शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

जिताडा फ्राय अन् ‘अलार्मिंग’ मुंबई...

 

जिताडा मासा आणि त्याचा फ्राय (छाया. सौ. मिसळपाव डॉट कॉम)


जिताडा... हा शब्द किंवा नाव फारसा परिचित असण्याचं कारण नाही. (असल्यास ते आमचं अज्ञान...) कोकणातल्या विशेषतः रायगड जिल्हावासीयांचे, अलिबागचे रहिवासी आणि तिकडे जाणारे नियमित पर्यटक यांच्या मात्र तो जिव्हाळ्याचा विषय आहे. तर, जिताडा हा या धरातलावरील एक अत्यंत चविष्ट असा मासा आहे. (हे अस्मादिकांचे स्व-स्वादानुभवाधारित स्टेटमेंट). पूर्वी कोकणात भाताच्या शेताच्या पाण्यातच सापडायचा. शेतकरीही देवाचा प्रसाद म्हणून तो खायचे. विकायचे नाहीत. रायगडच्या खाड्यांमध्येच त्याची पैदास होते. त्यामुळे तो दुर्मिळ आहे, म्हणतात. (ही ऐकीव माहिती आहे. जाणकारांनी जरुर करेक्ट करावे.) अलिबाग, पेण, पनवेलच्या परिसरातील काही हॉटेलांत तो मिळतो. या जिताड्याच्या प्रथमग्रासाशी निगडित एक भन्नाट किस्सा माझ्या पोतडीत आहे. तोच आज शेअर करतो आहे.

तत्पूर्वी, एका गोष्टीचं स्पष्टीकरण करतो की, मी काही प्रचंड मत्स्यप्रेमी खवय्या नाही, हे जितकं खरं, तितकंच माशाचं उत्तम जेवण मिळालं की ते सोडतही नाही, हेही खरंचाय. (उदय तानपाठक, आशिष चांदोरकर या सन्मित्रांशी तुलना केली, तर आम्ही खवय्ये कॅटेगरीत बसूच शकत नाही, हे तर त्याहूनही महासत्य!) तर, गोष्ट आहे मंत्रालयात असतानाच्या काळातली. तेव्हा पर्यटन मंत्र्यांच्या कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहात होतो. आमच्या ऑफिसमधला स्टाफ अतिशय भारी- कामाच्या बाबतीतही अन् रसिकतेच्याही! आम्ही त्या काळात सर्व जण अधून मधून विकेंडला छोट्या छोट्या ट्रीप काढायचो. कार्ला, लोणावळा अशा सक्सेसफुल ट्रीप आम्ही केलेल्या होत्या. दत्तात्रय खिलारी, मिटना ही मंडळी एकत्र आली की वेगवेगळ्या माशांच्या बाबतीत माझ्या आणि पिटके गुरूजींच्या समोर चर्चा करून गुरूजींची गंमत करू पाहायचे. त्यावेळी माहित नसलेल्या कित्येक माशांची नावं कानावर पडली. अशाच एका चर्चेत खिलारींनी जिताडा या केवळ रायगड स्पेसिफिक खाडीत निपजणाऱ्या माशाबद्दल आणि त्याच्या चविष्टपणाबद्दल सांगितलं. जिताडा हे नाव काही मला तितकंसं आवडलं नाही; पण नावाचा आणि चविष्टपणाचा संबंध असण्याचं आणि लावण्याचं कारण नव्हतं. आणखीही काही वेळा आमच्यात त्याविषयी चर्चा झाली. मग, एकदा मीच म्हटलं, आता चर्चा खूप झाली; खाऊ घाला आम्हाला जिताडा!” इथे काका गुरव मदतीला धावून आले. नियोजनाच्या बाबतीत काकांचा नाद कोणी करायचा नाही. काकांनी माहिती काढली. पनवेलच्या रेस्ट हाऊसचा खानसामा जिताडा उत्तम करून देतो, अशी खात्रीशीर वार्ता तर दिलीच, शिवाय, लगतच्या विकेंडला शुक्रवारचं नियोजन पक्कंही करून टाकलं. ऑफिसमध्ये विजय मोरे, विनोद निकम, सुरेश, वऱ्हाडी, उघाडे, नागे, खेडकर (आता सर्वांचीच नावं आठवत नाहीत, पण) अशी बरीच तरुण हौशी मंडळी होती. त्यावेळी आमचं खटलं माहेरी- कोल्हापुरी होतं. बंधू अनुप हे त्यावेळी मुंबईतच दिग्दर्शनाचा कोर्स करत होते. तेव्हा तेही सोबत असणार होते. ठरल्याप्रमाणं शुक्रवारी ऑफिस सुटल्यानंतर काम संपेल तसतसं सगळ्यांनी पनवेलच्या रेस्टहाऊसवर जमायचं ठरलेलं. विकेंड असल्यानं पुढच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमांच्या भाषणांचं नियोजन वगैरे संपवून आम्हालाच तिथं पोहोचायला सगळ्यात उशीर झाला. साडेनऊ-दहा वगैरे वाजलेच. आधी गेलेल्यांनी टप्प्याटप्प्याने जिताड्यावर ताव मारायला सुरवात केलेली होतीच. आमच्यासाठी वाटा राखून ठेवलेला होता. आम्ही साऱ्यांनी जमिनीवरच गोलाकार बसून जिताडा फ्रायचा आस्वाद घ्यायला सुरवात केली. खरे सांगतो, तोवरच्या आणि त्यानंतरच्या आयुष्यातही इतका स्वादिष्ट मासा खाण्यात आलेला नव्हता; नाही. आजतागायत त्या माशाची याद आम्ही काढत असतो. त्या रात्री पोटभर केवळ जिताडा अन् जिताडाच खाल्ला. पोट भरलं, मन मात्र नाही.

हा सारा खानपान समारंभ होईस्तोवर बारा वाजून गेलेले. झोपण्याची वेळ झाली तेव्हा आम्ही आपापल्या खोल्यांत गेलो. हॉलमध्ये एकत्र होतो, तोवर काही जाणवलं नाही. खोलीत गेल्यावर मात्र तिथं प्रचंड मच्छर असल्याचं लक्षात आलं. अगदी लाइट, पंखे, गुडनाईट वगैरे लावूनही या तमाम मच्छरांनी आमच्या शरीराचा ताबा काही सोडला नाही. अंगावर घ्यावं, तर प्रचंड उकडायचं. काढावं, तर डासांच्या तडाख्यात सापडायचं. अशा दुहेरी पेचप्रसंगात सापडलेलो. झोप लागायचं नाव नाही. दिवसभर काम करून आधीच कंटाळा आलेला, त्यात झोप नाही. अनुप, मी दोघेही अस्वस्थ झालेलो. खोलीबाहेर जाऊन इतरांच्या खोल्यांचा अंदाज घ्यावा, त्यांच्या खोलीत जावं, असाही विचार केला, पण कंटाळलेले आणि तृप्त झालेले ते जीव एक तर झोपले असावेत किंवा आमच्यापेक्षा त्यांची अवस्था वेगळी नसावी. काही अंदाज येई ना. पहाटे पावणेपाचच्या सुमारास ठाण्याला जाणारी पहिली लोकल पकडून आधी घर गाठावे आणि मग निवांत झोप काढावी, असं आम्ही ठरवलं. पण, तोवरचा वेळ काढणंही असह्य होत होतं. शेवटी साडेतीन वाजताच आम्ही बाहेर पडलो. पहाटेच्या गारव्यात जरा बरं वाटलं. डासांच्या तावडीतून सुटल्याचा आनंदही होताच, पण झोपच नसल्यानं पाय मात्र जडावलेले. आम्ही चालतच साधारण अर्ध्या तासात स्टेशन गाठलं. कामावर जाणारे लोकही हळूहळू एकेक करीत येत होते. आमचं कोणाकडंही लक्ष नव्हतं. गाडी कधी एकदा येते आणि त्यात बसतो कधी न् एखादी डुलकी काढतो कधी, अशी अवस्था झालेली.

लोकल आली. आम्ही त्यात चढलो. दोघे विंडो सीटला समोरासमोर बसलो. आमचे सहप्रवाशीही कुठं कुठं जागा मिळवून सकाळची अर्धवट झोप उर्वरित प्रवासात पूर्ण करण्याच्या मागे होते. आमचं तर रात्रभराचं सक्तीचं जागरण झालेलं. डुलकी कधी लागली, ते समजलंही नाही. साधारण पाचच्या सुमारास अतिशय बारीक पण हळूहळू वाढत जाणारा आणि काही क्षणांनी पुन्हा वाजणाऱ्या बीपच्या आवाजानं त्या डब्याचा ताबा घेतला. बॉम्बस्फोटांचा अनुभव घेतलेल्या मुंबईकराच्या हृदयात त्या आवाजानं धडकी भरली नसती तरच नवल! मी तर गाढ झोपेतून उठल्यानं या भोवतालाचं भान यायला थोडा उशीरच झाला. डब्यात मोजकेच प्रवाशी होते, पण अस्वस्थता आणि भीतीनं त्यांचा ताबा घेतलेला. प्रत्येक जण इकडे तिकडे पाहात होता. कोणी वरच्या सामानाच्या रॅककडे, तर कोणी बाकड्याखाली. काहींनी तर डबाभर फिरुन त्या आवाजाचा माग काढण्याचा प्रयत्न केला, पण नेमका आवाज कोठून येतोय, हे लक्षात येत नव्हतं. रात्रभराच्या जागरणावर झोप हावी झाली असतानाच या प्रकारानं मी सावध होण्याचा प्रयत्न करीत होतो; पण, काही ट्रेस लागत नव्हता. समजलं, तेव्हा डबाभर पसरलेल्या भीतीनं माझाही ताबा घेतला. समोर बसलेल्या अनुपची अवस्थाही वेगळी दिसत नव्हती. अधूनमधून टायमरसदृश बीप वाजतच होता.

मनात विचारांचं काहूर उठलं. आता आम्ही दोघंही बंधू मुंबई लोकलच्या या बॉम्बस्फोटात उडणार तर... खरं म्हणजे या वेळी आम्ही आमच्या कल्याणच्या घरी साखरझोपेत असायला हवं होतं. पण, त्या जिताड्याच्या नादात इकडं पनवेलकडं कडमडलो. गावाकडं आईबाबांच्या, बायकामुलांच्या आता ते कसं बरं लक्षात येणार? तसं, ऑफिसचं आयडी होतं सोबत, पण स्फोटात माणसाच्या चिंधड्या होतात, तिथं आयडी कुठं सापडायचं? आईबापाचं वाईट वाटायला लागलं. त्यांची दोन्ही पोरं एकाच वेळी एकाच क्षणी ठार होणार होती. काय यातना होतील बरं त्या जीवांना? केवढी तगमग होईल त्यांची, हातातोंडाशी आलेली पोरं हकनाक गमावल्यावर? रात्री बायकोचा फोन आला होता, तिला कल्पना दिली होती की पनवेलमध्ये सहकाऱ्यांसोबत आहे म्हणून. लेकीसोबत बोबडं बोलायचं मात्र राहून गेलेलं. बदमाश (पण चवदार!!!) जिताड्याच्या नादात जिंदगी गमावण्याचा प्रसंग येऊन ठेपलेला. डोळे मिटलेले असले, तरी असेच विचार मनात येत राहिले. आता आपलं काही खरं नाही... कुठल्याही क्षणी आपण उडणार... हे आणि असंच काहीबाही...

तेवढ्यात कुठलं तरी एक स्टेशन आलं, तेव्हा डब्यातले अनेक जण थेट उतरलेच तिथे. शेवटी जीवाची भीती कुणाला नसते? मागच्या स्टेशनवर चढलेल्यांचाही त्यात समावेश होता. डब्यात आम्ही काही मोजकेच जण होतो. मात्र, प्रत्येकाचा जीव कंठाशी आलेला होता. मीही उतरायचा विचार करीत होतो, तेवढ्यात लोकल सुटली. मधल्या प्रवासात जगलो-वाचलो तर पुढचं स्टेशन मात्र सोडायचं नाही, असं ठरवलं. स्टेशन आलं, तसं अनुपला खुणावलं. तोही विस्कटलेला होताच. पटकन आम्ही तिथे उतरलो. आणखीही काही जण उतरले आणि पुढच्या लोकलसाठी उभे राहिले. मी मात्र आता लगेच कुठली लोकल पकडण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. अनुपला म्हटलं, या टेन्शनवर मात करण्यासाठी चहाची गरज आहे बुवा आता!

प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाला चहाचा स्टॉल नुकताच उघडलेला दिसला. त्या दिशेनं आम्ही चालायला सुरवात केली. अनुपनंही त्याची मनोवस्था सांगायला सुरवात केली. माझ्यापेक्षा त्याची विचारशृंखला काही वेगळी नव्हती. एकच दुःख वेगळं होतं, ते म्हणजे,च्यायला, बिनालग्नाचंच मरावं लागणार आता!”

आम्ही बोलत बोलत चहाच्या स्टॉलपाशी पोहोचलो. त्यानं चहा नुकताच उकळायला ठेवला होता. त्याला चहाची ऑर्डर देऊन आम्ही थोडे बाजूला उभारलो. चहा हाती आला. एक मस्त कडक घुटका घशात सोडला. तेवढ्यात शांततेचा आवाज चिरत पुन्हा एकदा तो बीपचा आवाज कानी आला. बारीक, चढता अन् तीव्र... आता मात्र आम्ही अधिकच अस्वस्थ झालो. तेवढ्यात माझ्या काही लक्षात आल्यासारखं झालं. खिशातून मी हळूच माझा ब्लॅकबेरीचा मोबाईल काढून चेक केला, तर त्यात मी लावलेला पहाटे पाचचा डेली अलार्म दर दहा मिनिटांच्या स्नूझनंतर पुनःपुन्हा अलार्मदेत होता... मला मात्र जागं होण्यासाठी गरमागरम चहाचा कप हाती घ्यावा लागला होता... पुढं बंधूराजांनी आमची कोणत्या शब्दांत काढली असेल, ते सुजाण वाचकांना काय सांगायला हवं का?

 (नुकतीच अलविदा ब्लॅकबेरी ही ब्लॉगपोस्ट मी लिहीली, त्यावेळी त्याचा हा विशिष्ट बझर अलार्मही आठवला आणि ही घटना स्मृतीपटलावर ताजी झाली.)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा