रविवार, २ जानेवारी, २०२२

अलविदा ब्लॅकबेरी...

 



फार काळापूर्वी नव्हे, तर अवघ्या दशकभरापूर्वी ज्या मोबाईल फोननं अवघ्या जगाला स्मार्ट टेलिफोनी म्हणजे काय, हे शब्दशः दाखवून दिलं, मोबाईल टेलिफोनीच्या स्मार्टनेस दर्शविण्याच्या क्षमतेची प्रचिती दिली, तो ब्लॅकबेरी आता येत्या ४ जानेवारी २०२२ पासून अस्तंगत होतो आहे. 

आजचं जग गतिमान खरंच, पण ही गती इतकी आहे की, भल्याभल्यांना त्या गतीशी जुळवून घेणं जमलं नाही की त्यांची स्पर्धेतून गच्छंती अटळच! मोबाईल कंपन्यांच्या आगमनाबरोबर मोटोरोलाच्या पाठोपाठ येऊन कानामागून येऊन तिखट झालेल्या नोकियानं या कनेक्टिंग पीपलमध्ये आपला प्रचंड मोठा वाटा उचलला. मोबाईल हँडसेट व तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊन मोबाईल टेलिफोनीचं सार्वत्रिकीकरण करण्यात नोकियाचं योगदान मान्य करावंच लागेल. पण, लोकांचा कंपनीवर विश्वास आहे, जगभरात आपले सर्वाधिक ग्राहक आहेत आणि ते आपल्यासोबतच राहतील, असा अति-आत्मविश्वास कंपनीच्या मुळावर आला आणि सॅमसंगनं अँड्राईडच्या जोरावर त्यांचं एक नंबरचं स्थान कधी टेकओव्हर केलं, ते त्यांनाही कळलं नाही. ड्युअल सीम, अँड्राईड ओएस आणि अल्प किंमत या त्रिसूत्रीच्या बळावर सॅमसंगनं दमदार वाटचाल केली. नोकियाला हे लक्षात येऊन त्यांनी सिम्बियनच्या बळावर पुन्हा बाजारात स्थान मिळविण्याचा प्रयत्न चालविला, पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता.

इथं आपण बोलतो आहोत ते ब्लॅकबेरीविषयी! सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणं जेव्हा सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म ऑर्कुटपुरते मर्यादित होते. व्हॉट्सअपचा जन्मही जेव्हा झाला नव्हता, त्या काळात ब्लॅकबेरी मॅसेंजरनं स्मार्टफोनच्या खऱ्या ताकदीची प्रचिती जगाला दिली होती. आणि किंबहुना, म्हणूनच अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय झालेल्या या फोननं जगभरातील चोखंदळ ग्राहकांच्या मनावरही मोहिनी घातली. 

केवळ या तंत्रज्ञानासाठी म्हणून तेव्हा मी सुद्धा हा फोन घेतलेला. टू-जी किंवा त्याच्याही आधीच्या इंटरनेट गतीच्या आधारे तातडीने माहिती व छायाचित्रे पाठविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठविला होता. दुबई येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाची छायाचित्रे बीबीएमवरुनच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री पावणेबाराच्या सुमारास मिळवून स्थानिक दैनिकांना पुरविण्यात यश आले होते. दुसऱ्या दिवशी ती सर्व महत्त्वाच्या, आघाडीच्या दैनिकांत पहिल्या पानावर ठळकपणाने प्रसिद्धही झाली होती. हा शासकीय कारकीर्दीतला ब्लॅकबेरीशी निगडित एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून सांगता येईल. 

जेव्हा एंड टू एंड ट्रान्सक्रिप्शन वगैरेची एवढी जाणीवजागृती नव्हती, त्या काळातही आमच्या सर्व्हरवरील तुमचा डाटा सुरक्षित आहे, असं ब्लॅकबेरीनं जाहीर केल्यानं तर ग्राहकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली. कित्येक अमेरिकन कादंबऱ्यांतील नायक-नायिकांच्या हाती लेखकांनी अत्यंत आपलेपणानं ब्लॅकबेरी सोपविलेला होता. बॉलिवूडचे हिरो-हिरॉईन आपल्या हातात आज जसा अॅपल मिरवितात, तसं ब्लॅकबेरी मिरविण्यात (पाहा- सलमानचा बॉडीगार्ड) धन्यता मानायचे. पण, अखेरीस जी चूक नोकियानं केली, तीच ब्लॅकबेरीनंही केली. ग्राहकांना गृहित धरून तंत्रज्ञानात्मक बदलांना विलंब केला आणि तोपर्यंत सॅमसंगसह अॅपल, एचटीसी, एलजी, सोनी आदी कंपन्यांनी अँड्राईडच्या साथीनं मार्केटमध्ये आपापली पॉकेट्स निर्माण केली. पुढं विविध चायनीज कंपन्यांनीही किफायतशीर किंमतीत स्मार्ट तंत्रज्ञान ग्राहकांना सादर करून आपलंही अस्तित्व मोठ्या प्रमाणावर निर्माण केलं. 

ब्लॅकबेरीनं आपली रिजिडिटी थोडी कमी करून इतर अँड्राईड अॅप्सना आपल्या ओएसवर स्थान देणं, नवतंत्रज्ञानाधारित फोन्सची नवी श्रेणी सादर करणं, अशा काही गोष्टी केल्या, पण खूप उशीर झाल्याचं त्यांच्याही लक्षात आलंय आणि ते आता या क्षेत्राला रामराम ठोकताहेत. कंपनी आता यापुढील काळात माहिती तंत्रज्ञानाशी निगडित सायबर सिक्युरिटी, क्रिटीकल इव्हेंट मॅनेजमेंट (सायबर अॅटॅक्स, आयटी आऊटेजेस, डिसरप्शन, सेफ्टी इ.) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या क्षेत्रांमध्ये कार्यरत राहणार आहे. पण, स्मार्ट टेलिफोनीचा इतिहास ब्लॅकबेरीच्या योगदानोल्लेखाशिवाय अपूर्ण असणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा