिशी त्यांनी दर्पणचा अखेरचा अंक प्रकाशित केला. पण, इथे त्यांची पत्रकारिता मात्र थांबली नाही. मराठीतले पहिले मासिक दिग्दर्शन’ (दि. १ मे १८४०) याचे ते संस्थापक संपादक होते. त्या माध्यमातून त्यांनी आपली पत्रकारिता व लेखन पुढे सुरू ठेवले.

पत्रकारितेतील या आद्य योगदानापलिकडे आधुनिक महाराष्ट्राला बाळशास्त्रींनी मोठे सामाजिक-शैक्षणिक योगदान दिले आहे. बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी या मुंबईतल्या पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक (१८४५), नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटी या लोकसुधारणा व्यासपीठाचे संस्थापक संचाल, पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या बाळशास्त्रींनी यशस्वीपणे सांभाळल्या. त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्राविण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाने त्यांचा गौरव केला.

ज्योतिष व गणित विषयातही त्यांचा मोठा अधिकार होता. ‘Differential Calculus’ या विषयावर शून्यलब्धिहे पहिले मराठी पुस्तक बाळशास्त्रींनी लिहीले. त्याशिवाय त्यांनी नीतिकथा, सारसंग्रह, इंग्लंड देशाची बखर भाग १ आणि २, भूगोल विद्या गणित, बालव्याकरण, भूलोकविद्येची मूलतत्त्वे (ही दोन्ही पुस्तके त्यांच्या पश्चात सुमारे पंचवीस वर्षे प्राथमिक शाळेतून पाठ्यपुस्तक म्हणून चालू होती), हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजांच्या राज्याचा इतिहास, ज्ञानेश्वरी या मौलिक श्रेष्ठ भक्तिग्रंथाचे त्यांनी मराठीत प्रथम (१८४६) शिळा प्रेसवर प्रकाशन केले. अशा अफाट कर्तृत्वाच्या बाळशास्त्रींचे १७ मे १८४६ रोजी वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी विषमज्वराने निधन झाले.

अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात एखादा मनुष्य किती उत्तुंग कामगिरी बजावू शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बाळशास्त्री होते. बाळशास्त्रींचे केवळ मराठी वृत्तपत्रसृष्टीलाच नव्हे, तर एकूणच भारतीय साहित्य, गणित, शिक्षण आदी क्षेत्रांना जे मौलिक योगदान लाभले, ते अतुलनीय आहे.

बाळशास्त्रींनी एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या व्यासंगाची चुणूक दाखवून परकीयांवरही आपल्या व्यक्तीत्वाची आणि कर्तृत्वाची जी छाप पाडली, त्याच्या किती टक्के व्यासंग आज आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीच्या, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रस्थापित करतो आहोत, हा चिंतनाचा विषय आहे. व्यासंगाच्या जोडीनेच ज्या सामाजिक जबाबदारीचे दिग्दर्शन बाळशास्त्रींनी त्यांच्या कार्यातून केले, ते सामाजिक भान पत्रकारांनी जपले पाहिजेच, पण मानवी मूल्यांचा जनतेमध्ये आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रसार करता येईल, याचा विचार करून बाळशास्त्रींचा वारसा सांगत असताना आजच्या पत्रकारांनी पत्रकारितेची मूलतत्त्वे, तिची सामाजिक बांधिलकी आणि सांविधानिक मूल्ये प्रकर्षाने जपण्यासाठी प्रतिबद्ध होण्याची गरज आहे.

 

(या लेखामधील माहितीसाठी महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर या यशवंत पाध्ये यांच्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून आधार घेतला आहे.)



[1] पाध्ये, यशवंत: महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, राजे पब्लिकेशन्स, पृ. १६-१७

[2] कित्ता, पृ. १७

[3] कित्ता, पृ. १२ व १४

1 टिप्पणी: