बुधवार, १९ जानेवारी, २०२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधरपंत टिळक यांचे मैत्र

 



“‘लोकमान्य ही पदवी टिळक घराण्यातील कोणास शोभून दिसली असती तर ती श्रीधरपंतांसच होय. सख्ख्या भावापेक्षाही माझा त्यांच्याशी जिव्हाळा होता, असे उद्गार साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले ते श्रीधरपंत बळवंत टिळक यांच्याविषयी होय. श्रीधरपंत हे बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र. बाबासाहेबांच्या समाज समता संघाची शाखा पुण्यात उघडून तिचे कार्यालय थेट गायकवाड वाड्यात उघडणाऱ्या आणि तेथे चातुर्वर्ण्यविध्वंसक समाज समता संघ असा फलक लावणारे श्रीधरपंत हे पुत्र जरी टिळकांचे असले, तरी त्यांनी वारसा चालविला आगरकरांचा आणि मैत्र संपादले डॉ. आंबेडकरांचे! बाबासाहेबांवर आणि त्यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यावर त्यांची निरतिशय श्रद्धा होती. प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता आणि सार्वजनिक, सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. गायकवाड वाड्यातील गणपती उत्सवात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला, ही त्या काळातील किती कृतीशील क्रांतीकारकता होती. केसरीमधील ट्रस्टींसमवेतच्या वादाला कंटाळून त्यांनी वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी (२५ मे १९२८) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अवघे तीन तास आधी त्यांनी तसे बाबासाहेबांना पत्राद्वारे कळविले, यातूनच त्यांचे बाबासाहेबांवरील प्रेम दिसून येते. श्रीधरपंत आणि डॉ. आंबेडकर यांच्या याच स्नेहबंधाला उजाळा देऊन आजच्या पिढीपर्यंत श्रीधरपंतांचे कार्य पोहोचविणे, यासाठीच हा लेखनप्रपंच.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ सप्टेंबर १९२७ साली समाज समता संघाची स्थापना केली. समता तत्त्वावर आधारित हिंदू समाज निर्मिती करणे हे या संघाचे ध्येय ठरविण्यात आले होते. संघाच्या कार्यकारिणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता सर्व पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ सवर्ण समाजातील होते. कार्यकारिणी अशी: अध्यक्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उपाध्यक्ष: डॉ. आर. एन. भाईंदर (एमबीबीएस), देवराव वि. नाईक, संपादक- ब्राह्मण-ब्राह्मणेतर, सेक्रेटरी: १) एस. एस. गुप्ते, बीएसस्सी, २) बी.व्ही. प्रधान, बीए (ऑनर्स), खजिनदार: आर. डी. कवळी, बीए, कार्यकारी मंडळ: १) एफ. डी. डिसिल्व्हा, बीए, २) व्ही. आर. घोनकर, बीए. ३) डी. विठ्ठलराव प्रधान, ४) पी. पी. ताम्हाणे, बीए. ५) आर. जी. प्रतापगिरी, बीए (ऑनर्स), ६) जे. पी. मुळे, ७) एन. व्ही. खांडके, ऑडिटर्स: १) डी. बी. सुभेदार, एसीआरए २) आर. एम. कर्णिक, बीए.

समाज समता संघाची उद्दिष्टे मूलभूत मानवी अधिकारांना केंद्रवर्ती मानणारी होती. सर्व मनुष्य प्राणी समानाधिकारी असून स्वत:तील मनुष्यत्वाच्या विकासाठी कारणीभूत होणाऱ्या साधनांवर, सवलतींवर व संधींवर त्या प्रत्येकाचा समान हक्क असतो, असा या संघाचा विश्वास आहे. समतेचा हक्क हा पवित्र, अबाधित व अभेद्य आहे. हा हक्क जन्मसिद्ध व वर्ण, जात व स्त्री-पुरुष भेदातीत आहे. सामाजिक समता अस्तित्वात आल्याशिवाय समाजाचा सामुदायिक जीवनक्रम सुरळीत चालणे अशक्य आहे. समाजाच्या सुरळीत व सुसंघटित आयुष्यक्रमाला बाधक होणारे सर्व विचार, आचार (कार्ये) व संस्था ही सारी समाज समानत्वाच्या विरुद्ध आहेत, अशी या संघाची निर्देशपूर्वक घोषणा आहे. सर्व त्या उपायांनी वरील तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचा या संघाचा संकल्प आहे, अशी उद्दिष्टे घेऊन समाज समता संघ अस्तित्वात आलेला होता. बा. न. घोरपडे, यांनी समताच्या पहिल्याच अंकात या संघाची ध्येयधोरणे स्पष्ट करताना म्हटले होते की, "हिंदूसभेच्या भित्र्या व लपंडावी धोरणाचा आता खऱ्या जनतेला वीट आला आहे. सहभोजने, मिश्रविवाह (अनुलोम- प्रतिलोम) इत्यादी प्रत्यक्ष उपायांनी हिंदू समाजाची आजची चातुर्वर्ण्यमूलक व्यवस्था उलथून पाडून समतेच्या पायावर त्याची नवी उभारणी व संघटना करण्याचे अवघड पण अनिवार्य काम समाज समता संघासमोर आहे. सुदैवाने संघाला डॉ. आंबेडकरांसारखे विद्वान व धीरोदात्त कर्णधार लाभले आहेत. समता क्रांतीवादी तरुण आपल्या झेंड्याभोवती गोळा करण्याचे सामर्थ्य व आकर्षकत्व त्यांचे ठायी खास आहे.

या ध्येयधोरणांच्या पूर्तीसाठी संघाच्या समस्त कार्यकारिणीने एकदिलाने आपल्या कार्यास प्रारंभ केला होता. त्यासाठी प्रसंगी यातील अनेकांना त्यांच्या समाजाकडून त्रास सोसावा लागला. काहींना तर त्यांच्या ध्येयनिष्ठेचे फलित म्हणून वाळीतही टाकण्यात आले. मात्र, त्यांनी अंगिकृत कार्यास अंतर दिले नाही.

सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अत्यंत सनातन व कर्मठ असणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांचे १९ मार्च १८९६ रोजी जन्मलेले श्रीधर बळवंत टिळक यांना मात्र सामाजिक सुधारणांविषयी तीव्र आस होती. श्रीधरपंत आणि त्यांचे बंधू रामचंद्र यांचा आणि केसरी ट्रस्टी यांचा वाद कोर्टात सुरू होता. केसच्या कामासाठी मुंबईला आले की, ते बाबासाहेबांना भेटल्याखेरीज पुण्याला परत जात नसत. बाबासाहेबांनी आपली केस घ्यावी, अशी त्यांची खूप इच्छा होती. मात्र, बाबासाहेबांनी एकूण परिस्थितीचा विचार करून केस घेण्यास नकार दिला. बाबासाहेब कधी पुण्याला गेले की त्यांना गायकवाड वाड्यातील आपल्या घरी घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करीत. मात्र, माझ्या येण्यामुळे आपणास उगाच त्रास होईल, असे सांगून बाबासाहेब त्यांना परत पाठवित असत.

श्रीधरपंतांचा सामाजिक चळवळीकडे खूपच ओढा होता. समाज समता संघाची शाखा पुण्याला सुरू करावी आणि संघाची कचेरी आपल्या घरी असावी, असे ते बाबासाहेबांना बोलून दाखवत. तुमच्या केसचा निकाल लागल्यानंतर तुम्ही संघाच्या चळवळीत भाग घ्या, असा सल्ला त्यांना बाबासाहेबांनी दिलेला. तो त्यांनी स्वीकारला.

त्यानुसार, ८ एप्रिल १९२८ रोजी समाज समता संघाच्या पुणे शाखेचे उद्घाटन ठरले. खास या समारंभासाठी ७ एप्रिलच्या रात्रीच्या गाडीने डॉ. आंबेडकर, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, द.वि. प्रधान, कद्रेकर, शिवतरकर, भंडारे, भा.वि. प्रधान आदी मंडळी पुण्याला दाखल झाली. गायकवाड वाड्यातील श्रीधरपंतांच्या घरीच त्यांचा मुक्काम होता. रात्री संघस्थापना, सहभोजन आदी कार्यक्रम झाले. श्रीधरपंतांच्या पत्नी सौ. शांताबाई यांनी दोन ब्राह्मण स्त्रियांच्या सहाय्याने सहभोजनासाठीचा स्वयंपाक केला. पंतांनी स्वतः पंगतीला पाने मांडली, जेवण वाढले आणि सर्वांना विडे दिले. स्वयंपाक चालू असताना पंतांच्या घरातील विजेचे दिवे बंद पडले, तेव्हा त्यांनी मेणबत्त्या, कंदील, गॅसच्या बत्त्या घरात पेटवून सर्व समारंभ अत्यंत उत्साहाने पार पाडला. ही तपशीलवार नोंद भा.वि. प्रधान यांनी दुनिया वृत्तपत्रातील लेखामध्ये दिली आहे.

श्रीधरपंतांच्या सामाजिक कळकळीविषयीची एक ठळक नोंद सत्यशोधक पक्षाचे धुरीण दिनकरराव जवळकर यांनी केली आहे. ते म्हणतात, जेव्हा टिळक बंधूंनी गायकवाड वाड्यातील गणपतीपुढे अस्पृश्यांचा मेळा नेण्याचे ठरविले, त्या वेळचा प्रसंग अजून आमच्या दृष्टीसमोर दिसत आहे. श्रीधरपंतांनी अस्पृश्य मेळा नेण्याचा निर्धार केला होता. एक दिवस दुपारी आम्हाकडे जेध्यांच्याकडून सारखी बोलावण्यावर बोलावणी येऊ लागली. आम्हाला कारण काहीच कळे ना. जेधे यांच्याकडे जाऊन पाहतो तो तेथे आमची वाट पाहात श्रीधरपंत बसलेले! जेधे मेन्शनमध्ये जवळकरांची वाट पाहात टिळकांचा मुलगा बसला आहे, असे वाक्य जर त्यापूर्वी कोणी उच्चारले असते तर त्याला लोकांनी वेड्यात काढले असते. परंतु, यावेळी श्रीधरपंत-टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत-ब्राह्मणेतर तत्त्वावर, सत्यशोधक चळवळीवर प्रेम करणारे बनले होते. अस्पृश्य मेळा वाड्यात नेण्याचा त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला. त्याचवेळी जेध्यांच्या मारुती देवळातही तोच मेळा आम्ही आत घेऊ, असे श्री. जेधे यांनी कबूल केले. या वेळेपासूनच श्रीधरपंतांच्या खऱ्या सार्वजनिक आयुष्याची सुरवात आहे. यानंतर त्यांनी अत्यंत धैर्याने अस्पृश्योद्धाराच्या चळवळीकडे आपले लक्ष घातले. समाज समता संघाची पुण्यात स्थापना करून आपल्या वाड्यात सहभोजन घडविले.

यानंतर पुढच्याच महिन्यात २५ मे १९२८ रोजी श्रीधरपंतांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भांबुर्डा स्टेशनानजीक पूना मेलखाली झोकून देऊन आत्महत्या केली.

श्रीधरपंतांच्या आत्महत्येचा वृत्तांत केसरीच्या २९ मे १९२८ रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाला. त्यात असे म्हटले होते की, ... श्रीधरपंतांच्या पत्नीने विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशा अर्थाच्या बातम्या शहरात पसरल्या आहेत, पण त्या अगदी निराधार आहेत. त्याचप्रमाणे श्रीधरपंतांच्या आत्महत्येच्या कारणासंबंधाने वाटेल ते तर्क करण्यात येत आहेत. केवळ ऐकीव गोष्टींवरुन लोकांनी तर्क करू नयेत... त्यांचा स्वभाव विनोदी, स्पष्टोक्तिप्रिय, मनमोकळा आणि बराच भावनाप्रधान होता. यामुळे कोणताही खाजगी अगर सार्वजनिक विषय डोक्यात भरला अगर मनाने घेतला म्हणजे त्यावाचून दुसरे काही त्यांना सुचत नसे... त्यांची मते व कार्यपद्धती कोणास सर्वस्वी मान्य नसली तरी त्यांच्या तडफदार लेखनशैलीची वाखाणणी त्यांच्या विरोधी मताचेही लोक करीत असत. आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणेच्या कार्यास त्यांनी प्रारंभही केला होता. अशा स्थितीत त्यांनी एकाएकी इहलोकीच्या आयुष्यास कंटाळून प्राणहत्या करण्यास प्रवृत्त व्हावे, हे अकल्पित दैवदुर्विलसित होय...

अस्पृश्यांच्या समाज समता संघाच्या चळवळीशी श्रीधरांनी संबंध ठेवला म्हणून त्यांना पश्चाताप झाला, म्हणून त्यांनी आत्महत्या केली, अशा प्रकारच्या कंड्या पिकविण्याचे प्रयत्न त्यावेळी पुण्यात झाले. त्याचा प्रतिवाद श्रीधरपंतांचे वडिलबंधू श्री. रामचंद्र टिळक यांनी स्वतःच केला. ज्ञानप्रकाशला दिलेल्या मुलाखतीत रामभाऊ म्हणाले, पुण्यामुंबईतील काही प्रतिष्ठित पण खोडसाळ वृत्तपत्रकारांनी माझ्या बंधूंच्या आत्महत्येसंबंधात ज्या काही बेजबाबदार हकीकती प्रसिद्ध केल्या आहेत, त्याबद्दल मला आश्चर्य वाटते. त्याचा तीव्र निषेध आणि इन्कार करणे माझे कर्तव्य आहे. समाज समता संघ स्थापन केल्याचा पश्चाताप म्हणून श्रीधरपंतांनी आत्महत्या केली, असे म्हणणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. तो संघ स्थापन केल्याबद्दल त्यांना कधीही पश्चाताप वाटला नाही. उलटपक्षी, तो स्थापन झाल्या दिवसापासून त्यांना एक प्रकारचे समाधान वाटत होते. इतकेच नव्हे, तर सातारा, नगर, नाशिक, वगैरे ठिकाणी त्या संघाच्या शाखा स्थापन करण्याच्या खटपटीत ते होते. हा निर्धार त्यांनी माझ्याजवळ व रा. पां.ना. राजभोज वगैरे मित्रमंडळींजवळ कित्येक वेळा बोलूनही दाखविला होता. अशा स्थितीत त्यांच्या आत्महत्येचा संबंध समाज समता संघाच्या स्थापनेशी लावणे यासारखा अप्रयोजकपणा दुसरा कोणताच नाही, असे म्हटले तरी चालेल...

श्रीधरपंतांनी आत्महत्येच्या दिवशीच रा.का. तटणीस आणि डॉ. आंबेडकर यांना पत्रे लिहीली होती. बाबासाहेबांना लिहीलेले हे पत्र अत्यंत हृद्य स्वरुपाचे आहे. त्यात श्रीधरपंतांनी म्हटले होते, हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वी बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल. आपल्या समाज समता संघाचे अंगिकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता, याबद्दल मला फार संतोष वाटतो. आपले प्रयत्नांस परमेश्वर यश देईल, याची खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्,त सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळींस माझा सप्रेम नमस्कार सांगावा. कळावे, लोभ असावा, ही विनंती. आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक (२५-५-२८)

श्रीधरपंतांच्या हृदयद्रावक मृत्यूनंतर समाज समता संघातर्फे दुखवटा सभेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचा एक तेजस्वी कार्यकर्ता, तरुण समाजक्रांतिवीर मृत्युमुखी पडला!' असा ध्वनी या सभेत उमटला. सभेला केशवराव ठाकरे, वरेरकर, पी. आर. लेले, देवराव नाईक, सीतारामपंत बोले, जोगळेकर, आचार्य फासे, प्रधान बंधू, श्री. कवळी, खांडके, कद्रेकर, जाधव, उत्तमराव कदम, गोपीनाथ प्रधान, सौ. मनोरमाबाई प्रधान वगैरे मंडळी उपस्थित होती. अस्पृश्य बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.

सभेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, (कै.) श्रीधरपंतांचा व माझा संबंध सख्ख्या भावापेक्षा अधिक जिव्हाळ्याचा होता. समाज समता संघाशी त्यांचा संबंध जुळून आल्यापासून त्यांच्याविषयी मला विशेष आपलेपणा वाटत असे. त्यांनी सामाजिक सुधारणेच्या कार्याला गती देण्याची जी धडाडी दाखविली, तिची किंमत मला अधिक श्रेष्ठ प्रतीची वाटू लागली होती. जुने लोक, जुनी परंपरा आज बाजूला ठेवून आणि दूरवर विचार करून पाहिले, आजच्या नवीन नवमतवादी पिढीचा विचार केला तर त्यात कै. श्रीधरपंत मोठ्या लोकमान्यतेस पात्र होते, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही. समाज समता संघाच्या चळवळीला मुद्दाम जाणूनबुजून जे एक प्रकारचे निष्कारण छळावे, असे हीन वृत्तीचे वातावरण हिंदुस्थानात उत्पन्न होत होते, त्याला टक्करच म्हणून की काय श्रीधरपंतांनी समाज समता संघाची शाखा प्रत्यक्ष आपल्या घरी लोकमान्यांच्या गायकवाड वाड्यात स्थापन करून जे अलौकिक धैर्य दाखविले ते खरोखर कौतुकास्पद होते.' बाबासाहेबांनी यावेळी श्रीधरपंतांचे अखेरचे पत्रही वाचून दाखविले.

याखेरीज श्रीधरपंतांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणारा एक विस्तृत लेख २ जून १९२८ रोजीच्या दुनिया वृत्तपत्राच्या अंकात लिहीला. तो असा-

(कै.) श्रीधर बळवंत टिळक

लेखक- डॉ. भीमराव आंबेडकर

 

मी ता. २६ मे ला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेकरिता गेलो होतो. आदल्या दिवशी मी जेव्हा मुंबईहून निघालो, त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही, याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्यात आत्महत्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे, असा ध्वनी उमटण्यासारखे काहीच नव्हते. दुपारी फार ऊन असल्यामुळे रा. लबाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी ६ वाजता सुरू झाली. सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे सभेचे काम फार उत्साहाने चालले होते. हिंदू महासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे, या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली, यामुळेच मला थोडा धक्का बसला. वाचून पाहतो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो, त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र श्री. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी. मी अगदी गांगरून गेलो. आधी हे खरेच वाटेना. परंतु ही तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो. गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपण आरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला, हे जाणून माझे मन उद्विग्न झाले. श्रीधरपंतांना कोणी तरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा, असा माझा प्रबल तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे कारण हेच की दुसरे कोणते, हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल, असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. टाइम्स हातात घेतो, तोच श्रीधरपंतांच्या हातचे मरणापूर्वी तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा टाइम्स टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आत्महत्या हेच मरणाचे कारण होय, हे अगदी स्पष्ट झाले.

मग तर अगदीच कष्टी झालो. श्रीधरपंताला मी थोडासा दोषही दिला. आत्महत्या हा मरणाचा एक भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्या घडली ती कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंतांची आत्महत्या मोठी हृदयद्रावक होती, असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य केसरी कंपूशी भांडण्यात जाणार, आपल्याला विधायक काम करण्यास अवसर राहणार नाही, यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्या करणे बरे, असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतावर यावी, यासारखी अनिष्ट गोष्ट ती कोणती? माझ्या मते श्रीधरपंतांना केसरीत जागा मिळाली असती, तर हा घोर प्रसंग आलाच नसता. केसरी पत्रात आपणास जागा मिळावी, ही एक त्यांची महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती केसरी गेला, त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकारांची फेड या दृष्टीने केसरीच्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणूनच नव्हे, तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता. राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते- जहाल, सुताळ आणि बेताल या सर्वांच्या पेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने केसरीला काही धोका नव्हता. असे असताना त्यांना केसरीत जागा मिळाली नाही, याचे मला राहून राहून मोठेच आश्चर्य वाटते. केसरीत जागा मिळाली असती, तरीही केसरी कंपूचा भांड लागून जे व्हायचे ते झालेच असते, असे काही लोक म्हणतील. कसेही असो! एवढी गोष्ट खास की, निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे जर ते असते, तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्ट डीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज जे केसरीचे ट्रस्टी म्हणून वावरत आहेत, त्यांना तसे वावरता आले नसते. केसरी कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे, याची आठवण केसरी कंपूला असती, तर किती बरे झाले असते.

श्रीधरपंतांचा मृत्यू हा खरोखरच दैवदुर्विपाकाचा एक मासला आहे. मनुष्यमात्राच्या आयुष्याच्या पूर्ततेस अवश्य असलेली सामग्री (कै.) श्रीधरपंतांच्या भाग्याने त्यांच्या उशास ठेवलेली होती. साधनसामग्रीचा उपयोग करण्याइतकी बुद्धिमत्ताही त्यांना होती. सार्वजनिक कामाची कळकळ व एखादी गोष्ट तडीस नेण्यास अवश्य असणारी धडाडी या दोन्ही गोष्टी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या होत्या. त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ असल्यामुळे जनतेला वश करून घेण्यात त्यांना अवधी लागला नसता. अशा सर्वतोपरी पुढारीपणास लायक असलेल्या तरुणाचा अंत झालेला पाहून कोणास खेद होणार नाही?

सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांचा जहालपणा सर्वांनाच माहीत आहे. समता संघाच्या कार्यावर त्यांनी किती भर दिला होता, हे त्यांच्या पत्रावरून उघड होत आहेच. समता संघाच्या स्थापनेचा पश्चात्ताप होऊन आत्महत्या केली, अशा मूर्खपणाच्या वल्गना करणाऱ्या भालाकाराने आपला शहाणपणा आटोपता घ्यावा, हे बरे. समता संघाच्या कार्याला त्यांना किती अंतिम स्वरूप द्यावयाचे होते, हे त्यांनी आपल्या गायकवाड वाड्यावर नुसते 'समाज समता संघ' असे नाव न देता 'चातुर्वर्ण्य विध्वंसक समाज समता संघ' हे नाव दिले, यावरून सिद्ध होत आहे. आपल्या वडिलांची समाजकार्य वगळण्यात चुकी झाली, हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले, यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. त्यांना स्पष्टपणे कळून आले होते की, अर्धशतक राजकारणाचा अट्टाहास करूनही त्याच्या फलश्रुतीच्या आड जर कोणती एखादी गोष्ट आली असेल तर समाजकारणाचा अभाव हीच होय. या समजुतीप्रमाणे त्यांचा उद्योगही चालला होता. तो उद्योग किती धडाडीचा होता, हे कोणासही सांगण्याचे कारण नाही.

हल्लीच्या काळी महाराष्ट्रातील तरुणांत श्रीधरपंतांच्या तोडीचा तरुण सापडणे अत्यंत कठीण आहे. तरुण महाराष्ट्र परिषदेत जिभल्या पाजळणारे तरुण कोणीकडे आणि आमचे श्रीधरपंत कोणीकडे? ठरावांची रेलचेल करून गिरीकंदरी लपून बसणाऱ्या तरुणांतील भेकड तरुण ते नव्हते. त्यांचा निश्चय, जोम व कर्तबगारी ही सारी अवर्णनीय होती. ते जगले असते, तर महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण्याचे महान कार्य त्यांनी तडीस नेले असते. याचमुळे श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी मला थोडा राग येतो. सामाजिक सुधारणेच्या अंगीकृत कार्यात आपणास केवढे स्थित्यंतर घडवून आणता येईल, याची त्यांना यथार्थ कल्पना असावयास पाहिजे होती व त्या कार्यासाठी तरी निदान त्यांनी जगावयास पाहिजे होते. नुसत्या जगण्यात हशील नाही हे तत्त्व मलाही मान्य आहे. परंतु सफल जीवन स्वार्थासाठी नाही, तरी परार्थासाठी साठवलेच पाहिजे. श्रीधरपंतांना याचा विसर पडला.

मला त्यांच्यासंबंधी काय वाटते, हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे, यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. (कै.) श्रीधरपंत टिळक एका ब्राह्मण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव. त्यांचे वडील लो. टिळक यांना १९१९ साली जेव्हा मी मूकनायक पत्र चालवीत असे त्यावेळी, दर अंकात जरी नसले तरी अंकाआड, शिव्याशापांची लाखोली वाहत असे. ब्राह्मण्याशी अहर्निश झगडणाऱ्या माझ्यासारख्या अस्पृश्य जातीतील एका व्यक्तीने ब्राह्मण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दुःखित व्हावे, हा योगायोग तर त्याच्याहीपेक्षा विशेष विलक्षण आहे, हे कोणीही कबूल करील. परंतु हा योगायोगच श्रीधरपंतांच्या मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे. कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती, तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे- हिंदुस्थानावरील मोठीच आपत्ती आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छु माणसास कबूल करणे भाग आहे.'

अस्पृश्यता निवारणादी समाज सुधारक कार्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या श्रीधरपंतांकडून किती अपेक्षा होत्या, त्यांच्याविषयी किती ममत्व होते, हे या लेखामधून किती प्रत्ययकारकतेने दिसून येते. केवळ एवढ्यावरच न थांबता समाज समता संघाच्या समता या मुखपत्राचा प्रकाशन दिन हा श्रीधरपंतांच्या स्मृती जपण्यासाठी म्हणून शुक्रवार ठरविण्यात आला कारण याच दिवशी ते कालवश झाले. तसा खुलासा समतेच्या पहिल्या अंकात आठव्या पानावर श्रीधरपंतांच्या छायाचित्रासह छापण्यात आला होता. त्या छायाचित्राच्या डाव्या बाजूला श्रीधरपंतांनी बाबासाहेबांना पाठविलेले अखेरचे पत्र त्यांच्या हस्ताक्षरातच छापले होते.

असे होते या दोन महान व्यक्तीमत्त्वांचे मैत्र अन् एकमेकांप्रती जिव्हाळा!

 

(संदर्भ:- खैरमोडे, चां.भ., डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, सुगावा प्रकाशन, पुणे (तिसरी आवृत्ती, जुलै २००३))

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा