सोमवार, ३ जानेवारी, २०२२

माध्यमांचे डिजीटलायझेशन आणि भवितव्य




 ('दै. पुढारी'च्या वर्धापन दिनानिमित्ताने बेळगाव आवृत्तीकडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'डिजीटल लाइफ स्टाईल' या विशेष पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी दै. पुढारीच्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

संवाद ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि त्या गरजेपोटीच आदिम काळातील चित्रलिपीपासून ते आजपर्यंतच्या अनेक भाषा, लिप्यांची निर्मिती झाली. छपाईच्या शोधानं मानवाच्या या संवाद प्रक्रियेला खरी गती आली. जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावलेल्या छपाई तंत्राच्या शोधामुळं जगाच्या संवाद प्रक्रियेला गतिमानता प्रदान केली. औद्योगिक क्रांतीनंतर नवतंत्रज्ञान आणि नवनवीन शोधांना मोठ्या प्रमाणात मिळालेल्या चालनेतून पुढे माध्यमांचं क्षेत्र अधिकच व्यापक होत राहिलं, विस्तारत गेलं. दूरध्वनीपासून ते दूरचित्रवाणी अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत हे क्षेत्र विस्तारलं. मानवाची माहितीची भूक भागविण्यासाठी अखंडितिजीपणे ही माध्यमं सेवारत झालीआजही आहेत. डिजीटल तंत्रज्ञानानं तर गेल्या तीनेक दशकांत मानवी जीवनात मोठी संवादक्रांती घडवून आणली आहे.

संगणक आणि त्यानंतर इंटरनेटच्या शोधानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला नवा आयाम मिळवून दिला. किंबहुनाया दोन गोष्टींच्या आस्तित्वाखेरीज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रच अस्तित्वात येऊ शकलं नसतं. डिजीटल हा शब्दच मुळी संगणकाशी संबंधित आहे. संगणकाला भाषा कळते तीच मुळात शून्य (०) आणि एक (१) या डिजीट्सच्या स्वरुपातील. या भाषेला बायनरी भाषा म्हणतात. या डिजीट्सच्या वापरातून ज्या ज्या बाबी निर्माण होतात, त्या डिजीटल होत. पूर्वी इलेक्ट्रो-मॅग्नेटिक स्वरुपातील ॲनालॉग फॉर्मेट ध्वनी, दृश्ये यांच्या अंकनासाठी वापरले जात. त्यामध्येही वेगवेगळे प्रकार होते. त्या एका फॉर्मेटचे अन्य फॉर्मेटमध्ये रुपांतरण ही खूपच जिकीरीची बाब असे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे मात्र हे रुपांतरण अत्यंत सोयीचे बनले. हाच आपल्या डिजीटायझेशनचा कालखंड होय. अशा प्रकारे काळानुरुप होत गेलेलं माध्यमांतर हा मानवजातीच्या प्रगतीमधीलविकासामधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहेअसं म्हटल्यास अतिशयोक्तीचं ठरणार नाही. परंतु, गुटेनबर्गनंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमं आस्तित्वात येण्याच्या दरम्यान सुमारे साडेतीनशे वर्षांचा काळ लोटलापण त्यानंतर अवघ्या साडेतीन दशकांमध्ये माध्यमांनी ज्या गतीनं आपलं रुप पालटलं आहेती गती अचंबित करणारी आहे. हे गतिमानतेचं चक्र केवळ इंटरनेट, डिजिटायझेशन आणि त्यांच्याशी संबंधित अनेकविध शोधांमुळंच तसं राहू शकलेलं आहे.

नाविन्याच्या स्वीकारात अग्रेसर असलेल्या प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रावर उपरोक्त बाबींचा प्रभाव व परिणाम होणे ही स्वाभाविक बाब होती. मुद्रित माध्यमांबरोबरच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर अर्थात रेडिओ आणि दूरचित्रवाणीमध्ये डिजीटायझेशनमुळे अनेक गुणात्मक बदल घडून आले. या नवतंत्रज्ञानाने प्रदान केलेल्या गतिमानतेमुळे या क्षेत्रांमध्ये लवचिकता आली. इंटरनेटमुळे ग्लोबल खेडे बनलेल्या या जगाला स्मार्ट टेलिफोनीच्या तंत्रज्ञानाने अधिकच जवळ आणले. समाजमाध्यमांच्या विकासाने तर संवादक्रांतीला अनेक नवे आयाम प्राप्त करून दिले.

नेक्स्ट मीडिया:

इंटरनेट आणि समाजमाध्यमे यांच्या संयोगातून विकसित झालेल्या नवमाध्यमांना माध्यम क्षेत्रात आता नेक्स्ट मीडिया म्हणूनही संबोधले जाऊ लागले आहे. याचं कारण असं की, डिजीटायझेशनमुळं पारंपरिक माध्यमे आणि नवमाध्यमे ही आता एकाच प्लॅटफॉर्मवर, हातातल्या मोबाईलच्या किंवा पी.सी.च्या एकाच स्क्रीनवर आपल्याला उपलब्ध होऊ लागली आहेत. हे माध्यमांतर क्रांतीकारक आहे. एखाद्या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर आपल्याला जसे फोटो पाहता येतात, तसेच एखाद्या महत्त्वाच्या घटनेचे व्हिडिओ सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध होतात. एखाद्या वाहिनीच्या साइटवर त्यांच्या व्हिडिओ क्लिप्सबरोबरच संबंधित घटनेची लिखित माहिती छायाचित्रांसह पाहायला मिळू शकते. म्हणजे प्रत्येक माध्यमाने आपल्या मूळ माध्यमाच्या मर्यादा ओलांडून अन्य माध्यमांचा आधार घ्यायला सुरवात केली आहे. किंबहुना, नवमाध्यमांनी त्यांना या बदलाची संधी उपलब्ध केली आहे. तथापि, आता बदल एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. पारंपरिक माध्यमांनी समाजमाध्यमांमधूनही वाचकांशी जोडले जाण्यास सुरवात केली आहे. फेसबुक, ट्विटर यांच्यासह विविध प्लॅटफॉर्मवर ही माध्यमे सातत्याने वाचकांना ताजी, लेटेस्ट माहिती देत आहेत. ट्विटरवर सेकंदाला सहा हजार ट्विट्स, फेसबुकवर मिनिटाला चाळीस लाख लाइक्स, तर वॉट्सअपवरून दिवसाला ६० अब्ज संदेशांची देवाणघेवाण होत आहे. ही आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. ट्विटरवर प्रसारमाध्यमे आणि या क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक जण सातत्याने आपल्या अधिकृत हँडलवरुन ताजी माहिती अपडेट करतात. त्यामुळे वापरकर्त्यांना तत्काळ माहिती उपलब्ध होते आहे. ब्लॉगच्या माध्यमातूनही अनेक पत्रकारांबरोबरच सामान्य वापरकर्तेही वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतात. माध्यमांच्या साईट्सवरही आता त्यांच्याशी संबंधित संपादक, प्रतिनिधी यांचे विश्लेषणात्मक ब्लॉग लिहीले जाताना दिसताहेत.

आणखी ट्रेंड आहे तो केवळ ऑनलाइन पोर्टल किंवा ॲप तयार करून केवळ त्याद्वारे बातमी, लेख, फीचर, ऑडिओ, व्हिडिओ तयार करून ते शेअर करण्याचा. व्यक्तीगत पातळीवर सुद्धा असा प्लॅटफॉर्म निर्माण करणे आता फारसे अवघड राहिलेले नाही. विशेषतः स्थानिक पातळीवरील माहितीच्या आदान-प्रदानासाठी अशा प्रकारचे अनेक प्लॅटफॉर्म ऑनलाइन स्वरुपात उदयास येत असलेले दिसतात.

याचा पुढचा टप्पाही आता स्मार्टफोन ॲपच्या द्वारे वापरकर्त्यांना उपलब्ध झालेला आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या पोर्टलवरुन लेटेस्ट न्यूज अपडेट्स संकलित करून एकाच ठिकाणी उपलब्ध करणारी अनेक ॲप्स आहेत. त्याचप्रमाणे आता हॉटस्टार, जीओ टीव्ही यांसारखी अनेक ॲप्स अशी आहेत की, जिथे आता कोणत्याही वाहिनीवरील कोणताही कार्यक्रम वापरकर्ता आपल्या सोयीने कोणत्याही वेळी पाहू शकतो. इतके स्वातंत्र्य या नवमाध्यमांमुळे वापरकर्त्यांना मिळालेले आहे. कोविड-१९च्या कालखंडात तर या ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म्सचाच आधार सर्वच प्रकारच्या कन्टेन्ट निर्मात्यांना लाभला. त्यामुळे नेटफ्लिक्सपासून ते डिस्ने हॉटस्टार, ॲमेझॉन प्राईमपर्यंत अनेक स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थाने फॉर्ममध्ये आलेच, शिवाय झी, सोनी आदी माध्यम समूहांनीही झी-फाइव्ह, सोनी लिव्ह आदी ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतंत्रपणाने विकसित केले. त्यामुळे कोरोना कालखंडाने दिलेली ही ओटीटीची देणगी आता सदैव आपल्यासमवेत राहणार आहे. माध्यम म्हणून त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. कारण देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील दर्जेदार आणि ताजा कन्टेन्ट वापरकर्त्याला ते गतीने सर्व्ह करताहेत, हे त्यांचे वैशिष्ट्य आणि जमेची बाजू आहे.  

वापरकर्ता ते माध्यमकर्ता:

पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत या नवमाध्यमांचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे यांमध्ये आता प्रत्येक वापरकर्ता (युझर) हा माध्यमकर्ता (कॉन्ट्रीब्युटर) बनला आहे. हातातल्या स्मार्टफोनमुळे तो त्याला उपलब्ध असलेल्या अनेकविध समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरुन जशी त्याला हवी ती माहिती घेऊ शकतो, त्याचप्रमाणे विविध प्रकारची माहिती त्याद्वारे शेअरही करू शकतो. माध्यमांचे भाष्यकार जे रोसेन म्हणतात त्याप्रमाणे लोकांना पूर्वी ऑडियन्स म्हटले जायचे. याचा अर्थच असा की, आता लोक केवळ प्रेक्षक, श्रोते किंवा वाचक राहिलेले नाहीत. ते स्वतः आता या नवमाध्यमांच्या द्वारे जगाला माहिती देण्यास सक्षम बनले आहेत. याचाच दुसरा अर्थ असा की, माध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक माध्यमकर्मीची जबाबदारी आता दुपटीने वाढलेली आहे. वापरकर्त्यांचा वेग वाढल्यामुळे माध्यमांनाही त्यांची गती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. तथापि, केवळ गती वाढविली म्हणजे झाले, असे मात्र नाही. माहिती कितीही गतीने दिली जात असली, प्राप्त होत असली तरी, तिच्या सत्यासत्यतेची पडताळणी करण्याची जबाबदारी माध्यमांवरच येते.

नवमाध्यमांमुळे पारंपरिक माध्यमांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे, असे मात्र नाही. गेल्या शतकात रेडिओचे आगमन झाले, तेव्हा मुद्रित माध्यमांचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तविली गेली. दूरचित्रवाणीचे आगमन झाले, तेव्हा, रेडिओ आणि मुद्रित माध्यमांचे अस्तित्व संपेल, अशीही शक्यता वर्तविली गेली. मात्र, दोन्ही वेळेला तसे झाले नाही. उलट, या सर्वच माध्यमांचे क्षेत्र, व्याप्ती आणि अवकाश हा परस्परपूरक ठरत गेला आणि त्यातून त्यांची वृद्धीच झाल्याचे दिसून आले. आताही तसेच होईल, अशी चिन्हे आहेत. आजचे युग हे वर म्हटल्याप्रमाणे माध्यमांतराचे आहे. प्रत्येक माध्यम हे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या कक्षा विस्तारण्याबरोबरच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, हे निश्चितच आहे. नवमाध्यमांच्या द्वारे होणारे बदल स्वीकारत जे पुढे जात राहतील, त्यांची प्रगती होतच राहणार आहे. जे बदलणार नाहीत, होणारे बदल स्वीकारणार नाहीत, ते लयाला जाणारच आहेत. मोठ्या झपाट्याने जगभर विस्तारलेली मात्र न बदलणारी, लवचिक नसणारी  समाजमाध्यमे (उदा. ऑर्कुट) नष्ट झाल्याचे गेल्या दशकभरात आपण पाहिलेच आहे. बदल न स्वीकारणाऱ्या प्रसमारमाध्यमांनाही हेच लागू आहे.

सिटीझन जर्नालिझम:

नवमाध्यमांच्या या युगात प्रसारमाध्यमांना आणखी एका गोष्टीचा स्वीकार करावा लागणार आहे, ती म्हणजे सिटीझन जर्नालिझम. वापरकर्त्यांकडून मिळणाऱ्या माहितीचाच आधार घेऊन पत्रकारिता करण्याचे युग येऊ घातले आहे. किंबहुना, दक्षिण कोरियाच्या ओह-माय-न्यूज या वृत्तपत्राने त्याची पायाभरणी आधीच करून ठेवली आहे. या वृत्तपत्रात एकही पत्रकार नियुक्त करण्यात आलेला नाही. या वृत्तपत्रातील तथा त्याच्या पोर्टलवरील शंभर टक्के माहिती त्यांचे सिटीझन जर्नालिस्टच कॉन्ट्रीब्युट करतात. केवळ ५५ लोकांच्या स्टाफच्या बळावर त्यांनी सांभाळलेल्या या व्यापाकडे जगातील सिटीझन जर्नालिझमचे एक यशस्वी मॉडेल म्हणून पाहिले जाते. सीएनएनचे आय-रिपोर्ट, मी-पोर्टर, ग्लोबल व्हॉईस अशी सिटीझन जर्नालिझमला प्रोत्साहन देणाऱ्या पोर्टलची काही अन्य उदाहरणेही जगाच्या पाठीवर आहेत.

भारतात मोठी संधी असूनही सिटीझन जर्नालिझम म्हणावे तितके गतीने विकसित झालेले नाही. मात्र, सध्या माध्यम क्षेत्रात व्यावसायिक अंगानं होत असलेले बदल पाहता हळू हळू आपल्या देशातील प्रसारमाध्यम क्षेत्राची वाटचाल न्यूक्लिअर मालकी असणाऱ्या साखळी वृत्तपत्रसमूहाच्या दिशेने होताना दिसते आहे. अशा वेळी मल्टीमीडिया ॲप्रोच ठेवून काम करीत असताना केवळ मल्टीटास्किंग कुशल आणि कार्यक्षम लोकांनाच यापुढे माध्यम क्षेत्रात संधी राहणार आहे. कमीत कमी मनुष्यबळाच्या आधारावर जास्तीतजास्त आऊटकम बेस्ड काम करवून घेण्याकडे सर्वच क्षेत्रांचा कल वाढत असल्याने त्याला माध्यम क्षेत्र अपवाद असेल, अशी भाबडी आशा बाळगणे चुकीचे आहे. त्यामुळे कमी केलेल्या मनुष्यबळाची पोकळी भरून काढण्यासाठी सिटीझन जर्नालिझमकडे या क्षेत्राला निश्चितपणे वळावे लागणार आहे. प्रत्येक सर्वसामान्य वापरकर्त्याला सिटीझन जर्नालिस्ट म्हणून काम करण्याची मोठी संधी पुढील काळात उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. प्रसारमाध्यमांना मात्र त्या दृष्टीने युझर जनरेटेड कन्टेन्टच्या एडिटिंगवर अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. सिटीझन जर्नालिस्टकडून आलेल्या रॉ-फीडची शहानिशा करण्याबरोबरच त्या संदर्भातील अधिक पूरक माहिती घेऊन ती आकर्षक पद्धतीने बहुमाध्यमी वाचकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना पेश करण्यासाठी अधिक काम करावे लागणार आहे.

ऑटोमेटेड जर्नालिझम:

गेल्या काही वर्षात नोंद घ्यावी, असा एक महत्त्वाचा ट्रेन्ड जागतिक माध्यमांच्या क्षेत्रात उदयास आलेला आहे, तो म्हणजे ऑटोमेटेड जर्नालिझमचा होय. यालाच अल्गॉरिदम जर्नालिझम किंवा रोबोट जर्नालिझम असेही म्हटले जाते. सद्यस्थितीत फॅक्ट्स आणि फिगर्स यांवर आधारित असलेल्या तुलनेत साचेबद्ध किंवा बंदिस्त वार्तांच्या निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि बॉट्सचा (रोबोट) वापर केला जाऊ लागला आहे. असोसिएटेड प्रेस (एपी), ब्लूमबर्ग, फोर्ब्ज, प्रोपब्लिका या विदेशी न्यूज एजन्सीजसह वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाईम्स, लॉस एंजेल्स टाईम्स आदी वृत्तपत्रांमध्ये अशा स्वरुपाच्या बातम्यांची निर्मिती केली जाते आहे. त्यांना मानवाचा हातही लागत नाही. यामध्ये सध्या हवामान, क्रीडा, आर्थिक व व्यापार-उद्योगविषयक घडामोडी, गुंतवणूक व स्थावर मालमत्ता विश्लेषण आदी वार्तांची निर्मिती करण्यात येते. यामध्ये विविध बातम्यांचे आदर्श नमुने आधीच संगणकात भरले जातात. त्यामध्ये नावे, ठिकाणे, क्रमवारी, सांख्यिकीय तसेच अन्य महत्त्वाची आकडेवारी आणि अन्य पूरक माहिती भरली की त्या फॉर्मेटमध्ये बातमी काही क्षणात तयार होऊन मिळते. त्यावर वेगळे मनुष्यबळ वाया घालविण्याची गरज राहात नाही. लॉस एंजेल्स टाईम्सने एका भूकंपाच्या धक्क्याची आकडेवारी व माहिती मिळताच बॉट्सच्या सहाय्याने अवघ्या तीन मिनिटांत त्याची बातमी सर्वत्र रिलीज केली. तथापि, गरजेनुसार अशा बातम्यांवर योग्य ते संपादकीय व शैलीचे संस्करणही केले जाते.

सिटीझन जर्नालिझमचा अथवा ऑटोमॅटेड जर्नालिझमचा हा पाचवा स्तंभ आकाराला येत असला तरी मुख्य प्रवाहातील पत्रकारितेला अगर पत्रकारांना तो संपूर्णतया बाजूला करील, असे मात्र होणार नाही. त्याचे स्वरुप पूरकच राहील. याचे कारण असे की, नवमाध्यमांच्या आधारे देण्यात येणाऱ्या माहितीचे, घटना-घडामोडींचे स्वरुप हे फार मोठे, व्यापक असण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे सिटीझन जर्नालिस्ट व बॉट्स हे कॉन्ट्रीब्युटर असले तरी, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला मर्यादा आहेतच. या मर्यादांच्या पलिकडचे अधिक मोठ्या, व्यापक स्टोरी करण्याचे अवकाश हे पत्रकारांसाठी खुले आहेच. सिटीझन जर्नालिझम, नवमाध्यमे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांवरील संतुलन सांभाळत या उपलब्ध खुल्या अवकाशात निसर्गदत्त बुद्धिमत्तेच्या बळावर भरारी मारण्यास सज्ज असणाऱ्या पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांचे भवितव्य कालही उज्ज्वल होते, आजही आहे आणि उद्याही उज्ज्वलच असणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा