मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

विवेकानंदांच्या सान्निध्यात...

 

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर भाषण ठोकताना लहानपणचे अस्मादिक (छायाचित्र सौजन्य: प्रा. डॉ. ए.जी. जोशी काका, कागल)

(दि. १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आपण तो राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा करतो. या निमित्ताने काही अनुभवांचा आठव...- डॉ. आलोक जत्राटकर)

सातवीत होतो. रामकृष्ण मिशनने स्वामी विवेकानंदांचे विचार या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याचे परिपत्रक शाळेत (श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल) आलेले. विचार या शब्दाभोवती केंद्रित झालेले माझ्या आयुष्यातील हे पहिलेच भाषण होते. तोपर्यंत चांगल्या सवयी, माझी शाळा, भारताचा स्वातंत्र्यदिन आणि प्रासंगिक जयंत्या-पुण्यतिथ्या यांच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी राष्ट्रपुरूषांविषयीची भाषणे करत होतो. त्यांचे स्वरुप विशेषतः गोष्टीवेल्हाळ असे. मात्र, माझ्या आयुष्यातले पहिले सिरियस भाषण कुठले असेल तर ते विवेकानंदांच्या विचारावरील होय. 

अमर चित्रकथेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांसह त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस, शिष्या भगिनी निवेदिता यांना भेटलेलो होतो. पण, त्या गोष्टींच्या पलिकडलं असं काही पहिल्यांदाच मी बोललो. खरं तर आईच मला भाषणं लिहून द्यायची. मी पोपटासारखा पाठ करायचो. गोष्टीरुप असल्यानं मुखोद्गतही लगेच व्हायचं. हातवाऱ्यांसह घडाघडा बोललो की बक्षीस खिशात, असं तोपर्यंतचं गणित असे. मात्र, या भाषणानं घाम फोडला. यातली भाषा, निवेदन वेगळं होतं. चित्ररुपात नि गोष्टीरुपात वाचलेले विवेकानंद वेगळे होते. मात्र, त्या विवेकानंदांची थोरवी काय आहे आणि कशामुळे आहे, हे त्या विचारांतून उलगडत होतं. आईनं सोप्या भाषेत ते दिले होते. मला मात्र ते अवघड जात होतं. 

मग, भाषण बाजूला ठेवून म्हटलं, मूळ पुस्तकाला भिडल्याशिवाय हे काही खरं नाही. शाळेच्या लायब्ररीतून स्वामी विवेकानंद म्हणतात... हे पुस्तक घेतलं आणि त्याची दोन तीन पारायणं केली तेव्हा कुठं भाषणात आपल्याला काय आणि कसं सांगायला पाहिजे, ते उमगलं. इतक्या लहान वयात खरं तर ते धाडसच होतं, पण ते केलं. बक्षीसही मिळवलं. पुरस्कार वितरण समारंभात रामकृष्ण मिशनच्या दोन स्वामीजींसमोर धाडसानं पुन्हा एकदा ते सादर केलं. (लहान मुलांखेरीज अखिल पब्लिकसमोर केलेलंही हे माझं पहिलंच भाषण होतं. त्यावेळी दरदरून फुटलेला घाम आत्ताही जणू मानेवरुन पाठीवर ओघळतोय, अस्सा आठवतोय.) 

विवेकानंदांशी तो जुळलेला विचारांचा धागा पुढं त्यांच्या वाचनातून अधिकच बळकट होत गेला. देवचंद कॉलेजच्या भालेराव सरांकडून विवेकानंद ग्रंथावलीचे दहाही खंड घरी दाखल झाले, तेव्हा अधाशासारखे वाचून काढलेले. काही झेपलं, काही डोक्यावरुन गेलं. काही पटलं, काही पटलंही नाही. विशेषतः विवेकानंदांनी बुद्धाच्या संदर्भानं केलेलं विवेचन त्या काळात मी खूप आवडीनं वाचलं. ते वाचल्यानंतर असं लक्षात येत गेलं की, भलेही विवेकानंद वेदांताची आग्रही मांडणी करीत असतील, पण बुद्धाच्या प्रचंड प्रेमात असणारा हा माणूस होता. त्या अनुषंगानं त्यांचं फिरणं, वाचणं, बोलणं आणि लिहीणं सुरू होतं. बुद्धाचं ते हिंदुइझमच्या अंगानं एक्स्प्लोरेशन करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना अधिक जिवितकाळ मिळाला असता, तर त्याची प्रचितीही त्यांनी त्यांच्या हयातीतच आणून दिली असती. मात्र, प्राप्त आयुष्यातही बुद्धाशी नातं जोडत राहण्याचा त्यांची आस अलौकिकच म्हणायला हवी. “I have a message to the West, as Buddha had message to the East” असं म्हणून ते पाश्चात्य जगताला बुद्धाचा संदेश देऊ पाहात होते. भगवान बुद्ध हा जगातला असा पहिला मिशनरी होता, ज्यानं अर्धं जग आपल्या वैचारिक ताकदीनं प्रेरित केलं अन् रक्ताचा एक थेंबही न सांडता मतपरिवर्तन केलं. ही त्यांची बुद्धाकडं पाहण्याची भावना होती. 

अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो... या संबोधनात भगवान बुद्धाच्या बंधुत्वभावनेचाच तर अंतर्भाव होता. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत।।अर्थात- उठा, जागे व्हा, उद्दिष्टप्राप्तीखेरीज थांबू नका. हा संदेश भारतातल्या तरुणांना देत असताना बुद्धाच्या अत्त दीप भवःचाच तो पुनरुच्चार नव्हता काय? आध्यात्माने गरीबाचे पोट भरत नाही, त्यासाठी त्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता, समान संधींची प्राप्ती व्हायला हवी, यासाठी प्रयत्न करण्यातच ईश्वरप्राप्ती आहे, असा उपदेश ते करीत. याचाच अर्थ त्या गोरगरीबांच्या सेवेमध्ये ईश्वरप्राप्तीचा आनंद आहे, हेच ते सांगत नव्हते काय? कन्याकुमारीच्या त्या खडकावर, तीन सागरांच्या संगमस्थळावर याच गोष्टीचे तर त्यांनी चिंतन केले. आपले सर्वस्व या गोरगरीबांच्या उत्थानासाठीच वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो तिथंच. हेही बुद्धासारखंच. त्यांचा विज्ञानवाद, त्यांची समाजाप्रतीची कळकळ, समतावादी दृष्टीकोन, विषमतेची चीड हे सारंच आपल्याला बुद्धाची आठवण करून देणारं

अंतिमतः बुद्ध म्हणजे तरी काय, करुणेचा महासागर! या विश्वातल्या प्रत्येक घटकाबद्दल अपार करुणा बाळगणारा, त्यांच्या हिताची चिंता वाहणारा, त्यांना दुःखमुक्तीचा, सर्वोच्च सुखप्राप्तीचा मार्ग दाखविणारा बुद्ध हा प्रत्येकात असतो. मात्र, त्याला पाहण्यासाठी भौतिकाची, विकारवशतेची पुटं ओरबाडून काढावी लागतात. मोहमायादी षडरिपुंशी झगडावं लागतं, प्रज्ञाशीलतेनं त्यांच्यावर मात करावी लागते, तेव्हा कुठं बुद्धत्वाचा अंकुर फुटण्याची आशा निर्माण होते. विवेकानंद हे त्या बुद्धत्वाच्या दिशेनं गतीनं झेपावणारं झाड होतं. वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी ते भौतिकातून मुक्त झालं. पण, तोवर त्या झाडानं अखिल विश्वाला परिवर्तनाची प्रेरणा प्रदान केलेली होती. त्या प्रेरणेला वळण कोणतं द्यायचं, दिशा कोणती द्यायची, हे त्याच्या हाती नव्हतं. आपण मात्र त्या प्रेरणा लक्षात घेऊन त्या उद्दिष्टप्राप्तीच्या दिशेनं चालायला सुरवात करायला हवी. हेच तर त्यांच्या अखिल जिवितकार्याचं सांगणं!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा