शनिवार, १५ जानेवारी, २०२२

अस्सल संदर्भसाधनांतून साकारलेले समग्र शिवचरित्र: छत्रपती शिवाजी महाराज

 



छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल मराठी माणसाचे आराध्यदैवत. आपल्या प्रत्येकाचं बालपण शिवरायांच्या शौर्यकथांनी भारलेलं अन् प्रेरणेचा स्रोत बनलेलं. चौथीच्या बालभारतीमध्ये शिवराय तसे पहिल्यांदाच संक्षिप्त पण समग्र चरित्ररुपात भेटलेले. पण त्या आधीही शिवजयंती, महाराष्ट्र दिनासह विविध राष्ट्रीय सण आणि गणेशोत्सवातील देखाव्यांतूनही पोवाडे, कथांतून महानायकाच्या रुपात डोळ्यांसमोर साकारलेले. माझ्या आयुष्यात स्पायडरमॅन, हि-मॅन वगैरे काल्पनिक सुपरहिरो खूप उशीरा आले. तोपर्यंत आणि त्यानंतरही ज्या एकाच रिअल सुपरहिरोचं गारुड माझ्या मनावर कायम राहिलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!

त्या भरातच बाबासाहेब पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती वाचलं, गो. नी. दांडेकरांची झुंजार माची, दुर्गभ्रमणगाथा, दुर्गचित्रे वाचली, पाहिली. महात्मा फुले यांनी लिहीलेला शिवरायांचा पोवाडा तर पुनःपुन्हा वाचला. रणजित देसाईंच्या लेखनशैलीचा तर मी प्रचंड चाहता. त्यांच्या श्रीमान योगीचा प्रभाव आयुष्य व्यापून टाकणारा. या कादंबरीनंच मूळ शिवचरित्र वाचण्याची प्रेरणा सतत जागती ठेवली. त्यानंतर मग, सेतू माधवराव पगडी, सर जदुनाथ सरकार, सभासदाची बखर आणि अगदी अलिकडे डॉ. बाळकृष्ण यांचे चार चरित्रखंड हे वाचून शिवचरित्राचे अनेकविध पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करीत राहिलो. ही एक निरंतर प्रक्रिया आहे. त्यातच सन २०२१ या मावळत्या वर्षाचे अखेरचे दिवस पुन्हा शिवमय झाले, ते प्राचार्य डॉ. आय.एच. पठाण यांच्या छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथाच्या वाचनासमवेत. 

छत्रपती शिवाजी महाराजहा ग्रंथ म्हणजे समकाळात उपलब्ध असणाऱ्या शिवचरित्राच्या समस्त अस्सल साधनांचा सर्वंकष आढावा आणि आधार घेऊन त्यातून साकारलेले हे महाराजांचे अधिकृत आणि समग्र असे चरित्र आहे, असे म्हणता येईल. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाला आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांची प्रस्तावना आणि आशीर्वाद लाभला आहे. डॉ. पवार सरांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे डॉ. पठाण यांनी हे शिवचरित्र साकारण्यास अनेक सामाजिक संदर्भ आहेत. सरांचे म्हणणे तर खरेच पण त्याही पलिकडे जाऊन शिवचरित्रापासून अद्यापही अनभिज्ञ असणाऱ्या आणि केवळ जयघोषातच अस्मिता मानणाऱ्या अनेक शिवप्रेमींना शिवचरित्र साध्या-सोप्या भाषेत समजावून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.

प्राचार्य पठाण यांनी अत्यंत विक्रमी वेळात या बृहद्ग्रंथाचं लेखनकार्य पूर्ण केलेलं आहे. अलिकडच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथप्रकल्प या निमित्ताने साकार झाला आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेले अथक अन् अविश्रांत परिश्रम पानोपानी जाणवत राहतात. दोनेक वर्षांपूर्वी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरील ग्रंथ साकारला आणि डॉ. जयसिंगराव पवार यांच्याच प्रेरणेतून त्यांनी शिवरायांवरील ग्रंथाचा संकल्प सोडला आणि तो तडीस नेला आहे.

प्राचार्य पठाण यांच्या या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगता येतील. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे अतिशय सहज, साध्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीत त्यांनी महाराजांचा जीवनपट उलगडला आहे. हा उलगडलेला जीवनपट अत्यंत साधार आहे. जिथे काही भक्कम पुरावा नाही, तिथे तिथे त्यांनी ते नम्रपणे नमूदही केलं आहे. तसं पाहता या ग्रंथातील प्रत्येक वाक्याचा संदर्भ आणि पुरावा त्यांनी ज्या त्या ठिकाणी नमूद केल्यानं हे चरित्र अत्यंत विश्वासार्ह झालं आहे.

परिपूर्ण समग्रता हे या चरित्रग्रंथाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. छत्रपतींच्या प्रत्येक सहकाऱ्याचं किंवा समकालीन महत्त्वाच्या व्यक्तीमत्त्वांचं काही ओळींत का असे ना, चरित्र आणि त्याचा आगापिछा याची नोंद त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचे त्या काळातील नातेसंबंध, परस्परव्यवहारामागील कार्यकारणभाव हा अधिक सुस्पष्टपणानं आपल्यासमोर येतो. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.

हे शिवचरित्र तर आहेच, पण छत्रपतींच्या आधीचा इतिहास, त्यांच्या निर्वाणानंतरच्या घडामोडी आणि त्यामागील छत्रपतींच्या प्रेरणा यांचा वेध घेऊन चरित्राला त्यांनी समग्रता प्रदान केली आहे. आपल्याला छत्रपतींच्या सिसोदिया वंशाची माहिती त्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं झालेल्या वादावेळीच होते आणि तीही अत्यंत संक्षेपात. इथं मात्र सिसोदिया वंशाची संपूर्ण वंशावळच लेखकानं दिलेली आहे. ही सुद्धा माहिती या पूर्वी इतिहासकारांखेरीज सर्वसामान्य वाचकांसमोर कधी आलेली नव्हती. मालोजीराजेंनी केवळ घृष्णेश्वराचा जिर्णोद्धार केला, या पलिकडे त्यांची इतर काही माहिती आपल्याला नव्हती. त्यांच्या पराक्रमाची, कारकीर्दीची माहिती येथे आहे. त्यांचे पुत्र शहाजी, शरीफजी यांची नावे पीर शहाशरीफ यांच्या नावावरुन आली, हे समजते. महाराजांमधील धर्मनिरपेक्षतेची प्रेरणा ही अशी त्यांच्या पूर्वजांकडून आल्याचं यातून स्पष्ट होतं.

शहाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाची आपल्याला आजपर्यंत फारच त्रोटक माहिती होती. त्यांचं संपूर्ण जीवनकार्य आपल्याला ठाऊक नव्हतं. ही त्रुटी या ग्रंथानं भरून काढलीय. शहाजीराजेंचं संपूर्ण जीवनकार्य आणि छत्रपतींच्या जीवनातील त्यांचे प्रेरकस्थान यांचा अत्यंत गौरवपूर्वक उल्लेख या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर येतो. ज्या बेंगलोरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यासाठी हात सरसावले, त्या बेंगलोरमध्ये शहाजीराजे यांचा नियमित दरबार भरत असे आणि तिथे त्यांचे न्यायदानही चालत असे, हे त्या पामरांना कोणी बरे सांगावे?

मातोश्री जिजाऊसाहेबांचं छत्रपतींच्या जीवनातील सर्वार्थानं असणारं गुरुस्थान हा ग्रंथ भक्कमपणानं अधोरेखित करतो. अफझलखानाच्या वधप्रसंगी असो, अगर अन्य मोहिमांप्रसंगी जिजाऊसाहेबांनी महाराजांना ज्या शब्दांत पत्रे पाठविली, ती पाहता आणि महाराजांनी आग्र्याला जात असताना ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यकारभार मातोश्रींच्या हाती सोपविला, तो पाहता, या मायलेकरांचं परस्परांच्या जीवनातील आदरणीय अढळस्थान लक्षात आल्याखेरीज राहात नाही.

हा ग्रंथ अखेरच्या पृष्ठापर्यंत वाचनीय झालेला आहेच, मात्र, अफझलखानाची स्वारी आणि महाराजांची आग्राभेट या प्रसंगांचे वर्णन करताना लेखकाची लेखणी तुफान चालली आहे. सदर प्रसंगांची ससंदर्भ माहिती देत असतानाच त्यात गुंतलेले तत्कालीन राजकारणाचे अनेक बहुरंगी पदर त्यांनी अत्यंत लीलया उलगडून दाखविले आहेत. त्याचप्रमाणे महाराजांची मुत्सद्देगिरीही त्यांनी त्या त्या ठिकाणी प्रत्ययकारितेनं दाखवून दिली आहे.

हाताखालच्या मावळ्यांप्रती, सहकाऱ्यांप्रती महाराजांना असलेली प्रचंड कणव, माया, स्वतःचा आब राखण्याची आणि समोरच्याला तो मान्य करण्यास भाग पाडण्याची- मग तो दिल्ली तख्ताचा बादशहा का असे ना, यांसह महाराजांचे अनेकविध गुणसमुच्चय विविध प्रसंगांमध्ये लेखकानं दाखविले आहेत. महाराजांचे संघटन कौशल्य, त्यांची राजनैतिक शैली, त्यांचे जबरदस्त संभाषण कौशल्य, समोरच्याला आपले म्हणणे केवळ पटवून देण्याचेच नव्हे, तर त्याच्या गळी उतरविण्याचे त्यांचे कसब हेही अतिशय तपशीलानं स्पष्ट केलं आहे. विशेषतः पुरंदरच्या तहाप्रसंगीचे महाराजांचे मिर्झाराजे जयसिंहांसमवेत तयार झालेले संबंध आणि महाराजांनी त्यावेळी घेतलेली भूमिका हे त्यांच्या राजनितीचे आणि संभाषणचातुर्याचे मोठेच उदाहरण ठरावे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये रयतेच्या कल्याणाची कामे केली, आपल्या राज्यकारभाराची आखणी केली, सामाजिक-आर्थिक धोरणे आखली, अष्टप्रधानांच्या कार्याची रचना केली, ती पाहता भारतात लोकशाही मूल्यांचा पाया घालणारे छत्रपती हे आद्य व्यक्तीमत्त्व होते, हे सिद्ध करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

मराठी भाषेचे छत्रपती हे फार मोठे आणि आद्य पुरस्कर्ते होते, हेही त्यांच्या राज्य व्यवहार कोषाच्या निर्मितीवरुन आपल्या लक्षात येते. या माध्यमातून मराठी भाषेचे राजकीय व्यवहारात प्रचलन तर त्यांनी केलेच, शिवाय ऊर्दू आणि फारसी भाषेचे आक्रमण थोपविण्याचे कार्यही साधले, असे निश्चितपणे म्हणता येते.

महाराजांचे धर्मनिरपेक्ष, सहिष्णु धोरण सप्रमाण अधोरेखित करताना लेखकानं त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मुस्लीम कर्मचाऱ्यांची यादीच पुस्तकात दिली आहे. केवळ यादी देऊन ते थांबलेले नाहीत, तर त्यांनी हिंदवी स्वराज्याला नेमके कोणते, योगदान दिले, याविषयीही विवेचन केलं आहे. त्याचप्रमाणं महाराजांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची अनेक उदाहरणं त्यांनी दिली आहेत. आधुनिक शस्त्रास्त्रांसाठी इंग्रज व्यापाऱ्यांशी संबंध, दुर्गबांधणीच्या कौशल्य व तंत्रज्ञानासाठी पोर्तुगीजांची मदत, औरंगजेबाच्या दख्खन स्वारीप्रसंगी आदिलशाही, निजामशाहीसमवेत संगनमत, शत्रूच्या गोटातील प्रभावी व्यक्तीमत्त्वांशी छुपी मैत्री अशा गोष्टी महाराजांनी वेळोवेळी केल्याच; मात्र, वेळ आली तर अशा लोकांना धडा शिकवायलाही कमी केले नाही. ज्याला त्याला, ज्याच्या त्याच्या मापात ठेवण्याची मुत्सद्देगिरी ही महाराजांच्या जीवनचरित्रापासून धडा घेण्यासारखी बाब आहे.

महाराजांचे शेतीविषयक धोरण, त्यांची व्यवस्थापन कौशल्ये या विषयी ग्रंथात प्रकाश टाकला आहेच; मात्र, सिंधुदुर्गाच्या रचनेचा नकाशा स्वतः महाराजांनी केला आणि त्याबरहुकूम तो बांधून घेण्यासाठी मार्गदर्शनही केले. महाराजांनी विविध किल्ले आणि दुर्ग उभारणीच्या कामी पोर्तुगीज, इंग्रज तज्ज्ञांचे वेळोवेळी सहाय्य घेतले. त्यावेळी महाराजांचे स्थापत्यविषयक ज्ञान पाहून त्यांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. त्यांनी तशा नोंदी केलेल्या आहेत. महाराज भारतीय आरमाराचे जनक खरेच, पण त्यांच्या या स्थापत्यविषयक ज्ञानाची माहिती मात्र या निमित्तानं वाचनात आली. या संदर्भाने महाराजांचा आणखी तपशीलात अभ्यास होण्याची आज गरज आहे.

एकूणातच, प्रथम शिवचरित्रकार कृष्णाजी अनंत सभासद, मोगल इतिहासकार खाफीखान महंमद हाशीम, मोगल सैनिक व वृत्तलेखक भीमसेन सक्सेना (या सक्सेनाने महाराजांना प्रत्यक्ष पाहिले होते आणि त्यानेच महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचे तपशीलवार वर्णन करून ठेवले आहे.), इतिहासकार सर जदुनाथ सरकार, जेज्युईट पाद्री फ्रैं. ल्याने, ज्येष्ठ इतिहासकार सेतुमाधवराव पगडी, सुरेंद्रनाथ सेन आणि डॉ.बाळकृष्ण यांच्यासह अनेक इतिहासकारांनी छत्रपतींविषयी लिहीलेल्या संदर्भग्रंथांचा आधार घेऊन प्राचार्य पठाण यांनी साकारलेला हा ग्रंथ प्रत्येक शिवप्रेमीने वाचायलाच हवा, इतका उत्कट झालेला आहे.

 

पुस्तकाचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज

लेखक: प्राचार्य डॉ. ईस्माईल पठाण

प्रकाशक: महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर

पृष्ठे: ६७१

किंमत: रु. ८००/-

1 टिप्पणी:

  1. इतके सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण एतीहासिक संदर्भ असणारे शिव चरीत्र शिवजयंती अगदी तोंडावरअसताना वाचण्यास उपलब्ध झाले तर खर्या अर्थानं ही शिव जयंती सार्थकी लागेल...खरच खूप छान माहिती लिहून प्रा.इस्माईल पठाण सर यांच्या छत्रपती शिवजी महाराज या नवीन पुस्तकाची ओळख करून दिली दादा....👌👌

    उत्तर द्याहटवा